सकाळ झाली .
मी जागा झालो, तो थोडासा कण्हतच.
बायकोने कपाळावर हात ठेवला आणि किंचाळली - "अगबाई !"
सर्व घरदार जागे झाले -
मुलाने तापमापकनळी माझ्या तोंडात खुपसली
म्हणाला -"एकशेएक ताप आहे !"
बायकोने
पट्कन देवीचा अंगारा माझ्या कपाळाला लावला..
थोरल्या सुनेने
स्वामी समर्थाचा अंगारा लावला..
धाकट्या मुलाने
कुठल्याशा अप्पामहाराजाचे भस्म लावले..
धाकट्या सुनेने
साईबाबाच्या फोटोपुढची उदी लावली..
थोरल्या मुलाने
भक्तमहाराजाची विभूती लावली..
भावाने
रामरक्षा म्हणायला सुरुवात केली..
बहिणीने
कुठल्यातरी पोथीत तोंड खुपसले..
मी विभूतीउदीअंगाराभस्मावगुंठीत माझे कपाळ धरून,
होतो तसाच कण्हत राहिलो . . .
सर्वांना विचारले -" झाले का तुमचे सगळे ?"
एकसमयावच्छेदेकरून सर्वांचे उत्तर आले -"हो !"
थोरल्याला जवळ बोलावले आणि म्हणालो-
"आता सर्वांनी मिळून महामृत्युंजयजप सुरू करण्याआधी,
फ्रीजमधली ती तापाची गोळी आणि पेलाभर पाणी दे ."
पाणी पीतपीत, गोळी घशाखाली ढकलली आणि -
दहाच मिनिटांत पुन्हा मस्त घोरायला लागलो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा