केले स्वागत प्राजक्ताने
सुगंध वाऱ्यासोबत धाडून-
निरोप प्रेमळ दिधला त्याने
छान फुलांचा सडा घालून ..
.
काड्या मोजक्या सुखाच्या
पाने असंख्य दु:खांची-
विधात्याने बनवली अजब
पत्रावळ आयुष्याची..
.
कायदे करण्यास असती
उत्सुक ते आमच्यासाठी-
पळवाटा शोधण्यात आम्ही
तत्पर ते मोडण्यासाठी..
.
कळते न ज्यातले काही
हमखास भाष्य त्यावर -
औषध मिळेल कोठे
या मानवी स्वभावावर ..
.
कागदाचे अंगण प्रशस्त समोर
शब्दांच्या धारा टपटप झरती -
नाचायला अधीर लेखणीचा मोर
कवितेचा पिसारा झपझप वरती ..
.
काटे आहेत म्हणून
गुलाबाने फुलू नये का -
आठ्या आहेत चेहऱ्यावर
स्मित आणू नये का ..
.
किती हा उन्हाळा, लागले
रिकामटेकडे कण्हायला -
घाम गाळत कष्टकरी लागले
ओझे उन्हाचे उचलायला ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा