“दत्त दिगंबर, दत्त दिगंबर” सारे नाम जपू या
आपण भजनी दंगून जाऊ आता
तल्लीन होऊ टाळ्या वाजवू त्याचे स्मरण करू या
आपण भजनी दंगून जाऊ आता ..
तीन मस्तके सहा हात हे शोभुनी दिसती छान
दत्त दिगंबर नाम स्मरणी डुलते आपली मान
नाद घुमे त्या जयघोषाचा रंगत त्यात जाऊ या
आपण भजनी दंगून जाऊ आता ..
वसुंधरा ही उभी घेउनी गोमातेचे रूप
चार वेदही उभे भोवती श्वान किती अप्रूप
छान साजरे उभे ध्यान हे डोळे भरुनी बघू या
आपण भजनी दंगून जाऊ आता ..
चक्र सुदर्शन एका हाती शंख तो दुसऱ्या हाती
हाती धरले त्रिशूल कमंडलू भस्म लावले माथी
दर्शन घेता गुरुदत्ताचे धन्य धन्य होऊ या
आपण भजनी दंगून जाऊ आता ..
.