तीन चारोळ्या -

१)

'चेहरा -'

तू असल्यावर माझा चेहरा 
स्वच्छ पुसलेला आरसा असतो -
तू नसतेस तेव्हाच सखे 
पारा उडालेला आरसा दिसतो . .
.


२)

'काकदृष्टी-'

बागेमधली सुंदर फुले 
दाखवली सगळी मी त्याला - 
कौतुक करणे दूर राहिले 
'निवडुंग कुठे' विचारुनी गेला ..

. .


३)

'खात्री -'


रडायचे दु:खात मला जर 
असतो आधार तुझाच खांदा -
खात्री आहे मला रे दोस्त 
शेवटी पहिला तुझाच खांदा . .

. . .

वजनदार उपास

येता जाता येरझाऱ्या घालत, 
बायको आरशापुढे उभी राहत होती .
स्वत:ला डोळे भरून न्याहळत होती .

न राहवून शेवटी मी विचारलेच -
" आज आरशाला कशी काय संधी ब्वा एवढाssssss वेळ ? "

ती पुन्हा आरशात पाहत उत्तरली- 
" काय करू समजत नाही . 
बघा ना, वजन कित्ती वाढतच चाललय ! "

मी म्हणालो-
" तू तर श्रावणात सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, 
गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी माता देवीचा, 
शनिवारी शनीचा/मारुतीचा, रविवारी खंडोबाचा...
असे कितीतरी उपास करत असतेस ना .. 
शिवाय पंधरा दिवसाच्या, त्या दोन एकादशा आहेतच उपासाच्या !"

ती मला मधेच थांबवत म्हणाली-
" उपास करतेय ना ? मग वजन कमी नको का व्हायला ? "

मी म्हटले-
" हो ना ! वजन कमीच व्हायला पाहिजे ग !
पण तुझे हे सगळे उपवास.. म्हणजे खाण्याचे पदार्थ दुप्पट खास ! 
वजन कमी व्हायचे असेल तर, मुळात कमी खायला पाहिजे ना ?
तुझे उपासाचे ढीगभर पदार्थ आणत आणत ......
हे बघ माझेच वजन कमी होत चाललेय ! "
.

योगायोग ?

बरेच महिने झाले,
या ना त्या कारणाने,
जेवणात आवडीच्या भाकरीचा योग काही येत नव्हता !

काल बायकोने जेवणात नेहमीप्रमाणेच
 आमटी, पोळी, भात, वांग्याचे मस्त भरीत आणि छानशी पालेभाजी केली होती .

तरीपण मी म्हणून गेलोच -
"आज तरी भाकरी पाहिजे होती ! "

बायको उत्तरली -
"भाकरी ताटात पडायलाही,
 नशीबात असाव लागत.. बर का !"

. . . आज एका मित्राचा फोन आलाः

" गजानन महाराजांच्या पोथीच्या
पारायणाच्या समाप्तीनिमित्त,
उद्या दुपारी तुम्ही उभयता 
भाजीभाकरीच्या प्रसादासाठी
आमच्याकडे यायच आहे ! "
.

कुणाच्या कांद्यावर कुणाचे बोजे


(चाल- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे )

कुणाच्या कांद्यावर कुणाचे बोजे ..

कशासाठी उतरावे दर शेतातून 
बळीराजे राबती शेती जीव ओतून 
जगतात बळे रानी मनात कुढून 
तरीच घरी येतात कांदे हे ताजे ..

शेत सारे पडीक ते पाणी न मिळून 
रोप जाते दुष्काळात गळून मरून 
पिकासाठी घेती कर्ज ब्यांकेत जाऊन 
ठरती ते कर्जबुडवे नोटीसही गाजे ..

खंत त्याला शेतातही विहीर न साधी 
व्यापाऱ्याची गोणी भरते चंगळवादी 
दलालांची पोळी भाजे शेत पेटे आधी 
घेत दोरी आत्महत्या झाडावरी गाजे ..

.

एक कांदा झेलू बाई, दोन कांदे झेलू

एरव्ही -

मंडईतल्या
कांद्यांच्या कट्टयाकडे
ढुंकूनही न बघणारी 
बायको ...

हल्ली -

मंडईतून जाताना,
इतकी टक लावून...

कांद्यांची पोती 
डोळे भरून बघत असते की ..

जणू सराफकट्ट्यातील शोकेसमधले
सोन्याचांदीचे दागिनेच बघत आहे !
.

जय कंकालेश्वर

दुपारी एक वाजता 'पुणे ते बीड' यष्टीत बसलो आहोत.

सव्वा पाच वाजले असले तरी, 
'अखंडबडबडव्रती' अर्धांगी 
काहीतरी बडबड नक्कीच करत असावी, 
असा मला दाट संशय येतोय !

साहजिकच,
'कशावरून' असे तुम्ही विचारणार-
मला ही खात्री आहे !

माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत,
मान हलवत,
तिच्या तोँडाच्या अविरत सतत अखंडपणे 
हालचाली चालूच आहेत ना हो !

मी एक वाजताच,
तिकीट काढल्यापासून,

माझ्या कानात गाणी ऐकण्यासाठी,
मोबाईल चालू करून,
हेडफोनच्या वायरी अडकवून बसलोय ... 

आणि गाण्यांच्या तालावर मुंडी हलवतोय..

तिला गोड गैरसमजात वाटत असणार की, 
मी तिच्या बोलण्याला प्रतिसाद देतोय !

एकुण काय तर............ दोघेही खूषच !

अजून अडीच तासांचा तर प्रश्न आहे,
देव करो -
मोबाईलची ब्याटरी तेव्हापर्यंत टिको  
आणि तिच्या लक्षात हे न येवो !
.

चारोळ्या -

'भक्ती भाव-'

देवा तुझी किती 
अगाध रे लीला -
मी तुझ्या पायाशी 
ध्यानी मात्र चपला ..
.

'अगतिक -'

देवळातल्या देवाच्या  
पायावर हात मी ठेवत आहे -
देवाशपथ, खरं सांगतो  
शंभर टक्के मी नास्तिक आहे ..
.

दोन चारोळ्या -

काट्यांचे पसरून अंथरुण
झोपायाची सवय जाहली -
पसरली कुणी अंथरुणावर
फुले नेमकी टोचु लागली . .
.


कौतुक करायला कशी 
जीभ आमची कुरकुरते -
निंदा चघळायला मात्र 
चारचौघात चुरचुरते ..
.

बहाणा

विरहाची परमावधी 
झाल्यानंतरच्या,
आपल्या पहिल्या भेटीत -

तू 
डोळ्यात कचरा गेल्याचे
निमित्त सांगतेस,
आणि -

पदराच्या टोकाने 
डोळ्याच्या कडा
हळुवारपणे
टिपून घेतेस -

खरं सांगू ?

तुझ्या 
अश्रू लपवण्याच्या 
त्या बहाण्याला -

मनापासून 
दाद दिल्याशिवाय 
राहवतच नाही ..
.

बाप


घरच्यांचे कौतुक करावे वाटते 
ऑफिसात शाबासकी घ्यावी वाटते

इच्छा असते, वेळच नसतो 
मनात खूप हुरूप असतो

लाडक्यांचे उत्साहात चाळे
गैरहजेरीतही उत्सुक डोळे

कर्तव्य असते घरदारासाठी 
नीतीनियम ऑफिसात पाठी

टुकार काम करायचे नसते 
चुकार होऊन चालत नसते

ऑफिसात तन असते दंग 
संसारात मन असते गुंग 

बॉसपुढे नमायचे असते 
बायकोपुढे दमायचे असते 

बॉसला कामाने कमवायचे 
बायकोला गजऱ्याने रमवायचे 

ऑफिसला फार जपायचे असते 
संसाराला सांभाळायचे असते

कुरकुर बॉसची ऐकली तरी 
हुरहूर भेटीची लागतेच घरी  

तारेवरची अजब कसरत 
कुणा मुखी न यावी हरकत

बाप रे बाप, किती हा ताप 
धावपळीतहि आवरत संताप

कपडा आत कधी फाटका 
संसार चालतो तरी नेटका 

कामाचा अश्रू दाखवायचा नाही 
नामाचा आनंद चुकवायचा नाही  

दु:खातही हसत खेळत बाप 
तोलत असतो कर्तव्याचे माप ..
.

फुटकी जवळ न कवडी माझ्या खिशात आता ..[गझल]

फुटकी जवळ न कवडी माझ्या खिशात आता 
कोणीच येत नाही माझ्या घरात आता..

कोणी न कार्यकर्ते सारे चुकार कामी 
उपदेश मात्र करती एका सुरात आता.. 

आरंभशूर जो तो थांबे न कार्य घडता  
बेकार पळपुट्यांची नाही ददात आता.. 

पूजेस टाळतो जो घालून साकडे तो 
देवास हाक मारी बुडता पुरात आता.. 

देणे न योग्य वाटे नशिबास दोष अपुल्या  
सामर्थ्य जाणले का या मनगटात आता ..
.