रागावुन का गेली प्रतिभा .. [हझल]

रागावुन का गेली प्रतिभा आल्यावाटे तरातरा
काय करावे सुचले नाही घाबरलो मी जराजरा ..

मुकाट बसलो हताश होउन न कळे काहीही मजला
चुकलो कोठे शोधत उत्तर डोके खाजवत कराकरा ..

रागारागाने मी पुढ्यात कागद झरणी घेउनिया
सुटलो निकराने शब्दांशी जवळिक साधत भराभरा ..

संपत आली शाई केली तरीहि घाई लिहिण्याची
खेळत होतो शब्दांशी मी खरडत कविता खराखरा ..

सांग मला तू रसिक वाचका आवडले जर लिहिलेले
नाही तर हे लेखन माझे फाडुन टाकिन टराटरा ..
. 

लुकलुके ती चांदणी का --[गझल]

लुकलुके ती चांदणी का रोज पाहुन मजकडे
तूच का ती भास सखये लक्ष ठेवुन मजकडे ..

माळलेला मी सखे तुज आवडे गजरा किती
आणतो संदेश वारा खूष होउन मजकडे ..

खूप झाली नजरभाषा आपली नजरानजर
शब्दही कंटाळले का बघत राहुन मजकडे ..

ना करी स्वीकार माझा टाक करुनी ठार तू
ना करी तू वार बसुनी नजर लावुन मजकडे ..

जीवनी अंधार माझ्या ह्या जगा पाहू कसे
खेळ असुरी दैव बघते नजर टाकुन मजकडे ..

बोलले ना शब्द एकहि जगत होतो मी जरी
पाहती सरणावरी ते अश्रु ढाळुन मजकडे ..
.

चित्र विचित्र

तळागाळातले कार्यकर्ते 
उन्हातान्हात राबून, 
थंडीपावसात मरून, 
तहानभूक घरदार विसरून, 
कार्य करून, 
फाटक्याच नशिबात गहाळ होतात..

आणि ..

त्यांची नेतेमंडळी मात्र,
अहोरात्र फ्लेक्सवर झळकत, 
संपत्तीत लोळत, 
मानसन्मानात घोळत, 
परीटघडीचे कपडे कुरवाळत, 
पद सत्ता खुर्ची 
पिढ्यानपिढ्या सांभाळत राहतात !
.

आस . .

रांग किती ही लांब आहे  
दर्शन लवकर दे विठुराया,
राहू किती काळ उभा मी
सांग तू मजला रे विठुराया ..

जीवन ओझे झाले आहे 
दुःखणे वाढत आहे ..
लवकर दर्शन होतच नाही
काया थकते आहे ..
घेतो जमेल तितके नाम
जिवाला चैन ना आराम
घडले नाही दर्शन आता 
माझा जन्म जाईल वाया ..

दिंडी चालत झाल्या वा-या 
नामस्मरण मुखी या ..
चिपळ्यासंगे टाळ हाती या   
पाठीशी तुझी माया ..
आस तुझ्या भेटीची आहे
ध्यानी चंद्रभागा वाहे
स्नानानंतर आतुर आहे  
माथा चरणावर ठेवाया ..
.

खास दिवाळीसाठीः

ऐन दिवाळीत शिमगा नको म्हणून,
तुमच्या अर्धांगीने खास तुमच्यासाठी मन लावून केलेल्या ...
तुमचे मजबूत दात तुमच्याच घशात घालणा-या,
केवढ्याही कसल्याही लाडू, चकलीचे
तुम्हाला हव्या त्या आकाराचे प्रकाराचे 
तुकडे, चूर्ण, वड्या 
क्षणात आणि कमी त्रास कष्टात करून मिळण्यासाठी . . .
खास खलबत्ता, 
लहान मोठ्या आकाराची करवत, 
हाताळणीय हातोडी, 
दंतवाचवणयंत्र, 
भुगाकरणीयंत्र 
माफक किँमतीत मिळतील.
.

दोष ना कुणाचा . .

पळाला लंगडा जोराने

पाहिले त्यास आंधळ्याने


साद घातली त्या मुक्याने 

ऐकली निमूट बहि-याने ..


हात ओले करतो जोमाने

पाहिले मुकादम काँट्-याक्टरने


पडावे खड्ड्यात जनतेने

बघावे निमूट शासनाने ..

.

खूप जाहल्या गाठीभेटी --[गझल]

खूप जाहल्या गाठीभेटी आज समाप्ती मौनाची
मोकळीक देऊ ओठांना भाषा बोलत शब्दाची ..

वाटत बघुनी आहे भीती पाझर अश्रूंचा नयनी
वाटली कधी भीती न मनी होती त्या जलप्रलयाची ..

चेहऱ्यास तव आठवता मी गायब थकवा का होतो 
दगदग सगळी माझी विसरुन जातो मी दिवसभराची ..

हलवतो हळू चावट वारा येता जाता पडद्याला
हुरहुर तिजला बघण्या वाढे सोबत धडधड हृदयाची ..

विखुरती फुले प्राजक्ताची सुंदर जमिनीवर सारी
गंध आसमंती पण विहरे किमया न्यारी का "त्या"ची ..
.

रीत स्वागताची ही न्यारी ..[गझल]

रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी ..



करतो उत्साहाने प्रयत्न धडपडून मी जगण्याचा
ससा नि कासव कथा तीच ती अजून ऐकत आहे मी ..

कोसळला ना कधीच धो धो लहरी तो पाऊस जरी
भरून वाटी चिमणीपुरते पाणी ठेवत आहे मी ..

लागुन ठेचा होतो जखमी प्रेमाच्या खेळात जरी
असते आशा अमर जाणुनी तसाच खेळत आहे मी ..


कर्जातुन घेतल्या घराचे दार बंद ठेवतो सदा
अतिथी देवो भव म्हणण्याला किती घाबरत आहे मी ..


शिते जिथे ती भुतेहि जमती शिकलो ज्ञानातून असे
माया पोटापुरती जमवत नाती टाळत आहे मी .. 
.

कुठे कशी फिर्याद करू मी ..[गझल]

कुठे कशी फिर्याद करू मी झाली हृदयाची चोरी
हिंडत आहे करून चोरी प्रेमिकाच वर शिरजोरी ..


फसले नाटक तुझे छान ते चोरुन बघण्याचे ग मला
होता नजरानजर आपली का होशी गोरीमोरी ..


घेण्या झोके मनासारखे प्रयत्न जीवनभर केले
समजायाला उशीर झाला नियती हाती ती दोरी ..


असता सोबत तुझी मला ती गिरवत होतो नाव सखे
सुटली अर्ध्यावरती सोबत आहे ती पाटी कोरी ..


दार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती
दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी ..

.

नसती सुरेख मोहकशी --[गझल]

नसती सुरेख मोहकशी खळी तुझ्या जर गालावर      
नसते बसले मन माझे घिरट्या घालत मग त्यावर  ..

सहज एकदा पडली त्या आरशावर नजर माझी 

प्रतिबिंबाला पाहुन मी गेलो भाळुन माझ्यावर  ...

गाढ झोपलो असता मी स्वप्नी सुंदरशा ललना  
सगळ्या पसार का होती पण मी जागा झाल्यावर ..

झाली वाटुन अर्धी ती स्थावरजंगम पाहुनिया
एक वाटणे आईचे काळिज उरले अर्ध्यावर ..

बसलो मारत गप्पा मी नावाशीहि निवांत तुझ्या
लिहिले होते नाव तुझे कागदाच्याच तुकड्यावर ..

बभ्रा केलाच गावभर उघडपणे पण वाऱ्याने
जरी माळला गुपचुप मी गजरा तुझ्या ग केसावर .
.