महागाई---महागाई ---

                                             
कौतुक सोन्या-चांदीचे 
गगनी भाव जरी भिडले 
गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी       
दागदागिने बहु घडले !  

थेटरातला चालू आहे 
उघडा काळाबाजार 
पहिला खेळच पहायचा  
जडला आहे आजार ! 

चार चाकी दोन चाकी 
वाहने उच्चांकात नवी        
भाव वाढते पेट्रोलचे 
नको सायकल चैन हवी !
   
ग्यास रेशन कपडालत्ता 
गरजा सोडुन भलतिकडे     
कर्जामधुनी खर्च वाढतो     
धूमधडाका चोहिकडे ! 

रेस क्रिकेट मैदानावर  
रसिक शौकिनांची गर्दी  
भरले खिसे खाली होती      
खंत ना करी कुणी दर्दी !

पोलिसचौकी समोर आहे 
जुगारअड्डे दारूगुत्ते 
व्यसनी डोलत फेकती पैसा 
खाते पुरते हतबल ते !

रंक रंगीले राव नशीले
मजेत मधला वर्ग आहे   
महागाई.. महागाई..   
आरडाओरड चालू आहे !  
.

[इ साहित्य दरबार..दीपोत्सव २०१८]

का मज नाही आता ती वळूनही पाहत हल्ली - [गझल]

का मज नाही आता ती वळूनही पाहत हल्ली
होतो वळणाआड जरी हळूच मी चालत हल्ली..

असता खुर्ची मानाची नियमित होता भेटत तो
जाता खुर्ची जातो तो समोरुनी टाळत हल्ली..

येता जाता का सांगू उगाच मी दु:खे कोणा
फिरतो आहे हसत हसत मनात ती लपवत हल्ली..

चंद्रासम मी पुनवेच्या दिसे तुला दुर्मिळ आता
येती लाटा नयनातुन उगाच का वाहत हल्ली..

ठरल्यावेळी दोघांची ग भेट ती बागेमध्ये
नसता आपण का जाते ग बाग ती वाळत हल्ली..
.

["पुणे प्रतिष्ठान"- दिवाळी अंक २०१८]

विदूषक

हास्यमुखवटा 
ठेवला काढून 
खास त्याने 
जेव्हा 
आपल्या चेहऱ्यावरचा ...

भाव वेदनेचा
घेतला जाणून 
आरशाने 
तेव्हा 

झाकलेल्या चेहऱ्यावरचा !
.
 ["कुसुमाकर"---दिवाळी अंक २०१८]    

मुखवटा

पुसून आरशास त्या, 
मी पुसून राहतो ,
"नित्य हासरा कसा, 
मी स्वत:स पाहतो ?"
                           
आरसा हळूच हसे
बघुनिया मला पुन्हा,  
प्रश्नांकित चेहरा 
पाहुनिया माझा पुन्हा -


"आहेस एक विदूषक 
रडशी मनातून तू ,
हसविण्यास या जगा 
लपवशी दु:ख तू !

रहस्य सांगतो तुला, 
नीट ऐक रे जरा- 
चेहऱ्यावरचा मुखवटा  
काढुनिया बघ जरा !"
.

[ Marathi Culture and Festivals- दिवाळी डिजिटल अंक २०१८]

शपथ मला तू घालायची-- [गझल]

मात्रावृत्त- मुरजयी   ,  मात्रा- ८+७ 
अलामत- आ 
---------------------------------------
शपथ मला तू घालायची 
सदैव ती मी मोडायची..
.
समजूतदार व्हायचे मी 
त्राग्याने तू वागायची .. 
.
उत्सुक आहे मी समजून 
गुपिते कानी सांगायची ..
.
रुसवाफुगवा कायम तुझा 
समजुत मग मी काढायची ..
.
घरात गोंधळ ग सगळ्यांचा 
संधी अचूक साधायची ..
.
भांडणतंटा रोजचा पण 
काडी न कधी मोडायची ..
.

करतो विचार कोणी--- [गझल]

वृत्त-  आनंदकंद ,   मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- आ  ,   गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------
करतो विचार कोणी व्याकूळल्या जिवाचा  
दगडास बघुन कोणी अभिषेकही दुधाचा ..
.
स्वप्नात रोज भिजतो घेऊन मी सखीला 
का वास्तवात नसतो पत्ताच पावसाचा ..
.
लढतो जवान तिकडे जातीस विसरुनीया 
नेत्यात चुरस इकडे हा कोण तो कुणाचा ..
.
नाभीत कस्तुरी पण जाणीव ना तयाला 
शोधात जीव होई हैराण का मृगाचा ..
.
ही जीत तर सख्याची हर्षात नाचते ती 
मुद्दाम हारते ती मग डावही सख्याचा ..
.

["चपराक"- दिवाळी विशेषांक २०१८]

चार चारोळ्या

 रोज रोज तोच आरसा 
रोज तोच बघणे चेहरा -
टाकला बदलून आरसा 
अशक्य बदलणे चेहरा..
.

"अरे वा, छान" म्हणणारा 
खुषमस्कऱ्या पदोपदी दिसतो -
वाईटाला वाईट म्हणणारा 
खरा मित्र एखादाच असतो !
.

नभांगणीच्या चांदण्यांना त्याने
पाठवले आहे ढगाआड -
गृहांगणीच्या माझ्या चांदणीला 
पाहतोय मत्सरी चंद्र लबाड ..
.

वारा तिकडे वाहत आहे
सखे, मीही तिकडे येत आहे -
तुझी चाहूल त्याला आधी 
त्याची सवय माहित आहे ..
.

["कलाविष्कार" e दिवाळी अंक- नोव्हेंबर - २०१८ ]

ती हसल्यावर मीही हसतो- - - [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक ,  मात्रा-  ८+८ 
अलामत- अ , गैरमुरद्दफ 
------------------------------------------
ती हसल्यावर मीही हसतो 
उशिरा कळते तिथेच फसतो ..
.
नभ दुष्काळी वेडी आशा 
पडीक असुनी जमीन कसतो ..
.
मृगजळ दिसता धावत सुटतो 
खिन्न होत मी मुकाट बसतो ..
.
राजकारणी जेथे तेथे 
बोलू खोटे विचार डसतो ..
.
विसरू जाती करुया एकी 
म्हणता कोणी समोर नसतो ..
.

तीन हायकू

१.
आनंदी सण
घातक प्रदूषण
काय करावे ..!
.

२.
किती भावली
आनंदी दीपावली
जग खुषीत ..!
.

३.
आनंद न्यारे
कुठे दुष्काळी वारे
कुणाला पर्वा ..!
.

" कागदाची नाव डोले --" गझल

कागदाची नाव डोले बघ सखे आनंदुनी
डोलते जणु बालपणची अठवण हृदयातुनी
.
सवय इतकी बडबडीला ऐकण्याची जाहली
कान माझे त्रासती का मौन हे तव ऐकुनी
.
बे दुणे चारात कळले दु:ख दुप्पट नेहमी
जीवनाचे पाठ झाले फार पाढे घोकुनी
.
सजवण्याची का तरूला लहर आली पावसा
पान बघुनी छान मोती हळुच गेला ठेवुनी
.
ना कधी संवाद घडला मिटरमध्ये आपला
जीवनी काही न अडले खास गझलेवाचुनी..
.

["नेटभारी... ई दिवाळी अंक २०१७ "- पान ३६]