कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे.. गझल

लवंगलता वृत्त..(मात्रा- ८+८+८+४,
रदीफ- येथे, काफिया- सादर, घागर,
अलामत- अ )

कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे
पाणी ओतू नका पालथी आहे घागर येथे..

संस्काराचा लवलेश कुठे आढळतो ना जेव्हा
विनयभंग तो समजत फासू मुखास डांबर येथे..

निर्दयतेने झाड तोडतो उत्साहातच कोणी
असेल पण त्या चिमणीलाही दु:ख अनावर येथे..

पाखराविना उदास आहे उभे झाड हे आता
फळभाराने झुकले तेव्हा होता वावर येथे..

सबला होते हतबल अबला निर्धार जरी केला
मानव का तो वासनेमुळे बने जनावर येथे..
.

दाही दिशांना गाजत आहे ..

दाही दिशांना गाजत आहे विठुरायाची कीर्ती
विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने नयनी साजिरी मूर्ती

हात कटीवर पाय विटेवर उभा छान विठुराया
रात्रंदिन तो उभा तरीही थकली नाही काया

विठ्ठल विठ्ठल नाम या सारे भजनी रंगत गाऊ
विठुरायाच्या जयघोषाला ऐकत दंगत जाऊ

चंद्रभागेच्या तीरावर मेळा जमला भक्तांचा
सामिल होऊ चला चला सत्संग तिथे संतांचा

टाळचिपळ्यांच्या गजरामध्ये तल्लीन होतच राहू
सावळ्या विठुरायाला आपल्या डोळे भरून पाहू




मी देशाभिमानी...

हिमालयाचा मुकुट मस्तकी 
उभी ही धारण करुनी
विराजमान झाली छान 
सागरांच्यामधे तिन्ही
अशा या भारतमातेचा 
सुपुत्र मी देशाभिमानी..

प्रयत्न असतो जाण्याचा 
सत्याच्या मार्गावरुनी
परदेशावर कुरघोडी 
शांती सलोखा राखुनी
उंच फडकत्या तिरंग्यापुढे 
झुकतो मी देशाभिमानी..

जवान किसान देशामधले 
होती अमर जन्म घेऊनी
दु:ख विसरुनी ताठ कण्याने 
वारसदार जगती मानी
अडचणीत त्यांच्या मदतीला 
तत्पर मी देशाभिमानी..

स्नेहभाव माया आपुलकी 
आदर विविध राज्यांमधुनी
सुकाळ दुष्काळ परिस्थितीत 
जगतो जो तो धडपडुनी
प्रतिकूल स्थितीतही लढायला 
सज्ज मी देशाभिमानी..

जन्म कुशीत भारतमातेच्या 
सुटका न हवी तिच्यापासुनी
सुखी आनंदी तिला पाहण्या 
येईन पुनर्जन्म घेऊनी
नागरिक भारतमातेचा मनी 
कृतज्ञ मी देशाभिमानी.. !
.

प्रजासत्ताकदिन...

लोकशाही राज्यघटना 
आदर्श आली अंमलात,
आज साजरा करायचा 
प्रजासत्ताकदिन कौतुकात..

लोकांचे लोकांनी लोकांसाठी 
बनले आहे आपले राष्ट्र,
जनमनकानोशासाठी 
सदैव आपल्यापाठी राष्ट्र..

रांगोळी रोषणाईत सजवू
प्रजासत्ताकदिन हा महान,
गल्लीबोळ शाळा ऑफिसात 
वाढवूया हो त्याची शान..

राष्ट्रीय एकात्मता आणखी 
सर्वधर्मसमभाव जपूया,
तिरंग्याचा मान राखण्या 
या सारे वंदन करूया..!
.

विठ्ठल विठ्ठल नाम जपूया .. (भक्तीगीत)

विठ्ठल विठ्ठल नाम जपूया
विठ्ठल नामस्मरणी रमूया
डोळ्यासमोर सुंदर मूर्ती 
हृदयी विराजमान करूया !

टाळमृदुंगाच्या तालावर
भजनामधे रंगूया
तल्लीन होऊन करुनी जागर
कीर्तनात दंगूया
संकटकाळी अपुला त्राता
पंढरीनाथा वंदन करूया ! 

पांडुरंग तो उभा विटेवर
हात कटीवर दोन्ही
युगे युगेही लोटली किती
दमला नाही अजूनही
सारे प्रदक्षिणा घालूया
विठूचा जयजयकार करूया !
.

चिमणी पाखरे

चिमणीपाखरे व्याकूळ होती
पंखांना हलवत भिरभिरती 
दाही दिशा पाण्यास्तव फिरती
जीव बिचारे किती हिरमुसती..

कुठे रोपटी कुठे फुले ती
झाडे नाहीत अवतीभवती
खांब नि सळया उंच इमारती
शोधत दमती हिरवाई ती.. 

हौद नि पाईप नजरेपुढती
नळातून जलथेंब न पडती
पाणवठे कोरडेच दिसती
गाणी कुठली मोटेवरती..

इकडेतिकडे जरी धावती
फेऱ्यातूनच ती तडफडती
चिऊ काऊ गोष्टीतच उरती
गोडगोड गाणी चित्रापुरती..

डोंगर फोडून झाडे तोडती
निराधार पाखरे बनवती
झाडे जगवा झाडे भवती 
फतवा नुसता कागदावरती..

चिमणी पाखरे उदास होती
आश्रयास आधार शोधती 
का माणसे जिवावर उठती
माणुसकीस काळिमा फासती..

मुर्दाड मनाची माणसे किती
पाखरांची मुळी कोणा न क्षिती
होणार कधी मानवी जागृती-
 वाढेल का प्रेम निसर्गाप्रती ?
.

जादूची छडी..(बालकविता)

आई ग आई, मला झोप आली
परीला भेटायची आता वेळ झाली

थापट हळूहळू माझ्या ग डोक्यावर
स्वप्नाची चादर मी घेईन अंगावर

परीशी स्वप्नात होईल माझी भेट 
मागेन मी तिला जादूची छडी थेट

सर्वांसाठी किती ग घरात राबतेस
थकवा मनातल्या मनात लपवतेस

जादूची छडी सर्वच करील काम
आई, तू घे विश्रांती कर आराम

दाखवीन जादूच्या छडीची कमाल
संपवीन आई, तुझे नक्की मी हाल

आई ग आई, मला झोप आली
बघ ना परी मला भेटायला आली !
.

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे.. (गझल)

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे
सख्खा भाऊ पक्का वैरी बनवत आहे

बघून वावर माझ्या घरात दु:खाचाही 
घरात आता शिरण्याला सुख कचरत आहे

दिली सोडुनी चिंता करणे मरणाची मी 
यमराजाला आता बसली दहशत आहे

आहे शोधत आता उन्हात का तो छाया 
झाडे तोडुन हाती ज्याच्या करवत आहे

मैत्री जडली दु:खांशीही इतकी माझी
संधी सुखात लोळायाची दवडत आहे
.

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर.. (गझल)

अनलज्वाला मात्रावृत्त -
८+८+८=२४
................................................

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर
गेल्यावर का वेळ वाटते आहे कातर..

विरहानंतर तिला पाहुनी धावत सुटलो
मिठीत होती छान तरी पण नवथर थरथर..

मीही माझी जपली होती नातीगोती
खिसे रिकामे दिसले माझे पडले अंतर..

संवादाची तार आपली जुळली होती 
का मौनाचा आणलास तू मधेच अडसर ..

अनुभव सगळे पाठीशी मी घेतच थकलो
उरले नाही त्राण जीवनी खाण्या ठोकर..
.

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही .. गझल

वृत्त- आनंदकंद
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा
काफिया- खंत अंत वसंत...
रदीफ- नाही
अलामत- अं
....................................................

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही 
जे जे जिवंत त्यांच्या हालास अंत नाही..

दुष्काळ खूप पडला ना ज्ञात पाखरांना- 
शोधात ती फळांच्या कोठे वसंत नाही..

कर्जास हात पुढती कित्येक रोज येती
फेडीस मात्र सौदा त्यांना पसंत नाही..

खड्ड्यात रोज कोणी पडतो नि जीव देतो
मुर्दाड शासनाचे का मन जिवंत नाही..

कुरवाळती स्वत:च्या सगळे सुखास आता
दु:खात कोण रडतो बघण्या उसंत नाही..

इतरांस खास तत्पर उपदेश डोस देण्या
सन्मार्ग चालणारा कोणीच संत नाही..

आहोत आज आम्ही जनता सुखात आहे
हे ऐकणे कुणाला आता पसंत नाही..
.