आनंद लुटू अवघेजण

आज पहाटे पहाटे साडेचार वाजता साखरझोपेतून अचानक जाग आली.

नेहमीप्रमाणे फेसबुकाचे तोंड न पाहता वेगळे काहीतरी करायचे ठरवले.

मोबाईल घेतला.
हेडफोनचे एक टोक त्यात खुपसले .
दुसरी दोन टोकं माझ्या दोन कानात .

गाण्यांचा विभाग शोधला आणि यादीवरून बोट फिरवले.
माझे डोळे झाकून ठरवले.
कुठल्याही एका गाण्यावर बोट थांबू दे.
ते प्रथम ऐकायचे......

आणि काय सांगू मित्रहो -

लता आणि भीमसेनजी माझ्या कानात आपले प्राण आणून गाऊ लागले.
जणू काही माझ्या एकटयासाठीच.

अहाहा .. आधीच पहाटेची शांत वेळ आणि कानात हे गाणे ऐकायला ...

...." बाजे रे मुरलिया बाजे रे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे... "

तुम्हाला सांगितल्याशिवाय कसा बरे राहीन ..

"आनंद लुटणे" म्हणजे आणखी दुसरे काय असते हो ?
 

.

चैन बेचैन

महिनाअखेर सुरू झाला .
मध्यमवर्गाची "चैन" आठवली .

पगाराच्या दिवशीचा पहिला आठवडा ....
खिशातल्या नोटा बाहेर दाखवत,
दुनियेला फाट्यावर मारत,
मस्त मजेत खाऱ्या काजूवर ताव मारणे .

दुसरा आठवडा.... पुढचा हिशेब आठवत,
किसमिसाचे तोबरे भरणे .

तिसरा आठवडा-
इकडे तिकडे बघत, हळूच पुडीतले शेंगदाणे मोजत चरणे ...

आणि...................

शेवटच्या आठवड्यात -
पोरांच्या बरोबरीने जिभल्या चाटत आवडीने लेमन गोळ्या चघळणे !

खरय ना ?
.

आठ चारोळ्या -

'तुझे असून तुझपाशी -'
सगळीकडे शोधत असतो
जेव्हा गुलाबाची फुले लाल 
 त्यावेळीच नेमके दिसतात  
लालीने तुझे फुगलेले गाल !
.

'ज्ञान सांगे लोकाला -'
सांगणार आहे तो आता  
ज्ञान लोकांना दिवसभर  
म्हणून शोधत बसला आहे 
आपला रुमाल साऱ्या घरभर !
.

'संसर्गी हीरो -'
सावलीतही गॉगल घालत 
हीरो बनावयाला  गेलो
' डोळे आले नाहीत माझे - '
सांगत घामाघूम झालो !
.

'कोडे -'
साधा साधा दगड
एवढे घाव सोसून देव बनतो -
माणूस एवढे घाव
सोसूनही "माणूस" का न बनतो ..
.

'मतलबी -'
स्तुती ऐकायला कसे
कान टवकारणे जमते हो -
कौतुक करायलाही तसे
तोंड पुढे येऊ द्या की हो !
.

'शेरास सव्वाशेर -'
सिंह असलो म्हणून काय झाले
उगाच "गैरसमज" करून घेऊ नका -
माझ्याही गुहेत "सिंहीण" आहे
तिच्यापुढे माझी थोरवी गाऊ नका ..
.

'आई -'
सामर्थ्य स्त्रीचे 
जाणून मी आहे -
जगातली एक स्त्री 
माझी आई आहे ..
.

'व्यर्थच -'
सुख म्हणजे काय 
विचारत गेलो घरोघरी -
दु:खातच ते रमलेले 
सारे दिसले घरोघरी ..
.

कवितेचा मोर

कवितेची भट्टी जमली मजला
पाव किलो "श्वास" गोळा केला ..

अर्धा किलो "यातना" त्यात ओतल्या
पाऊण किलो "वेदना"ही मिसळल्या ..

एक किलो "जखमा" शोधून ठेवल्या
दीड किलो "मलमपट्ट्या" वर लावल्या ..

दोन किलो "प्रेम" हळुवार साठवले
अडीच किलो "अश्रू" त्यात गोठवले ..

तीन किलो अशुद्ध, चार किलो शुद्ध
रांगेत ठेवले एक मीटर शब्द ..

एवढा मसाला उत्साहाने जमवला
थोडाही कंटाळा नाही मी केला ..

रसिक/अरसिक थोडे आले समोर
नाचवला माझ्या कवितेचा मोर .. !
.

'विरोधाभास -'

एखाद्याने म्हटले 'अरे '
दुसरा नक्की म्हणतो 'का रे '..

एक आणतो बासुंदी घडा
दुसरा टाकतो मीठखडा..

एखादा 'वा छान ' म्हणतो
दुसरा शेरा 'भंकस ' हाणतो ..

एक आनंदे टाळ्या वाजवी
दुसरा बंद पाडण्या वाजवी..

असे एखादा 'किती छानसा '
दिसतो दुसरा 'असातसा '..

'देव ' एका दगडाचा बनतो 
मात्र दुसरा 'दगड 'राहतो..

सूरत नियत नको एकसमान
पारखावे कैसे साधू-सैतान..!

.

बूमरँग

बातमी वाचली..
आणि बायकोच्या ज्ञानात थोडीशी भर घालावी म्हणून,
मी घाईघाईत स्वैपाकघरात डोकावलो.

बायकोचे दोन्ही हातानी धबाधब कणिक तिंबणे चालू होते.
एका बाजूला लाटणे, दुसऱ्या बाजूला पोळपाट होता. 
सावध पवित्रा आणि सुरक्षित अंतराची काळजी घेऊन,
मी तिला म्हणालो-

" अग, हे बघ !
आपल्या इस्रोने 

त्या कोट्यावधी किलोमीटर अंतरावरच्या मंगळ ग्रहावर,
यशस्वीरीत्या यानाची पाठवणी केलीय आणि मंगळाची माहिती आणली,  बरं का ! "

आपले कणिक तिंबण्याचे कार्य यशस्वीरीत्या चालूच ठेवत,
बायकोने प्रत्यक्ष घाव न मारताही,
एक शाब्दिक तडाखा मला हाणलाच -

" तुम्हीच बघत बसा ! जग कुठल्या कुठे चाललय .
तुम्हाला मेलं साध, 

अर्ध्या फर्लांगावरच्या मंडईत चालत चालत जाऊन,
कोथिंबिरीच्या चार काड्या आणायचे किती जिवावर येतंय ! "

मी खालमानेने आणखी हाल नकोत,
या सूज्ञ विचाराने खालमानेने हॉलमधे परतलो .


.

काटा रुते कुणाला

मी फूल तोडण्यासाठी
हलवले जरा फांदीला..
" हळूच सांभाळून रे.."
आवाज फुलातून आला -


दचकलो.. हाय..थोडा मी ,
बोटातच घुसता काटे..

हुंदके फुलाचे काही
टपकले पाकळ्यांवाटे ..
.

बिन पाण्याने

श्रावणानंतरचा रविवारचा दिवस,
निवांत दिवस !

डोक्यावर आणि हनुवटीवर केसांचा भारा वाढलेला...
म्हटलं चला-
आज सगळा भार उतरवून टाकूया !

केसांची वाट लावायची ठरवल्याने,
पावलांनी आपोआप केशकर्तनालयाची वाट धरली

नाभिकमित्राने बाटलीतून पाण्याचा मस्त फवारा उडवला....
वाटलं....
बहुतेक आसारामकडे होळी साजरी करून आला असावा !

डोक्यावरच्या केसांची वास्तपुस्त झाल्यावर,
 त्याने गमतीने विचारले,
"साहेब, दाढी पाण्याने का बिनपाण्याने ? "

मी उत्तरलो -
" घरी आणि ऑफिसात,

 आमची बिनपाण्याने होतेच -
निदान इथे तरी पाणी वापरा ! "
.

आम्हाला जमणार नाही

दारिद्र्यात खितपत पडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्ता पद खुर्ची सोडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्यअहिंसाशांती रुचणे
आम्हाला जमणार नाही..

शिष्टाचार पाळणे कधी
आम्हाला जमणार नाही..

सुसंस्कृत सदाचारी असणे
आम्हाला जमणार नाही..

घोटाळ्यावाचून जगणे
आम्हाला जमणार नाही..

भाषणात आश्वासन गाळणे
आम्हाला जमणार नाही..

रात्री हेवेदावे दिवसा एकी
आम्हाला जमणार नाही..

लांगूलचालन सोडणे कधी
आम्हाला जमणार नाही.. !
.

दोन चारोळ्या

पाऊसच.... पण-

आवडतो तो पाऊस सखे, 
आभाळातुनी खळखळणारा -
मुळीच दावू नकोस मज तो 
तव नयनातुनी ओघळणारा . .
.


निंदकाचे घर नसावे शेजारी -

आवड प्रत्येक निंदकाची 
जगाच्या पाठीवर आगळी वेगळी - 
दु:ख जाणवता शेजारी 
त्याच्या मनात सुखास उकळी . .
.