लिहिण्यास कारण की -


तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत  दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे? जेवणाचे ताट पुढयात घेऊन, हातातला घास गालात-नाकात-तोंडात व्यवस्थित जातोय का ?- याची फिकीर न करता ' कसलाही ' कार्यक्रम हस्त-यंत्राद्वारे  चाचपणी करत, बदलत पहाणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! निदान येता जाता तरी 'दूरदर्शन संचावरील एकही कार्यक्रम " आज नजर टाकूनही पाहिला नाही, याची मनाला सतत टोचणी लागून राहिलेले 'आता ऑफिसात तोंड कसे दाखवावे ? ' या चिंतेने काळजीग्रस्त झालेले दिसतात !
      ज्यांना बातम्या ऐकायच्या नाहीत , ज्यांना मालिका पहायच्या नाहीत, ज्यांना दूरदर्शन वरील स्पर्धा पहायच्या नाहीत आणि  ज्यांना दूरदर्शनमधे काडीमात्रहि  स्वारस्य नाही - अशी माणसे ' सुखी 'असणार यात शंकाच नाही ! सुखी माणसांना मन गुंतवायला इतर असंख्य उद्योग आहेत. बातम्या नाही ऐकल्या/पाहिल्या तर आकाश कोसळणार नाही ! मालिकांच्या पात्रांत गुंतून पडलो तर त्यांच्या बापजाद्यांची इस्टेट आपली थोडीच होणार आहे ? नाही गुंतलो तरी आपण नरकात थोडेच जाणार आहोत ! ' एस एम एस ' वरच १०१ टक्के अवलंबून असणाऱ्या स्पर्धात भाग नाही घेतला , मरणोत्तर तर आपल्या पिंडाला कावळा शिवायचा थोडाच राहणार आहे - अशा निर्गुण ,निराकार, स्वस्थ , स्थितप्रज्ञ ,उदास ,भकास वृत्तीने जगणारी माणसे खरीच सुखी नाहीत काय ? दूरदर्शनवर दिसणारे जगातील  असंख्य घोटाळे , अगणित भानगडी-लफडी , अतुलनीय भ्रष्टाचार , अवर्णनीय "आदर्श ", अनंत लाचखोर -असल्या फालतू  गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपण बरे नि आपले काम (- न केलेले ) बरे !

 लिहिण्यास कारण की -

मी चुकून 'जाला'समोर न बसता , दूरदर्शन संचासमोर समोर बसलो (-आणि तिथेच फसलो !). कुठली तरी टुकार ( - पण घरातल्या तमाम महिला वर्गमतानुसार निदान  १०००० तरी भाग पूर्ण करणारी ?)मालिका चालू -- एका पात्राने  एक शब्द उच्चारण्याचा अवकाश की, पार्श्वसंगीत म्हणून ताट-वाट्या -पातेली -चमचे -डाव वगैरे एकसमयावच्छेदेकरून दणादण कानावर आदळल्याचा आवाज येई ! संगीतकार जाउ द्या (-त्याला काही कळत नसेल !) ; पण मालिकेतील पात्रे, दिग्दर्शक ,इतर सहकारी (-निदान स्पॉट बॉईज  तरी ?) यांच्या क्डून तरी पार्श्वसंगीत कानाला सुसह्य वाटते /जाणवते का  नाही, हे जाणून घेण्याची तसदीही कुणी घेतली नाही , याचे 'प्रचंड' आश्चर्य वाटते! हा एक भाग झाला ; तदनंतरचे 'महा'आश्चर्य म्हणजे एका पात्राने दुसऱ्या पात्राकडे नजर टाकली की , राहिलेल्या ८/९ पैकी  'प्रत्येक ' पात्राची प्रतिक्रिया /प्रतिसाद जाणून घेण्यासाठी - त्याच्या चेहऱ्यावर काहीकाळ क्यामेरा स्थिर !! मला सांगा , अशा रीतीने कासावापेक्षाही संथ गतीने मालिका चालू राहिली तर १०००० नव्हे तर १०००००० भाग नाही झाले तरच .... ?
धन्य धन्य हो - मालिका निर्मात्याची , दिग्दर्शकाची , संगीतकाराची , (आवडत नसली तरी, पोटासाठी -) काम करणारे कलाकार आणि त्या " मूर्ख-खोक्या " पुढे ठिय्या मांडणा-या सर्वांची !

२ टिप्पण्या: