मोह...!


देह देवाचे मंदीर ..
किती सुंदर गीत आहे हे !
पण प्रत्येकाच्या देहात "देव" असला तरच ना..

आज म्हणावे लागते -
देह  "मोहा"चे  मंदीर !
संस्कार, शिक्षण, सदाचार, सुविचार ..
ह्यापलीकडे एक जग अस्तित्वात आहे -

" मोह ! "
हा शब्द देखील किती मनमोहक आहे.
त्या शब्दाच्यादेखील प्रेमात पडायचा मोह आवरत नाहीच !
ब्रम्हर्षी विश्वामित्राला जिथे मेनकेचा मोह पडला,
तिथे आम्हा पामरांची काय कथा ?
तुम्ही रस्त्याने जात असताना, समोर चकाकणारे एखादे बाटलीचे टोपण दिसते खरे..
पण खरच सांगा मोहापोटी, क्षणभर का होईना,
सुरुवातीला ते एखादे रुपया-पाच रुपयाचे नाणे असावे असे वाटून जाते की नाही ?

मिळकतीचा मोह, वाटणीचा मोह, संपत्तीचा मोह, परस्त्रीचा मोह, परिस्थितीतून मोह, सोन्याचा मोह, न जाणो मानवी मन आहे तोवर कशाकशाचा मोह पडत राहणार !

आपल्या सरळ स्वभावाच्या सीतामाईला नाही का सुवर्णमृगाचा मोह पडला ?
का बरे हा मोह नावाचा शत्रू, परमेश्वराने आपल्या देहात निर्माण केला असावा ?
आपली परीक्षा घेण्यासाठीच तो उत्पन्न केला असावा..
लहान बालकाला गोळीचा-खेळण्याचा मोह,
तरुणाला तारुण्यातील सौंदर्याचा मोह,
स्त्रीला तर अगदी साध्यासुध्या गज-याचा मोह पडतो.
भुरळ, चित्त विचलीत होणे, आकर्षित होणे, संमोहित होणे..
मोहाची किती विविध रूपे ?
आदर्श घोटाळे, भ्रष्टाचार, लाचखोरी..ही झाली मोहाची महान उदाहरणे -
एवढेच कशाला -
ग्यासच्या रांगेतून, देवदर्शनाच्या रांगेतून, कुठल्याही रांगेतून...
 आपल्याला घुसण्याचा क्षणभर मोह न झालेली व्यक्ती कुणाला दिसली असेल,
तर त्रिवार प्रणाम !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा