काल दुपारी मी बायकोला सांगून टाकले - "अग ए, ऐकलस का !
आज रात्री माझ्या नावचा स्वैपाक करू नकोस हं ! "
बायकोने विचारले - " का हो ! काय विशेष ? "
मी उत्तरलो -" आपलं सहजच . तो राज गब्बर म्हणाला नाही का ग परवा-
' बारा रुपयात जेवण मिळते', म्हणे त्या मुंबईत !
चाखून येतो जरा वेगळी टेस्ट ! "
बायकोने विचारले -
" अहो , पण एकदम असे बारा रुपये जेवणासाठी, बाहेर चैनीसाठी उडवायचे म्हणजे,
आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना झेपणार का ? "
मी म्हणालो - " अग, काटकसर आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे ना ?
आणि हे बघ, रात्री तुझा स्वैपाकही करूच नकोस !
तुझ्यासाठीही मी बारा रुपयाच्या जेवणाचे पार्सल आणतो.
तुझीही चैन होऊ दे ना एखादा दिवस ! "
बायकोचा प्रफुल्लित चेहरा बघून-
माझा आनंद दिवाणखान्यात मावेना हो !
होती नव्हती तेव्हढी शिल्लक घेऊन मी तडक मुंबईला रात्री पोहोचलो.
....पत्र्याच्या टपरीपासून,
ते थेट ताज हॉटेलपर्यंत सगळीकडे चौकशी करून दमलो !
माझ्यापेक्षा भारी कपडे घातलेल्या, त्या ताजच्या द्वारपालाला मी भीतभीतच विचारले देखील शेवटी -
" साहेब, इथे मुंबईत बारा रुपयात जेवण कुठे मिळते हो ? "
अंगावर चढलेल्या झुरळासारखे, माझे वाक्य ऐकून त्याने झटकले..
आणि पुन्हा तो आपल्या ड्युटीवर हजर होण्यासाठी-
'नमस्ते साब' म्हणत, दुसऱ्या पॉश कष्टमरकडे वळला !
खूप ट्याक्सीपीट करून,
माझ्या पोटात शेवटी सगळे पशुपक्षीप्राणी ओरडायला लागले !
शेवटी मनाला म्हटलं - " आपले घर ते घरच ! इथली जिवाला नुसती घरघरच !
गरीबाची बरी भाजीभाकरी, बारा रुपयांची चैन नको ! "
तडक घरी आलो ! बायको तर माझ्यापेक्षा समजूतदार !
रात्री बारा वाजता,
आम्ही घरच्या मस्त पिठलेभाकरीवर यथेच्छ ताव मारला !
आम्ही दोघांनी आता ठरवले आहे -
" ऐकावे जनातले आणि खावे घरातले ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा