ती भाकरी


काल सकाळी देवदर्शनाला निघालो होतो.

रस्त्याच्या एका बाजूला,
 उंच इमारतीचे बांधकाम चालू होते.
बाजूला पत्र्याच्या शेडबाहेरच, 
तिथल्या कामगाराची पत्नी दगडाची चूल मांडून, 
तव्यावर भाकरी धपधप थापत होती.....

तो नाद कानापर्यंत आणि... 
नंतरचा भाकरीचा वास नाकापर्यंत-
छानसा दरवळून गेला खरा -

काल नेमका महाशिवरात्रीचा म्हणजे उपवासाचा दिवस !

 तरीही त्या भाकरीकडे लक्ष गेलेच.

सगळी देवाचीच करणी की शेवटी.

मनांत येऊन गेला हळूच एक विचार....
त्या मस्तशा भाकरीबरोबर आपल्याला कांदा, चटणी आणि पिठले मिळाले तर...

स्वर्गसुख म्हणतात- ते आणखी काय असते हो !

ती तव्याएवढी मोठी, पौर्णिमेच्या चंद्रासारखी, पांढरीशुभ्र गोलगरगरीत, 
अगदी भूमितीतल्या वर्तुळासारखी , पहात रहावीशी वाटणारी भाकरी -

आमच्या फ्ल्याट संस्कृतीत कुठली पहायला मिळणार ?

आमच्या घरात रोज नवनवीन आकाराच्याच चपात्या - 
"गोल वर्तुळाकार" एक चपाती दिसेल तर शपथ !
कधी त्रिकोणी - कधी पंचकोनी - कधी बहु कोनी !

रात्री सात ते नऊ घरातल्या "आम्ही सारे खवैय्ये" म्हणत गरजणाऱ्या .. 
सगळ्याजणीना कधीतरी सकाळी एकदा- 
त्या पत्र्याच्या शेडजवळ, फिरायला न्यावे म्हणतोय !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा