शांतीचे प्रतिक

बायकोने आवाज दिला.
"अहो, आजचा पांढरा रंग लक्षात आहे ना ?"

अनुभवी प्रामाणिक आज्ञाधारक नवरा असल्याने,
मीही तत्परतेने उत्तरलो -
"अग, हा बघ.. तास झाला की तयार होऊन मी,
देवळात तुझ्याबरोबर यायला !"

पाच मिनिटात तयार होत्तेच की, म्हणणारी बायको
तब्बल सव्वा तासानंतर तय्यार होऊन समोर आली एकदाची ...
आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.

पांढरे बूट, पांढरा टीशर्ट, पांढरी प्यांट, 
पांढरे डोके झाकण्यासाठी पांढरी क्याप,
पांढरा रुमाल... वगैरे वगैरे माझ्या परीने मी म्याचिंग केले होते.
तरीही बायको पुटपुटलीच-
"--तरी रात्री केसांना डाय करा म्हणत होते मी !"

टकलावर उरलेल्या दहा बारा केसांना डाय करून,
मी माझा स्मार्टनेस कितीसा बदलणार होतो हो ?

पण कुरकुर करणे हा तिचा जन्मजात स्वभाव,
मी तीस/पस्तीस वर्षात बदलण्यास असमर्थ ठरलो होतो हे नक्कीच !
असो.

बायकोने डोक्यावरच्या पांढऱ्याशुभ्र गजऱ्यापासून,
 ते खाली पांढऱ्या चपलापर्यंत,
आपले म्याचिंग परफेक्ट सवयीनुसार जमवले होते.
संधी साधून मीही अंमळ पुटपुटलोच -
"म्याचिंगच्या फंदात तू तुझे हे लांबसडक काळेभोर केस,
डाय लावून पांढरे केले नाहीस,
हे बाकी छान केलेस हो !"

बायकोची बडबड बरोबर असल्याने,
मी फक्त पांढऱ्याशुभ्र ढगात तरंगत होतो.

रस्त्यावर इकडे तिकडे पाहिले तो काय..
माझेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली !

जिकडे तिकडे........ श्वेतवसनधारी, पांढऱ्या डोक्यातल्या,
पांढऱ्याच पांढऱ्या पऱ्या दिसून येत होत्या हो !

--- पण पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असल्याने की काय ....
कानावर पडणारा 
त्या पांढऱ्या जगातला कलकलाट मात्र अगदीच असह्य होत होता !!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा