ब्यांकेचे इयरएंडिंग असले की, पूर्ण आठवडाभर हा कार्यक्रम ठरलेला.
हाश्शहुश्श करत रोज रात्री उशीरा घरी यायचे.
दमूनभागून चिंताक्रांत चेहरा करत, खुर्चीत बसकण मारत,
हातातली ब्रीफकेस कुठेतरी आदळायची.
[- ब्यांकेच्या कृपेनेच मिळाली असल्याने.]
बायको खाली मान घालून..
" मीच ह्यांना पोटासाठी ब्यांकेत धाडून,
काम करून, ब्यांक चालवायला लावते--"
अशा अपराधीपणाने, पाण्याचे भांडे अगदी आदबीने पुढे धरायची..
[आम्ही ब्यांकेत ऑडीटरपुढे आदबीने एखादी फाईल धरतो ना ..
अगदी त्याच ष्टाईलीत !]
उपकार केल्याच्या आविर्भावात, ते भांडे जवळच्या स्टुलावर ठेवून -
" आधी हातपायतोंड तरी मला धुवून येऊ दे.." - असे काहीसे पुटपुटत,
मी कसनुसा, दमलेला, चिंताक्रांत असा, बऱ्यापैकी अभिनयीत चेहरा दाखवत बाथरूमकडे वळत असे.
सबंध जगातल्या ब्यांकेत- मी एकटाच काम करणारा असल्याचा,
उगाच फील यायचा हो त्यावेळी.. !
जणूकाही मी नसतो तर, जगातल्या सर्व ब्यांकेची इयरएंडिंगची कामे
अगदी ठप्प होऊनच राहिली असती !
...... अशारीतीने ब्यांकेचे इयरएंडिंग एकदाचे संपायचे.
मग एक दिवसभर भरपूर ताणून विश्रांती घ्यायची...!
नंतरच्या दिवशी...
स्वैपाक करणाऱ्या बायकोकडे कौतुकाची नजर टाकायची
आणि कामाला निघायचे.
मी तिच्याकडे पाहतोय, असे तिला दिसताच-
तिचा कणिक तिंबण्याचा आवाज अंमळ वाढलेला जाणवायचाच हो मला !
नंतर केव्हातरी जेवताना लक्षात यायचे-
- - - आज आमटी जरा जास्त तिखटजाळ
मेथीची भाजी चवीला कडूझार
लोणचे अगदीच आंबटचिंच
चटणी खारटघोट
कोशिंबिरीत मीठ विसरलेले
पापड [माझ्यावर जणू-] जळका
भातातला खडा कच्चकन दाताखाली
पोळ्याही सर्व राज्यातल्या नकाशांचे आकार दाखवणाऱ्या- - - इ.इ.
बापरे ! एकाच जेवणात इतके रस/विरस ?
त्यावर माझे आणि बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू ..
बायको म्हणायची -
" एखाद्या दिवशी असे स्वैपाकातले गिळावे लागले तर..
किती किती हे अकांडतांडव हो ?
तुम्हाला वर्षातून एक आठवडाच तर..
कधी नाही ते इयरएंडिंगचे काम करावे लागते ना ?
तुमची केवढी धुसफूस असते.. !
मी मेली वर्षातले एक्कावन्न आठवडे तुमची मोलमजुरी करत राबराबते.... धुणीभांडीउष्टीखरकटीआल्यागेल्यांचेआगतस्वागत
[- एकाच दमात की हो !] मलाच एकटीला बघावे लागते ना ?....... "
... भांडणानंतर- - -
निवांत स्वत:शीच विचारचिंतन मंथन मनन वगैरे केल्यावर,
बायकोचे मुद्दे पटू लागतात. आणि मी स्वत:वरच रागावतो-
आपण तर फक्त "ब्यांक एके ब्यांक"च करत आहोत.
पण मी रजेवर असल्यावरदेखील, ब्यांकेचे काहीच अडलेले नसते,
ती अगदी व्यवस्थित सुरळीत चालू असतेच ! इ.इ....
चार वाजलेले असतात. मी हळूच स्वैपाकघरात शिरतो.
मस्तपैकी फक्त दुधातल्या, मी केलेल्या- दोन चहाच्या कपातला,
एक कप--- मीही जमेल तेवढा नतमस्तक होत,
बायकोपुढे पेश करतो.. !
तिच्या खुदकन हसण्याच्या सुरेखशा ष्टाईलीवर,
जीव ओवाळून टाकतो--
तिच्याकडे बघतबघत.. चहाचे घुटके गिळत........!
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा