चिमण्यांची शाळा - [बालकविता]

ऐकू आली ठण ठण घंटा 
भरली चिमण्यांची शाळा ..

भुर्रकन चिमण्या चिवचिवल्या 
वर्गात शिरल्या पंधरा सोळा ..

मास्तर नव्हते आले अजुनी 
चिमण्यांचा गोंधळ होऊन गोळा ..

काव काव आवाज बाहेर आला 
वळला तिकडे चिमण्यांचा डोळा ..

कावळे मास्तर वर्गात फिरले 
चिडीचूप झाला वर्ग सगळा ..

पाढे म्हणती कावळे मास्तर 
बे त्रिक सात चार नव्वे सोळा ..

चिमण्या होत्या गोंधळलेल्या 
पाढा म्हणताना दुखला गळा ..

कावळे मास्तर आपल्या नादात 
पुसता पुसता फळा काळा ..

डस्टर धपकन डोळ्यावर पडले 
सुजला मास्तरांचा एक डोळा ..

वाचता येईना लिहिता येईना 
चिमण्या म्हणती डोळा चोळा ..

चिडले ओरडले जोरात मास्तर 
सुटली शाळा जा पळा पळा ..

चिमण्या सगळ्या हसत उडाल्या 
लवकर सुटली त्यांची शाळा ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा