हे श्री गणेशा ,


हे श्री गणेशा,

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय "
ब्रीद बाळगणाऱ्या,
कर्तव्यतत्पर असणाऱ्या,
वेळप्रसंगी चोवीस तास राबणाऱ्या,
तहानभूक विसरणाऱ्या,
कामातून दांडी मारायला न मिळणाऱ्या ...

माझ्या समस्त पोलीसबांधवांना मी तर आम्हांसर्वांच्यातर्फे
"गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा" देत आहेच...

पण तूही तुझे,
"सुखकर्ता दु:खहर्ता"
हे ब्रीद कायम ठेवून, त्यांच्या पाठीशी सदैव रहावेस ..
ही दोन्ही कर जोडून तुझ्या चरणी नम्र प्रार्थना !!!
.

विस्मरण..आठवण..


विसराळूपणा ..

छे ! वैताग आणलाय बुवा ह्या विसराळूपणाने !

बायकोने काम सांगितले .. नेमके विसरतो ,
मित्राच्या पोस्टला लाईक करायचे .. नेमके विसरतो ,
मैत्रिणीला शुभेच्छा द्यायची .. नेमकी विसरतो ,
बॉसला नेमक्यावेळी शिव्या द्यायच्या .. हमखास विसरतो ,
सहकाऱ्याला थाप मारून एखादे काम टाळायचे ठरवतो .. न विसरता विसरतो !

काही उपाय असेल, तर सांगाल काय ह्या विसराळूपणावर ?

अरेच्चा .. एक सांगायचे विसरलोच की सर्वांना ..
" २०१४ मधे 'लोकांनी' मतदान करायचे आहे "

हे विसरणारे कुणी मतदार असतील,
मी त्यावेळीमात्र आठवणीने आठवण करून द्यायला तयार आहे !
.

स्मरणशक्ती .. बोफोर्स..


मी एक साधासुधासरळमार्गी माणूस !

व्यवहारातले छक्केपंजे समजत नाहीत.
राजकारणातले डावपेच उमजत नाहीत.

यापुढे फक्त "स्मरणशक्ती" पक्की टिकवण्यासाठी उपयोगी पडणारी,
औषधे शोधत राहणार..गोळा करणार..प्रचार करणार..

जगातले "लोक" मूर्ख आहेत ..
याचा मला नुकताच साक्षात्कार झाला आहे.


ते आजचे घोटाळे आज विसरतात असे नाही,
तर ..
भूतकाळातले घोटाळे देखील भविष्यकाळात अगदी सहज विसरतात !

स्मरणशक्तीवर जडीबुटी, मलम, काढा, अर्क, गुटी, सायरप ..
जे जे औषध मिळेल, त्याचे मी डोस पाजत राहणार आहे !

औषध मिळेपर्यंत ..

मला कुणी समजावून सांगेल काय ..

ते "बोफोर्स" "बोफोर्स" म्हणतात, ते काय आहे हो ?
.

बगळा आणि नेता..


                      बगळा पांढराशुभ्र असतो.
                                    बगळा धूर्त असतो.
                                     बगळा आपले सावज अचूक पकडतो.
                                      आणि कार्यसिद्धीनंतर सगळे "विसरून" पुन्हा,
                                        पहिल्यासारखाच स्थितप्रज्ञ दिसतो !

                     नेता पांढराशुभ्र . . .

                                    पुढच सगळ मीच सांगत बसू काय ?
                                   .

विसराळू ...


हा हा हा हा ..

इतकं मोकळ मोकळ वाटत म्हणून सांगू !
नाहीतर...
जबरदस्त टेन्शन आलं होत हो .

परवाच्या भानगडी,
कालचे घोटाळे,
मघाचे लफडे...

हे सगळे म्हटलं लोकांच्या लक्षात राहिले,
तर कसं होणार आपलं ... ?

पण ..
एकदम माझ्या अचानक लक्षात आले हो -
लोक म्हणजे कोण हो ?
शेवटी सगळे "मी" मिळूनच बनणार नं "लोक" ..!

माझ्यासारखेच सगळे मूर्ख आणि विसराळू देखील !

बघा, सगळे लोक विसरून गेले की नाही मला ..
आणि माझ्या कुटील, घातकी, अतिरेकी कारवायाना !!!
.

वेळ ...

वेळ ...

कुठल्याही गोष्टीची " वेळ " फार फार महत्वाची असते.
म्हणजे एखादी घटना, गोष्ट
योग्य त्याच वेळेवर झालेली, घडलेली, जपलेली,
जाणलेली शोभून दिसते- आवश्यक असते,
 हे लक्षात येणे फार उत्तम !

लग्नाचा मुहूर्त योग्य वेळी साधला पाहिजे ..
उद्याचे काम आज करा,
 हा उपदेश उद्याच्या मुहूर्तासाठी आज पाळून चालेल ?

ऑपरेशनची वेळ डॉक्टरानी सांगितलेली योग्य ..
तिथे आपण "आज -आत्ता- ताबडतोब " चा हेका धरणे योग्य आहे ?

मला कामाची खूप खूप आवड आहे..
म्हणून कार्यालयात चोवीस तास घालवणे, 
मूर्खपणाचे नाही का ठरणार ?

बायकोला साड्यांची आवड आहे ..
एकाच वेळी चार साड्या खरेदी करणे आणि एकदम दोन नेसायला लावणे,
हा वेडेपणा नाही काय ?

काळ-वेळ न पाहता झिंगणारा बेवडा ,
अंथरूण पाहून पाय न पसरता- वेळी अवेळी मटका लावणारा,
खिशात दमडा नसतांना जुगार खेळणारा,
चार चौघात वेळ काळ न पाहता बिडीचे झुरके ओढणारा,
ह्या असल्या व्यसनी लोकांना वेळेचे महत्व पटवून द्यावे काय .. देत बसल्यास कुणाच्या वेळेचा अपव्यय होणार आहे हो ?

शहाण्याला शब्दाचा मार वेळेला दिलेला बरा ..
उधळलेल्या जनावराला योग्य वेळीच चाबकाचे फटकारे लगावलेले ठीक ..
मूर्खाचा नाद वेळीच सोडलेला चांगला ..

आपला शहाणपणा आणि दुसऱ्याचा मूर्खपणा वेळीच जपलेला ...?

एखाद्या मित्राचा वाढदिवस ठराविक दिवशी आहे,
हे माहित असतांना,
 "आगाऊ"पणाने शुभेच्छा देण्यात काय हशील ?
अगदी विसरूनच, लक्षात नाही राहिला तर,
 कालांतराने क्षमायाचना करून शुभेच्छा देण्याची वेळ साधणे - 
ही देखील मैत्री जपण्याची कलाच !

अरेच्चा .. नेहमीप्रमाणेच काळवेळ न बघता बरळत सुटलोच की --
 इतरांना वेळेचे महत्व समजावून सांगता सांगता, 
मला स्वत:ला ते कधी कुठल्या मुहूर्तावर समजणार कुणास ठाऊक ?
.

मांजर , उंदीर , पाहुणा !


त्या बाजूच्या बिळातून,
 एक गलेलठ्ठ उंदीर सारखा आतबाहेर करत होता.

ह्या बाजूला एक काळे मांजर कधीच टपून,
त्याच्या हालचाली बघत बसले होते.

संधी काही मिळेना.

शेवटी धाडस करून..
काळे मांजर उडी मारणार इतक्यात,

त्या घरात आलेला पाहुणा,
त्या मांजर आणि उंदीर यांच्यामधून गेला..

मांजर पुटपुटले, " आला का आडवा माणूस ! आता कुठले आपले काम व्हायला ! "

तात्पर्य:
पाहुणा माणूस कुणाला- कोणत्या वेळी- कसा- आडवा येईल..
सांगता येत नाही !!!
.

मत्सर ...

मत्सर ...

माणसाच्या षड्रिपूपैकी एक !
पण जीवघेणा ..
इतर रिपू त्यामानाने खूपच सौम्य .

एकमेकाचे पाय ओढायला लावणारा,
पायात पाय अडकवायला लावणारा,
दुसऱ्याच्या उत्कर्षात अडथळा आणणारा,
इतरांची प्रगती न पाहू देणारा,

बेसावधपणे मित्राच्या पाठीवर वार करणारा,
सावध मित्रांच्या तोंडावर अपशब्द बोलू शकणारा,

स्त्री-पुरुष भेदभाव न मानता रमणारा,
जळफळाटाने प्रसंगी बेचिराख करणारा,
माणसातली माणुसकी संपवणारा,
दुसऱ्याला तुच्छ लेखायला भाग पाडणारा,
लेकी बोले सुने लागे- ह्या न्यायाने टोमणे मारायला उद्युक्त करणारा,
सारासार विवेकबुद्धी लयास नेणारा ...

परमेश्वरा,
एकच प्रार्थना -
सर्वांचा आवडता  "मत्सर"  हा शत्रू ,
माझ्या शत्रूच्याही मनाच्या कधी जवळ येऊ देऊ नकोस रे !
.

मोह...!


देह देवाचे मंदीर ..
किती सुंदर गीत आहे हे !
पण प्रत्येकाच्या देहात "देव" असला तरच ना..

आज म्हणावे लागते -
देह  "मोहा"चे  मंदीर !
संस्कार, शिक्षण, सदाचार, सुविचार ..
ह्यापलीकडे एक जग अस्तित्वात आहे -

" मोह ! "
हा शब्द देखील किती मनमोहक आहे.
त्या शब्दाच्यादेखील प्रेमात पडायचा मोह आवरत नाहीच !
ब्रम्हर्षी विश्वामित्राला जिथे मेनकेचा मोह पडला,
तिथे आम्हा पामरांची काय कथा ?
तुम्ही रस्त्याने जात असताना, समोर चकाकणारे एखादे बाटलीचे टोपण दिसते खरे..
पण खरच सांगा मोहापोटी, क्षणभर का होईना,
सुरुवातीला ते एखादे रुपया-पाच रुपयाचे नाणे असावे असे वाटून जाते की नाही ?

मिळकतीचा मोह, वाटणीचा मोह, संपत्तीचा मोह, परस्त्रीचा मोह, परिस्थितीतून मोह, सोन्याचा मोह, न जाणो मानवी मन आहे तोवर कशाकशाचा मोह पडत राहणार !

आपल्या सरळ स्वभावाच्या सीतामाईला नाही का सुवर्णमृगाचा मोह पडला ?
का बरे हा मोह नावाचा शत्रू, परमेश्वराने आपल्या देहात निर्माण केला असावा ?
आपली परीक्षा घेण्यासाठीच तो उत्पन्न केला असावा..
लहान बालकाला गोळीचा-खेळण्याचा मोह,
तरुणाला तारुण्यातील सौंदर्याचा मोह,
स्त्रीला तर अगदी साध्यासुध्या गज-याचा मोह पडतो.
भुरळ, चित्त विचलीत होणे, आकर्षित होणे, संमोहित होणे..
मोहाची किती विविध रूपे ?
आदर्श घोटाळे, भ्रष्टाचार, लाचखोरी..ही झाली मोहाची महान उदाहरणे -
एवढेच कशाला -
ग्यासच्या रांगेतून, देवदर्शनाच्या रांगेतून, कुठल्याही रांगेतून...
 आपल्याला घुसण्याचा क्षणभर मोह न झालेली व्यक्ती कुणाला दिसली असेल,
तर त्रिवार प्रणाम !
.

तीन चारोळ्या -

१.

भूतकाळच्या आठवणी 
एकामागून येती एक -
थेंब पावसाचे गळक्या 
छतावरून ते जणु एकेक..
.

२.

एकच फिरली वाऱ्यावरती 
बट अलगद तव गालावरून -
वादळे उठली ग किती ती 
सांगणे अवघड या हृदयातून..
.

३.

नाही रात्री विसरत मी 
तारा आहेस तू .. 
जाणत असतो दिवसा मी 
पारा आहेस तू ..
.