नादच खुळा

छ्या ! 

काय म्हणावे तरी ह्या फेसबुकाच्या नादाला !

तिचे छानसे प्रोफाईल पिक्चर 

फेसबुकावर पाहत बसण्याच्या नादात,

बायकोने आणून ठेवलेला ब्रेड, 

"चहाच्या कपा"त बुडवण्याऐवजी -

मी जवळच्याच "पाण्याच्या ग्लासा"त बुडवून,

मस्त फस्त केला ..

लॉगौट झाल्यावर लक्षात आले हो !

.

घर

 विरहवेदना -

सहन न होते विरहवेदना 
दुराव्यात इकडे
का डोळ्यांचे फुटत राहती 

उगा बांध तिकडे ..
.


नाईलाज -

 बसलो असतो आठवत मी
चंद्रचांदण्या सखीची मिठी -
विसरू कशी तहानभूक मी
नाही अन्नाचा कण ओठी ..

.



बिलंदर -

"सकाळ झाली" म्हणत म्हणत
चंद्र बिलंदर लपून बसतो -
घेऊन दिवसा चांदण्या सोबत

रात्रीचे बेत आखत हसतो ..

.

गर्वाचे घर खाली


मी स्वत:च्या नावामागे,
 कवी/लेखक अशी "पदवी ",
इतरांनी लावण्याऐवजी,
 स्वत:हूनच लावली आणि .....

अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊन -

माझी मीच पाठ थोपटून घेतली !

बालपणापासून... 
म्हातारपणापर्यंत... 
साहित्यातले "सर्व प्रकार" लिहून झाले.

आता लिहिण्यासारखे आपल्या हातून काहीही उरले नाही.
असा विचार करत... 

मी निवांत वाचण्यासाठी 

दासबोध आणि ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ हातात घेतले.

डोळे उघडे ठेवले आणि
... खरोखरच डोळे उघडले !

आपण काहीच लिहिले नसल्याचा
मला प्रथमच साक्षात्कार झाला !

नव्हे खात्रीच झाली...

 त्यांच्यापुढे साहित्यातला....
मी......... एक -

 "कोरा चांगदेव" !
.

मनात आले माझ्या जे . .


मनात आले माझ्या जे
तुझ्या मनातही आले का
भेट जाहली स्वप्नात सखे 
दोघांची ती स्मरते का ..

रेघा मारत वाळुत बसलो
मनातुनी त्या पुसल्या का
लाटा लाटा मोजत हसलो
पुन्हा कधी त्या दिसल्या का ..

क्षणाक्षणांचे जमाखर्च ते
मनात माझ्या जपले ग
शिल्लक दोघांची किती
पाहण्यास मन टपले ग ..

भेटायाचे कधी न आपण
किती कितीदा ठरवत रुसलो
ते सत्यात न कधी उतरले
स्वप्नात सदा मिरवत फसलो ..

विसरू म्हटले तरी विसरणे
अशक्य वाटे ह्या जन्मी
जवळ येउनी दूर सारणे
जमते का बघु पुढल्या जन्मी ..
.

सावलीचा नाहि उरला मजवरी विश्वास आता - [गझल]

 सावलीचा नाहि उरला मजवरी विश्वास आता
सोबतीला येत नाही मार्ग काळोखात जाता

प्रेम केले काय चुकले गुंतलो मी का असा हा
अडकता का सोडवीना यातुनी कोणीच ज्ञाता

पाहिला नाही कुठेही आजवर तो धबधबा मी
मज दिसे विरहातुनी तो भेटता तू हाय खाता

उमटलेले पाहिले मी चेहऱ्यावर स्मित तुझ्या ते
वेदना माझी लपवली लावुनी डोळ्यास हाता

हाय कोठे चालले हे पाय मज काही न कळता
चालतो आहेच रस्ता मी फिरस्ता गीत गाता ..
.
.

मारे सभेत हुरळत होते ..[गझल]


मारे सभेत हुरळत होते
पत्नीसमोर निवळत होते 


कार्यास साथ ना देता ते
चर्चा मजेत चघळत होते 


हातात फूल चुरगळले जे
गंधास फार उधळत होते 


ज्योती मनात सुविचाराची
देहात दीप उजळत होते 


दानास लोक हटले मागे  
गुत्त्यात तेच खिदळत होते


तोडावयास जाता पुष्पे
काटेच फार विव्हळत होते ..

.

नवीन वर्षाचा संकल्प

समस्त चमत्कारी आणि चमत्कारिक ,
भाऊ, बापू, बाबा, आई, आक्का, ताई, बाबा, महाराज ह्यांना-

 हात जोडून नम्र विनंती ----------

आम्हा सामान्य माणसासारखाच तुम्ही सर्वानीही "नवीन वर्षानिमित्त संकल्प" सोडायला हरकत नाही हो ! 

" आजपासून मी माझा श्रीमंती आश्रम, मठ, बंगला, झोपडी,महाल सोडून...
दीनदुबळ्यांची,अपंगांची , गरीबांची, दु:खितांची, आजाऱ्याची, अडल्यानडल्याची, निराधारांची सेवा करण्यासाठी बाहेर पडेन..


आणि-


माझ्या भस्म, विभूती, गंडेदोरे, ताईत, फोटो, राख, अद्भुत चमत्कार वगैरेंच्या मदतीने विनाशुल्क त्यांचे मनोरथ पूर्ण करीन आणि त्यांचे कल्याण करण्याचा, दु:ख, यातना "खरोखरच" दूर करण्याचा "प्रयत्न" करीन....!"


कारण "शेकडो" श्रीमंत त्यांच्या गाड्यातून, 
जमेल त्या वाहनातून भेटण्याचा प्रयत्न करत असतात !

पण खरे "लाखो" गरजू गरीब, कफल्लक, निर्धन असतात...
मनात तीव्र इच्छा असूनही, 

तुम्हामंडळीना भेटायला खर्चण्याइतका द्रव्यलाभ
 त्या बिचाऱ्याना कुठून होणार हो ! 

दोन्ही हात जोडून विनंती तर केली आहेच,
ती अंतर्ज्ञानाने एव्हांना तुमच्यापर्यंत पोचली असेलच... 

घेणार ना एवढे मनावर ? 


म्हटले तर अवघडच आहे ..
पण तुम्हा सर्वांना ते काहीच अशक्य नाही !
.

फलक हिरो

फेरफटका मारावा, म्हणून बाहेर पडलो .

रस्त्यावर हे भले मोठे फलक .

बहुधा वाढदिवस असावा , 
कारण फोटो मोठे आणि मजकूर लहान होता.

पंचवीस तीस युवा मंडळी त्या फलकावर दिसत होती .
त्यातली पंधरावीस तरी काळा गॉगल डोळ्यांवर चढवलेली !


बिच्चारे फलक हिरो !

एवढ्या लहान वयातच त्या सर्वांचे "मोतीबिंदू ऑपरेशन" पार पडले असावे ...

का -

"काविळीच्या साथी"त त्यांचे फोटो काढले असावेत ?

का-

"डोळ्यांच्या साथी"तच सगळे सापडलेले ! 

........ एक शंका उगाच भरकटून गेली हो माझ्या मनात !

.

संधी


हुssss हूsss हुsss हूssss -


कडाक्याच्या थंडीमुळे झालेले,
माझे मुटकुळे गदगदा हलवत,
बायको मला झोपेतून उठवत,
त्राग्यानेच करवादली -


" अहो, उठा आता !
पुरे झाली झोप. ...
कसलं ते तुमचं झोपेत स्वत:शीच जोरजोरात बडबडण आणि हसण हो ..."


तोंडावरचे पांघरुण बाजूला सारत ,
नेहमीसारख्याच गंभीर चेहऱ्याने मी म्हणालो -


" माझे आई !
निदान झोपेत तरी....

 मला बोलण्या-हसण्याची संधी देत जा ना जरा ! "
.

फेसबुक-मित्रयादी-शोक

नको  "फ्रेंडरिक्वेस्ट" रे तू स्विकारू
स्विकारता ती, नको बोंब मारू -
पुन्हपुन्हा "मित्रयादी"स पाहुन 
कपाळावरी हात का घेशि मारुन ..


उतावीळ होशी "प्रोफाइल"ला भाळुन 
पहाशी न आधीच "टाईमलाइन" -
जरा घे तपासून "प्रोफ़ाइला "सी  
तुझा वेळ वाया कधी तो न जाई..

दिसेना कधी "पोस्ट" मित्राचि येथे
टगे येथ जमती किती "ट्याग"वाले -
अती "गेम""पोका"स कंटाळशिल तू
नि या "फेबु"वर यायचे टाळशिल तू ..

नको रे मना गुंतु "यादी"मधे तू
हनूमानपुच्छा नको वाढवू तू -
हजारोहि घेशील "लिस्टी"त फ्रेन्डा
समोरी पहाशील भलत्याच "ट्रेन्डा" .. !
.