कसा अचानक आला वरुनी - [गझल]


कसा अचानक आला वरुनी 
तनास माझ्या गेला धुवुनी

भिजून अक्षरपक्षी सगळे
मनात बसले पटकन लपुनी

विचार जमले मेघरुपी ते
खुशाल म्हणती ये रे फिरुनी

नहात कविता होती उघडी 
तशीच हसली जाता भिउनी

क्षणात पाउस आला गेला 
तयार झरणी भरभर लिहुनी ..
.

इयरएंडिंग


ब्यांकेचे इयरएंडिंग असले की, पूर्ण आठवडाभर हा कार्यक्रम ठरलेला.

हाश्शहुश्श करत रोज रात्री उशीरा घरी यायचे.
दमूनभागून चिंताक्रांत चेहरा करत, खुर्चीत बसकण मारत,
हातातली ब्रीफकेस कुठेतरी आदळायची.
[- ब्यांकेच्या कृपेनेच मिळाली असल्याने.]
बायको खाली मान घालून.. 
" मीच ह्यांना पोटासाठी ब्यांकेत धाडून, 
काम करून, ब्यांक चालवायला लावते--" 
अशा अपराधीपणाने, पाण्याचे भांडे अगदी आदबीने पुढे धरायची..
[आम्ही ब्यांकेत ऑडीटरपुढे आदबीने एखादी फाईल धरतो ना .. 
अगदी त्याच ष्टाईलीत !]

उपकार केल्याच्या आविर्भावात, ते भांडे जवळच्या स्टुलावर ठेवून -
" आधी हातपायतोंड तरी मला धुवून येऊ दे.." - असे काहीसे पुटपुटत,
मी कसनुसा, दमलेला, चिंताक्रांत असा, बऱ्यापैकी अभिनयीत चेहरा दाखवत बाथरूमकडे वळत असे.
सबंध जगातल्या ब्यांकेत- मी एकटाच काम करणारा असल्याचा,
उगाच फील यायचा हो त्यावेळी.. ! 
जणूकाही मी नसतो तर, जगातल्या सर्व ब्यांकेची इयरएंडिंगची कामे 
अगदी ठप्प होऊनच राहिली असती !
...... अशारीतीने ब्यांकेचे इयरएंडिंग एकदाचे संपायचे.

मग एक दिवसभर भरपूर ताणून विश्रांती घ्यायची...!

नंतरच्या दिवशी...
स्वैपाक करणाऱ्या बायकोकडे कौतुकाची नजर टाकायची
आणि कामाला निघायचे. 
मी तिच्याकडे पाहतोय, असे तिला दिसताच- 
तिचा कणिक तिंबण्याचा आवाज अंमळ वाढलेला जाणवायचाच हो मला !

नंतर केव्हातरी जेवताना लक्षात यायचे-
- - - आज आमटी जरा जास्त तिखटजाळ
मेथीची भाजी चवीला कडूझार
लोणचे अगदीच आंबटचिंच
चटणी खारटघोट
कोशिंबिरीत मीठ विसरलेले
पापड [माझ्यावर जणू-] जळका 
भातातला खडा कच्चकन दाताखाली
पोळ्याही सर्व राज्यातल्या नकाशांचे आकार दाखवणाऱ्या- - - इ.इ. 
बापरे ! एकाच जेवणात इतके रस/विरस ?

त्यावर माझे आणि बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू ..
बायको म्हणायची -
" एखाद्या दिवशी असे स्वैपाकातले गिळावे लागले तर.. 
किती किती हे अकांडतांडव हो ? 
तुम्हाला वर्षातून एक आठवडाच तर..
कधी नाही ते इयरएंडिंगचे काम करावे लागते ना ? 
तुमची केवढी धुसफूस असते.. !
मी मेली वर्षातले एक्कावन्न आठवडे तुमची मोलमजुरी करत राबराबते.... धुणीभांडीउष्टीखरकटीआल्यागेल्यांचेआगतस्वागत
[- एकाच दमात की हो !] मलाच एकटीला बघावे लागते ना ?....... "

... भांडणानंतर- - - 

निवांत स्वत:शीच विचारचिंतन मंथन मनन वगैरे केल्यावर, 
बायकोचे मुद्दे पटू लागतात. आणि मी स्वत:वरच रागावतो-

आपण तर फक्त "ब्यांक एके ब्यांक"च करत आहोत. 
पण मी रजेवर असल्यावरदेखील, ब्यांकेचे काहीच अडलेले नसते, 
ती अगदी व्यवस्थित सुरळीत चालू असतेच ! इ.इ....

चार वाजलेले असतात. मी हळूच स्वैपाकघरात शिरतो.
मस्तपैकी फक्त दुधातल्या, मी केलेल्या- दोन चहाच्या कपातला, 
एक कप--- मीही जमेल तेवढा नतमस्तक होत, 
बायकोपुढे पेश करतो.. !

तिच्या खुदकन हसण्याच्या सुरेखशा ष्टाईलीवर, 
जीव ओवाळून टाकतो--
तिच्याकडे बघतबघत.. चहाचे घुटके गिळत........!
.

पोस्ट आणि स्मायली : नव्या म्हणी -

नम्र विनंती: 

ही पोस्ट कुणालाही, कधीही, कुठेही
 शेअर/कॉपी/कॉपीपेस्ट/उचलेगिरी करण्यासारखी वाटल्यास,
तसे करावे, 
पण.......... माझ्या नावाचा उल्लेख पोस्टवर करावा..... कारण-
तुमच्यासारख्या रसिक वाचकाशिवाय,
 माझ्या पोस्टचा तारणकर्ता/जाहिरातकर्ता दुसरा आहे तरी कोण हो !

१. पोस्ट चिमूटभर स्मायली हातभर
२. पोस्ट भिकार स्मायली चिकार
३. पोस्टला स्मायलींचा आधार
४. पोस्टवरचा राग स्मायलीवर
५. पोस्ट तिथे स्मायली
६. चांगल्या पोस्टला स्मायली कशाला
७. पोस्ट पाहून स्मायली टाकावी
८. पोस्ट रद्दी स्मायलींची सद्दी
९. पोस्ट ना वाचण्यासारखी स्मायली ना पाहण्यासारखी
१०. पोस्टमधे नाही तर स्मायलीत कुठून येणार
११. आयत्या पोस्टवर स्मायली
१२. पोस्ट बेजार स्मायली हजार
१३. आपलीच पोस्ट अन आपलीच स्मायली
१४. पोस्ट टाकल्याशिवाय स्मायली मिळत नाही
१५. चार आण्याची पोस्ट बारा आण्याच्या स्मायली
१६. उथळ पोस्टला स्मायली फार
१७. इकडे पोस्ट तिकडे स्मायली
१८. उचलली स्मायली टाकली पोस्टवर
१९. उतावळा पोस्टअपडेटक स्मायलीला राजी
२०. एक ना धड भारंभार स्मायली
२१. एकाने पोस्ट टाकली म्हणून दुसऱ्याने स्मायली टाकू नये
२२. पोस्ट अपडेटायला अन स्मायली पोस्टायला एकच गाठ
२३. कुठे पोस्टची शान कुठे स्मायलीची घाण
२४. पोस्टवरच प्रेम अन स्मायलीचा सुकाळ
२५. चार दिवस पोस्टचे चार दिवस स्मायलीचे
२६. पोस्ट टाकणाऱ्याच्या मनात स्मायली
२७. पोस्ट वाचायला गेला अन स्मायली टाकून आला
२८. पोस्ट तशी स्मायली
२९. पोस्टकर्त्याची खोड स्मायली टाकल्याशिवाय जात नाही
३०. ज्या गावच्या पोस्टी त्या गावच्या स्मायली
३१. पोस्ट लिहील तो स्मायली पाहील
३२. वाचली पोस्ट की टाकली स्मायली
३३. लिहिण ना वाचण स्मायली टाकून पाहण
३४. पोस्ट फेसबुकात चित्त कॉमेंट लाईकात
३५. आवडीच्या पोस्टला सतराशे स्मायली
३५. पोस्ट लहान स्मायली महान
३६. पोस्टची तहान स्मायलीवर
३७. पोस्ट एकपट स्मायली दसपट
३८. रोज पोस्टे त्याला स्मायली भेटे
३९. पोस्ट टाकीन तिथे स्मायली मिळवीन
४०. पोस्टकर्त्याला स्मायलीचा मार
४१. स्मायलीवरून पोस्टची परीक्षा
४२. पोस्ट सलामत तो स्मायली पचास
४३. सगळीच पोस्ट स्मायलीत
४४. पोस्ट टाकणार त्याला स्मायली मिळणार
४५. पोस्ट वाचली म्हणून स्मायली टाकत राहू नये
४६. पोस्टमधे नाही बळ स्मायली टाकून पळ
.
........... विजयकुमार देशपांडे
.

गरजेपुरते चाळत गेले -[गझल]

गरजेपुरते चाळत गेले
गरज संपली टाळत गेले

पोलिस दिसता समोर त्यांना
नियम कायदे पाळत गेले

झाले व्याकुळ चिखल पाहता
गाळालाही गाळत गेले

फोटो बघता हार घालुनी
अश्रू खोटे ढाळत गेले

जीवन असते पानालाही
जीवन न मिळे वाळत गेले
.

फेसबुकी उखाणा -

मिळवता आला नाही कधी, 
शाळेत पहिला नंबर -
लाडकी xxx फेस्बुकावर मिळवते, 
रोज मित्रांचे लाईक शंभर !
.

सोन्याच्या ताटात वाढणार 
पुरणाची पोळी गरम गरम -
चांदीच्या वाटीत वाढणार 
लोणकढ तूप कढत कढत -
दोन तास झाले की हो 
xxx राव फेस्बुकावर 
मैत्रिणीच्या लाईकची 
वाट बघताहेत कुढत कुढत ...
.

घरात पोती पोत्यात तांदूळ -
तांदळात खडे का खड्यात तांदूळ -
दमते ग बाई मी शोधून शोधून ...
मदतीला बोलावते मिष्टरांना -
पण काढत नाहीत आपल डोक 
कधीच XXX राव  फेसबुकामधून ! 
.

काळजी लाखमोलाच्या जिवाची

  परवाच्या भुतानच्या आमच्या दौऱ्यात, 
बहुतेक उद्धट/उर्मट/बेजबाबदार/निष्काळजी/बिडीफुंक्या असा कारचालक नव्हता, 
म्हणून खूप बरे वाटले.

     उलट तिथले चालक कार सुरू होण्याआधी, व्यवस्थित आपला सीटबेल्ट लावत असत,
आणि शेजारी बसणाऱ्यालाही आवर्जून लावायला सांगत !
एकाही कारचालकाने ओव्हरटेकिंगचा प्रयत्न केल्याचे आठवत नाही. 
मुळातच समंजस असणार ते कारचालक ! कौतुक करावे तेवढे थोडेच.

     "अति घाई संकटात नेई" अशी पाटी, "फक्त वाचण्यापुरती" आपल्याच भागात दिसते. 
त्यामुळे खूप समाधान वाटत असे.... पुणेरी वातावरणाच्या तुलनेत !
फुनशोलिंग ते न्यूजलपाईगुडी या प्रवासात मात्र, 
अपवादाने आमचा कारचालक दर पंधरावीस मिनिटानी, 
कार चालवतांना, कुणाला ना कुणाला तरी त्याच्या मोबाईलवर बोलतांना आढळला. 
... विशेष म्हणजे मोबाईलचे अधूनमधून चार्जिंग चालू असतानाही !
     
     तिसऱ्या वेळेला मात्र त्याची ती वागणूक असह्य होऊन,
मी त्याला कार बाजूला थांबवायला सांगितली..
आणि-
"चार्जिंगचा मोबाईल काढून, अर्धापाऊण तास निवांत मोबाईलवर
पाहिजे त्याच्याशी/ पाहिजे तेवढा वेळ बोलून घे-" असे बजावले.
आम्हाला रेल्वेस्थानकावर त्याने सोडल्यावर, 
त्याला शांतपणे मोबाईलवर बोलण्याचे फायदे/तोटे समजावले. 
त्यावर तोही मुंडी हलवत सहमत झाला !

तेवढेच एक "उपदेशात्मक सत्कृत्य" आपल्याकडून घडल्याचे.. 
मलाही समाधान वाटले !
.

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो - [गझल]

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो
सुटणे गुंता विसरत गेलो

होती काळी शेजारी ती  
पण गोरा मी मिरवत गेलो

येता जाता हसतच होती
सुचता थापा मारत गेलो

जुळले सूतहि प्रेमहि जमले  
प्रेमी तिचिया डुंबत गेलो

गडबडलो मी प्रेमात तरी 
आनंदाला उधळत गेलो ..
.

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू - [गझल]

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू

वाटही पाहून झाली काळ तो सरला किती
ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू

झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी
का कधी शंका न आली मारली मज थाप तू

प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही
जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू

जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे 
मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू ..
.

भुतान दौरा

      काही महिन्याखालीच भुतानचा दौरा करून आलेला पुतण्या, 
पुनःपुन्हा तिथले कौतुक करत होता, तेव्हापासून मलाही त्या रॉयल भुतानचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होत होतीच !
अखेर मित्रानेही मनावर घेतल्याने, ती संधी मिळाली.
रेल्वे आरक्षण, हॉटेल बुकिंग, टूरकार बुकिँग इ. ऑनलाईन कामं 
मित्राच्या अनुभवी सूनबाईने पटापट उरकली.
... [तिथे पासपोर्टची आवश्यकता नाही.. भुतानमधे फिरण्याचे "परमिट" तिथेच घ्यावे लागते!]


निसर्गरम्य भुतानने प्रवेशातच आमचे मन जिंकले !

"फुनशोलिंग" नावाच्या गावातल्या हॉटेलात आम्ही उतरलो होतो.

टूरएजंटमार्फत परमिट काढले. त्यासाठी आपले आधार/मतदानपत्र झेरोक्सप्रत आणि फोटो दिले. प्रत्यक्ष परवानगीपत्र मिळण्यासाठी तिथल्या ऑफिसात आपण त्याच्याबरोबर जाऊन, आपले दोन बोटांचे ठसे देणे आणि फोटो काढणे आवश्यक असते. पूर्ण प्रवासात २/४ ठिकाणी ते चेक केले जातेच.

मनोहारी डोँगरांच्या रांगा, रमणीय हिरवीगार झाडी, 
अधूनमधून रस्त्याकडेची पांढरी फुले उमलवलेली झाडे, 
जणू शुभ्रधवल चांदण्या ल्यालेली भासत होती. 

वळणावळणांनी वेढलेले रस्ते, 
कधी मान दुखेपर्यंत वर निसर्गाकडे, 
काळया पांढऱ्या ढगांच्या हलत्या पुंजक्यांकडे विस्मित नजरांनी पहावे लागे, 
तर कधी उंचावरून खाली खोलवर दऱ्या पाहतांना गरगरून यायचे ! 


एक वेळ तर चक्क उंचावरील ढगातून आमची कार जातांना, 
क्षणभर अंगावर भितीने सर्रकन काटा
 आणि पोटात गोळाही येऊन गेला हो..
वाटले, ढगातून जातांना चालकाला समोरचा रस्त्याचा अंदाज आलाच नाही तर.. आपल्या रसिक वाचक फ्रेँडफ्रेंडणीना नंतर "थोडासा विरंगुळा" कोण देणार !

निरनिराळी दृष्ये पाहताना,
मधूनच नदीचे वाहणारे पात्र डोळ्यांना सुखद गारवा द्यायचे.. 
तळाशी दिसणारे विविध आकारांचे गोटे दगड लक्ष वेधून घ्यायचे !
ठराविक चौकोनी, आयताकृती, उभ्या आडव्या रंगीबेरंगी आकर्षक भिंती
 व पत्र्यांच्या छतांनी आच्छादित सुंदर सुरेखशा इमारती..
फिरत्या प्रवासात मस्त मजा आणत होत्या. 

डोंगरांच्या पायथ्याशीच नाही तर, 
डोँगरांच्या उतारावरच्या इमारती, घरे, वास्तूही चित्ताकर्षक होत्या.

चालकाच्या सौजन्यपूर्ण मार्गदशनाने प्रवासात
वेळेला चहा, कॉफी, शुद्ध शाकाहारी भोजनाची सोय होत होती.

दुसरे दिवशी "थिम्पू" या भूतानच्या राजधानीच्या गावी राहिलो. 
हॉटेल, दुकान, कार्यालय अशाठिकाणी-
 बहुतांशी बाहुलीसारख्या, गोऱ्या गोऱ्या, बारीक डोळ्यांच्या, येताजाता उगाच स्वहस्ते मोकळ्या केसांच्या बटा सावरणाऱ्या महिलांचा कार्यकारी पगडा अधिक प्रमाणात दिसला. 

आरक्षित हॉटेलात शिरताना तर, तेथील महिलाच आमच्या बॅगा सुहास्यपूर्ण वदनांनी स्वागत करत,  पटापट रूमकडे/रूममधून उचलत होत्या.. 
त्या महिलांकडे पाहणाऱ्या आमच्या कौतुकाच्या नजरांकडे, 
आमच्या घरच्या महिला मात्र -
कुत्सित नजरांनी का बघत होत्या कुणास ठाऊक !

त्यानंतरचा मुक्काम "पुनाखा" गावच्या हॉटेलात केला. 

भुतानमधे ठिकठिकाणी सुंदरशा बुद्धमूर्तींनी सजलेली शांत प्रार्थनास्थळे,
 आवर्जून पाहण्यासारखी आहेत. रंगीबेरंगी कलाकुसरयुक्त इमारती लक्ष वेधून घेतात.

पंधराव्या शतकात बांधले गेलेले, नवसाला पावणारे एक मंदिरही पाहिले.

पुनाखा गावातून आमचा मुक्काम "पारो" या आंतरराष्ट्रीय 
विमानतळ असलेल्या गावातील हॉटेलात झाला.

आधी उंचावरील एका व्ह्यूपॉईंटवरून "बर्डस आय व्ह्यू"समान दिसणारे ते विमानतळ पाहिले.
भुतानभेटीत आमचे पंतप्रधान ज्या इमारतीत राहिले, 
तीही चालकाने अभिमानाने दाखवली. 

 

उंच डोंगरावर दिसणारी बुद्धाची प्रसन्नमुद्रेची अतिशय भव्य मूर्ति पाहिली.
वाघाच्या तोंडाची प्रतिकृती एका डोंगराच्या खडकावर दिसते, 
ती पाहून झाली.

विशेषेकरून जाणवली ती, तेथील वाहनचालकांची शिस्त ! 
आवश्यक ते रुंदारुंद रस्ते, ओव्हरटेक न करता, योग्य अंतर राखत, 
शिस्तीत जाणारी वाहने.. पाहणे.. आम्हा बेशिस्त लोकांना तरी दुर्मिळच ! 
आधी पादचारीवर्गाला रस्ता पार करू देण्याची, तिथल्या वाहनचालकाची वागणूक निश्चितच वाखाणण्याजोगी ! 

शांत मुद्रेचे, आनंदी भासणारे, मदतीस तत्पर असे तेथील नागरीक पाहून

समाधान वाटले.

आपल्या भारतीय पाच, दहा, वीस, शंभर, पाचशेच्या चलनातील नोटा
तिथेही व्यवहारात सुरळीत चालत होत्या. कुठेही कसलीही अडचण आली नाही. 
पण..
तेथील हस्तकलेच्या आर्ट क्राफ्टच्या वस्तु तुलनेने खूपच महागड्या.. 
असे आमच्या बरोबरच्या महिलावर्गाचे एकमत झाल्याने- 
आनंदाने आमचे चेहरे आणि खिशातली पाकिटे अंमळ फुगलेले राहिले !

भुतानमधून आम्ही पंचमहाभुते पारोहून पुन्हा फुनशोलिंगमार्गे कोलकत्याला आलो.. पुण्याकडे येण्यासाठी !
.

बटरमिल्क

भुतानच्या दौऱ्यात 
एका हॉटेलमधे बसलो होतो.

खाण्याचे पदार्थ सांगून झाल्यावर, 
मी वेटरला विचारले -
"बटरमिल्क" मिलेगा क्या ?"

बहुधा त्याला समजले नाही.
तरीही त्याने तत्परतेने विचारले -
" बटर भी है और मिल्क भी है .. 
क्या लाऊ ? "

पुन्हा त्याला मी विचारले- 
"बटरमिल्क याने छाज, ताक, मठ्ठा, दहीका पानी है ?"

प्रश्नांकित मुद्रेने तो उत्तरला- "बटरमिल्क पहली बार सुन रहा हूं !"

[ - - - मला एकदम नेपाळच्या दौऱ्यातले एका  प्रसंगातले माझ्या बायकोचे हिंदी आठवले आणि हसू आले.. 
ती नक्कीच त्याला समजावत म्हणाली असती- 
"वो नही क्या, 
एक जगमे दही लेके
उसमे पानी डालके 
रवीसे घुसळ घुसळकर 
दूध जैसा पातळपातळ करते.. 
उसकोच बटरमिल्क बोलते हमारे इधर !"]
.