करतो विचार कोणी--- [गझल]

वृत्त-  आनंदकंद ,   मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- आ  ,   गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------
करतो विचार कोणी व्याकूळल्या जिवाचा  
दगडास बघुन कोणी अभिषेकही दुधाचा ..
.
स्वप्नात रोज भिजतो घेऊन मी सखीला 
का वास्तवात नसतो पत्ताच पावसाचा ..
.
लढतो जवान तिकडे जातीस विसरुनीया 
नेत्यात चुरस इकडे हा कोण तो कुणाचा ..
.
नाभीत कस्तुरी पण जाणीव ना तयाला 
शोधात जीव होई हैराण का मृगाचा ..
.
ही जीत तर सख्याची हर्षात नाचते ती 
मुद्दाम हारते ती मग डावही सख्याचा ..
.

["चपराक"- दिवाळी विशेषांक २०१८]

चार चारोळ्या

 रोज रोज तोच आरसा 
रोज तोच बघणे चेहरा -
टाकला बदलून आरसा 
अशक्य बदलणे चेहरा..
.

"अरे वा, छान" म्हणणारा 
खुषमस्कऱ्या पदोपदी दिसतो -
वाईटाला वाईट म्हणणारा 
खरा मित्र एखादाच असतो !
.

नभांगणीच्या चांदण्यांना त्याने
पाठवले आहे ढगाआड -
गृहांगणीच्या माझ्या चांदणीला 
पाहतोय मत्सरी चंद्र लबाड ..
.

वारा तिकडे वाहत आहे
सखे, मीही तिकडे येत आहे -
तुझी चाहूल त्याला आधी 
त्याची सवय माहित आहे ..
.

["कलाविष्कार" e दिवाळी अंक- नोव्हेंबर - २०१८ ]

ती हसल्यावर मीही हसतो- - - [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक ,  मात्रा-  ८+८ 
अलामत- अ , गैरमुरद्दफ 
------------------------------------------
ती हसल्यावर मीही हसतो 
उशिरा कळते तिथेच फसतो ..
.
नभ दुष्काळी वेडी आशा 
पडीक असुनी जमीन कसतो ..
.
मृगजळ दिसता धावत सुटतो 
खिन्न होत मी मुकाट बसतो ..
.
राजकारणी जेथे तेथे 
बोलू खोटे विचार डसतो ..
.
विसरू जाती करुया एकी 
म्हणता कोणी समोर नसतो ..
.

तीन हायकू

१.
आनंदी सण
घातक प्रदूषण
काय करावे ..!
.

२.
किती भावली
आनंदी दीपावली
जग खुषीत ..!
.

३.
आनंद न्यारे
कुठे दुष्काळी वारे
कुणाला पर्वा ..!
.

" कागदाची नाव डोले --" गझल

कागदाची नाव डोले बघ सखे आनंदुनी
डोलते जणु बालपणची अठवण हृदयातुनी
.
सवय इतकी बडबडीला ऐकण्याची जाहली
कान माझे त्रासती का मौन हे तव ऐकुनी
.
बे दुणे चारात कळले दु:ख दुप्पट नेहमी
जीवनाचे पाठ झाले फार पाढे घोकुनी
.
सजवण्याची का तरूला लहर आली पावसा
पान बघुनी छान मोती हळुच गेला ठेवुनी
.
ना कधी संवाद घडला मिटरमध्ये आपला
जीवनी काही न अडले खास गझलेवाचुनी..
.

["नेटभारी... ई दिवाळी अंक २०१७ "- पान ३६] 

चार चारोळ्या

१.
'लहरी -'

आले पावसाच्या मना
तेथे कोणाचे चालेना -
भिजवी चिंब रानावना 
ढुंकून पाहिना माळराना ..
.

२.
'असाही पाऊस -'

आमचा गाव दुष्काळग्रस्त
आम्ही गावकरी सारे त्रस्त -
मंत्र्यांचा ताफा गावात आला
आश्वासनांचा पाऊस पाडून गेला ..
.

३.
'निसर्ग कृपा-'

गेली पाने फुले बहरूनी 
जलथेंबांच्या सर मोत्यांनी -
वाटे निसर्ग वाटत सुटला 
दागदागिने दहा दिशांनी ..
.

४.
'खेळ -'

लपंडाव सुखदु:खाचा 
असतो चालू आयुष्यात - 
खेळ हा ऊनपावसाचा 
दिसतो जणू निसर्गात !
.

[" रानगंध... ई दिवाळी अंक २०१५ "]

वाट फुलांची चालत हसतो- [गझल]

वाट फुलांची चालत हसलो 
काट्यांमधुनी का मी रमलो..
.
बोलुन गेला साखर तोंडी 
होतो ज्ञानी तरिही फसलो..
.
उज्ज्वल संधी ध्येयासाठी 
स्वप्ने बघतच दिवसा दमलो..
.
होत्या छानच कविता माझ्या 
टीका ऐकत मी ना थकलो..
.
आळस माझा पक्का साथी 
सोबत त्याच्या मीही बसलो..
.

जे जे मनात माझ्या- [गझल]

जे जे मनात माझ्या ते ते तुलाहि वाटे 
जुळण्यास संधि आहे फोडू नकोस फाटे

आहेस चांदणी तू मी चंद्र ना जरी तो 
मी काजवा ग जेव्हा अंधार फार दाटे

फुलता गुलाब गाली नजरा तुझ्यासभोती 
ना गप्प राहता मी टोचेन शब्दकाटे

लाजाळु एक तूही निवडुंग मी असा हा 
दोघात साम्य आहे एकांत छान वाटे

सौदा कधी न होतो प्रेमात प्रेमिकांचा 
निर्व्याज प्रेम पाही ना फायदे न घाटे ..
.

[ ज्ञानामृत.. ई दिवाळी अंक- २०१५ ]

आजोबा

आजोबा माझे किती तरूण 
सांगतात वय आपले शेपाऊण

चालताना हातात काठी असते 
तरीपण मान ताठ किती दिसते !

आताही खेळले ते कुस्ती जर 
समोरचा होईल सपाट भुईवर

दोन स्वत:चे, दोन चष्म्याचे 
आजोबा माझे चार डोळ्यांचे

कधी चष्मा डोक्यावर ठेवतात 
कधी कधी गळ्यात अडकवतात

नंतर सगळ्यांना शोधायला लावतात 
स्वत:ही नेहमी बेजार होतात !

आजोबा फिरायला जातात जेव्हा 
आजीला बरोबर नेतात तेव्हा

दोघांची जोडी बोलते छान 
लुटुलुटू हलते दोघांची मान !

आजोबांचे कित्ती भारी जाकीट 
गोळ्याचॉकलेटने भरते पाकीट

आजोबा कधीकधी फिरायला नेतात 
बाहेर मलाच विसरून येतात !
.

बोलायला कधीही - [गझल]

वृत्त-  आनंदकंद ,     मात्रा- २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- अ ,   गैरमुरद्दफ 
---------------------------------------------------
बोलायला कधीही कोणी तयार नसती
आणून अश्रु अंती खोटे कितीक रडती..
.
कपड्यात फाटक्या तो ठरतो कुणी "भिकारी" 
फाडून जीन्स फिरतो "मॉडेल" त्यास म्हणती..
.
दोषांवरून ओढत का पांघरूण अपुल्या
शोधात मग दुजांच्या बिनघोर तेच फिरती..
.
का सांगतो व्यथा मी कवितेमधून माझी 
अपुल्याच येथ सारे दु:खात मग्न असती..
.
ढापून शेत सगळे घेऊन अंगठेही   
समजून चोर इतरा फिरतो खुशाल जगती..
.