"मराठी बोला चळवळ" --- निमित्त-

मराठीच वाचू मराठीत बोलू -
मराठी लिहूनी आनंदात डोलू !

मराठी मराठी जी माझीच माय -
कशी विसरू सांगा दुधावरची साय !

परीसामुळे होई लोखंड सोने -
मराठी असे जीवनी साज-लेणे !

उतू नका आणि मातू नका हो -
मराठी वसा तुम्ही टाकू नका हो !

मी मातृभाषाभिमानी रहावे -
जगाने  शहाणे मराठीत व्हावे !

मिरवणार  झेंडा मराठी सदा मी
फडकणार उंचावरी  तोच नेहमी !!
.

खारूताई, खारूताई !

खारूताई, खारूताई!
पळापळीची कित्ती घाई !

झुपकेदार शेपटीची-
ऐट भारी हो तुमची !

बघुन टकमक इकडेतिकडे
तुरु तुरु पळता कुणीकडे ?

आज्जीची गोष्ट ऐकली आम्ही-
रामाला मदत केली तुम्ही !

इवलीशी ताई, काम खूप मोठ्ठे-
पाठीवर पाहू द्या ना रामाची बोटे !!

मैत्रीचे गणित -

मैत्रीमधे वजाबाकी
दोषांची करावी,
मैत्रीमधे बेरीज ती
गुणांची करावी;
मैत्रीत हवा गुणाकार
मैत्रीत नको भागाकार,
मैत्रीच्या गणितांमधे
शून्याला नकोच आधार !
जीवनात सुविचारांनी
मैत्रीचे धागे विणावे,
विणता विणता धाग्यांनी
जाळे सुंदरसे बनवावे;
मैत्रीच्या जाळ्यात
खूप खूप गुरफटावे-
मैत्रीचे गणित नंतर 
आयुष्यात ना सुटावे !!

माता ही घाबरी ---

[चाल: राधा ही बावरी -]

गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते
ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते
त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई
माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी !

इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना
थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना
तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई
तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?

आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती
पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती
ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई
ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !

पुढार्‍या,तू मंञी होणार !

(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -)

‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार
पुढार्‍या,तू मंञी होणार !

माती,वाळू,सिमेंट,चूना
तूच पुरवसी खडी विटांना
इमारती त्या उभारतांना
तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला
नसे अंत ना पार !

सभासभांचे रूप आगळे
प्रत्येकीचे जथे वेगळे
तुझ्याविना ते काढती गळे
हाती कुणाच्या दिसती नोटा
कुणी पिऊन हुश्शार !

तूच भेसळीतून जोडसी
घोटाळ्यांतुन एकी तोडसी
कुरघोडयांतुन पक्ष फोडसी
देसी पेटया- लाच पुरवसी
पक्ष पुढे बेजार !!

उंदीरमामा आणि मनीमावशी -

ट्रिंग  ट्रिंग  ट्रिंग  ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग -
कुणीच नाही  फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !
उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत -
फोन लावला कानाला
 जोरात लागले बोलायला -
" उंदीरमामा मी  इकडे ;
कोण बोलतय हो  तिकडे  ? "
- विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-
" मी  तुमची  मनीमावशी,
कालपासून आहे  उपाशी ."
 - मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार ,
सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार
शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार
वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार -
देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार
शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार -
आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार !
सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार
'अभिनयाच्या अंगा'स्तव  'तो' 'स्त्री-वेषी' न होणार
'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत  बोलणार
निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार
'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!

किती सांगू मी आनंद झाला-

(चाल:- किती सांगू मी सांगू कुणाला-)

किती सांगू मी आनंद झाला ,
भाव भाज्यांचा खाली ग आला !
गडे जाऊ चला , भाज्या आणू चला-
रुपयाला किलो कांदा झाला ! ।१।

नवर्‍याच्या संगती ग , पिशव्या हाती
                                घेऊन मी आले
‘नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात-’
                            नवरोजी कुरकुरले !
चुका-दोडका-लसूण , कोबी-आलं-सुरण ,
             नवलकोलात फ्लॉवर दिसला ! ।२।

मेथी शेपू भेंडी ग , पालकाची पेंढी
                       भुलले ग्राहक किती !
कुणी मागे गवार , कुणी घेवडा-मटार
                        शेंगांना नांवे किती !
रोज फोडी करून , ते बटाटे चिरून-
           सांज सकाळी कंटाळा आला ! ।३।

भाव असा वाढला ग , घेणारा भरडला-
                         डोळ्यांतुनी पाणी पडे !
लपुन छपुन व्यापारी , करती ग नफेखोरी-
                              महागाई चोहीकडे !
....घेता डुलकी जरा , स्वप्न पडले मला-
              जाग येता , बटाटा तो दिसला !! ।४।

जगावेगळे विश्व कवीचे -

जगावेगळे विश्व कवीचे
अक्षरांसवे खोड्या करता -
चिमटे काढते वा गुदगुल्या
सराईतपण हाती येता !

जे ना दिसते कधी रवीला -
म्हणे नेमके कवीस दिसते
पाताळातून थेट त्या गगनी -
कवी भरारी चालू असते !

बालपणी वा म्हतारपणी ,
खरडावी लेखणी वाटते !
परी लेखणी येता हाती
कवीमनीं का खंत दाटते !

जुळवू कैसे यमकाला मी
भिता व्याकरणाला मनात
गणवृत्ता ओळखू कसे मी -
काव्यप्रसूती चिंता जनात !

अरसिका पहिले वंदावे -
अन कवितेचे बोट धरावे ,
टीकाकारास मुळी न भ्यावे
स्वानंदास्तव मस्त लिहावे !!

बंडूच्या स्वप्नातच येते -

बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी
झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी   ।१।

खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल
चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल   ।२।

ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार
बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार   ।३।

खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर
निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर   ।४।

ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा
प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा   ।५।

बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी
कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी    ।६।

मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू
देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्टीदांडू   ।७।

- - - गजर घड्याळाचा ऐकुन करि बंडूला परी टाटा
लवकर निजून उशिरा उठता बंडू खाई धपाटा   ।८।