बागेमधली विविध फुले
रांगामधुनी कशी बहरती
रंग लेऊनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती !
वातावरणी रम्य रंगती
मुलामुलींचे ढंग वेगळे
कोलांटउड्या मर्कटलीला
पळापळीचे खेळ आगळे !
बाबागाडी निवांत फिरते
चिवचिवणारी छोटी बाळे
विश्वाला सामावून घेती
लुकलुकणारे त्यांचे डोळे !
खुषीत नातू आणि आजोबा
बागेमध्ये फिरून येती
कोण सान नि कोण तो मोठा
देहभान विसरून जाती !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा