माणूस तोच माना, बोले विचार करुनी
बोले जसा मुखाने चालून दाखवी जो -
मदतीस धावुनी ये नात्यासही जपूनी
सर्वांस आदरून मैत्रीस मानतो जो !
वेळेवरी स्तुतीला निर्व्याज कौतुकाला
मागेपुढे न पाही, करि ना कधी ठणाणा -
निंदा करी न कधिही अपशब्द बोलतो ना
माणूस संगतीला सत्पात्र तोचि जाणा !
माणूस तो न माना व्यसनात गुंतला जो
व्यसनात राहुनीया इतरांस ओढतो तो - अवसानघात करि जो मातापिता सख्याचा
हक्कास फक्त जाणी, कर्तव्य टाळतो तो !
नात्यास आणु पाहे गोत्यात जी लबाडी
तोंडावरीच गोडी पाठीवरी चहाडी -
राहूनिया कृतघ्न निंदा सदा करी जो
विश्वासघात करतो माणूस ना मुळी तो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा