सल्ल्याचा फायदा


बायको भलतीच काटकसरी .
का कुणास ठाऊक,
पण मागच्या महिन्यापासून बायको फारच चिडचिड करू लागली.
बायकोच ती-,

 ऐकतेय  की नाही, अशी भीती असतांना,
मी तिला योगासने आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला.

दोन दिवसाखाली बायको खुषीत दिसली.
अर्थातच तिच्या खुषीचे कारण काढून घेण्यासाठी मी विचारले,
" काय बाईसाहेब, माझा सल्ला एकदम मानवलेला दिसतोय ! "

कधी एकदा सांगते, या आविर्भावातच बायको म्हणाली,
" बर झालं बाई, तुम्ही योगासनांचा सल्ला मला दिला.
उशीरा का होईना, पण दोन दिवसांखाली मी आसने सुरू केली,
आणि त्याचा मला इतकाsss फायदा झाला म्हणून सांगू ! "

कधी नव्हे तो बायकोला चांगला सल्ला दिला म्हणून
मी माझ्या शर्टची कॉलर ताठ करणार-
त्याआधीच बायको म्हणाली,
" मी दोन दिवसांखाली शीर्षासन केले आणि गंमतच झाली. "

मी उलट विचारले, " शीर्षासनात गंमत कसली आणखी ? "

ती काटकसरी बायको छानसे हसत हसत म्हणाली,
" अहो काय सांगू तुम्हाला ;
कपाटासमोरच्या भिंतीजवळ शीर्षासन करण्यासाठी म्हणून,
मी खाली डोके आणि वरती पाय केले आणि नेमका -
घर झाडताना कपाटाखाली गेलेला,
माझा हा चष्माच दिसला मला !
मस्त झाला गडे...
तुमच्या सल्ल्याचा फायदा ! "


. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा