भिंत !
दोन अक्षरी साधा शब्द !
"नावात काय आहे"च्या धर्तीवर, तुम्ही आता "भिंतीत काय आहे ?"- असे विचारणारच ! अर्थात असे विचारणे म्हणजे " दिवाळीत काय आहे " असेच विचारणे !
" भिंत " या सध्या शब्दातच एक भव्यपणा आहे. आजच्या युगातील एक प्रकारचे वैशिष्ट्य जणु या शब्दात दडले आहे. व्याघ्रावर स्वार होऊन येणाऱ्या गुरू चांगदेवाला भेटण्यासाठी जेव्हां ज्ञानदेवाने भिंत चालवली, तेव्हां खुद्द चांगदेवाने आपल्याच तोंडात बोट घातले म्हणे ! या कथेमुळे तर भिंतीला एकप्रकारचे आगळेच तेज प्राप्त झाले आहे !
बाजारात फाटक्या नोटा चालत नाहीत, शाळेत विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके चालत नाहीत ! कित्येकदा नव-याचे बायकोपुढे काहीच चालत नाही-, असे असताना, पाय नसलेली, जीव नसलेली- साधी भिंत चालते- हे आश्चर्यकारक विस्मयपूर्ण वैशिष्ट्य नाही ?
मनुष्य कल्पक आहे. पूर्वी ज्ञानेश्वरकाळात "चालणारी भिंत" असल्याचे ऐकिवात आहे, तर आज आपण "बोलणारी भिंत"ही प्रत्यक्ष पाहू शकतो ! आपण जे काही बोलू तेच आणि तसेच बोलून दाखवणाऱ्या विजापूरच्या गोलघुमटाच्या भिंती हा सर्व जगाच्या कौतुकाचा विषय आहे !
चालू शतकातील माणसे मुक्या, अबोल भिंतीना बोलण्यास भाग पाडू शकतात. निवडणुकीचे दिवस आठवा. याच भिंतींनी तुम्हाला "- - - पुढे एक फुली ", किंवा " - - -लाच मते दया"- असे आवर्जून सांगितल्याचे स्मरते ना ? प्रियकराला प्रियाराधनाच्या काळात "आंधळ्या प्रेयसीचे डोळे " कसे बोलके " वाटतात, तद्वतच निवडणुकीच्या काळात मुक्या भिंतीना वाचा फुटून त्या "बोलक्या" बनतात ! निवडणुकीच्या प्रचाराचे साधन, म्हणून जगात भिंतीला अद्वितीय स्थान आहे !
भिंतीचा दुसरा अवतार म्हणजे "जाहिरातीचे उत्तम साधन !" रंगीबेरंगी बनलेल्या ठिगळानी बनलेल्या वस्त्रांप्रमाणेच ती भिंत नटूनथटून उभी रहात असते ! नाना जातीची, नाना धर्माची माणसे धर्मशाळेत एकत्र जमावीत, त्याप्रमाणे निवडणुकीनंतर भिंतीचे स्वरूप बनते. एका कोपऱ्यात धारदार ब्लेडची जाहिरात, त्याशेजारीच फेअर-एन-लवली वापरणा-या सुंदर स्त्रीच्या मुखड्याची जाहिरात, त्याखालच्याच कोप-यांत वरील सुंदर (!) स्त्रीचा मुखडा पाहून- घ्याव्या वाटणा-या डोकेदुखीच्या अप्रतिम गोळ्यांची जाहिरात, ह्या सर्व जाहिरातीत उठून दिसणारा तो "लाल त्रिकोण !" चारपाच नातेवाईक एकत्र नीटपणे राहू शकत नाहीत, पण चार-पाच विरोधाभासात्मक जाहिराती मात्र समाधानाने अगणित काळ एकत्र नंदू शकतात, ही गोष्ट निर्जीव भिंतीच्या आत रहाणाऱ्या माणसांपेक्षा निश्चितच अभिमानास्पद आहे ना ! अशा भिंती पाहिल्या की, मला उगीच त्याबद्दल आदर वाटू लागतो. कारण असा "कोस्मोपोलिटीशिअन सर्वधर्मसमभाव" इतरत्र दिसणे हे - सोलापुरात खरेदी केलेल्या लोटरीच्या तिकिटास सोलापुरातच बक्षिस लागण्याइतके दुर्मिळ दुर्लभ आहे !
पुरातन काळात मानव अक्षरशः उघडा होता. जसजसा तो प्रगतीपथावरून चालू लागला, तसतसा अडथळा आणणा-या शत्रूला तो भिऊ लागला. तो स्वत:ला दडवण्यासाठी आधार शोधू लागला. एका दगडाची भिंत अपुरी पडून, भिंतींची संख्या दोनावरून चार झाली ! त्याला चार भिंती आधी पुरेशा वाटल्या खऱ्या- पण तो आधार अधिकच आकर्षक बनवण्यासाठी, त्याची धडपड सुरू झाली. तिची रचना, आकार, बांधणी- याकडे तो काळजीपूर्वक लक्ष देऊ लागला. दगड-विटा-मातीच्या भिंतीना आतून बाहेरून तो रंगवू लागला. तिची शान वाढवू लागला. सदैव काळेबेरे करण्यात हात गुंतलेल्या पुढाऱ्याचे लक्ष जसे, आपला चेहरा आणि पोशाख तरी स्वच्छ असावा- याकडे असते, तसे घरातील घाण लपवण्यासाठी भिंतीना छान ठेवण्यात मानवाचे मन रंगू लागले ! नुसत्याच भिंती बेडौल दिसतील- म्हणून तो भिंतीत कोनाडे, खिडक्या, खुंट्या, फडताळे बनवू लागला. भिंतीची महती त्याला पटली ! "भिंत" ही केवळ नावालाच भिंत नसून, ती आपली रक्षकही आहे. ती आपल्या भांड्यांची व भांडणांची अब्रू झाकते. घरातील लक्तरे जगापुढे उघड्यावर न आणता, ती घरातच लोंबू देण्याची सेवाइमाने इतबारे भिंत बजावते !
स्वत:चे संरक्षण व्हावे, म्हणून जनता स्वत:ला चार भिंतीत कोंडते, तर चोरांचे संरक्षण व्यवस्थित व्हावे- म्हणून सरकार तुरूंगाच्या भिंती उभारते ! भिंत तरी एकाच प्रकारची असते म्हणता काय ! छे ! उभ्या भिंती, आडव्या भिंती, सिमेंटच्या भिंती, विटांच्या भिंती, दगडांच्या भिंती, लाकडी भिंती ! जसे भिंतींचे नाना प्रकार, तसे त्यांचे विविध मालक- श्रीमंतांच्या गुळगुळीत संगमरवरी, शेतकरी-मजुरांच्या कुडाच्या झोपडीच्या भिंती ! इतिहासात अजरामर झालेली चीनची लांबलचक, उंच आणि अभेद्य भिंत-, तर भूगोलात आढळणारी भूकंपविरोधक पुठ्ठ्याची घडी करता येणारी भिंत !
भिंतीचे महत्व समजल्याशिवाय का अकबराने मुमताजला का त्या शहाजहानने अनारकलीला भिंतीतच चिणून मारायचे ठरवले होते ! इतिहासाने तळघराच्या भिंतीना काय उगाच महत्व दिले ? तळघर हे तर पूर्वी सैन्याचे सर्वस्व असायचे. तळघरातील गुप्त वाटा दाखवणारा सूर्याजी पिसाळ उघडपणे आपल्या फितुरीने अजरामर (!) झाला ! शत्रूने भिंतीला पाडलेले खिंडार, एका रात्रीत बुजवण्याच्या कामगिरीने चांदबीबी उगाच नाही प्रसिद्ध झाली ! एकंदरीत भिंतीने जगात इतिहास घडवायला सहाय्य केले आहे ! "भिंत नसती तर-" काय अनर्थ घडले असते, हे लिहिण्यास माझी लेखणी तरी समर्थ नाही, आणि ते आता लिहिण्यातही काही अर्थ असे वाटत नाही !
एवढे मात्र खरे की, पूर्वीची भिंत ही पूर्वजाइतकीच स्वाभिमानी होती. जुन्या इमारती, वाडे, किल्ले अद्यापही ताठ मानेनेच उभे असलेले आपल्याला आजही दिसतात ! "मोडेन पण वाकणार नाही-" अशा बाण्याच्या पूर्वजाप्रमाणेच, त्यानी बांधलेल्या भिंतीही खाल्ल्या सिमेंटला- मातीला- चुन्याला जागून अजूनही दिमाखात उभ्या आहेत ! हल्ली पैसा दिला की माणूस मान तुकवतो, झुकवतो. भिंतीना याच गोष्टीचे वाईट वाटून, त्या आपल्या शिमिटाच्या डोळ्यातून वालुकामय अश्रू ढाळतात ! नाइलाजानेच त्या आपल्या धन्याआधी पंचत्वात विलीन होऊ बघतात !
पूर्वीच्या भिंती "इमानदार" होत्या, तर आजच्या भिंती "कानदार" आहेत. धन्याच्या कसल्याही बातम्या शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात जुन्या भिंती तरबेज होत्या, तर गुप्त बातम्याच प्रथम फोडण्यात आजच्या भिंती वाकबगार आहेत, असे म्हणण्यात- मुळीच अतिशयोक्ती नाही !
भक्कम भिंतीमुळे एकेकाळी, या कानाची बातमी त्या कानाला कळत नसे. आजच्या काळात आपल्याच घरात आपल्याच बायकोला मारलेली लाथ चुकली, तर ती हमखास भिंत फोडून आरपार जाऊन आपल्याच शेजाऱ्याच्या बायकोच्या कमरेत अचूक बसण्याची शक्यता अशक्य वाटत नाही ! कुठे पूर्वीच्या त्या "भीतीतारक" भिंती आणि कुठे आजच्या "भीतीकारक" भिंती !
भिंतीचे महत्व अमूल्य आहे. ते कित्येकांना माहित असल्याने ते लिहितात- "येथे जाहिरात व अन्य मजकूर लिहिण्यास सक्त मनाई आहे-" अशी सूचना वाचूनही, एखादी जाहिरात वा अन्यप्रकारचा मजकूर तेथे लिहिला गेलेला असतोच ! बिच्चारे भिंत-मालक !
आपला आधार म्हणजे "भिंत". आपल्या पूर्वजन्मातल्या पापकर्माचे फळ म्हणून भूकंपप्रसंगी भिंत आपल्याला गाडावयास मुळीच मागेपुढे पहात नाही. कुस्ती आणि कुस्तीशौकिन, तसेच क्रिकेट आणि क्रिकेटशौकिन- यांचे नाते अतूट आहे. भिंतींचा आधार ह्या फुकट्या शौकिनांना खेळाचे सामने फुकट पहाण्यात कितीतरी होतो ! सरळ मार्गाने कधीच न जाणारे चोर ऊर्फ शर्विलक, तुरुंगातून अथवा घरांतून उड्या मारून पोबारा करण्यात, भिंतीचाच किती लीलया वापर करतात ! नवरा-बायकोला भांडणानंतर, (स्वत:चेच -) कपाळ फोडून घेण्यासाठी म्हणून, ह्या भिंतीसारखे उत्तम जवळचे साधन नाहीच ! असे फुकटे प्रेक्षक, असे फुकटे चोर आपले खास कौशल्य दाखवताना पाहून, अनादिकालातील आपल्या "पूर्वजां"ची आठवण होत रहाणे, स्वाभाविक आहे !
सुप्रसिद्ध देशभक्तांनी तुरुंगाच्याच भिंतीवर आपली काव्यसुमने फुलवली आहेत ! तर काही ठिकाणच्या विशिष्ट भिंती अश्लील काव्याने थुंकलेल्या आढळतात ! भिंतीबद्दलच्या वाढत्या आस्थेमुळे भिंतीला किंमत आहे. ती उभी असतांना भाड्याने देता येते. ती कोसळल्यानंतर तिच्या भग्नावशेषांना मागणी येते. जाहिरातीद्वारे पैसे मिळवण्याचे, भिंत एक उत्तम साधन आहे. कधीकाळी गवळ्याकडून घेतलेल्या कमी जास्त दुधाची नोंद अन्यत्र कुठेही न करता, ती भिंतीवरच करण्यात महिलांना विशेष अप्रूप वाटत असते ! ज्ञानेश्वरानी चालवलेली भिंत एकवेळ आपल्याला कुठे पहायला मिळणार नाही, पण दूध-नोंदीची दुर्मिळ भिंत आपल्याला आपल्या घरात कधीही पहायला मिळू शकते ! समस्त महिलावर्ग या भिंतीवरच आपल्या बाळांना "घोडा-घोडा" खेळायला शिकवतात आणि बाळ खेळूनखेळून दमले की, त्याच भिंतीवर "शू" करायला शिकवतात !
भिंतीचा योग्य उपयोग करण्यात, महिलावर्गानंतर नंबर लागतो तो, कुटुंबनियोजन-प्रचारकांचा ! त्यांना भिंतीबद्दल वाटणा-या प्रेम, आदर, कौतुक याबद्दल न लिहिणेच बरे ! एखादा मंत्री अगर एखादा प्रसिद्ध नट आपली प्राप्तीकराची थकबाकी पंधरा वर्षांनी भरण्याची चूक करील, पण कुटुंबनियोजनप्रचारक आपल्या हातून पंधरा भिंतीतील एकही भिंत लाल त्रिकोणाच्या तडाख्यातून सुटण्याची चूक, चुकूनही होऊ देणार नाही !
भावी जावयाबरोबरच त्याच्या स्वत:च्या मालकीच्या चार भिंतींची चौकशी पूर्ण केल्याखेरीज, कुठल्याही वाधुपित्याचा आत्मा शांत होतच नाही !
टक्कल पडलेला माणूस आणि घराच्या रिकाम्या भिंती- दोन्ही गोष्टी सारख्याच ! म्हणून तर आपण आरसा, फोटो, खिळे, शोभेच्या वस्तू, मोडक्या खुर्च्या, छत्र्या, घड्याळे यानी आपल्या घराच्या भिंती सजवतो. पैसा न खाता काम करणाऱ्या अधिकाऱ्याइतकेच, क्यालेंडरशिवाय भिंत दिसणे दुर्मिळ जाहले आहे.
भिंतीत खिळा ठोकणाऱ्या कमनीय कामिनीस पाहून एखाद्या काविराजाला काव्यप्रसूतीची स्फूर्ती होते, तशीच स्फूर्ती भिंत समोर दिसली रे दिसली की, एखाद्या श्वानराजाला आपली मागची तंगडी वर करायची येत असावी ! जाहिराती पाहून फसणे, भुलणे हे प्रत्येक स्त्रीपुरुषाचे आद्यकर्तव्य ठरते ! त्यामुळे भविष्यकाळात असे होईल की, माणूस पुनश्च उघड्यावर राहू लागेल आणि जाहिरातींच्या भावी उत्पन्नासाठी नुसत्याच लांबलचक आणि उंच भिंती बांधू लागेल !
" भिंतीत काय आहे ?"- असे विचारणारे सूज्ञ आता " भिंतीतच सारे काही आहे ! "- असे म्हणणार, यात शंकाच नाही ! रस्त्यातून जाताना आलिशान इमारतींच्या रंगीबेरंगी आकर्षक भिंती दिसतात. सिनेमांची दिलखेचक रंगीत पोस्टर्स, हरेक मालाच्या उठावदार जाहिराती, आम जनतेने बार भरल्यावर मारलेल्या पिचका-यांची नक्षीदार कलाकुसर ! मधूनच जुन्या इमारतींच्या उसासे टाकणाऱ्या विटक्या भिंती ! रात्रीच्या मंद उजेडात हितगुज करू इच्छिणाऱ्या पोपडे निघालेल्या भिंती !
कधीतरी, सटीसामासी अथवा दिवाळी वा तत्समप्रसंगी- ह्या साऱ्या भिंती रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊनमाखून निघतात. त्या त्यावेळी अधिकच आकर्षक वाटतात आणि मग कौतुकाने तोंडून उस्फूर्तपणे उद्गार बाहेर पडतात -
" रंगल्या भिंती अशा ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा