बसस्टॉप


    दिवसभर घरात बसून कंटाळा आला होता. बसस्टॉपकडे एखादी चक्कर मारावी, म्हणून चपलेत पाय घातले नि निघालो. दाराशीच नवे शेजारी भेटले . त्यांनी नको असताना हटकलेच . "बसस्टॉपकडे फिरावयास निघालोय !" - असे उत्तर देऊन मी माझा रस्ता सुधारला. माझ्या त्या उत्तरावर शेजाऱ्याने असा काही चेहरा केला की, जणू काही मी ठाण्याच्या इस्पितळाकडेच नाव नोंदवण्यास निघालो होतो ! अरसिकच आहे बेटा ! बसने प्रवास करण्यात पैसे खर्च होतात, पण बसस्टॉपवर काहीवेळ फुकट मजा पहावयास मिळते तर ती का सोडावी ?

        मी तर म्हणतो की, माणसाने काशीयात्रा वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्या यात्रेस जाऊन आयुष्यातला महत्वाचा काळ फुकट घालवण्याऐवजी, रोज बसस्टॉपवर पंधराच मिनिटे घालवली, तर त्या मनुष्यास 'प्रवासी व फॅशन-दर्शन ' यासारख्या विषयावर प्रबंध लिहिता येईल व (फुकटात-) डॉक्टरेट मिळू शकेल !

        कुंभमेळा व बसस्टॉपभोवतालची गर्दी यात फरक फक्त एकच आहे. कुंभमेळ्याचे यात्रेकरू ईश्वरनामात सदोदित दंग असतील, मात्र बसस्टॉपवरचे प्रवासी बस कंडक्टरच्या नावाचा जप करत असतात. बसबद्दलचे प्रेम जास्तच उतू आले, तर त्याच्या नावाने शंखध्वनी करण्यासही ते प्रवासी मागेपुढे पाहात नाहीत ! मानवी सुखासाठी बस हे साधन आहे. हे साधन वापरण्यासाठी आधार म्हणजे बसस्टॉपचाच !

        सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व तऱ्हांची माणसे एकत्र आणण्याचे सामर्थ्य ह्या बसच्या 'थांब्या'त आहे. रविवारी संध्याकाळची जत्रा पाहण्याचे नयनरम्य स्थान म्हणजे बसस्टॉप ! ज्यांचा वेळ बेकारीत जातो, त्यांनी तेथे जाऊन बसावे. त्यांचा वेळ तेथे फुकट जाणार नाही. बससाठी थांबणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे पोशाख, चेहरे, त्यांचे हावभाव वगैरे गोष्टी बेकार लोकांनी अभ्यासल्या, तर ते उत्तम 'मानसशास्त्रज्ञ' होऊ शकतील ! पण मी हे काय सांगत बसलोय- म्हणजे चाललोय- वेड्यासारखा ?

        तो पहा- बसस्टॉप आलाच ! सुदैवाने आज रविवारचा दिवस. संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत हं. ह्या कट्ट्यावर मी बसतो बर का ! इथून आपल्याला सार काही बसस्टॉपवरच दृश्य दिसतंय !

        ते पहा , नवविवाहिताचे नव्याकोऱ्या कपड्यातले एक जोडपे बससाठी 'थांब्या'कडे येऊ लागलय ! दोघेही कसे मस्त लाजतायत ! निदान सर्वांच्या समोर एकमेकांचा धक्का एकमेकाला लागू नये म्हणून किती जपताहेत ते ! (पण असे करण्याच्या प्रयत्नातच वधूचा धक्का वराला लागला बर का- माझे सूक्ष्म निरीक्षण !) वधूचा धक्का वराला लागताच ती ओशाळते . परंतु 'लाजतेस काय अशी ? आपल्याला जीवनात जोडीने यापुढे कितीतरी धक्के अजून खायचे आहेत !' - अशाप्रकारचा भाव तो वर चेहऱ्यावर दर्शवत आहे. बसथांब्याजवळील त्या पलीकडच्या कट्ट्यावर दोन तीन पेन्शनर्स गप्पा छाटत आहेत. आसपास इकडे तिकडे हिंडणाऱ्या तरुणींकडे (चोरटे ?) दृष्टीक्षेप टाकत, 'आजचा तरुणवर्ग का बिघडत चालला आहे?' याचीच बहुधा ते चर्चा करत असतील !

        संध्याकाळची वेळ ही शाळा कॉलेज ऑफिसेस सुटण्याची व सिनेमा सुरू होण्याची वेळ असते. पण आज रविवार ! त्यामुळे सिनेमाला जाणारे व फिरायला जाणारेच प्रवासी आपल्याला बसस्टॉपजवळ दिसणार ! त्या तीन जाडजूड स्त्रिया पाहिल्यात का ? त्या तिघी मिळून सिनेमाला असतील. कारण नुकताच पगार झालाय ना ! त्या श्वेतवस्त्रधारित शिक्षिकाच असणार ! कारण त्या पहा कशा अंग चोरत उभ्या आहेत ! कुण्या परपुरुषाचा स्पर्श होताच त्याचे, त्या आपल्या चष्म्यातूनच भस्म करतील अशी मला तरी खात्री वाटतेय !

        हा घोळका कॉलेजचा असावा. सर्व प्रवाशांच्या (माझी सुद्धा दृष्टी हं ! खोटे कशाला सांगू ?) नजरा त्या घोळक्याकडेच आहेत. त्या घोळक्यात एक तरुण (नवा भरती डेमोन्स्टरेटर !) आहे, त्याच्याभोवती चार पाच 'मिस कॉलेज ' असाव्यात ! तो तरुण मात्र ओशाळला आहे, कारण सध्या तो गोपीतला कृष्ण आहे, हे सर्वजण पाहत आहेत ना ! त्या गोपी- सॉरी पोरी- आपल्या माना वेळावून वेळावून, त्याला बहुधा 'रविवारच्या नव्या डिफिकल्टीज ' विचारत असाव्यात. सर्वजणासमोर  नवीन डेमोन्स्टरेटरचे डिसेक्शन जाहीररीत्या करण्याची संधी- नाही तरी त्या पोरीना दुसरीकडे कुठे व कधी मिळणार ?     

        त्या तिथे भडक कपड्यातील दोन सिंधी महिला आपापसात बडबडत आहेत. त्यांच्या पोरांचा रस्त्यावरच तमाशा चालू आहे. एक पोरटे ट्विस्ट करत आहे, दुसरे पोरटे "मैं गधोका लीडर्रर्रsss' म्हणून कोकलत आहे. त्यांच्या आयांचा नुसत्या हातवाऱ्यातच वेळ चालला आहे.

        वेळ ही अशी मस्त संध्याकाळची ! सूर्य अस्ताला जात आहे----वगैरे ! अशा रम्य वेळी तो पहा सात-आठ स्कर्ट व साड्यांचा ताफा, बससाठी इकडे येत आहे. कॉलेजमधील इकोनॉमिक्सचा हा ग्रुप दिसतोय ! शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या या अप्सरा असाव्यात ! कारण त्या ग्रुपमधील एका साडीवालीचा डोईवरील कच्छ-मुकुट सर्वात उंच तळपतोय ! केशमुकुटाची उंची हे सध्या डोक्यातील ज्ञानावरही थोडीफार अवलंबून आहे ! त्या ग्रुपमधून ज्युनिअरच्या पोरा-पोरीवर ताशेरे उडत असणार . त्या साडीवाल्या पोरी, मधूनच आपले खांद्यावरील पदर नीट आढळले तर थोडेसे ढळवण्याचा प्रयत्न करत आहेत ! (जाऊ दे ! अशा गोष्टी (आपलेच -) डोळे मिटून पहावयाच्या असतात !) किंवा एखाद्या नवीन आलेल्या स्मार्ट लेक्चररबद्दल- 'तो कुणाकडे व कितीवेळ पाहत असतो ?' याचे मूल्यमापन करत त्या भोवतालचे विश्व विसरू पाहतात.

        ह्या अप्सरांच्या आपोझिट साईडला पाहिलेत का ते कॉलेजकुमारांचे टोळके ? ते 'न्यारो-हिप्पी' आहेत हं ! अप्सरांकडे पाहून ह्या गंधर्वांच्या लीला बऱ्याच चालू असतात. गंधर्व व अप्सरा ह्यांच्याकडे आळीपाळीने नजर टाकत, एखादा टांगेवाला मिस्कीलपणे 'है क्या एक सवारी ?' असे ओरडत जातो. अर्धा मळकट लेंगा घालून गळ्यात हिरवा तांबडा रुमाल बांधलेले एक कार्टे बघा हातातली कपबशी मुद्दाम वाजवत चाललंय ! ते आता ओरडलेच - 'सवेरेवाले गाडीसे चले जायेंगे !' कधी का जाईनास बेट्या- त्या पोरी तुझ्याबरोबर थोड्याच येणार आहेत ? पोरीना तरी थोडीशी गम्मत वाटून त्या हसतात. ते ऐकून-पाहून त्या टोळक्यातल्या प्रत्येकाचा कलेजा पार खल्लास झाला असणार !

        पोरांच्या टोळक्याकडे गेलेली ती म्हातारी बघितली का ? पण ते टोळके तिला पोरींकडे पाठवते. ती काहीतरी पुटपुटत पोरींना विचारते. त्यातली एक पोरगी तिला नीट रस्ता समजावून सांगत, एक समाजकार्य पार पाडते. मधूनच एक आगाऊ तरुण, गॉगल घालून सायकलवर कसरत करत गेला. पण त्याची ती कसरत पहायला इथे वेळ कुणाला आहे ? सर्वाना येणाऱ्या बसचीच काळजी लागून राहिली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने एकही बस वेळेवर येणार नाही, एरव्ही चारचार बशी ओळीने एकमेकीना खेटून उभ्या असलेल्या दिसतात !

        दोन चार पोक्त जोडपीही सिनेमाला निघालेली आहेत ! हे जवळचे जोडपे पहा. बायकोच्या हातात बास्केट व नवऱ्याच्या हातात बेबी व मोठा बॉल आहे ! 'आजोबा, बश कधी येनाल ?' - बारकी बेबी आजोबांना विचारते. बायको व बास्केट यांच्याकडे आळीपाळीने पाहत असलेले आजोबा त्राग्याने म्हणतात- "येईल हं बेबी आता, तासाभरातच !" बायकोचे लक्ष कुठे आहे पतीराजाकडे ? तिचे लक्ष आहे आपल्या पर्फेक्ट 'म्याचिंग'कडे ! बास्केट चप्पल पर्स पातळ ब्लाउज या साऱ्यांच कसे झक्क व्हाईट म्याच झालंय ? (पक्का रंगही  कसा झक्क उठून दिसतोय नाही का !) - असा विचार ती स्वत:शी करत असते. नवऱ्याकडे मात्र मारक्या म्हशीसारखी नजर टाकत पाहते . कारण नवऱ्याने चप्पल घालून, ढगाळ्या प्यांटवर पट्टा कसाबसा चढवून, बुशशर्टचा इन केलेला आहे. न शोभणारा दुर्बिणीचा चष्मा त्याच्या नाकावर घसरत विराजमान झालाय !

        सारेचजण बसची वाट पाहत आहेत. पण बस कुणालाच लौकर याविशी वाटत नाही. कारण
बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येकजण आपली 'पोझिशन' आजमावतोय ! सिनेमा काय रोजचाच आहे ! पण सुटीचा दिवस आठवड्यात एकच असतो ना ! बसस्टॉपच्या आसपासचे वातावरण कसे अशावेळी धुंदफुंद बनलेले आहे. निरनिराळ्या केशरचना , निरनिराळ्या फ्याशन, निरनिराळ्या स्वभावांचे दर्शन याच बसस्टॉपवर होते. एखादी छोटीशी जत्राच भरल्यासारखी वाटते ! दुसऱ्यांना कृत्रिम नाटकी जीवन काही क्षण दाखवण्याचा अट्टाहास इथे प्रत्येकाचाच चाललेला आहे. यात सर्वांनाच एकप्रकारचा आनंद आहे. 'आपण सुखी आहोत' हे दाखवण्याची धडपड याच बसस्टॉपवर चाललेली आढळते. त्याच्याकडे पाहून वाटते की, खरेच जगण्यात मौज आहे. सर्व थरांना बसस्टॉप एकत्र आणतो. रडणाऱ्या लहान बालकापासून ते तावातावाने ओरडणाऱ्या वृद्धापर्यंत बसस्टॉपची वागणूक एकसारखीच असते. संध्याकाळच्या मर्क्युरी लाईटच्या सौम्य प्रकाशांत ह्या रंगीबेरंगी सजीव हालचाली पाहिल्याबरोबरच वाटू लागते की, निर्जीव असला तरी बसस्टॉप आपल्याला काहीतरी सांगू इच्छितोय, त्यासाठी तो बोलावतोय ! आणि म्हणूनच मी बसस्टॉपकडे आकर्षिला जातो व तासाभराने मन कसे तृप्त होऊन जाते.. एका अनामिक भावनेनेच !
.                     
       

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा