उपदेश पहावा करून



        कुणाला भाषण करता येते, कुणाला विनोद करता येतो, तर कुणाला आणखी काही करता येते. खर सांगायचं तर मला आपल हे असल काही करायला येत नाही. मला करता येतो फक्त - "उपदेश !" त्यात मात्र आपला तोंडखंडा आहे बर का !

        उपदेश करणे हा धंदा करणारा महाभाग जगात काही मी एकटाच नाही. हजारो वर्षापुर्वी गुरूगृही अभ्यास संपल्यावर, तेथून बाहेर पडणारे समस्त शिष्यगण गुरूकडून उपदेशाचे डोस प्राशन करूनच इतर कार्यांकडे वळत . तसेच विवाहादि कार्य संपल्यावर वधूपिता आपल्या कन्येला जामाताच्या स्वाधीन करतानाही उपदेशच करत असतो. असा एखादा 'उपदेश-सीन' असल्याशिवाय सामाजिक-कौटुंबिक चित्रपट वास्तववादी ठरत नाही, असे म्हटले जाते ! आजतागायत होऊन गेलेल्या संतांच्या कामगिरीत मुख्यत्वेकरून लोकांना सोप्या भाषेत केला गेलेला 'उपदेश'च महत्वपूर्ण ठरला आहे !

        उपदेश करणे ही काही खर्चाची बाब नाही . उपदेश कुणीही करू शकतो. कुणालाही करता येतो. कधीही करता येतो व कुठेही करता येतो . एवढ्या सर्व सोयी असताना अशा कार्याचा लाभ घेणे कुणाला बरे नको वाटेल ? सर्वाना जरी हवेसे वाटेल तरी, याच्या वाटेला फारसे कुणी जावयास धजावत नाहीत, हेही तितकेच खरे ! कारण 'उपदेशकर्त्या' संताना नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. उपदेश करणे आणि केलेला उपदेश आचरणात आणणे - ह्या सारख्याच महत्वाच्या गोष्टी आहेत !

        जगातील  प्रत्येक सासू आपल्या सुनेला रामप्रहरापासून ते रात्रप्रहरापर्यंत 'उपदेश-काढा' पाजण्याचा प्रयत्न करत असते. परंतु गंमत अशी की, सुनेला "असे" वागावे म्हणून उपदेशणारी सासू स्वत: मात्र "तसे" क्वचितच वागत असल्याची आढळते !

        आजकालच्या दंगल जमान्यात शाळेमधे 'शांत बसा' म्हणून उपदेश करणारा पुढारी मात्र, दुसरीकडे दंगल पेटवण्यास उद्युक्त झालेला आढळतो ! 'आई वडिलांची आज्ञा पाळा' असे सांगणारी व्यक्ती स्वत:च्या आईवडिलांना घराबाहेर काढताना आढळते ! 'परोपदेशे पांडित्यम' म्हणतात ते ह्यालाच !

        उपदेश करणाऱ्याइतकाच उपदेश ऐकणाराही त्या तोलाचा असावा लागतो. कुरुक्षेत्रावर भगवान्  श्रीकृष्णाने केलेला 'उपदेश' ऐकावयास तेथे धनंजयच असावा लागतो, दुर्योधनाचे तेथे कामच नाही ! 'लाल त्रिकोणा'ची महती विवाह नोंदणी कार्यालयात येणाऱ्यानाच सांगितलेली बरी, ती वृद्धाश्रमात अथवा बालवर्गात सांगून काय उपयोग ?

        परवा एका 'कुटुंब-नियोजना'चा प्रचारक माझ्या मित्राजवळ फिरत फिरत आला. गप्पा मारता मारता प्रचारक मित्राला सांगू लागला. नव्हे, उपदेशच करू लागला- "आज आपल्या देशात सेकंदाला हजार बालके जन्मास येत आहेत, अशा रीतीने लोकसंख्या वाढत आहे. पण त्याचबरोबर या अनावश्यक वाढीमुळे अन्न वस्त्र निवारा यांचा अपुरेपणा वाढत आहे. यावर उपाय म्हणजे तुमच्यासारख्यानी शस्त्रक्रिया करून घेणे योग्य. तुम्हालाही त्यात देशकार्याला हातभार लावल्याचे समाधान मिळेल !"  मित्र बिचारा प्रचारकाच्या तोंडाकडेच पाहत राहिला. कारण विवाह होण्याआधीच 'शस्त्रक्रिया कर' म्हणून उपदेश करणारा त्याला प्रथमच भेटला होता ! मित्र अद्याप  'अविवाहित' आहे हे समजताच मुकाट्याने तो 'कु नि प्र ' तेथून चालता झाला !

        उपदेश करण्यात पुष्कळदा "गुरुची विद्या गुरूला" फळण्याची भीती असते. एका वकील-अशीलाच्या जोडीची कथा सर्वश्रुतच आहे. वकिलाने अशिलाला न्यायाधिशासमोर वेडेपणाचे सोंग वठवण्याचा उपदेश केला. त्यात वकिलाने ती केस जिंकली. केस जिंकल्याच्या आनंदात जेव्हा त्याने अशिलाकडे 'फी'ची मागणी केली, तेव्हा अशिलाने पुन्हा आपण वेडे असल्याची बतावणी सुरू केली. बिचारा हुशार वकील समजून चुकला की, आपला उपदेश आपल्यालाच भोवला बरं !

        उपदेशाच्या बाबतीत विरोधाभास सदैव प्रत्ययास येतो. 'खोटे कधी बोलू नये' असे मत प्रतिपादन करणारे पिताजी, आपल्या पुत्राला पुष्कळदा देणेकरी दारात दिसताच- 'बाबा घरात नाहीत !'असे सांगण्यास बजावतात. तेव्हाच तो पुत्र समजून चुकतो की, पिताजी जे 'खोटे' बोलू नये म्हणून सांगतात, ते खरोखरचे 'खोटे' नसून, ते 'खरे'बद्दल वापरलेले 'खोटे' आहे ! 'धूम्रपाना'मुळे क्यान्सर होईल असा उपदेश करणारे अनेक डॉक्टर प्रकृतीस्वास्थ्यास्तव झुरके मारत बसलेले दिसतात ! माझी छाती 'एकोणतीस एकतीस'च  दिसत असूनही, 'माणसाने नेहमी थोडे खावे !' असे सांगणारा एक 'किंगकॉंग' मला परवाच प्रवासात भेटला होता ! (त्याची 'चाळीस बेचाळीस' अशी छाती पाहून, त्याला प्रत्युपदेश करण्याची मात्र मला छाती झाली नाही एवढे खरे !)

         पुष्कळजण चांगल्या हेतूने उपदेश करतात. पण करायला जातो एक अन होते मात्र भलतेच ! आता हेच पहा ना- परवा आमची 'ही' घरात भांडण झाल्यामुळे, तलावात (बहुधा पाणी कमी आहे असे पाहून !) जीव देण्यास निघाली. वेळ संध्याकाळी सातची होती. बराच वेळ झाला तरी 'ही' खरोखरच परत आली नाही, म्हणून कंटाळून मी हिच्या शोधार्थ तलावाकडे निघालो. मस्त वारा सुटला होता. मी 'बहारो फूल बरसाओ ..' असे गुणगुणत तलावाजवळ पोहोचलो . तेवढ्यात तिथे एका बाकड्यावर, ओळखीची अशी वाटणारी  हिची साडी उर्फ पोतेरे दिसले. म्हणजे 'ही अजून जिवंतपणीच  येथे बसली आहे तर'- असा विचार करत मी बाकड्याजवळ दहा पावलांवर पोहोचलो. तेवढ्यातच वीज गेली. अंधार गुडूप झाला ! मी आपला सरळ बाकड्यावर 'हि'च्याजवळ जाऊन बसलो. आणि नेहमीचा धंदा (-अर्थात 'उपदेश करण्या'चाच हो !) सुरू केला !

        "प्रिये लाडके देवते.... वगैरे वगैरे.. आता तरी चल घरी.. अशा कातरवेळी एकटेच इथे बसणे योग्य नाही. मी तुझ्या सोबत आहे. मला एकट्याला तुझ्याशिवाय घरी कसे करमेल ? " - मी असे उपदेशत असताना, तिने काही उत्तर देण्याऐवजी- फाडकन माझ्या गालावर हात उमटल्याचा आवाज आला. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले . अन तेवढ्यात वीज आली ! बाकड्यावर जिच्याजवळ बसून मी उपदेश केला, ती बाकड्यावरची 'ती'-  माझी 'ही' नव्हतीच हो !   

 हिच्यासारखीच साडी असलेली ती, दुसऱ्याच कुणाचीतरी 'ही' होती !

        हल्ली मी सर्वांना उपदेश करत असतो-

 "बाबानो, दुसऱ्यांना उपदेश अवश्य करा, पण ते दुसरे 'भलतेच कुणीतरी तिसरे' असू देऊ नका !"
.  

                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा