मी कवी आहे -

" मी कवी आहे -" ही बातमी सगळीकडे पसरत आहे
ओळखीचाही ओळख माझी आता का विसरत आहे ..

माझ्या दिशेने येणाऱ्या मित्रांना मी थांबवत आहे
जमेल तेथे जमेल त्याला माझ्या कविता ऐकवत आहे .. 

'तो पहा-- कवी आला..' ऐकून जो तो घाबरत आहे 
मला पहाताच उलट्या दिशेने पटकन का पळत आहे ..

येणारा जाणारा मला बघून हात खिशात घालत आहे
कापसाचे दोन बोळे काढून आपल्या कानी कोंबत आहे ..

जिच्यावर प्रेमकविता करायला कधी न मी कंटाळत आहे  
हल्ली तीही दूर सरकते बोलण्यासपण टाळत आहे ..

"माझा पहिला काव्यसंग्रह"- मी जाहिरात करत आहे   
विक्रीसाठी दारोदारी उंबरठेही झिजवत आहे ..

मी समोर दिसताच जो तो आपले पाकिट चाचपतोय  
जमलेच तर रिकामे पाकिट उघडून मला दाखवतोय ..

माझी चाहूल लागताच आंधळा भिकारी दचकत आहे
आपला वाडगा अथवा थाळी पुन्हा पुन्हा चाचपत आहे ..  

लेखक, विडंबन, गझलकार अंतर राखून चालत आहे  
तुच्छतादर्शक नजरेनेच मला पाहतो वाटत आहे ..

उधारीच्या भीतीने चहावाला नजर चुकवतोय  
येताजाता आदबीने रद्दीवाला नमस्कार करतोय .. 

पाहुणे, मित्रमंडळाची वर्दळ बरीच रोडावत आहे
एकांतात बसून मी एकेकाला आठवत आहे ..

दुरावलेला दोस्त मुद्दाम जवळ बसून सांगत आहे 
वरचेवर मी काटकुळा तर बायको जाड दिसत आहे ..

चहा फराळास बोलावलेला यायला नकोच म्हणत आहे      
बायको खुषीत आनंदाने टीव्हीसमोर बसत आहे .. !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा