आंबेखरेदी


आंबेखरेदीसाठी मंडईत गेलो की, 
उगाच सराईताचा आव आणत,
दोनचार बागवानाकडे चकरा मारायच्या .


नंतर एखाद्यापुढे उभे रहायचे ..
आणि पठडीतले "मैं हरसाल तुम्हारे यहांच आम लेता हूं " हे वाक्य ऐकवायचे .


"मुझे तो मालूम है ना साब "..असे म्हणत -
जन्मजन्मांतरीची ओळख असल्याचा आव आणत,
तो इरसाल बागवानही हमखास,
"आधीच बाजूला काढून ठेवलेला, नमुन्याचा एक आंबा"
रस पिळायला काढतो.. 


अहाहा ! दिलखुश !! तो नमुना अगदी गोड असतोच !!!

इतरही नजरेत भरण्यासारखे "हे घेऊ, का ते घेऊ" आंबे नजरेसमोर असतात .
पण- आपल्यातला "साब " खूष होऊन,
त्या बागवानावर विसंबून,
विश्वासाने आपण आम्रखरेदीचा सोहळा आटोपतो.


चार चार वेळा आपण त्याला बजावतो....
" चांगले नाही निघाले तर बघ हं ..
सगळेच्या सगळे परत आणून देईन !"


तो बिलंदर बागवानही मुंडी हलवत,
छातीठोकपणे प्रत्येक आंबा अगदी-
"आपल्या स्वभावासारखाच गोड" असल्याची ग्वाही/खात्री देतो..


- आणि अर्धा डझन जास्त आंबे ...
आग्रह करू करू आपल्या गळ्यात मारतोच !


.....घरी आलो की नेहमीचीच रडकथा !

" आज काही आंबा चांगला नव्हता /
आंबटच रस आहे /
हापूस वाटत नव्हताच तरी मला /
किती पाणचट रस आहे /
धडाभर साखर घातली तेव्हा कुठे असा बरा लागतोय हो ..." 

- एकेक कॉमेंट कानावर आदळते .

..........आपण पामर बिचारे खाली मान घालून,
मनातून त्या बागवानाला शिव्या हासडतच -
घरच्या शिव्या निमूटपणे, त्या रसाबरोबर गिळत/खात राहतो !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा