लीला दाखवी खट्याळ कान्हा

अधरावर धरी बासरी हरी
लागे चाहुल गोपिकाघरी
धाव अंगणी पुकारा करी
चला ग शोधू कुठे श्रीहरी ..

इकडे तिकडे शोधत गोपी
एकेमेकीला हळू विचारी
कुठे ग मुरलीवाला कान्हा
ऐकू येईना कानी बासरी ..

वृक्षाआडुन पाहतो हरी 
गोपीमुद्रा कावरीबावरी
हसुनी धरी बासरीस अधरी 
मधुर सूर जाई कानावरी .. 

भारावत गोपिका नाचती
फेर धरुनिया सूरतालावरी 
लीला दाखवी खट्याळ कान्हा  
क्षणि नसल्यापरि क्षणी समोरी ..
.

स्वप्नात पहिली ती अपुरीच वाटली ही - [गझल]

स्वप्नात पाहिली ती अपुरीच वाटली ही
सत्यात पण अचानक बघ भेट जाहली ही

टोकास आज ह्या मी टोकास त्या ग तूही
रस्त्यातली दुरीही मिटणार चांगली ही

हातात हात आला पहिलीच भेट होता
किति घालमेल तुझिया डोळ्यात चालली ही

लाटांत खेळताना त्या सागराकिनारी
थरथर शिवाशिवीची आकंठ रंगली ही

मानून कृष्ण मजला राधेत कल्पिले तुज
बघ कल्पनेत काया हर्षात नाहली ही ..
.

का का का

का नेमके होत राहते तसे
ठरवतो जेव्हा जेव्हा मी असे 



ठरवलेले असते व्हावे जसे
फिसकटत जाते तेच कसे 



बघत राहतो घडेल जसजसे
घडत राहते पण वाट्टेल तसे



नाही कळत घडतेच का असे
का न घडते मज पाहिजे तसे



वाटते जेव्हा जिंकावे मी असे
फासे नेमके उलटे पडती कसे ..

.

" ह्याप्पी दसरा ......! "

"ह्याप्पी दसरा ----!" - असे कानावर शब्द आले,
 किंवा ,
वाचायला मिळाले की ------


डोळ्यांसमोर येते अशी व्यक्ती की, 

जिने -


डोळ्यांवर गॉगल लावून
गळ्याला मस्त टाय लावून
तोंडात चिरूट धरून
वुलन चा कोट पहनून-


.......कमरेखाली मस्तपैकी धोतर नेसले आहे !
.

तूर डाळ

बायको म्हणाली -
"अहो, उद्या दसरा..
थोडीफार काहीतरी खरेदी करायलाच हवी ना, सणा निमित्त.. ?"

बायकोला "नाही" म्हणणे,
शक्यच नव्हते.

चार वाजता आम्ही दोघे मिळून ..
पायपीट करत -

सोने चांदीचे दागिने मिळतात ना...
त्या सराफबाजारापलीकडच्या,
टीव्ही फ्रीज शोरूम जवळच्या,
पॉश फर्निचरच्या दुकानांच्या गल्लीजवळ असलेल्या,
मॉडर्न कारबाजारनजीकच्या,
स्वस्त किराणा स्टोर्ससमोर लागलेल्या-
ह्या भल्यामोठ्या रांगेत तासभर उभे राहून...

पाव किलो तूरडाळ खरेदी करून आलो एकदाचे !

थोडीशी महागच होती, पण - उद्या आणखी दुप्पट महाग झाली तर ?

काय करणार -
नैवेद्यापुरता वरणभात तरी हवाच न करायला ..

सणासुदीला बायकोला नाराज करायचे जिवावर आले होते अगदी ... !

उद्या वरण शिजवेपर्यंत..
बायको तुरीची डाळ एका बशीत,
शोकेसमधे सर्वांना दिसेल,
अशी ठेवणार आहे म्हणे !
.

शांतीचे प्रतिक

बायकोने आवाज दिला.
"अहो, आजचा पांढरा रंग लक्षात आहे ना ?"

अनुभवी प्रामाणिक आज्ञाधारक नवरा असल्याने,
मीही तत्परतेने उत्तरलो -
"अग, हा बघ.. तास झाला की तयार होऊन मी,
देवळात तुझ्याबरोबर यायला !"

पाच मिनिटात तयार होत्तेच की, म्हणणारी बायको
तब्बल सव्वा तासानंतर तय्यार होऊन समोर आली एकदाची ...
आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.

पांढरे बूट, पांढरा टीशर्ट, पांढरी प्यांट, 
पांढरे डोके झाकण्यासाठी पांढरी क्याप,
पांढरा रुमाल... वगैरे वगैरे माझ्या परीने मी म्याचिंग केले होते.
तरीही बायको पुटपुटलीच-
"--तरी रात्री केसांना डाय करा म्हणत होते मी !"

टकलावर उरलेल्या दहा बारा केसांना डाय करून,
मी माझा स्मार्टनेस कितीसा बदलणार होतो हो ?

पण कुरकुर करणे हा तिचा जन्मजात स्वभाव,
मी तीस/पस्तीस वर्षात बदलण्यास असमर्थ ठरलो होतो हे नक्कीच !
असो.

बायकोने डोक्यावरच्या पांढऱ्याशुभ्र गजऱ्यापासून,
 ते खाली पांढऱ्या चपलापर्यंत,
आपले म्याचिंग परफेक्ट सवयीनुसार जमवले होते.
संधी साधून मीही अंमळ पुटपुटलोच -
"म्याचिंगच्या फंदात तू तुझे हे लांबसडक काळेभोर केस,
डाय लावून पांढरे केले नाहीस,
हे बाकी छान केलेस हो !"

बायकोची बडबड बरोबर असल्याने,
मी फक्त पांढऱ्याशुभ्र ढगात तरंगत होतो.

रस्त्यावर इकडे तिकडे पाहिले तो काय..
माझेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली !

जिकडे तिकडे........ श्वेतवसनधारी, पांढऱ्या डोक्यातल्या,
पांढऱ्याच पांढऱ्या पऱ्या दिसून येत होत्या हो !

--- पण पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असल्याने की काय ....
कानावर पडणारा 
त्या पांढऱ्या जगातला कलकलाट मात्र अगदीच असह्य होत होता !!
.

जय जय अंबे, जय जय दुर्गे -

जय जय अंबे जय जय दुर्गे, 
मजवरती कर तू कृपा ग माते,
ठेव सुखी सगळ्यांना ..

सत्वर मजला पावलीस जेव्हा केला नवस मी तुजला   
सुख शांती भरभराट वैभव दिसले दारी मजला
शिर ठेवुनिया चरणी तुझिया ,करते अर्पण भावना ..

दुष्ट कामना दूर ठेवण्या दे तू मज सद्बुद्धी
कधी न होवो माझ्या मनी ती अविवेकाची वृद्धी
कर हे जोडुन करते वंदन ,सारुनिया ग विवंचना ..  

जगण्या जगती धनसंपत्ती नकोच भ्रष्टाचारी   
कुठे दिसो ना वैरभावना निंदा द्वेषही भारी   
आई जगदंबे तुजसी अंबे , शरणागत मम भावना ..    

.

दुर्गे दुर्घटना भारी

सकाळी चहाचा कप घेऊन बायको समोर आली.....

मी पहात राहिलो आणि शेवटी उद्गारलो-
"वा, किती छान दिसतेय ग तुला ही निळी साडी ! अगदी मस्त !"


तशी ती (संधीचा फायदा घेत-) म्हणाली -
" अहो, आटोपताय लवकर.
आपल्याला रुपाभवानीच्या दर्शनाला जायचं ना ? "


नाही म्हणणे शक्य तरी होते का ! 
आधीच धोंडा डोक्यावरून पायावर पाडून घेतला होता .....

मी विचारले-
"अग पण.. नवरात्रातले दिवस .. गर्दी मी म्हणत असणारी .. पुन्हा कधीतरी जाऊया की .. निवांतपणे .. मी कुठे नाही म्हणतोय का ?"


चतुर हुशार चाणाक्ष बायको उत्तरली -
"आज निळ्या रंगाचा दिवस..
तुम्ही म्हणताय ना ..'मी छान दिसते आज ' म्हणून !
मग आजच जायचं हो.. कितीही गर्दी असू दे..
देवळात सुंदरशी जागा बघून,
मला एक छानपैकी सेल्फी काढायचाय !
फेसबुकावर कधी एकदा अपलोड करीन असे झालेय !......"
.

आलीया भोगासी-

आज सकाळी जागा झाल्याबरोबर,
त्याने प्रथम फेसबुक उघडून ... 

न विसरता-
एकेकाळी त्याच्या दिलाची बेहतरीन लाजवाब धडकन असणाऱ्या .. त्याच्या आवडत्या...

"रेखा"ला शुभेच्छा दिलेल्या आहेत... !

(आजही ती त्याची आवडतीच आहे----
पण-- जाहीरपणे कबूल करू शकत नाही तो .. !)

 बायकोपासून-
सकाळपासून तो आपले तोंड चुकवत आहे..
कारण...त्याला धाडसाने वागता येत नाही..

आताही त्याच्या दिलाची धडकन वाढलेलीच आहे ..
पण ती निव्वळ बायकोच्या भीतीपोटी !

आला का आज वांधा !!

कुणास ठाऊक ..... पण,
बहुतेक आपल्या बायकोच्या लक्षात आले नाही, 

असे त्याला तरी वाटतेय..

काल बायकोचा वाढदिवस होता- तो ..
कधी नव्हे ते -- तो नेमका विसरून गेला होता ...
------ हे आता त्याच्या लक्षात आले आहे .!

बायको पुढ्यातल्या फेसबुकात तोंड खुपसून बसलेली आहे .....
त्याची चुळबूळ वाढत चालली आहे !

.   

तीन हायकू


१.
पाऊस आला
भिजवत निघाला
मने दोघांची ..
.


२.
किती चिखल
नसती दलदल
राडे मनात ..

.
 
३.
गर्दीच गर्दी
शोधत आहे वर्दी
बकरा एक ..
.

वेडी आशा

आहे वाव सुधारणेला
खूपच तुझिया आयुष्यात
दाखव सुधारणा करून 
करू नकोस तू चुकाच ग -

"वा वा ..छान" म्हणती सारे
कुणी न दाखवी चुका तुला
हसती पाठीमागे तुझिया
ठेवत नावे तुलाच ग -

कौतुक करणे.. मान हलवणे
रीत जगाची आहे इथली
वेळेवर करण्या सावध 
कुणी न येईल पुढे कधी ग -

खूषमस्करे  यांची जात
चुका पाहता हसती मनात 
उधळत वरवर कौतुकसुमने
कुरापती मग हळूच ग -

वाटेल कटू माझे सांगणे 
आज तुला हे मनातुनी
सुधारणा झाल्यावर बघ
होशिल तृप्त तू मनात ग -

घेई मनावर ..वाढव वाचन 

'षुद्ध अशुद्ध 'थांबव नर्तन
धडे घेऊनी योग्य ठिकाणी
दाखव सामर्थ्य शब्दांचे ग ..
.

साठी बुद्धी नाठी -

त्या दिवशी सकाळी सकाळी-
नुकताच पावसाचा चार थेंबांचा शिडकावा होऊन गेलेला.

आदल्या दिवशी संध्याकाळी मॉर्निग वॉकला जाणे जमले नव्हतेच.

म्हटले चला, आता छान हवा पडली आहे ..
आताच उरकून घ्यावा सकाळचा तरी मॉर्निंग वॉक !

पाऊस नव्हता त्यामुळे "प्यार हुआ इकरार हुआ .." गुणगुणत निघालो.

रोजच्या पेन्शनरच्या कट्ट्यावर बसलो .
मस्त मजेत हसत खिदळत गप्पाटप्पा हाणल्या इतरांशी.

तासाभराने निघालो.......

काही लोक माझ्याकडे वळून वळून पाहत होते.

मनात म्हटल- खुशाल पाहू देत..
आपली प्रसन्न मुद्रा त्यांना पुन्हापुन्हा पहायची असेल कदाचित !

दारात पोचताच,
बायकोने नेहमीच्या सवयीने डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिले,
आणि ती उद्गारली-
" अहो हे काय.. हातात दोन दोन छत्र्या कुणाच्या आहेत ?
तुम्ही बाहेर निघालात, तेव्हा जवळ असू द्यावी,
म्हणून ही दाराजवळ ठेवलेली छत्री-
तुम्ही बरोबर न्यायची विसरून गेला होतात न !"

गप्पा संपण्याच्या नादात, आपलीच समजून-
मी कट्ट्यावरच्या दोन छत्र्या एका हातात एक,
अशा उचलून घेऊन आलो होतो !

साठी बुद्धी नाठी ..
असे उगाच नाही शेक्सपिअरने म्हटले !
.