लिहितेस कधी तू जेव्हा --


[चाल- नसतेस घरी तू जेव्हा...]

लिहितेस कधी तू जेव्हा
जीव सुटका सुटका म्हणतो -
लाईटचे वरती वांधे
अंधार सारखा पडतो .. 


तू लिहिता वीज रुसावी
जवळून दूर मी सरतो -
तू जरा दिशाहीन होते
अन घोळ नेमका होतो -


येताच ती वीज जराशी
धुसफुसून बघशी मागे -
खिडकीशी कागद वारा
तव धरण्यावाचून नेतो .. 


तव लिखीत ओळी साऱ्या
मज पाठ ग हजारवेळा -
स्मरणातच तुझे अडावे
मी उगाच अगतिक होतो -


तू थांब सखे लिहितांना
मी झाडू का घरदारा -
कागदाचा केर ढिगात
माझ्यासह घरभर फिरतो ..


ना अजून झालो लेखक
ना प्रसिद्ध कवी मी झालो -
तुजवाचून अडतच जाते
तुजपासून शिकत रहातो ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा