श्रावण आला



पाऊस आला आणि गेला 
आनंद मागे ठेवुनी  गेला ..

तृप्त जाहली ही धरती 
हर्षित आकाश डोईवरती ..

डोलती पाती गवताची 
मैत्री सांगत वाऱ्याची ..

तजेला कळीकळीस येई 
सुवास फुलाफुलात न्हाई ..

पक्षी होत गगनविहारी 
किलबिलाट पिलात भारी ..

द्विपाद आणि चतुष्पाद 
प्राण्यांचा आनंदी घोषनाद ..

सरोवरात क्मळदले 
भृंगास अंतरंग खुले ..

प्रसन्न होई वातावरण 
धरेस हिरवाईचे आवरण ..

श्रावण भासे जिकडे तिकडे 
आनंदलहरी सगळीकडे ! 

.

पळसाला पाने तीनच


काल मैत्रीदिन संपला.
आजपासून आणखी ३६४ दिवस-
ह्या "दीना"चे रोजचे रहाटगाडगे सुरू .......

"हे करा -" 
"ते करा -"
" हे का केले नाही -" 
"तेच कसे करायचे राहिले -"

ऑफिसातही तेच 
आणि -
घरीही तेच !

तिकडे "बॉसगिरी "
आणि -
इकडे "बायकोगिरी" !

एक ना दोन ....
काम करूनही वर दादागिरी त्यांचीच !

कंटाळा आला ह्या सहनशीलतेचा !

कधी कधी वाटत,
जीव द्यावा कुठेतरी जाऊन .

पण तेवढे धाडस कुठले ?

तिथेही येऊन पुन्हा वर दम भरायला तयार -
" जीव द्यायला हीच जागा आणि हीच वेळ बरी सापडली हो तुम्हाला ! "

काही झाले तरी शेवटी ...
एक "नवरा" ना !

भोगा आता नवरेपणाचे भोग ह्याजन्मीचे !

आपले दु:ख हलके करावे ह्या सद्हेतूने ,
मघाशी हळूच,
 एका विवाहित मित्राकडे हे सगळे माझे दु:ख सांगायला गेलो तर ...

तोच माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाला -
" मी हेच सांगायला तुझ्याकडे येणार होतो रे आत्ता ! "

खड्डा गीत



त्याला मिळाली नोकरी महापालिकेत 
खड्डयाचा हिशोब तपासणे नशीबात !

खड्ड्यात छोकरी पडताना त्याने सावरले 
केवळ खड्ड्यामुळे दोघांचे लग्नही जमले !

लग्नामुळे रोज रोज बाहेर फिरणे झाले
खड्ड्यातल्या चिखलाने नवे ड्रेस आले !

होई दुचाकीवर दोघांची रोज प्रभातफेरी 
आदळले एका खड्ड्यात- हाड मोडून घरी !

तिला स्वैपाक जमेना- त्याला उपास 
रोज रोज त्याच्या पोटात खड्डा झकास !

झाले निमित्त भांडणाला- रोज जेवणाचे 
ती ओरडली - जा खड्ड्यात एकदाचे !

माणसाचा प्रवास असा ध्यानात ठेवा, 
खड्ड्यामुळे खड्ड्यात कधी न व्हावा !

.

उजळणी



शाळा तपासणीसाठी 
अधिकारी आले.

पहिलीच्या मास्तरांनी 
प्रत्येक पोराला 
त्यांच्यासमोर 
एक पासून शंभरपर्यंत आकडे 
मोजायला सांगितले.

तपासणी अधिकारी 
एकदम खूष झाले .

मास्तरला त्यांनी विचारले -
"मास्तर, पोरांची उजळणी
 इतकी कशी काय पक्की झाली हो ?"

मास्तरांनी तंबाखूची पिचकारी लांबवर मारत 
उत्तर दिले-

" नगरपालिकेपासून आपल्या ह्या शाळेपर्यंत
रोजची रस्त्यातले खड्डे मोजायची 
प्रत्येकाला सवय झालीय ना ! "

.

हॅपी फ्रेंडशिप डे -


रोजच्या प्रमाणे अकरा वाजता,
 संगणकापुढे बसून मन लावून काम करत होतो.

पाठीमागे अचानक धपधप आवाज आला.
मागे वळून बघतो तो,
 बायको स्वैपाकघरातून माझ्याच दिशेने येताना दिसली. 
एका हातात ते जगप्रसिद्ध लाटणे ,
दुसऱ्या हाताने आपल्या झिंज्या सावरणे चालू होते. 

मी उगाचच सवयीनुसार घामेघूम.
काय झाले नक्की काहीच कळेना.
माझा हात थरथरू लागलेला.

माझी स्थिती बायकोच्या ध्यानात आलेली असावी. 

जवळ येऊन तिने विचारले-
" का हो ! असे एकदम घाबरायला काय झाले तुम्हाला ?
मी कुठे काय म्हणाले का,
आत्ता तुम्हाला काही ? "

कपाळावरचा घाम पुसण्याचा प्रयत्न करत, 
मी उत्तरलो -
" न न नाही , त त त तसे काही नाही . "

तिने हातातले लाटणे खुर्चीवर एका बाजूला अलगद ठेवले. 
डोक्यावरचे अस्ताव्यस्त केस व्यवस्थित करत ती म्हणाली -
" अहो, आज फ्रेंडशिप डे नाही का ?
त्या पोळ्या लाटता लाटता, माझ्या एकदम ध्यानात आलं हो.
परत विसरून जाईन म्हणून आत्ता घाईतच आले.
मिष्टर, ह्यापी फ्रेंड्स डे बरे का ! "

हात्तिच्या !
किती घाबरलो होतो मनातून मी .

मीही धीर एकवटून उत्तरलो -
" थ थ थ्यांक्स म्याडम.
सेम टू  यू ! "

ती आत निघून गेली ..
आणि माझा जीव एकदाचा संगणकात पडला !
.

जनरेशन ग्याप -




बापाने एका टपरीतून बूट खरेदी केले.


घासाघीस पाचवीला पुजलेली असल्याने ती यथासांग केली. 


विक्रेत्याने एक वर्षाची खात्री दिली .



घरी आल्यावर मुलाला बूट दाखवले.

मुलगा- "केवढ्याला ?"

तो - " अरे , फक्त अडीचशेला ! " 


त्याच्या उत्तरातला उत्साह वाखाणण्यासारखा होता.




निर्विकार मुद्रेने मुलाने नुसताच हुंकार दिला.



दुसऱ्या दिवशी मुलाने बूट खरेदी केले. कोपऱ्यात नीट ठेवले .

तो- "केवढ्याला ? "

मुलगा- "फक्त बावीसशेला .. ब्र्यांडेड आहेत ! "

बाप कौतुकाने वा वा म्हणाला .


चार दिवसानंतर .....


दोघेही बापलेक भिजत घरी आले .

दोघांच्याही बुटांच्या तळाला चिखल भरलेला !

दोघांनीही आपापले बूट नळाखाली स्वच्छ घुतले .

बापाने बूट व्यवस्थित कोपऱ्यात ठेवले .



मुलगा बूट आणि त्याचा बाजूला निघालेला तळ...


डोळे विस्फारून पहात होता .



बाप काळजीने त्या तिघांकडे आळीपाळीने पहात होता !


.
.

मित्र -


मित्र म्हणजे मित्र असावा 

विश्वासाला पात्र असावा ..



खांद्यावरच्या डोक्याला 


थापटणारा मित्र असावा ..




तोंडावर बोलुनिया गोड 


तोंडघशी पाडणारा नसावा .. 




संकटात ना पुकारता 


पाठीशी अपुल्या असावा ..




वेळ पाहुनी कौतुक अथवा


निंदाही करणारा असावा .. 




मदतीवेळी हात आखडून 


पळ काढणारा नसावा ..




शंभर नसले संधीसाधू ,


खास एक तरी मित्र असावा !

.

आत्मगाथा सांगवेना वाटते भीती मला - [गझल]

वृत्त-  कालगंगा / देवप्रिया 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
--------------------------------------------------------आत्मगाथा सांगवेना वाटते भीती मला 
ना कुणा ती ऐकवेना वाटते भीती मला.. 

सागरावर बघ उसळती जीवघेणी वादळे 
का किनारा गाठवेना वाटते भीती मला..  

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हो 
शांतता पण साहवेना वाटते भीती मला..  

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी 
मार्ग खडतर चालवेना वाटते भीती मला.. 

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती 
आरसाही पाहवेना वाटते भीती मला..  

जागणे अन् झोपणे हा फरक नाही राहिला 
जीवनाला पेलवेना वाटते भीती मला ..
.
.

" चिऊ चिऊ चिडकी - "


बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -


चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -

  
बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -


बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -

 

चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.

" आरती कंत्राटदाराची - "


जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||

साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल  
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||

पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे 
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे 
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे  
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||

अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील  डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||   
.