घरोघरी


मी बर माझ घर बर
कशाला नसती उठाठेव
घरात करत बसाव
निवांत आपल देव देव ..

तुमच तुमच्यापाशी
आमच आमच्यापाशी
कशाला करायची हो
इतरांची नसती चौकशी .....

आलेच हं दोन मिनिटात
शेजारच्या की-होलात डोकावून
डोळे जरा लावून अन
कान थोडे भिंतीला लावून ..

हीच बोंब घरोघरी -
म्हणायची नेहमीच घाई
....आमच्या तरी कधी घरी
अस्स काही नसत बाई .. !

.

पैज

बायको माहेरी गेली की, 
माझ्या अंगावर काटा येतो.
(....सासरी असली की गुलाब बहरतो, 

हे वेगळे सांगायलाच हवे काय !)

जुन्या मैत्रिणी भेटल्यामुळे,
ती माहेराहून येताना बरोबर हमखास 

काहीतरी नाविन्य घेऊन येतेच .

परवा गेली होती आणि येताना 

"पैज" नावाचे नाविन्य घेऊन आलीच !
उठता, बसता, चालता, बोलता, 

हलता, डुलता, खाता , पिता ....
प्रत्येक गोष्टीतून ..
पैज लावण्याची नवी खोड तिला लागली .

मी चिडूनच रागावत तिला म्हणालो-
"अग, सारखी सारखी काय पैज लावतेस ?"

ती त्यावर उत्तरली --
"बरं बाई,राहिलं! यापुढ कध्धी 

पैज लावणार नाही, मग तर झालं !"

मी उलट विचारले -
"हे तरी कशावरून खर समजायचं मी ?"

हसत हसत ती म्हणाली -
"कशावरून म्हणजे ?
मी सांगतेय ना म्हणूनच !
अगदी खोटं वाटत असलंच माझं म्हणण तर...
... लावता का पैज ? "
.

आयुष्याची तब्येत

एखाद्या सुट्टीदिवशी-

चल ग,
जरा बागेत फिरून येऊ.
जाम कंटाळा आलाय.
आठवड्यात काम, काम, काम !
मागची सुट्टीही तशीच गेली-
थोडस फ्रेश होऊन येऊ . .
बर वाटेल बाहेरच्या वातावरणात ....

नको रे .
आज गुरुवार आहे.
आज माझा उपास आहे .
मंदिरात जाऊन येऊ.
उशीर लागला तरी हरकत नाही,
मागच्या गुरुवारीपण,
जमलेच नव्हते ना आपल्याला जायला तिकडे !

...... कुरबुर आणि मनस्ताप वाढल्यावर,
जेवणाच्या वेळा अयोग्य झाल्या तर ,
आयुष्याची तब्येत

 कशी जपणार ही दोघं भविष्यात ?
.

माणसातला देव

बऱ्याच दिवसांनी तो आपल्या मित्राच्या घरी आला होता.

"काय रे, आज कशी काय वाट चुकला इकडे ?" - मित्राने विचारले.

" आज शुक्रवार ना, संतोषीमातेच्या मंदिराकडे निघालो होतो.
म्हटल, आज निवांत आहे जरासा, मारावी चक्कर तुझ्याकडेही-"

 - तो थकल्या चेहऱ्याने म्हणाला.

गप्पाटप्पा झाल्या.

चहानाष्टापाणी झाले.

मित्राची म्हातारी, थकलेली आई बाहेर आली.

तिच्याबरोबरही त्याने दोनचार घरगुती गोष्टी शेअर केल्या.

तिच्या पायावर डोके टेकवून,
"बराय येतो, काकू." - असे म्हणत, तो आल्या दिशेने परत निघाला.

मित्राने पृच्छा केलीच- "अरे तू तर संतोषीमाता मंदिराकडे जाणार होतास ना ?
मग परत घराकडे ...?"

तो हसत हसत उत्तरला-
"तुझ्या घरीच आत्ता संतोषीमातेचे दर्शन घेतले ना.
खूप बरे वाटले.
पुरेसे आहे तेवढे !"
.

उपमा

माझ्यासमोर बसलेल्या,
 त्या रसिकाच्या एका हातात माझे पुस्तक होते...
आणि -
पुढ्यातल्या मेजावर उपम्याची बशी होती !

तो रसिक अचानक माझ्याकडे
आपली निर्विकार नजर टाकत उद्गारला -
"वा, वा... काय छान उपमा आहे हो !"

- मी अंमळ माझी कॉलर ताठ करून, 

सावरून बसलो.

पण -

पुस्तकातील मी लिहिलेली एखादी उपमा वाचत वाचत तो पुटपुटला..
की तोंडातल्या उपम्याचा घास चावत चावत पुटपुटला.......

मला कळायला काहीच मार्ग नव्हता !
.

नऊ चारोळ्या -

टू इन वन -
आज शुक्रवार आहे, म्हणजे
देवळात 'ती'ही असणार आहे -
देवळात आता निघावे म्हणतो 
जमल्यास.. देवीदर्शनही घेणार आहे !
.

यादे -
असता दूरच्या प्रवासात मी 
चमचमली नभी एक चांदणी -
बस्स ! क्षण एकच पुरेसा तो 
दाटून आल्या तुझ्या आठवणी ..
.

आशा उद्याची-
आज स्वप्नात आलीस सखे 
बरे वाटले नक्कीच.. त्यामुळे -
उद्याचा पूर्ण दिवस, पुन्हा 
रात्रीच्या आशेने छान.. त्यामुळे ..
.

अबोली-
ओळख नुकतीच तिची होता 
व्याख्यान तिचे तासभर ऐकले -
कंटाळून नाव मी पुसता 
"अबोली" उत्तर कानावर आले ..
.

सितारे कागजपर -
आकाशभर पांढऱ्याशुभ्र मनमोहक चांदण्या
निळ्या आकाशात,वर चमचमत आहेत -
पांढऱ्याशुभ्र कागदावर तुझ्या मनभावक चारोळ्या
निळ्या अक्षरात, खाली चमकत आहेत ..
.

जित्याचे खोड-
आयुष्याच्या सहाणेवर 
दु:खाचे खोड उगाळू किती -
वास नाही झीजही नाही 
गंधासाठी कुरवाळू किती ..
.

नशीबच फुटके -
आयुष्यवृक्षाला माझ्या
दु:खफळांचा बहर ये नामी-
देवही देई कधी ना हमी
सुखफळ किडके निघे नेहमी..
.

प्रारब्ध  -
ओझे काट्यांचे लेऊन 
डुलती फांद्या आनंदाने - 
ओझे प्रारब्धाचे घेऊन 
जगती माणसे वैफल्याने ..
.

दंश -
ओळखणार कसा नाही मी 
पाहिल तुला जरी मी दुरून- 
पाठीवरच्या केसांची ती 

नागिण कधीच गेली डसून..
.

ताटाखालच मांजर

सकाळी सकाळी एका हातात चहाचा कप -
आणि दुसऱ्या हातात इंग्रजी पेपर धरून,
बायकोसमोर उभा होतो.

बायको इंग्रजीत शिजलेली- पण मराठीत एकदम कच्ची !
ती कधी नव्हे ते, "मराठी नॉव्हेल" वाचायचा "प्रयत्न" करत होती.

बायकोने अचानक पुस्तकातून आपली नजर काढून -
माझ्याकडून रोखून पाहत,
मला विचारले-
"अहो, 'ताटाखालच मांजर' म्हणजे काय हो ? "

मला जोराचा ठसका लागला,
हातातला पेपर निसटून खाली पडला...
- आणि कपातला सगळा चहा त्या इंग्रजी पेपरवर सांडला.
(.....माझ्याबद्दलची बातमी सर्व इंग्रजानाही कळली की काय ?)

मी खाली पाहत, अंगठ्याने फरशी टोकत उद्गारलो -
"आज्ञाधारक नवऱ्याला, बायकोच्या 'ताटाखालच मांजर' म्हणतात !"

माझं म्हणणं बायकोला पटलं !
(- नको त्या गोष्टी लगेच कशा काय पटतात, ह्या बायकांना देव जाणे.)
आणि तिने पुन्हा आपली दृष्टी पुस्तकात खुपसली.

मी माझी नजर पोतेरे शोधण्याकडे वळवली ..........
.

सवय दु:खाची

का रे देवा, 
असे मला
दु:खाच्या "सीटबेल्ट"ने
माझ्या जीवनरथात
जखडून ठेवले आहेस-
मी चुकून कधीतरी
सुखाच्या खाईत
लोटला जाईन... म्हणून ?
इतकी काळजी नकोच,
मला जागोजागी
उचक्या लागतात,
दु:खाच्या आठवणींच्याच !
दु:ख
इतके पचनी पडत आहे....
चुकून सुख वाट्याला आले,
तरीही
मला भीती वाटत असते
ती अपचनाचीच !
.

सहा चारोळ्या -

'नसते कौतुक -'
का सूर्याचे कौतुक करता 
फक्त "दिवसा" प्रकाश देतो -
रात्री उगवुन जर दाखवले 
तरच मी शाबासकी देतो ..
.

'प्रेम-'
काय म्हणावे ह्या प्रेमाला
कधीही कुठेही वेळीअवेळी -
जडते बसते जुळते तुटते
मनामनांची अजब ही खेळी ..
.

'आम्ही खरे खवय्ये-'
कच्छी दाबेली बर्गर पिज्झा
यांवर तरुणतरुणींचा डोळा -
घरच्या कांद्याच्या थालिपिठावर
आवडे मज लोण्याचा गोळा ..
.

'असेही करावे कधीतरी-'
करण्यासाठी निंदा जनांची
उपयोग पाठीचा करू नका -
शाबासकीही वेळप्रसंगी
पाठीवर देण्या विसरू नका ..
.

'उन्हाचे मोल -'
किती हा उन्हाळा, म्हणत 
रिकामटेकडे लागले चडफडायला -
ओझी उन्हातही उचलण्यासाठी 
कष्टकरी लागले धडपडायला ..
.

'फुटके नशीब -'
करतो प्रामाणिक धडपड
जिवापाड मी हसण्यासाठी -
नशीब माझे करते गडबड 
कायम मी रडण्यासाठी ..
.
.

लहरी

प्रेयसी
बरोबर असताना,
पाऊस
येतच नाही..


प्रेयसी
बरोबर नसताना,
हमखास
येऊन जातो -


वाण नाही
पण त्याला
गुण लागले
असावेत प्रेयसीचे.....


नको तेव्हा
तोंड दाखवायचे..
हवे तेव्हा नेमके
गुल व्हायचे .. !

.