डस्टबिन

लग्न झाले .
प्रथेनुसार तो तिच्या ताटाखालचे मांजर झाला.
तरीपण थोडेफार भान ठेवू लागला.
तारतम्य बाळगू लागला.

एके सकाळी ती त्याला म्हणाली-
"स्वच्छता अभियान सुरू झाले .
आपणही हातभार लावू.
आपल्या घरातल्या जुन्या डस्टबिनला "वृद्धाश्रमा"त पाठवू ."

त्याने थोडा विचार केला .

नंतर तो म्हणाला -
" ठीक आहे.
माहेरी तुझ्या भावाला फोन करून विचार-
"तिथल्या डस्टबिनचीपण वाट लावायची आहे का"- म्हणून.
एकाचवेळी इथले आणि तिथले काम होईल !"

बुमरँग असे अचानक आपल्यावर उलटेल, 

असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते ..

डस्टबिनचा विषय कोपऱ्यात पडून राहिला तो राहिलाच...... धूळ खात !


.

असे का होते -

असे का होते, समजत नाही
पण तसेच घडते, हे मात्र खरे ..

देवळात गेलो की,
कमीतकमी किंमतीचे
नाणे खिशातून निघते -

हॉटेलात गेल्यावर मात्र,
डिशच्या भावाचे
मूल्यमापन नसते ..

देवळात गेलो की
रांगेत उभा रहायला कुरकुरतो ..

हॉटेलात नंबर लावून
बाहेर मुकाट चुळबुळतो ..

देवळासमोरच्या भिकाऱ्याच्या थाळीत
त्याने अजीजीने मागितले तरीही
एक नाणे टाकायला
हात मागेपुढे पाहतो ..

हॉटेलसमोर दरवानाच्या हातात 

त्याने कडक सलाम ठोकला की,
दहाची तरी नोट
बिनधास्त मी टाकतो .. !
.

काही जमत नाही .. तरीही-

बोलायला मुळीच जमत नाही
कवळीही तोंडात टिकत नाही ..


चालायला नीट जमत नाही
हातातली काठी धरवत नाही ..

नात्यागोत्यातली रंगत नाही
रुसव्याफुगव्याची गंमत नाही ..


वाचायला काही जमत नाही
नाकावर चष्माही रहात नाही..

रागवायला आता जमत नाही
ऐकायला कुणाला फुरसत नाही ..

इकडतिकड पाहिल्याशिवाय करमत नाही
डोळ्यांना पहिल्यासारखं दिसत नाही..

कुचूकुचू काहीच जमत नाही
कानांची साथही मिळत नाही ..


बसायला कोणी फिरकत नाही
बोलवायची आता हिंमत नाही..

सुुुसंवाद मुुुळी करवत नाही

झोपेची गोळी सोडवत नाही..

मरायला काही जमत नाही
जगायची आशा सुटत नाही ..
.

अजुनी बसून आहे

(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..

मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..

का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..

हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.

तीन चारोळ्या -

शरणागत त्या झोपेला 
मिटू पाहती हळू पापण्या-
तयार होउन बसले ते 
स्वप्नपाखरू झडप घालण्या ..
.

मांडला बाजार रुपयांचा 
भावनेला कोण हो पुसतो -
माज पैशाचाच असतो 
मान आपोआप तो मिळतो..
.

मोजत बसलो आहे सखे
नभातली एकेक चांदणी -
कधी उगवणार तू ग सखे 
जीव लागला आहे टांगणी..
.

चारोळ्या ---

दोन थेंब पावसाचे पडले 
खेळ बघा नशिबाचे घडले -
बने एक मोती पानावर
दुसरा पडे तो चिखलावर ! "
.

दिसला रस्ता जिन्यात कोपरा 
पिचकारी मारून थुंकायचेच-
पुढाऱ्याचे तेवढेच अनुकरण 
अनुयायांनी पण करायचेच..
.

दहा तोंडे केवळ रावणाला 
शोभली होती खरी-
परनिंदेसाठी तीही मला 
पडली असती अपुरी..
.

दु:खे जेव्हा वाटत होतो 
एकही याचक दिसला नाही-
सुख वाटण्यास उभा राहिलो 
एकही दु:खी उरला नाही ..
.

दिली फेकुनी तलवार 
लावली लेखणीस धार -
होते शहाणे जे थोडेफार 
झाले शब्दांनीच ठार..
.

जीवन

हसून घ्यावे
रुसून घ्यावे
चार दिसाचे
हे तर जीवन

कुढत रहावे
सडत रहावे
पिडत रहावे
नकोच जीवन

छंदात रहावे
वंदित रहावे
धुंदीत रहावे
क्षणैक जीवन

प्रेम घ्यावे
प्रेम द्यावे
वैर शमावे
दुर्मिळ जीवन

शांत रहावे
निवांत रहावे
खंत न करता
जगावे जीवन

गाणे गावे
खाणे खावे
जगणे जगावे
हे तर जीवन ..

.

आली दिवाळी


छ्या ! ह्या बायकोने नसतीच आफत आणली की हो !
आज सुट्टीचा दिवस .
वाटल काही तरी मस्त मस्त खायला मिळेल.

पण कुठलं काय नि पिठलं बी न्हाय !

आज तिने हट्टच धरला -
 "मी पण आजपासून फेसबुक वाचणार बर का हो तुमच्याबरोबर !"


मी झिडकारून म्हटले -
"अग, काही विशेष नसते ग ह्या फेस्बुकात !"

ती उसळून म्हणाली- 
" तुम्ही तसेच म्हणणार, हेही माहीतच होत मला !
पण मला सांगा- आता रोज कुणीतरी तुमची मैत्रीण 
हॉटेलातले चकली, शेव, अनारसे, करंजी, निरनिराळ्या लाडूचे फोटो टाकणार की नाही फेस्बुकावर.... 
आणि ते 'घरी केलेले' म्हणून बजावत फुकटचा टेंभा मिरवणार ना ?
तुम्ही ते मिटक्या मारत,
 "वा वा ! छान ! खमंग हं ! मस्त मस्त ! हौ स्वीट !" असे खोटे खोटे का होईना म्हणत..
मनांत खात बसणार तासनतास !
मी पण तुमच्याबरोबर इथेच बसून राहणार आणि खाणार ! 
आत मी मेली एकटीच मरमर किती करत बसू हो ?"

मुकाट्याने लॉगौट केले आणि-
 लाडू वळायला तिच्या मदतीला गेलो !
.

पाच चारोळ्या -

'का रे भुललासी वरलिया रंगा -'
गोऱ्या रंगावर कातडीच्या
तिच्या का पाघळलो मी - 
काळ्या रंगाच्या मनाची 
शक्यता का विसरलो मी ..
.

'तरबेज -'
गाठोडे अनुभवांचे पाठीशी 
पक्के बांधून ठेवले -
डळमळली जीवननौका कधी 
विपरीत काही न घडले ..
.

'खट्याळ वारा -'
गालावर बट तव केसांची
मज आवडते भुरभुरणारी -
खट्याळ वारा सामील होई 
झुळूक पाठवत हुरहुरणारी ..
.

'मित्र-'
गुलाबाचे फूल द्यायला 
धडपडतात सगळेच मित्र -
काटा टोचू नये म्हणून
धडपडतो तो खरा मित्र !
.

गनिमी कावा -
गनिमी कावा छानच जमतो 
नजरेचा वार मी जेव्हा करतो -
प्रतिकारास्तव पापणी झुकवुन 
ढाल तुझी ती जेव्हा बघतो ..
..

सात चारोळ्या -

मोह -
अशीच अमुची "बाई" असती
सुंदर रूपवती 
धुणीभांडी मी केली असती
घुटमळून  भवती !
.

अनिवार्य-
असो हिवाळा वा पावसाळा
तुझी सोबत सखे, अनिवार्य का -
गुलाबी थंडी वा चिंब भिजणे
आठवण होणे अनिवार्य का..
.

जीवनगाणे -
असतेस दु:खी जेव्हा तू
गीत हुंदक्यांचे ऐकतो -
हसतेस जेव्हा जेव्हा तू
मनातून सूरही लावतो ..
.

अपशकून -
अंधश्रद्धा उखडण्यासाठी 
जेव्हां जेव्हां मी तळमळतो
दारासमोर आडवे मांजर 
 मनात का मी कळवळतो !
.

सखीवर सरी -
अंगाखांद्यावर मी तुझ्या 
खूप आता खेळणार आहे -
पावसाच्या सरी होऊन 
खूप तुला छळणार आहे ..
.

महाआळशी -
'असेल माझा हरी' म्हणत 
बसला तसाच खाटल्यावरी -
पडला खाटल्यावरून तरी
अजून हरीवर श्रद्धा धरी ..
.

रुसवा -
असून माझ्याजवळी का 
प्राजक्ताचा रुसवा इकडे - 
हलवत अपुल्या फांदीला 
फेकतो फुले शेजारी तिकडे ..
.