माझे मन

अशा अचानक आलेल्या
पावसाच्या आगमनात
माझे मन चिंब भिजते ..

गरमागरम आईस्क्रीम
मस्त गारेगार थंड चहा
नाही नाही ते विचार करते ..

छत्री हातात मिटलेली
एक वहाण निसटलेली
पाऊसधार हातात धरते ..

गरमागरम भजांची प्लेट
डोळ्यांसमोर भेटते थेट
उभ्याउभ्याच फस्त करते ..

इथ इथ पाणी गोल गोल राणी
थरथरते वय एकदम आठवते 
सखीच्या आठवणी स्वत:शीच पुटपुटते ..
.

मिसकॉल तुझा एक -

प्रवासात मिसकॉल तुझा एक दिसतो
मोबाईलवर तुला मी कॉल लावतो -

'आऊट ऑफ कवरेज एरिया' ऐकतो
कुठे कशी असशील, विचाराधीन होतो ..

अस्वस्थ अगतिक असा कसा मी
चुळबुळ करीत बेचैनसा बनतो -

. . पुन्हा पुन्हा मी कॉल लावतो
"आऊट ऑफ.."चाच मेसेज रिपीट होतो..

धडधड मनात वाढत असते
जीव जास्त कासावीस होतो . .

अखेर, एकाक्षणी "ओळखटोन" पडता कानी
हिरमुसलेला जीव किती सुखावतो -

"झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.."
 गुणगुणत प्रवास पुढचा पारही पडतो ..
.

समाधान

     बायकोबरोबर मंडईत गेलो की, 
खरेदीची सर्व सूत्रे ती पुढे होऊन (-मला घासाघीस जमतच नाही, या भ्रामक गैरसमजातून !) 
आपल्या हाती घेते आणि मी फक्त पैशाचे पाकिट माझ्या खिशातून माझ्या हाती !

     भाजीवाली मेथीच्या पेंढीचा भाव पंधरा रुपये सांगते, आणि बायको अथक घासाघिशीनंतर- तीच पेंढी बारा रुपयाला खरेदी करून, हातातल्या पिशवीत घालत असते...
त्यावेळचा तिच्या चेह-यावरचा विजयी भाव अगदी पाहण्यासारखा असतो !
केवळ ती असते, म्हणूनच जणू काही आमच्या संसाराच्या इतिहासात,

आजही तब्बल तीन रुपयांची बचत झालेली !

    खरे तर मागच्याच आठवड्यात या भाजीवालीकडून, 

मी मेथीची पेंढी ऑफिसातून येताना , पंधराची दहा करून, आणलेली असते..., 
हे मी तिच्या विजयी पराक्रमावर पाणी पडू नये, 
यासाठीच केवळ सांगितलेले नसते !

कारण तिने संसारात मिळवलेले असे छानसे समाधान,
हेच तर आमच्या प्रपंचाचा गाडा सुरळीत चालण्याचे एकमेव साधन !
.

शुभकार्यासी आरंभ करता....

(चाल- मेरा जूता है जापानी..)

शुभकार्यासी आरंभ करता
वंदन करतो मी गुरुदत्ता
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..

समाधान अति मनास होता
शांती लाभते चित्ता
मूर्ती डोळ्यासमोर असता
संसारी ना चिंता..
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
त्रैमूर्तीला बघता बघता
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..

संकट येता तुज आळवता
पाठीशी तू त्राता
नामस्मरणी चित्त गुंतता
विसरून जातो जगता..
हृदयी आनंदाला नसतो
जीवनभरात आमच्या तोटा
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..
.



बोट माझे त्या फुलाला एक जेव्हा बिलगले ..[गझल]

बोट माझे त्या फुलाला एक जेव्हा बिलगले
चावण्याला बोट काटे तेथ का सरसावले ..

वाहणारे सतत अश्रू हे तुझ्या नयनांतुनी
वाटले मज पाहता का नायगारे उसळले..

आज सर ती एक हलकी पाहिली दारात मी
अन सखीच्या आठवांनी मन किती हे भिजवले..

दु:ख होते सोबतीला चाललो मस्तीत मी
का अचानक मज सुखाने भेटुनीया दुखवले..

गर्व ज्योतीचा निमाला झुळुक येता एक ती
गर्व ज्योतीला किती या मी जगाला उजळले ..

.

करतो मी वंदन आलो शरण समर्था ..

धरतो मी स्वामी तुमचे चरण आता
करतो मी वंदन आलो शरण समर्था ..

गर्वाचा फुगा भावभक्तीचा फुगवला
गवगवा जनात मी त्याचाच केला ..

पाहिले ना अंथरूण पसरले पाय
कळले नाही यापुढे नशीबात काय ..

हरण गर्वाचे वेळेवर केले तुम्ही
ताळ्यावर मन माझे आणिले तुम्ही ..

पाठीशी तुम्ही मी बिनघोर आता
भिण्याचे कारण मज उरले न आता ..

दु:खाचे निवारण सुखाला आमंत्रण
स्वामी आम्ही धरता तुमचे चरण ..

"श्री स्वामी समर्थ" मनी जप घोळतो
वाट संसाराची मी सहज ही चालतो ..
.

बंडू फेसबु[भु]के

नऊ वाजले - सूर्याची किरणे खिडकीतून तोंडावर आली आणि सकाळ झाली.

नऊचा गजर झालेला ऐकत बंडू उठला.
पटकन आठवणीने तोंड न धुताच, आधी ते फेसबुकात खुपसले......
पाच फोटो आधीच शोधून ठेवले होते...

पहिला फोटो नव्व्याण्णवजणांना ट्याग केला "गुडमॉर्निंग"चा ..
आणि मग तो इतर कामाकडे वळला.

दुपारचे बारा वाजले.-- घाईघाईने वचा वचा चार घास चावले आणि -
दुसरा फोटो फेसबुकावर पंचाहत्तरजणांना ट्याग करून टाकला "गुडनून"चा !

चार वाजता आठवणीने, बायकोने चहाचा कप पुढ्यात ठेवला-
बायकोने दिलेला चहा घट घट घशाखाली ओतला.. 

तिसरा फोटो तयार होताच--- "गुडआफ्टरनून"चा !
झटकन फेसबुकावर पन्नाससजणांना ट्यागला आणि

 बंडू बाहेर पडला ------

दोन तासांनी बंडू घरी परतला, सहा वाजलेले पाहून दचकला -- चटकन फेसबुक उघडले आणि चौथा फोटो पंचवीससाठी सादर ट्याग केला - "गुडइव्हनिंग"चा !

रात्रीे बारा वाजता..बंडूने फेसबुक उघडले आणि हुश्श करत,

"गुडनाईट"चा फोटो मोजून निवडक दहाजणींना ट्याग करून टाकला ... !

----तो उत्साहभराने भल्या सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपण टाकलेल्या फोटोवरचे लाईक/ कॉमेंट/ शेअर पाहू लागला ----

फेसबुकावर तब्बल पाच हजारची मित्रयादी असलेला बंडू---
आपल्या मित्र/मैत्रिणींचे जेमतेम वीस लाईक - पंधरा कॉमेंट - दोन शेअर बघतच-------

"आता वाजले की बारा ..." असे स्वत:शी गुणगुणत सुखाने झोपी गेला.
.

कर्ता-करविता तोच...

चहाचा कप हातात देत सकाळी बायकोने विचारले-
"आज एकादशी आहे, उपास का जेवण ?"

का कुणास ठाऊक, पण अंतर्मनाने कौल दिला आणि उत्तरलो-
"उपास !"

"उपास" असल्याने-
अर्थातच दुपारी बरेच उपासाचे खाद्यपदार्थ अस्मादिकांनी हादडले !

मघाशी चार वाजता,

काहीतरी चारामुरा चरायचा म्हणून -
स्वैपाकघरात पाऊल टाकले.
टेबलावर खारी बिस्कीटे, गोड बिस्कीटे इ.(नॉनउपासी खाद्य?) डबे होते.

माझा हात बिस्किटाच्या एका डब्याकडे वळला,

पण नजर मात्र...
साबुदाण्याच्या चिवड्याच्या डब्याकडे वळली !

"विठ्ठला पांडुरंगा, तुलाच रे माझी काळजी बाबा !" - असे म्हणत,
मी चिवडा आनंदाने भक्षण करता झालो,
आणि -
..... माझा उपास अबाधित राहिल्याने परमसंतुष्ट जाहलो !
.

..... || श्री स्वामी समर्थ || ......

संकटसमयी तुझ्या जपाचा
किती किती आधार वाटतो ..

भिऊ कशाला स्वामी समर्था

तुझाच धावा सदैव करतो ..

दर्शन घडते मनात मजला
 
पाठीवर तव हातही फिरतो ..

वाटचाल मी आयुष्याची 
कृपाप्रसादे नीट चालतो ..

ताळ्यावर मज तूच ठेवसी
कधी गर्व ना सुखात होतो ..

संकटहर्ता नित्य तू असशी
दु:खाची न मी पर्वा करतो ..

अवतीभवती अस्तित्व तुझे
जगण्यासाठी श्वासच असतो ..

'श्री स्वामी समर्थ ' जप हा
प्रपंचात मज साहाय्य ठरतो ..
.

चार हायकू

कधी हसावे
कधीमधी रुसावे
जोडी अजोड ..
.

सुनेचे चार
सासूबाईचे चार
डाव घडीचा ..
.

सरले त्राण
चातक गतप्राण
वळीव जोर ..
.



मी मी आणि मी


आयुष्यात नेहमी


पोकळ जिणे ..
.