गणपती


१)  
   
बायको आपल्या कमरेवर एक हात ठेवून,
एका हातात लाटणे तसेच धरून तावातावाने,
तव्यावरची पोळी तशीच ठेवून, बाहेर दिवाणखान्यात येउन ओरडली,
" मला काही म्हणालात काय ? "

मी शांतपणे दोन्ही कानावर हात ठेवून,
आपली मुंडी नकारार्थी हलवत म्हणालो,
" ह्या बाहेरच्या गोंगाटापेक्षा मोठया आवाजात,
"मी तुला" काही बोलणे शक्य आहे काय ? "
.

२)   

बरीच सेलेब्रिटीज मंडळी बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला भेट देऊन आली.
बरे वाटले !

बऱ्याच वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचे कौतुक केले .
आणखी बरे वाटले !!

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,
किंवा झोपडीत किंवा पत्र्याच्या शेडमधील गणपतीचे फोटो झळकले असते तर.....

सोन्याहून पिवळे, असे खुद्द श्री गणेशालाही नक्कीच वाटले असते !!!
.


३)

श्री गणेशाचे भरल्या अंत:करणाने विसर्जन करून आलो.
गणेशाचे दहा दिवसांचे रूप, डोळ्यासमोर तरळताना डुलकी लागलीच.

- आणि दहा दिवसातल्या रोजच्या प्रमाणे श्री गणेश कानाशी पुटपुटून गेले...

" तुमच्या घरातून निरोप घेताना, मला खरेच वाईट वाटले रे .
किती शांतपणे, मन:पूर्वक, भक्तीसंगीतात मी गुंगलो.
धूप दीप नैवेद्य आरत्या सगळ्यात मी दंगलो.
पण ...

तुमच्या घराबाहेर आपण आलो आणि ... उगीचच बाहेर आलो, असे वाटले बघ !

पुढच्यावेळी मी येईन ...

जर ती धांगडधिंगा असलेली गाणी- हिडीस अंगविक्षेप- कर्णकटू वाद्ये नसतील तरच !!
बघ ! तुझे ऐकणार असतील सर्वजण--- तर मी येईन नक्की,
नाहीतर... माझाच सर्वांना कोपरापासून नमस्कार सांग सर्वांना ! "
.


देव नाही देवळात


देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -

देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -

हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -

देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
 

.

राम ... राम ... राम ...



राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे

कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले

राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू

कानावर बातमी

कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा

राम . राम.
जप चालू

राम .
सिलेंडरची टंचाई

 
मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !
 
.

" लता " ...




लता ...
दीदीचा आज वाढदिवस !

तरीच..
' बीस साल बाद ' चे 

ते गाणे 
आज सारखे डोळ्यासमोर ऐकू येत आहे..

"सपने सुहाने लडकपन के, 

मेरे नैनोमे डोले बहार बन के .."

सर्वांच्या तर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा -

" ह्या जगाचा अंत होवो ..

पण लतादीदीची गाणी ,
पुढच्या जगातही ऐकायला मिळोत !!! "
 

.

आरसा.... नाही मित्रच !



मला आरसा खरोखरच आवडतो.

तो माझ्याबद्दल
आपलं खरखुरं
प्रांजळ मत
कसलीही भाडभीड न ठेवता
रोखठोक स्पष्टपणे
तोंडावरच सांगून टाकतो.

 
तोंडापुढे एक -
 
आणि पाठीमागे दुसरच बोलणाऱ्याशी..
 
त्यामुळेच माझ कधी जमत नाही !
.

भावनिका


    १.       टुक टुक 

सर्व चांदण्या अवती भवती
किती पहा त्या सतावती -
धरण्या जातो जर मी हाती
दुरून मजला टुकटुकावती !
 

.

                                      २.      खरा चेहरा

फुटला हा आरसा का असा
तुकडे पडले इकडे तिकडे -
चाचपून का बघतो आहे
माझ्या मी चेहऱ्याकडे !
 
.

कानठळ्या


काय करावे तेच समजत नाही !
रात्रभर गणपतीचे देखावे पहातो .
साहजिकच सकाळी उशीरा जागा होतो.
 

कुठे काही वाजतंय का ..
काहीच उमजत नाही .
कानाचं अस्तित्वच जाणवत नाही .
कान बधीर झाल्याचे जाणवतात .
चुकून कानात बोळे घातलेत की काय असाही भास होतो.

दुपारी डुलकी घेता घेता, 

श्री गणेश पुन्हा कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झालाच..

" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे, 

जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून-
 माझ्या दोन कानात घालतोस का ? 
डोळे बंद करून घेऊ शकतो,
 ...कानाला माझे हात लावू शकत नाही ना....
 ह्या मोदक आणि फुलांमुळे ! 
चतुर्थीपासून आता माझ्या विसर्जनापर्यंत... 
नाही रे हे सगळ सहन होणार ! "
 

.

दोन भावनिका -



१.      बिचारा साई -

त्यानी बसवले सोन्याच्या चौकटीत
साध्यासुध्या फकीर साईला -
त्यानी बघितले दुरून ऐटीत
गुदमरलेल्या गरीब साईला !
.
 




२.     दलालीतला देव !

आर्त दिली हाक देवा
तरी नाही तो भेटला -
दलालास फळविता
मुकाट्याने तो भेटला !

.

समांतर



                                    आपण दोघे
                                    रस्त्यावरून चालत राहिलो
  

                                    आपण दोघे
                                    आयुष्यभर चालत राहिलो -
 

                                    आपण दोघे
                                    जीवन जगत राहिलो
 

                                    दोघांचे रस्ते मात्र -
                                    समांतर ... !
 

                                    हे समांतर रस्त्यात,
                                    

                                    सुरुवातीलाच समजून 
                                    घेतले असते तर !
 

.

नवा खेळ !

 
अहो बाबा -
आपण आता नवा खेळ खेळू या ना हो

आधी मी तुमच्यावर रागावल्यासारखे करणार
मग तुम्ही मला मारल्यासारखे करणार ...

अरे बाळा -
आम्ही मोठ्ठे लोक तर नेहमीच असला खेळ खेळतो की रे
   कुणीतरी आमच्यावर काहीतरी आरोप करतात
      मग आम्ही राजीनामा दिल्यासारखे करतो
         मग ते आम्हाला तुरुंगात पाठवतात
            आम्ही तिथे जाऊन आल्यासारखे करतो
 
.... आणि मग ते सगळे मिळून,
 आमच जंगी स्वागत करतात !
.