रे फुलांनो -


रे फुलांनो, अवेळी उमलू नका 
पहा तरी म्लान चेहरा तिचा
जेव्हा तुम्ही उमललेले नसता
असतो सुकलेला चेहरा तिचा ..

पाहू द्या तिचा टवटवीत चेहरा
उमलत रहा तुम्ही ती दिसताना 
तुमच्याचकडे ती पाहत असते 
तुमच्यासवे उमलत फुलताना ..

व्हावी जाणिव अस्तित्वाची
उमलत तुम्ही सुगंध पसरा
निसर्गात आनंद लहरु द्या 
दरवळू द्या आसमंत सारा ..

उमलेल तीही फुलेल तीही 
उधळेल चेहऱ्यावर हास्य तीही 
जगात साऱ्या मुक्तमनाने
चैतन्याला पसरवील तीही ..

रे फुलांनो, अवेळी उमलू नका 
वाटेकडे लागले डोळे माझेही 
सुवासिक हसरे होऊ द्या 
तिच्यासवे विश्व सारे माझेही ..
.

नकोच सोने हिरे माणके देऊ तू मजला देवा

नकोच सोने हिरे माणके देऊ तू मजला देवा  
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या 
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे 
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला 
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या     
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..
.

नशिबात दु:ख हुकमी घेऊन मीच हरतो

ज्योतीस मालवूनी अंधार रोज करतो 
झाले असह्य जगणे मी त्या यमास स्मरतो ..


आम्हास न्याय देवा  देसी न तू कधीही  
सुख धाडसी पळीभर दु:खात ऊर भरतो ..

शोधात का सुखाच्या सारे गमावले मी 
दु:खास आपलेसे करुनी सदैव फिरतो ..

जो तो इथे असामी धुंदीत आपल्या का 
गुंगीत वेदनेच्या मी एकटाच झुरतो ..

टपलेत येथ सारे दुसऱ्यास दु:ख देण्या 
केव्हातरी सुखाला पाहुन मनात डरतो ..

का वेळ लागतो त्या जिंकावया सुखाला 
नशिबात दु:ख हुकमी घेऊन मीच हरतो ..
.

माणसाची लक्षणे


जमत नाही स्तुती करणे 
जमते फक्त टवाळी करणे

जमत नाही मदत करणे 
जमते फक्त आडवे जाणे

बघवत नाही पुढे जाणे 
जमते जाणाऱ्यास ओढणे

जमत नाही सु-शेजारी होणे 
जमते फक्त निंदक होणे

जमत नाही कौतुक करणे 
जमते फक्त मत्सर करणे

जमत नाही 'माणूस' होणे 
जमते इतरांस नाव ठेवणे ..

.

'तिळगूळ घ्या - गोड गोड बोला -


संक्रांतीचा दिवस !

आज कुणावर आलीय कुणास ठाऊक ही संक्रांत, 

मनांत विचार करतच ... 

........ सकाळी सकाळी देवपूजा आटोपली .


हातात पेपर घेऊन, 

खुर्चीवर निवांत चाळत बसलो.

आधीच चहापान झाले होते.

बायको समोर येऊन बसली.


......आणि हातातल्या वाटीतून हलव्याचे पाचसात 

दाणे काढून,

माझ्या हातावर टिकवत,

छानपैकी ठेवणीतले हसत म्हणाली -

तिळगूळ घ्या ......... 

आज साडी आणायची आहे ना मला !  "
.

हायकू

.

तू पूर्वेकडे ........................
.............मी रे पश्चिमेकडे 
......नभ एकच .....


.

खरे प्रेम

खरे प्रेम तिथे असते 
खोटी स्तुतीदेखील
आपलेपणाने ऐकली जाते ...

खरे प्रेम तिथे असते
खोटे नातेदेखील 
सन्मानाने जपले जाते ...

खरे प्रेम तिथे असते 
कागदी फूलदेखील 
चिमटीत धरून हुंगले जाते ...

खरे प्रेम तिथे असते 
शिवी ऐकूनदेखील 
ओवीप्रमाणे स्वीकारली जाते ...

खरे प्रेम तिथे असते 
द्वेष केला तरीदेखील 
घरांत स्वागत हसून होते ......!
.

नादच खुळा

छ्या ! 

काय म्हणावे तरी ह्या फेसबुकाच्या नादाला !

तिचे छानसे प्रोफाईल पिक्चर 

फेसबुकावर पाहत बसण्याच्या नादात,

बायकोने आणून ठेवलेला ब्रेड, 

"चहाच्या कपा"त बुडवण्याऐवजी -

मी जवळच्याच "पाण्याच्या ग्लासा"त बुडवून,

मस्त फस्त केला ..

लॉगौट झाल्यावर लक्षात आले हो !

.

घर

 विरहवेदना -

सहन न होते विरहवेदना 
दुराव्यात इकडे
का डोळ्यांचे फुटत राहती 

उगा बांध तिकडे ..
.


नाईलाज -

 बसलो असतो आठवत मी
चंद्रचांदण्या सखीची मिठी -
विसरू कशी तहानभूक मी
नाही अन्नाचा कण ओठी ..

.



बिलंदर -

"सकाळ झाली" म्हणत म्हणत
चंद्र बिलंदर लपून बसतो -
घेऊन दिवसा चांदण्या सोबत

रात्रीचे बेत आखत हसतो ..

.

गर्वाचे घर खाली


मी स्वत:च्या नावामागे,
 कवी/लेखक अशी "पदवी ",
इतरांनी लावण्याऐवजी,
 स्वत:हूनच लावली आणि .....

अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊन -

माझी मीच पाठ थोपटून घेतली !

बालपणापासून... 
म्हातारपणापर्यंत... 
साहित्यातले "सर्व प्रकार" लिहून झाले.

आता लिहिण्यासारखे आपल्या हातून काहीही उरले नाही.
असा विचार करत... 

मी निवांत वाचण्यासाठी 

दासबोध आणि ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ हातात घेतले.

डोळे उघडे ठेवले आणि
... खरोखरच डोळे उघडले !

आपण काहीच लिहिले नसल्याचा
मला प्रथमच साक्षात्कार झाला !

नव्हे खात्रीच झाली...

 त्यांच्यापुढे साहित्यातला....
मी......... एक -

 "कोरा चांगदेव" !
.