मन उगाच भरकटते -


 नेहमीप्रमाणे सर्व कामं आटपून हातात वर्तमानपत्र घेतलं .

           कुठेतरी कुणीतरी आंदोलन केलं होतं , त्याचा पाठपुरावा म्हणून आंदोलनाविषयी सविस्तर बातमी आली होती . माझी नजर त्या बातमी मधील चौकटीवर खिळली होती. आंदोलन 'संपवण्या'साठी आतुर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्र त्या चौकटीत दिसत होते. त्यात पोलीस कुणाच्या पाठीवर , कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर - हातातील काठीने जमेल तसा (त्वेषाने-) मार देतांना दिसत होते !

           एका बाजूला पाठमोरा बसलेला एक मरतुकडा ज्येष्ठ नागरीक दिसत होता. ' अहो पोलीसदादा , मी नुसता या  बाजूने चाललो होतो, माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही हो! मला मारू नका ना! ' असा त्याचा एकूण आविर्भाव जाणवत होता.

            त्या आंदोलनाशी, त्या नागरिकाचा  खरोखरच काही संबंध असेल काय  ? माझ्या मनात विचारांचे आंदोलन सुरू झाले...

         गर्दीचे मानसशास्त्र काही वेगळेच असते. कुणी मुद्दाम गर्दी घडवून आणतात, काही ठिकाणी उगाचच गर्दी जमत जाते. हौशे, गवशे, नवशे एकत्र जमले, तरीही त्याचे रूपांतर अकारण गर्दी जमण्यात होते. आंदोलनकर्त्याला फक्त 'गर्दी 'शी मतलब असतो. जणु काही जमलेल्या गर्दीमुळेच तो यशस्वी/अयशस्वी  ठरणार असतो . गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ , वेळेचा अपव्यय , इतरांची कोंडी , गैरप्रकार याचा दूरान्वये विचार त्याने केलेला नसतो. मी आणि माझे आंदोलन , याखेरीज त्याच्या मनात इतर काही नसतेच.


          आंदोलन यशस्वी झाले तर ठीक ! यशाच्या धुंदीत आंदोलनकर्ता खूष , सारं काही आलबेल झाल्यामुळे पोलीस खूष, गर्दीमधला प्रत्येकजण  'मी ' होतो म्हणून तर - तो 'मी' ही खूष! सारे कसे छान छान !

          आंदोलन चिघळले, तर मात्र पोलिसांच्या घोळक्यात, इतमामाने बंदोबस्तात आंदोलनकर्ता गाडीतून गुपचूप अन्य स्थळी रवाना होतो . उरलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडते, ती वर वर्णन केलेली  ' गर्दी '! त्या गर्दीचे हाल कुत्राही खाऊ शकत नाही , असे होतात. पळापळी, धावपळ, चेंगराचेंगरी ,रेटारेटी यात कुणाचे काय हाल होतील ते प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील सांगण्यास असमर्थ ठरेल! कोण नशीबवान पोलिसाच्या लाठीमारातून सुटेल आणि कोण बदनशिबी पोलिसाच्या काठीचे चवदार खाद्य बनेल, ते सांगता येत नाही. लाठीमारात कुणी नडगी जायबंदी करून घेईल, कुणाची पाठ सुजेल, कुणाचे हात मोडीत निघतील ! शेकडो, हजारो , लाखोंच्या या गर्दीत एखादा निरुपद्रवी ,निरागस, निरपराध माणूस मात्र अमानुषपणाचा हकनाक बळी ठरतो. त्या माणसाला शहाणपणाने आधीच तेथून पळून जायचे जमले नसल्याने, तो पोलिसांच्या तावडीत अलगद सापडतो. मग  सुक्याबरोबर ओलेही जळताना दिसते!

          या सगळ्या पार्श्वभूमीवर , माझे मन आंदोलनातून विचारचक्रात  भलतीकडेच फिरत गेले !
 कुठले आंदोलन , कुठले पोलीस आणि कसली गर्दी ? ....

           ज्याच्या खांदयावर मान ठेवून निर्धास्त फिरावे , असा माझ्याच मायदेशातील पोलीस  माझ्याच एखाद्या निष्पाप , पाप्याचे पितर दिसणाऱ्या  बांधवावर ,  'खाऊ की गिळू ' या नजरेने पहात , 'सात जन्माचा वैरी वा दावेदार सापडल्या'च्या आनंदात हातात लाठी घेऊन यथेच्छ तुडून पडतांना दिसावा ?
     - आणि तो परदेशातून येऊन भर गर्दीत, सर्वांच्या समोर बेछूट गोळीबार करून, मनुष्यहत्या करून, दोषी ठरलेला नीचोत्तम , विश्वासघातकी , क्रूरकर्मा अजमल कसाब - आज आमच्याच पोलिसांच्या खांद्यावर मान ठेवून आमच्या जिवावर, पैशावर , हवाल्यावर तुरुंगात का असेना पण आरामात हवे ते मागत , फासावर न लटकता, किती दिवस चैन करणार आहे ; हे मायबाप सरकारलाही ठाऊक नाही !
                                                                                                                                                                                                                                                                         स्वदेशात हात ,पाय किंवा डोके फोडून घेऊन जायबंदी अवस्थेत शंभर वर्षे जगण्यापेक्षा, परदेशात जाऊन   'अजमल कसाब होऊन, थोडे दिवस राजेशाही थाटात जगून पहावे काय ? ' - असा मनात आलेला नतद्रष्ट, 'नापाक'  ( कु-)विचार मात्र मी मनातल्या मनातच पटकन झटकून, हद्दपार करून टाकला! 

     माणसाचं मन किती विचित्र असतं ना? केव्हां, कुठे, कधी, कसे भरकटेल , कोण सांगू शकेल ?     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा