कॉमेंट्री -


                    टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तंद्रीतून मी भानावर येताच रस्त्यात थबकलो. एका घरासमोरील छोटया मैदानात, काही मुले व मुली घोळका करून उभी होती. त्यापैकी दोन-तीनजण ओरडले -
 "शाब्बास रे कोमेंटेटर ! "
ते ऐकून व पाहून, मी पुढे चालू लागलो. रॉकेल मिळाले नसल्याने हातातले डबडे हेलकावे खात होते. त्या हेलकाव्यागणिक "कॉमेंट्री"संबंधी विचार माझ्या मनांत झोके घेऊ लागले......

              '........ आता काही दिवसातच सर्व लोकांचा दुपारचा चहा चुकेल, पण रेडीओकडे एक कान टाकायचा चुकायचा नाही ! कॉमेंट्रीची गोडी काही अवीटच आहे. मग ती कुठल्याही खेळाची असो- कुस्ती, हॉकी, टेनिस वा क्रिकेट ! हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या ऋतूंप्रमाणेच हिचाही विशिष्ट ऋतू असतो. आपली क्रिकेटची टीम परदेशी दौऱ्यावर निघाली किंवा परदेशी टीम आपल्या देशाच्या दौऱ्यावर आली, की संपूर्ण देशातील सर्व गल्लीबोळ झाडून- त्यांच्या आधीच क्रिकेट खेळायला तयार होतात. जागा मिळेल तेथे एक/ दोन/ तीन लाकडे उभी केली जातात, एकजण कागदी बांधलेला किंवा चिंध्या गुंडाळलेला किंवा रबरे गुंडाळलेला किंवा हाताला येईल तसल्या आकाराचा गोल झेलता येणारा, गोळा फेकण्यास सज्ज होतो. एखादी जहांबाज बाई आपल्या हातातल्या लाटण्याने नवऱ्याला मारण्यासाठी ज्या अपरिमित आनंदाने उभी असते- त्या स्थितीत लाकडाजवळचा एक पोरगा  आपल्या हातात एखादे फळकूट पकडून, चेंडू अंगावर येण्याची वाट पहाताना दिसतो. मग एखाद्याच्या मुखातून, रेड्याच्या तोंडून वदवल्या गेलेल्या वेदाप्रमाणे,  "कॉमेंट्री"चा जन्म होतो !

               एकवेळ पहिल्या यत्तेतला मुलगा संपूर्ण वर्षात मास्तरांनी  सांगितलेली उजळणी पाठ करू शकणार नाही; परंतु कॉमेंट्रीच्या आगळ्या वेगळ्या ऋतूत तोच मुलगा आपल्या स्मरणशक्तीचे विस्मयकारक प्रदर्शन करू शकतो. क्रिकेटचे खेळातले सर्व मोडकेतोडके नियम, तो  व्याकरणाच्या नियमापेक्षा सुलभतेने, नीट ध्यानात ठेवू शकतो. मिडऑन, लॉंगऑफ, लॉंगऑनसारखे किचकट शब्द खिशातल्या गोट्यांसारखे, तो लीलया तोंडी खेळवू शकतो.

              टेस्टम्याच सुरू होण्याचा अवकाश की, सर्व उपहारगृहांपुढे (शाळेतही कधी न आढळतील इतके -) काळे कुळकुळीत स्वच्छ फळे दिसू लागतात. रेडिओ, ट्रांझिस्टर, दूरदर्शनला हारतुरे घालून ओवाळण्यात येते.
सर्व शाळांतून 'कॉमेंट्री ऐकणे' हा जणू "शालेय कार्यक्रमाचा"च भाग गृहीत धरण्यात येतो. कॉमेंट्री कशाशी खातात, हे माहित नसणाऱ्या महिला महिला-मंडपात बटाटेपोहे खातखात " आज सुनील मांजरेकरने कित्ती कित्ती छान आवाजात कॉमेंट्री सांगितली होती " - या विषयावर बिंधास कॉमेंट्स करू लागतात ! 

           सर्व ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, "मोस्ट अर्जंट" फायली तातडीने बाजूला फेकून आधी, कनिष्ठ कर्मचाऱ्याला अर्जंटली ताबडतोब "ताजा स्कोअर" कळवण्याची फर्माईश सुनावतो. त्या (कामचुकार-) कर्मचाऱ्याला तेच हवे असते ! नाहीतर ऑफिसच्या कामाच्या आकडेमोडीत कॉमेंट्रीमधले स्कोअरचे आकडे घुसडले जाण्याची शक्यता अगदीच अशक्य नसते ! त्यापेक्षा कॉमेंट्री ऐकायला बरी वाटते !          

               क्रिकेटच्या कॉमेंट्रीमुळे असंख्य फायदे आणि अगणित तोटे झालेले आपल्याला दिसतात. कॉमेंट्रीमुळे वेळेचा अपव्यय होण्याच्या तोट्याबरोबरच, घरबसल्या एक देशकार्य पार पाडल्याचे सात्विक समाधान आपल्याला लाभू शकते !  हो- 'कॉमेंट्री ऐकणे' हे एक देशकार्यच होऊन बसले आहे. कारण आपल्या देशातील आपले खेळाडू आपल्या देशाचे नांव उज्ज्वल करण्यास काय पराक्रम गाजवतात, हे ऐकण्यास साऱ्या देशाचे काम त्या खेळाच्या वेळेतच खोळंबून राहिलेले दिसते !

               एरव्ही रिकामी असणारी हॉटेल्स 'कॉमेंट्री'काळात गच्च भरलेली दिसतात. त्यामुळे मालकांना आपल्या आणि हॉटेलच्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते ! दुसरा फायदा, ज्यांच्याकडे रेडिओ नाही अशांना होतो. हे लोक कॉमेंट्रीच्या काळात नातेवाईक अथवा मित्रांकडे जाऊन (रेशनिंग वा महागाईच्या काळात-)  फुकटातला चहा पिण्याची संधी साधतात ! शिक्षकांना या कॉमेंट्रीमुळे, विद्यार्थ्यांपुढे आपल्या रटाळ विषयाची कॉमेंट्री ऐकवण्याची गरज टाळता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही अगदी मजेत, आनंदात, सुखात जातो !

                काही कामचुकार कारकुनाना कॉमेंट्रीच्या निमित्ताने, स्कोअर ऐकण्यास व तो तत्परतेने 'बॉस'ला ऐकवण्यात, दोन क्षण विश्रांतीही मिळते. काही ठिकाणी खास कॉमेंट्री ऐकण्यासाठी रेडिओची खरेदी होते. हा रेडिओ-विक्रेत्या दुकानदाराचा फायदाच की ! रिकामटेकड्यांचा वेळ फालतू गप्पा मारत बसण्याऐवजी, कॉमेंट्री ऐकण्यात सत्कारणी लागतो. आपल्या बायकोची निरर्थक बडबड, एखादा नवरा या कॉमेंट्रीच्या आवाजात दाबुन ठेवू शकतो.

               शिवाय, कुणी सांगावं - नुसती कॉमेंट्री ऐकून ऐकून, लाखातला एखादा तरुण या खेळाकडे आकृष्ट होऊन, आपल्या देशाचा एक भरवशाचा खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकेल ! कॉमेंट्री ऐकण्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे चैतन्य खेळत रहाते. अशा   वातावरणामुळे देशाचे आरोग्य (!) सुधारण्याचा संभव असतो. ज्या प्रेक्षकांना सामन्याचे तिकीट मिळत नाही, त्यांना रेडिओवरची नुसती कॉमेंट्री ऐकून (तिकिटाचा खर्च, जाण्या-येण्याचा खर्च, मधल्या वेळचा अरबटचरबट खाण्याचा खर्च वाचवून-) कितीतरी रुपयांची बचत करता येते. (-आणि बचतीच्या संदेशाने देशकार्यास खिसाभार लावता येतो !)  

              कॉमेंट्रीमुळे आबालवृद्धांना खेळाचे कामचलाऊ व सम्यक ज्ञान (म्हणजे काय कुणास ठाऊक, पण वाचायला बरे वाटते ना, असले काहीतरी भारी !) प्राप्त होऊ शकते. क्रीडाविषयक आवश्यक शब्दभांडार मनांत साठून रहाते. स्नेहसंमेलनप्रसंगी एखादी व्यक्ती, काल्पनिक खेळाची काल्पनिक कॉमेंट्री ऐकवून, सुखद बक्षिस मिळवू शकते !

                एकंदरीत कॉमेंट्री ऐकणे, म्हणजे रेशनिंगच्या काळात एका आठवड्यास एका युनिटला चक्क एक ग्राम साखर वाढवून मिळण्याइतका   आनंद उपभोगणे ! त्यातल्यात्यात काही नाणावलेल्या कोमेंटेटर्सची कॉमेंट्री ऐकणे हा, भारताने पाकिस्तानच्या केलेल्या पराभवाइतका दुर्मिळ योग आहे ! '

            " आई ग्ग ...! "
          - या कॉमेंट्रीच्या नादात माझा अंगठा समोरच्या दगडामुळे फुटला की हो ! पण जाऊ द्या. महानगरपालिकेने पडू दिलेल्या या दगडावर, आता मी  कॉमेंट्री तुम्हाला  ऐकवण्यात काहीच अर्थ नाही. कारण रॉकेल न आणल्याने, आमच्या गृहदेवतेची अस्मादिकांवरील कॉमेंट्री मला निमूटपणे ऐकावी लागणारच आहे. 

                तुम्हीही (सवय असली तर, आमच्या घराच्या भिंतीला कान लावून ती -) ऐका हं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा