चित्रकार पिंटू .. [बालकविता]


आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..


जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान .. 


भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..


मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो .. 


झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..


हत्तीचे पाय इवल्याशा सशाला 
बगळ्याचे पाय नेमके सिंहाला .. 


मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..


चित्र रंगवताना डोलते मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..


चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग..


आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा