बालकाची कैफियत -


देवाने तुम्हाला दिला चेहरा
त्रासिकपणा दाखवायला का ?
.....आनंद कधीतरी दिसू द्या !

देवाने दिले तोंड तुम्हाला  
फक्त शिव्या देण्याला का ?
.....आमची स्तुती करा जरा !

दिले देवाने डोळे तुम्हाला  

रागावून पाहण्यासाठी का ?
.....कौतुकाच्या टाका नजरा !

देवाने हात दिले तुम्हाला
पाठीवर मारण्यासाठी का ?
.....थोड्या मायेनेही फिरवा  !

पाय दिले देवाने तुम्हाला  

मारण्यासाठी फक्त लाथ का ?
.....नतमस्तक त्यावर होऊ कसा  !

देवाने दिले पोट तुम्हाला 
केवळ खाण्यासाठी का ?
.....आनंदही माझा त्यात साठवा !

पाठ दिली देवाने तुम्हाला 
कायम दाखवण्यासाठी का ?
.....उचलून साखर-पोते करा !

देवाने दिले कान तुम्हाला 
रडणे आमचे ऐकण्यासाठी का ?
.....बडबडगीतही आमचे ऐका !

बोटे दिलीत देवाने तुम्हाला
कानाखाली वाजवायला का ?
.....गुदगुल्या करून थोडे हसवा !
 
देवाने दिली मान तुम्हाला
दुसरीकडे वळवण्यासाठी का ?

.....छानसे कौतुक करत डोलवा !

देवाने दिले सगळे आपल्याला 
दुरुपयोग करण्यासाठी का ?
......हसत खेळत राहूया जरा  !!

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा