कथा दोन महाराजांची

सकाळी सकाळीच बायको कडाडली-
"
कालपासून ओरडतेय,
'
भाजी आणा' 'भाजी आणा' म्हणून !
रात्र नाही बघायची, दिवस म्हणून नाही पहायचा..
सदानकदा ते मेलं फेसबुक फेसबुक फेसबुक..!
घसा फोडून तोंडाला फेस यायची वेळ आली तरी- 
तुमचं मुंडक आपल त्या फेसबुकातच .."

....... काही प्रत्युत्तर न देता,
गरीब गोगलगायीप्रमाणे [डोळे फेसबुकाच्या पोटात ठेवूनच-] 
पिशव्या हातात घेऊन,
चपलात पाय सरकवून,
 “अस्मादिकमहाराज” घराबाहेर पडले...........

चालत चालत मी रस्त्यावर आलो.
समोरून एक कार भर्रकन गेली. 
साधारण पाव किलोमीटर अंतरावर ती पोचली असेल,
तोच तिच्यामागे एक भलामोठा कुत्रा..
अक्षरश: केविलवाणा सूर काढत,
पळतपळत गेला..

कारमधील आरशात मालकिणीने त्याला पाहिले असावे..
क्षणार्धात कार थांबली. 
कारचे दार उघडले गेले, 
टुणकन ते “श्वानमहाराज” कारमधे उडी मारून,
स्थानापन्न झाले.......

कार निघून गेली !

पुढे म्या पामराने काय लिहावे... ?
.





|| श्री गुरुदेव दत्त ||

""" - श्री गुरुदेव दत्त- """

चार वेद हे श्वानरूपाने, गायही वसुधा शेजारी 
‘श्री गुरुदेव दत्तपाहता, मनास येई उभारी ..


शंख हातचा बघुनी कानी सुविचारांचा नाद शिरे    '
'दत्त दत्त' जपमाळ ही हाती, चक्र सुदर्शन बघुन फिरे ..

त्रिशूल हाती उभा पाहता, कुविचारातुन सावरतो 
भासे डमडम डमरू कानी, जिव आनंदे मोहरतो ..

कमंडलूवर नजर टाकता, पुण्यसंचय आठवतो    
'
दत्तदिगंबर' मुखात स्मरुनी, मूर्ती नयनी साठवतो ..

तीन शिरे कर सहा पाहता, पाझर हर्षाचा झरतो 
समाधान अन तृप्तीनेही सगळा देहच गहिवरतो ..

पुढ्यातला मज हात एक तो, आशीर्वादच जणु देतो 
सार्थक समजुन आयुष्याचे चरणी नतमस्तक होतो
..

.

छोटी छोटी ही छानशी परी - [बालकविता]


छोटी छोटी इवली इवली
पाहिली का हो आमची बाहुली
नाक नकटे झ्याक दिसते
येता जाता फ्रॉकला पुसते
चालताना तोरा पहा हिचा
रुबाब जणू राजकन्येचा
खु्दकन हसते क्षणात रुसते
पट्कन कोपऱ्यात फुगून बसते
डोळे फिरती चिमूकलीचे
डबे शोधती भातुकलीचे 
खावे फुटाणे का शेंगदाणे 
स्वत:शी खेळत भरते बोकणे 
बोबडे बोल घुमती घरी जरी
कौतुक होते शेजारीपाजारी 
आत्ता होती कुठे गेली छकुली
"भ्वा.."करायला दारामागे लपली
छोटी छोटी ही छानशी परी
पहायला या ना आमच्या घरी ..

.

पाच चारोळ्या -

'गोडीगुलाबी -'

हलवायाची मुलगी म्हणून
तुझ्याशी मी लग्न  केले
लक्षात कसे नाही आले
पिठले जरी तिखट झाले !
.

'चक्कर -'

हळूच घेत मी होते गिरकी
आरशासमोर येताजाता
वैतागून आरसाच म्हणाला
चक्कर आली- पुरे ग आता !
.

'चेहरा-'

हसरा तुझा चेहरा
वाढवी प्रसन्न जगाचा थाट -
दुर्मुखलेला चेहरा
लावी ग साऱ्याच जगाची वाट ..
.

'कौतुक -'

होते 'कौतुका'ला मन माझे
जीवनभर किती आसुसलेले -
ऐकले शोकसभेत माझ्या 
मी ते बहुतेकांनी उच्चारलेले ..
.

'अपूर्वाई -'

होता सतावत प्रश्न दिवसभर हाच मला
काय मी देऊ 'वाढदिवसाची भेट' तिला -
तिजवर होत्या कविता लिहिल्या लेखणीने ज्या 
नाचली घरभर.. मिळता "लेखणी" भेट तिला ..
.

उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही – [गझल]


उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही
देवा राहू दे दु:खातच त्याविण करमत नाही   


आवड मजला ना पुष्पांची का पसरवली अफवा

होती ती काट्यांची सवयच फूलहि धरवत नाही


हसतो बघुनी परका कोणी स्नेही जणु समजोनी    
रस्त्यावर सामोरी दिसता अपुला फिरकत नाही


आवडतो मज माळायाला गजरा  ग सखे तुजला
नाही बघवत तो सुकल्यावर यास्तव माळत नाही


रंगत चढते भान विसरुनी लोकांना हसवाया    
आनंदी खोटाच मुखवटा कोणा समजत नाही



पथ काटेरी पायाखाली मज सवयीचा आहे    
हिरवळ सुखदच बागेमधली मजला वाटत नाही ..

.

पाच हायकू -


१.

जीवन माझे
जगण्यास ना ओझे
काळजी त्याला ..
.

२.

ओवी अभंग
नित्याचा मज संग
करविता तो ..
.

३.

जीवन ज्योत
उजळते तोवर
श्वास जोवर ..
. 


४.

पडल्या गारा
आल्या पाऊसधारा 
शेत हताश ..

.

५.

प्रेम धनुष्य
पेलणारे आयुष्य
खरा सुखांत ..
.

काल होतो आज नाही भान ठेवा भूवरी - [गझल]


काल होतो आज नाही भान ठेवा भूवरी 
का फुकाची अवगुणाची द्वेषनिंदा अंतरी  

वर तराजू अंति एकच तोलणारा पाहिला  
काल तो ऋणकोच होता जाहला धनको जरी

ये म्हणालो मी सुखाला माझिया घरट्यात रे
दु:ख हटवा सुख म्हणाले करुन त्रागा सत्वरी  

बहर आला वेदनेला आणि मी आनंदलो
पानगळ पण हो सुखाची त्याक्षणी का बावरी  

मार्गदर्शक काजवा का वाटतो अंधारता
गर्व करुनी सूर्य देतो जरि प्रकाशा इथवरी ..
.

माझ्या जीवनाच्या इस्पितळात -

माझ्या
जीवनाच्या
अनमोल
इस्पितळात ..

गोळ्या-
तुझ्या आठवणींच्या
नेहमीच
चघळत बसतो ..

सलाईन-
तुझ्या सहवासाचे
अधूनमधून
लावत असतो ..

इंजेक्शन-
तुझ्या स्पर्शाचे
येताजाता 
टोचत हसतो ..

डोस-
तुझ्या आसवांचे
कधीतरी
पीत राहतो ..

मलम-
तुझ्या उपदेशाचे
अचूक वेळी 
लावत बसतो ..

टॉनिक-
तुझ्या हास्याचे
सदोदित
प्राशन करतो ..

ऑक्सिजन-
तुझ्या अस्तित्वाचा
जन्मभर लावून 
हिंडत असतो ..

.

फुलपाखरू -

रंगसंगती सुरेख लेऊनी
फिरते फुलपाखरू !

मृदू रेशमी पंख मिटूनी
बसते फुलपाखरू !

फुलावरी ते ध्यान धरूनी
रमते फुलपाखरू !

घेत गोडवा परागातुनी
झुलते फुलपाखरू !

बालचमूंच्या खेळे नयनी
उडते फुलपाखरू !

.