आदर दाखवतो शेजारी - [गझल]

आदर दाखवतो शेजारी उद्धट जरि दारात हल्ली
शिजत असावा कट कावाही का त्याच्याच मनात हल्ली
.
आहे खूपच सोकावत हे दारापुढचे श्वान आता 

पळतच सुटते बिस्किट दिसता दुरुनीही हातात हल्ली
.
गेली होउन ती दुसऱ्याची जेव्हा परक्या दूरगावी

नजर नि पाउल दारापुढती दोन्ही अडखळतात हल्ली
.
होता कायम माझ्यासाठी उघडा दरवाजा मनाचा
खिडक्यांचेही दरवाजे का बंद तिचे दिसतात हल्ली
.
हातामध्ये हात असू दे ना ती शब्दांची ग भाषा  

होते जाणिव संवादाची छान मला स्पर्शात हल्ली ..
.

कावा मनात गनिमी साधावयास आली.. [गझल]

कावा मनात गनिमी साधावयास आली
केसात मोगरा ती माझ्यासमोर घाली 

थोडी हसून गेली रागात ती जरीही
बेसूर गायनाला हळु दाद की मिळाली 

चटणीहि मज मिळाली चतकोर भाकरीवर
बघुनी सुखात जग हे मग झोप गाढ झाली

अफवा कशी पसरली आवड न मज फुलांची 
काट्यांसवे घरोबा दुसरा कुणी न वाली  

पाहून सरबराई मुक्काम वाढवी तो
कटवून पाहुण्याला पुसणार मी खुशाली .. 
.

तीन चारोळ्या

दिसतो रोजच चंद्र पुनवेचा 
तू घरी असल्यावर-
होतो सुरू काळ ग्रहणाचा 
तू माहेरी गेल्यावर..
.

प्रश्न आहे भाकरीचा 
शोधतो मी उत्तराला 
प्रश्न आहे पावसाचा 
शोधतो आहेच त्याला..
.

कचऱ्यात सोने शोधत आहे 
ती फाटक्या कपड्यातली-
सोन्याचा कचरा करत आहे 
ही तोकड्या कपड्यातली..
.

चार हायकू

चार हायकू :

१.
भुई बेभान
भूकंपाचे थैमान
शांती उध्वस्त ..
.


२.
छाया दुष्काळी
महागाई चटके
खिसे फाटके ..
.


३.
जीवनगाणे
रोजचेच गाऱ्हाणे
सूर भेसूर ..

.

४.
शब्द चांदण्या 
कागद आकाशाचा 
खेळ काव्याचा ..
.

ऐकता आश्वासनेही .. [गझल]


ऐकता आश्वासनेही हाय जनता मूर्ख बनते
पूर्ण ना होती कधी ती खंत कोणालाच नसते..

शेकडो कामे बरोबर आजवरची जाहलेली
माणसाचे मन तरीही का चुका शोधीत बसते..

परवडे ती थेट काही साप सरड्यांशीच मैत्री
दंश करणे रंग बदलत मानवाची वृत्ति डसते..

मोगरा गुपचुप सुगंधी माळते केसांवरी ती
जाहिरातीचीच संधी उघड वाऱ्यालाहि मिळते..

फाटकेही घालण्याला ना मिळे काही जिवांना
रोज फ्याशन तोकड्या अन फाटक्यांची का मिरवते..
.

चांगले न दोन शब्द कधी कुणास बोलले..[गझल]

चांगले न दोन शब्द कधी कुणास बोलले
अपेक्षेत डोहाळे स्वस्तुतीचे लागले

बघुनी समोर तुजला शब्द घालती पिंगा
करण्या तुझेच स्वागत कविता बनून सजले

कळेना आपलेसे का दु:खाने केले
आयुष्यांती दर्शन सुखाचेहि ना घडले

जन्मालाहि घातले गरिबीच्या लेण्यासह
का देवाचे कौतुक करावयास विसरले


जसजशी ती वाढली जवळीक वेदनांशी
दुरावे नात्यातले तसतसे का वाढले ..
.

झोपडपट्टी पाडुन ते उंची महाल बांधत होते -

झोपडपट्टी पाडुन ते उंची महाल बांधत होते 
खुजेपणाने बुलडोझर माणुसकीवर फिरवत होते

करतच होतो ओरड मी पाण्यामध्ये बुडतानाही 
काढण्यास माझा फोटो सगळे संधी शोधत होते

माझे माझे ठरवुनिया कवटाळत होतो मी ज्यांना 
अडचणीत मी दिसताना दुरून मजला टाळत होते

जसा बावरा कृष्णसखा जवळी नसता बासरीच ती 
तू नसताना प्राण सखे तसेच माझे हरवत होते

फूल तोडता जराजरा थरथर हाता जाणवली ती 
घेता कानोसा कळले किंचित काटे विव्हळत होते

जाळुन मज सरणावरती घसे मोकळे झाले सगळे 
माझे निवांत का आता सद्गुण दुर्गुण चघळत होते

वा वा म्हणून गझलेला नावाजत ते गेले सगळे 
काही चुकलेल्या मात्रा बसून पण हे मोजत होते ..
.

झिडकारुन संस्काराला -- [गझल]

झिडकारुन संस्काराला बिनधास्त वागणे जमते
सोडून सरळ त्या वाटा पळवाट शोधणे जमते

लाभाचे माहित असता ते रोज सारखे फिरणे 
सगळ्या कामांना टाळत आम्हांस लोळणे जमते

दिसला जर खड्डा पुढती डोळ्यास तो जरी त्यांच्या 
आपणही त्यात पडूनी दुसऱ्यास पाडणे जमते

व्यसनाने जीवन दु:खी उपदेश येतसे कानी 
व्यसनाधिन निर्व्यसन्याला निमिषात बनवणे जमते

म्हणती सत्याची आहे सगळीच येथली दुनिया 
सत्यास मुलामा खोटा धादांत चढवणे जमते ..
.

प्रवेशबंदी


" लुंगी असल्यावरच प्रवेश .."

" कमरेला पट्टा नसेल तरच प्रवेश .."

" सोवळ्यात असेल तरच प्रवेश .. "

" क्यामेरा मोबाईल नसेल तरच प्रवेश .."

" अमुक असेल तरच प्रवेश .."

" तमुक नसेल तरच प्रवेश.."

..... असल्या "प्रवेशबंदी"च्या ठिकाणी -
आम्ही दोघांनी आपणच प्रवेश करायचा नाही...

असे पक्के ठरवले आहे !


...... पावित्र्यापोटी पादत्राणाची घाण-
 आणि म्हणून त्यावरची बंदी ....

आपण सर्वजण एकवेळ समजू शकतोच ना ?
.

दोन चारोळ्या -

१.
कामचुकारांना का मिळते 
बक्षिस येथे -
कर्तव्यदक्षांच्या का पाठी 
बडगा येथे ..
.

२.
थंडीत तो गुलाबी
होताच स्पर्श एक 
होतेच तप्त तन अन 
वातावरण सुरेख ..
.

जात तीच -----[गझल]

जात तीच
घात तीच  

भेट रोज 
बात तीच

ऊठसूट 
ज्ञात तीच

तेच हात
वात तीच

एक नजर 
मात तीच

खोल डोह 
आत तीच

दिवस काय
रात तीच 

वेळ धुंद 
घात तीच ..
.

आरशात मी हरवत गेलो ..[गझल]

आरशात मी हरवत गेलो
धुंदीतच मज शोधत गेलो

जीवनातल्या शर्यतीत मी
एकटाच पण जिँकत गेलो

मैफिल त्यांची दिसता जमली
मीहि एकटा जमवत गेलो

जखमा त्यांच्या युद्धामधल्या
संसारी मी मिरवत गेलो

नशिब खेळले कितीक खेळी
लबाड मीही फसवत गेलो

कुटील नाती डावपेच पण 
त्यावर पाणी फिरवत गेलो

मरणाच्याही 'वन वे'वरुनी 
'यू टर्न' किती मारत गेलो ..
.

स्वामी समर्था -

मूर्ती डोळ्यापुढे दिसू दे
तुझीच मजला स्वामी समर्था..

समाधान सुख शांतीचे दे 
वैभव मजला स्वामी समर्था..

सुविचारांचे स्मरण असू दे
मनात मजला स्वामी समर्था..

निंदा द्वेष अपकीर्ती नसू दे
जीवनी मजला स्वामी समर्था..

बुद्धी सहकार्यात रमू दे
हृदयी मजला स्वामी समर्था..

सद्गुणसंगत नित्य मिळू दे 
सत्पथी मजला स्वामी समर्था..

विसर जपाचा कधी न पडू दे
अंतरी मजला स्वामी समर्था..
.

घटकेत ऊन पोळे घटकेत चांदणे मज - [गझल]


घटकेत ऊन पोळे घटकेत चांदणे मज
आयुष्यमार्ग अवघड समजे न चालणे मज

विश्वात जीव इतके मी एक बिंदु साधा
"विश्वा"स ओळखाया शत जन्म जन्मणे मज

बागेतल्या फुलांची गणती उगाच केली
येता सुगंध नाकी का वेड मोजणे मज

तो सूत्रधार वरचा कळसूत्र खास त्याचे 
हातातले बनवले त्यानेच खेळणे मज

हातावरील रेषा सुखदु:ख सांगती जर
पुसणार कोण आहे आलेच शोधणे मज ..
.

कांदा भाई, कांदा भाई, कांदा भाई ...[विडंबन]

कांदा भाई, कांदा भाई, कांदा भाई...

रुपये दोन मिळतो किलोन
भावात छान
पिशवी द्या न 
नीट धरा न
पडती सतरा
जवळी बकरा
इकडुन तिकड मारतो चकरा
चकरा-बकरा, चकरा-बकरा, चकरा-बकरा.....
कांदा भाई, कांदा भाई, कांदा भाई !

मेरा ये थैला फाटका च्यायला 
कुणी ना पाह्यला 
कांदा पडायला 
बकरा खायला
ठणाणा व्हायला 
च्यायला-खायला, च्यायला-खायला, च्यायला-खायला......
कांदा भाई, कांदा भाई, कांदा भाई !
.

कसा अचानक आला वरुनी - [गझल]


कसा अचानक आला वरुनी 
तनास माझ्या गेला धुवुनी

भिजून अक्षरपक्षी सगळे
मनात बसले पटकन लपुनी

विचार जमले मेघरुपी ते
खुशाल म्हणती ये रे फिरुनी

नहात कविता होती उघडी 
तशीच हसली जाता भिउनी

क्षणात पाउस आला गेला 
तयार झरणी भरभर लिहुनी ..
.