गुंतता कलह हे


ऑफिसचे काम लवकर आटोपले.
इकडे तिकडे न भटकत घरी पोहोचलो .


दारातच सगळीकडे सामसूम शांतता असल्याची जाणीव झाली .
आपल्याच घराजवळ आल्याची खात्री करावी की काय -
असेही क्षणभर वाटून गेले.


ल्याचकीने दार उघडले.
आत गेल्यावर डोक्यात उजेड पडला. 


अपेक्षेप्रमाणे फक्त टीव्हीचाच आवाज दिवाणखान्यात घुमत होता.


आई, बायको आणि सूनबाई डोक्याला डोके लावून,
मालिका पाहण्यात मग्न होत्या. 


शांतता भग्न पावणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊन चहा केला.
मालिकेची ब्रेकची वेळ साधून तिघींपुढे तीन कप ठेवले !

आपसूकच तिन्ही माना माझ्याकडे वळल्या.
" अरे -
अहो -
अय्या -
आज लवकर कसे ? "
तिन्ही पिढयांचे उद्गार.. एकापाठोपाठ कानावर पडले.


तब्ब्ल दोन मिनिटांचा ब्रेक असल्याने, तिघींना उद्देशून एकच प्रश्न विचारला..
" काय असते या मालिकेत गुंतून जाण्याएवढे ?" 


आई आधी उत्तरली -
" अरे बाबा, तोंडात बोट घालायला लावणाऱ्या,
सुनेच्या एकेक हिकमती / करामती बघण्यात काय मजा येते म्हणून सांगू...... ! "


घाईघाईने आईचे उत्तर पूर्ण होण्याआधीच सूनबाई उद्गारली
" अहो बाबा, आणि बर का.. अगदी अचंबित करणाऱ्या,
अविश्वसनीय अशा सासूच्या उचापती / कुरापती पाहतानाही,
अगदी थक्क व्हायला होते हो ! मस्त धमाल येते ! "


त्या दोधीकडे आळीपाळीने बायको पाहत असतानाच ,
ब्रेक संपला आणि माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत,
तिन्ही डोकी उलट्या दिशेला वळली !


निमूटपणे चार कप हातात धरून,
मी बेसिनच्या दिशेने वळलो ..... !

.

दोन चारोळ्या -

आनंद खूप होता
"महिला दिना"त त्याला-
झाला तो दीन आता
पाहून लाटण्याला..

.
असते सवय कुणाला
आनंद वाटण्याची-
असते सवय कुणाला
दु:खात लोटण्याची..

.

बायको आणि साडी


... मंडईतून आलेली बायको 
दाणकन आपले धूड आणि बूड सोफ्यावर आदळत,
भाज्यांच्या पिशव्या बाजूला टेकवत, 

आपल्या इवल्याशा रुमालाने भलेमोठे कपाळावरचे घामाचे थेंब टिपत, 
हाश्श हुश्श करत उद्गारली-

" बै बै बै... हे आपले चार जिने खाली उतरून, 

परत वर चढून जायचे यायचे म्हणजे अगदी अग्नीदिव्यच आहे की ! 
 तेवढा फ्यान सुरू करता का हो ? "

होकारार्थी मुंडी हलवत, तिचाही मी फ्यान असल्यामुळे, 
लगेच डोक्यावरचा फ्यान चालू करत मी म्हणालो -

" अग, आज तुला दसऱ्यासाठी साडी आणायला जायचं ठरल होतं ना, आपलं काल ! "


क्षणार्धात . . .
सोफ्यावरून टुण्णकरून उडी मारत, 

अपूर्व उत्साहाने बायको चित्कारली,

" विसरलेच होते की मी ह्या भाज्यांच्या नादात ..
बसलात काय असे मग उगीच ! चला बरं पटकन..,
तयार होऊन आले हं, मी दोन मिनिटातच ! "


मघाची "ती दमलेली बायको" खरी का,
आता समोर दिसणारी "ही उत्साही खरी"...
असा विचार माझ्या मनात डोकावेपर्यंत ,
बायको फ्रेश होऊन,
"हं चला लवकर !" म्हणत माझ्यासमोर हजरसुद्धा !

.

हे फ्री ते फ्री

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...
  
"मी अमुक तमुकच्या सेंटर मधून बोलतेय -
  

सीम कार्डः फ्री
 

मेमरी कार्डः फ्री
 

अमुक इतका टोकटाईमः फ्री
 

आमच्या 4जीवर अमुक इतका एमबी इंटरनेटः फ्री ...."

..तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच,
मी ओरडलो -


" मोबाईलचा हँडसेट फ्री असेल तर लगेच आलो ..."


खाडकन्‌ तिने आपला आवाज बंद केला !
.

दोन चारोळ्या

तू तू आणि फक्त तूच --

वाचण्याचा प्रयत्न करतोय सखे ,
प्रेमाने भेट दिलेले पुस्तक तू -
समजत नाही, कसे वाचावे ,
अक्षरांऐवजी.. दिसतेस फक्त तू ..
.

घात -

सुटलो सांगत सर्वांना 
आलो सारे जग जिंकून मी -
पाहताक्षणी मी ग तुला 
बसलो ते जग हरून मी..
.

आपल्याच पायावर धोंडा -

रविवारचा आजचा मस्त दिवस !

निवांतपणे तासभर रंगोलीची मधुर गाणी सकाळी ऐकायचे ठरवले
आणि त्या नादात बडबड्या बायकोला मी म्हणून चुकलो -

" तू तासभर गप्प बसून राहिलीस, तर मी तुला,
तू म्हणशील ती भेट द्यायला तयार आहे ! "

...... तर सांगायचा मुद्दा हा की,

 सकाळी सकाळीच दोन तास -

" एखादी भेट देणे-घेणे हा भ्रष्टाचार कसा .."
ह्या विषयावर मला बायकोची बडबड ऐकत बसावे लागले की हो !

... रंगोली पार बोंबल्ली !

..

करावे तसे भरावे

घरात शिरता शिरता, त्याने बायकोला बातमी दिली -

" अग ए , ऐकतेस ना-
तुझ्या सांगण्याप्रमाणे,
आताच आईबाबांचे त्या वृद्धाश्रमात नांव नोंदवून आलो बघ ! "

ती जोषात, टाळ्या पिटत, गिरकी घेऊन म्हणाली,
" बर झालं बाई !
तिथं ती दोघं आनंदान, मजेत आणि अगदी सुखात राहतील ! "

तिच्या समोर उभा राहून,
तो पुढे म्हणाला....
" आणि हो,
मुख्य तेच सांगायचं राहिलं की.....
म्हटलं आता गेलोच आहे वृद्धाश्रमात तर ,
तुझ्या आई-बाबाचही नांव नोंदवून आलो बर का ...!
अग, तुझे आईबाबाही आनंदान, मजेत
आणि अगदी सुखात राहतील ना तिथं ? "

..... घेरी येत असलेल्या बायकोला सावरायला,
पटकन तो पुढे धावला !

.

सवलत

घराबाहेरच्या बाप्पाच्या मिरवणुकीत,
मनसोक्त नाचायला मिळाले.


दमूनभागून घरात आल्याने, गणपती विसर्जनानंतर,
मी अंमळ गाढ झोपलो होतो.

पण असे ते क्षणैक सुखही उपभोगू देईल,
ती बायको कसली !


"अखंड बडबड सप्ताहा"च्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणारी
माझी बायको, 

गदागदा मला हलवत,
माझ्या कानाशी ओरडत होती-
"अहो, किती मोठ्याने बडबड चालली आहे हो तुमची झोपेत ! "

थोडासा भानावर येत मी म्हणालो -
" माझे आई, निदान झोपेत तरी अशी बडबड करायची,
थोडी सवलत मला घेऊ दे ना ग ! "
.

फुटला अखेर पाझर . .(गझल)

फुटला अखेर पाझर दुष्काळ बघुन खाली
नयनातुनी नभाच्या बरसात खूप झाली ..

समजावले मनाला अपुले कुणी न तिकडे
तिकडेच का मनाची आशा खुळी पळाली ..

खुलतो गुलाब गाली पाहून मज जरी तो
दुःखात मग्न मी पण अश्रू तुझ्याच गाली ..

राज्यात फार झाले बेरोजगार माझ्या
सिग्रेट दारु गुटखा विक्री भरात आली ..

पाहून खूष झालो बाप्पा तुझी मिरवणुक
शिक्षा उगाच माझ्या कानांस रे मिळाली ..

.

तीन हायकू

१. 

वेध आगळे
पिंडापाशी कावळे
स्तब्ध सगळे ..



२.

एकांती दंग
मनोराज्यात गुंग
भासात रंग ..
.


३.

कितीसे खरे 
ओळखीचे चेहरे
का मुखवटे ..
.

टकलावरून माझ्या ..[हझल]

टकलावरून माझ्या मी कंगवा फिरवला
मज "बालदिन" सुखाचा नशिबातला गवसला ..

"मौना"चिया व्रताचा दिन आज बायकोचा
बडबड घरात करुनी आनंद मीहि लुटला ..

मग पुस्तकेच भारी मी घेतली उशाला
तेव्हां कुठे जराशी ही झोप येइ मजला ..

स्मरणास वाढवीण्या क्लासात नाव दाखल
"जॉईन क्लास केला" मुद्दाच हा विसरला ..

हत्तीस खेद भारी मुंगीस पाहिल्यावर
"डाएट पाळु कैसे" हत्ती मनी शरमला ..

आलीया भोगासी

ऑफिसमधून तो जरा लवकरच घरी आला आणि मोठया आशेने सोफ्यावर बसून, त्या चौघींना पाहत राहिला ..

आजी, आई, बायको आणि सूनबाई-
मोठ्ठा आवाज केलेल्या टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसलेल्या दिसत होत्या !

दिवसभर या ना त्या कारणाने, एकमेकीपासून दूर राहणारी ती चार तोँडे,
"एकटीव्हीसमभाव" या न्यायाने टीव्हीसमोर मात्र शेजारीशेजारी न भांडता, चिटकून बसलेली दिसत होती !

यावेळी अचानक तो आला असला, तरी त्यामुळे त्या चौकडीला काहीच फरक पडला नव्हता ..

पण -   तो मात्र आपल्या स्वागताविषयी
भलत्याच अपेक्षा बाळगून लवकर आला होता !

. . मालिका पाहण्यात गुंगलेल्या त्या चौघीकडे हताशपणे पाहण्याखेरीज,
 तो आता काहीच करू शकणार नव् आला आणि मोठया आशेने सोफ्यावर बसून, त्या चौघींना पाहत राहिला ..

घरात मोठ्ठा आवाज केलेल्या टीव्हीसमोर आजी, आई, बायको आणि सूनबाई-   ठिय्या मांडून बसलेल्या होत्या !

दिवसभर या ना त्या कारणाने, एकमेकीपासून दूर राहणारी ती चार तोंडे,
"एकटीव्हीसमभाव" या न्यायाने टीव्हीसमोर मात्र, शेजारीशेजारी न भांडता चिटकून बसलेली दिसत होती !

यावेळी अचानक तो आला असला, तरी त्यामुळे त्या चौकडीला काहीच फरक पडला नव्हता ..

पण - 
तो मात्र आपल्या स्वागताविषयी भलत्याच अपेक्षा बाळगून लवकर आला होता !

. . मालिका पाहण्यात गुंगलेल्या त्या चौघीकडे हताशपणे पाहण्याखेरीज,
तो आता काहीच करू शकणार नव्हता !

मालिका सुरू होऊन, पंधरा मिनिटे झाली..

अचानक मोठ्या आवाजातल्या जाहिरातींचा अखंड मारा सुरू झालेल्या उपद्रवामुळे-

आजीने नाक मुरडले,
आईने त्रासिक मुद्रा केली,
बायकोने आणि सूनबाईने, एकसमयावच्छेदेकरून,
"चहात माशी पडल्यावर" बघून होतो,
अगदी तसाच चेहरा करत,
एकमताने नाराजी व्यक्त केली..

"शी बै, नको तेव्हाच हे च्यानेलवाले
या जाहिराती कशा काय मधेच लावतात की !"

आता तरी चहाचा कप आपल्या पुढ्यात येईल, या आशेने तो उत्सुक झाला होता ..

पण मोठ्या आवाजातला तो टीव्ही बंद तर झाला नाहीच, त्याऐवजी जाहिरातीपुरता आवाज सूनबाईने म्यूट केला ..

आणि-
"जाहिरातवाले आपला रसभंग किती निर्लज्जपणे व बेमालूमपणे करतात-"
या विषयावर एक मिनिट व एकोणपन्नास सेकंद तावातावाने बिचा-या चौघीत चर्चा चालूच राहिली ..
--- टीव्हीच्या आवाजापेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात !

एकंदरीत वातावरण आणि रागरंग पाहून, पण वैतागून न जाता, तो बिचारा मुकाट्याने चहा करायला किचनकडे निघाला !
.

अविवाहित... दु:खी ?

आज सकाळी चहा पिता पिता, 
माझ्या एका मित्राबद्दल मी बायकोला सांगत होतो-
"खूप दु:खात दिवस काढलेत बिचाऱ्याने !"

पुढे मी आणखी काही सांगणार, 
तेवढ्यात बायकोने मधेच मला थांबवत विचारले,
"लग्न झाले होते का त्याचे?"

तिचा विचारण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला नव्हता, 
सहजपणे मी उत्तरलो,
"नाही ना."

विजयी मुद्रेने, 
मला काहीच कळत नसल्याच्या नजरेने माझ्याकडे बघत, 
बायको उद्गारली,
"अहो, त्याचं लग्न झालं नव्हत, 
तर त्याला दु:खात असायचं कारणच काय मुळी ?"
.

अ से आ हे फे स बु क ..

फेसबुकाच्या रंगमंचावर
येतीजाती पात्रे अगणित.. 

फेसबुकावर मैत्रीचे 
कित्येकांचे जमते गणित.. 

फेसबुक सर्वांसाठी आहे
उत्तम व्यासपीठ फुकट.. 

फेसबुकावर एकाचवेळी
आनंद आणि कटकट.. 

फेसबुकावर एकमेकांचे
हेवेदावे-साटेलोटे.. 

फेसबुकावर मौनातूनही
संभाषण खोटे मोठे.. 

फेसबुकाशी जुळवावे 
नाते खरे मनातून वाटे.. 

फेसबुकावर राग दाखवत
पळती काही फेक खोटे..

.

पाच हायकू

१.
एकच खंत
भेदाभेद जिवंत 
जातीत भिंत ..
.

२.
चंचल मन
व्यसनाधिन तन
संगती दोष ..
.

३.
ही हाणामारी
पुतळ्याच्या समोरी
पुतळा स्तब्ध ..
.

४.
नातेवाईक
किती त-हेवाईक
आयुष्य खेळ ..
.

५.
उभी ती दारी
भरली रहदारी
भुकेल्या पोटी ..
.

जशास तसे

पगार हातात आला होता. 
महिन्याच्या हिशेबाची मनात जुळवाजुळव करीत होतो. 

बायको अशा वेळी नेमकी समोर आली.. 

तिला माझी फिरकी घ्यायची लहर आली असावी !

तिने हसत हसत विचारले ,
" आपण न्यानो कार घेऊया का ?"

उपरोधाने मी विचारले, 
" पैसे माहेराहून आणणार का ?"

शांतपणे ती उद्गारली, 
" माहेराहून कशाला ? 
हे तुमचे न खपलेले कविता-संग्रह आणि पुस्तके रद्दीत घालू की !
त्यात कार आणि पेट्रोल - दोन्ही खर्च अगदी सहज भागतील !"

पेट्रोल पिल्यासारखा माझा चेहरा तुम्हाला दिसलाच असेल !
.

विसराळू बहिरा

आमचं म्हातारपण, फारच वाईट हो ! 

सकाळचं कोवळं ऊन खात, 
मी खिडकीजवळ जरा निवांत बसलो होतो.

समोरच्या खुर्चीवर बायको बसली होती. 

आमच्या गप्पा चालू होत्या, काही वेळ शांततेत गेला.

थोड्या वेळाने, सतत तीनचार मिनिटं तिच्या हातवाऱ्याबरोबर 
तोंडाची हालचालही मला दिसू लागली होती....

नक्कीच ती मला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असावी... 
म्हटलं, हिच्या आवाजाला झालं तरी काय !

मला राहवेना ;
मी ओरडलो-
" अग, घशात काही अडकलं आहे का ?
 नुसतच तोंड काय हलवतीस, काही बोलायचं आहे काय ?
 सांग ना लौकर काय ते ! "

काही क्षण तसेच गेले, 
बायको माझ्याकडे नुसतच पहात राहिली ..

नंतर ती खुर्चीवरून सावकाशपणे उठली, 
आणि ... 

माझ्या कानातून खांदयावर घसरलेलं,
माझं "श्रवणयंत्र" माझ्या कानात नीट बसवलं !

या म्हातारपणामुळे मी 'बहिरा' तर आधीच झालो होतो,
.... आजपासून 'विसराळू' पण ?

एकापेक्षा एक

छे छे छे !

काहीच समजेनासं झालंय हो !

कसं आवरावं बरं,
बायको आणि तिच्या आईच्या 
अखंड आणि मोठ्या आवाजात चाललेल्या ह्या आपापसातल्या बडबडीला !

बाहेरच्या गणपतीच्या मंडपासमोरून जाणा-या
 मिरवणुकीतल्या डॉल्बी सिस्टमवर ..

छानपैकी शांताबाई, सैराट, कल्लोळाची गाणी चालू आहेत ..

पण...

या दोघींच्या आवाजाच्या गोंगाटात, इच्छा असूनही,
मला त्या मस्त मस्त गाण्यातला 
एक शब्द कानावर नीट ऐकू येईल तर शपथ !
.

पाहुणचार

यजमान स्वागताला दारात उभे असतानाच,

"अग, पण मी तुला ---"

"अहो पण मी, लगेच ब्याग ----"

. . .अशी आपापसात तणतण करत,
हातातल्या ब्यागा सावरत मिस्टर व मिसेस पाहुणे घरात आले.

त्रासिक मुद्रेने मिस्टरांनी बहुधा मिसेसवरचा राग व्यक्त करण्यासाठीच,
हातातला मोबाईल सोफ्यावर आदळला.

मिसेसनी नुसते त्यांच्याकडे बघत,
नाक मुरडत स्वैपाकघराकडे पावलं टाकली,

..... यजमान भलतेच चाणाक्ष !

त्यांनी आपल्या मुलाकडे नजर टाकून खुणावले .
मुलगा लगेच एका ताटलीत मोबाईलचा चार्जर ठेवून, 
ती ताटली आदबीने मिस्टरांपुढे धरून उभा राहिला !

यावेळी मिस्टरांना नाहीतरी नकोच होते... 
अगदी चहाचे पाणीसुद्धा ! 

त्याऐवजी अगदी मनातली हवी असलेली गोष्ट..... 
अचानक पुढ्यात आल्याने, 
मि. पाहुणे एकदम खूष होऊन गेले !

आपल्या घरातून बाहेर पडून, यष्टीतून उतरताना, 
मिस्टर आणि मिसेस पाहुण्यांना आपण मोबाईलचे चार्जर 
घरातच विसरल्याचे ध्यानात आले होते . . . ! 
.