द्यावे म्हणतो संस्कारांचे ओझे फेकून
नीतीनियमांना मी दमलो आहे पाळून..
.
जाते पळुनी विझताच दिवा छाया तेथून
नाद न करता नाणी सरते नाते जवळून..
.
गेली वाढत सलगी माझी दारिद्र्याशी
गेले अंतर नात्यामधले आता वाढून..
.
असा कसा मी जातच विसरुन माझी गेलो
बघता बघता माणसातही गेलो मिसळुन..
.
नाही झेपत आता कौतुक ऐकायाला
गेली आहे निंदा रोजच कानी साठून..
.
झाली दु:खी काळोखाची खूप सवय मज
पडता भवती तिरिप सुखाची बघतो दचकून..
.
मात्रा गण मी मोजत हसलो शोधत फसलो
चोरशिपाई खेळत बसलो मी गझलेतून..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा