चार चारोळ्या - - - -

सवय-
काट्यांचे पसरून अंथरुण
झोपायाची सवय जाहली -
पसरली कुणी अंथरुणावर
फुले नेमकी टोचु लागली . .
.

राजकारण-
कुणी कुणाचे येथे नसते
जमती सगळे तिकिटापुरते -
मेनका सत्तेची नाचे जिकडे
विश्वामित्र पळतो तिकडे..
.

आदरातिथ्य-
केले स्वागत प्राजक्ताने
बहुत फुलांचा सडा घालुनी -
निरोप प्रेमळ दिधला त्याने
सुगंध वाऱ्यासोबत धाडुनी ..
.

सबला अबला -
कोण म्हणे तिजला अबला  
 निघाली बघा भांडायाला !
...मधेच पाहून त्या झुरळाला 
 का लागे धूम ठोकायाला !
.

ती भाकरी


काल सकाळी देवदर्शनाला निघालो होतो.

रस्त्याच्या एका बाजूला,
 उंच इमारतीचे बांधकाम चालू होते.
बाजूला पत्र्याच्या शेडबाहेरच, 
तिथल्या कामगाराची पत्नी दगडाची चूल मांडून, 
तव्यावर भाकरी धपधप थापत होती.....

तो नाद कानापर्यंत आणि... 
नंतरचा भाकरीचा वास नाकापर्यंत-
छानसा दरवळून गेला खरा -

काल नेमका महाशिवरात्रीचा म्हणजे उपवासाचा दिवस !

 तरीही त्या भाकरीकडे लक्ष गेलेच.

सगळी देवाचीच करणी की शेवटी.

मनांत येऊन गेला हळूच एक विचार....
त्या मस्तशा भाकरीबरोबर आपल्याला कांदा, चटणी आणि पिठले मिळाले तर...

स्वर्गसुख म्हणतात- ते आणखी काय असते हो !

ती तव्याएवढी मोठी, पौर्णिमेच्या चंद्रासारखी, पांढरीशुभ्र गोलगरगरीत, 
अगदी भूमितीतल्या वर्तुळासारखी , पहात रहावीशी वाटणारी भाकरी -

आमच्या फ्ल्याट संस्कृतीत कुठली पहायला मिळणार ?

आमच्या घरात रोज नवनवीन आकाराच्याच चपात्या - 
"गोल वर्तुळाकार" एक चपाती दिसेल तर शपथ !
कधी त्रिकोणी - कधी पंचकोनी - कधी बहु कोनी !

रात्री सात ते नऊ घरातल्या "आम्ही सारे खवैय्ये" म्हणत गरजणाऱ्या .. 
सगळ्याजणीना कधीतरी सकाळी एकदा- 
त्या पत्र्याच्या शेडजवळ, फिरायला न्यावे म्हणतोय !
.

किस डे -

आज किस डे !

.... राहून राहून-
त्याच्या मनांत 
विचारतरंग लहरत, विहरत होते .

भलभलत्या कल्पनांनी
तो शहारत होता,
रोमांचित होत होता .

मनांत
विलक्षण गुदगुल्या होत होत्या.

तेवढ्यात-

हवा असलेला आवाज 
त्याच्या कानावर आलाच ...

"ए, घे ना पट्कन .. 
पण एकच हं ! "

उतावीळपणा नडला..
घाईघाईत तो उठायला गेला -

.... स्वप्नातून जागा होतानाच ..
धाडकन्‌ तो कॉटवरून खाली आदळला !
.

सखे तुझ्यासाठी -


" सखे तुझ्यासाठी -"
हा माझा चारोळीसंग्रह- 

विशेषेकरून -
मैत्रीदिनाला/व्ह्यालेंटाईन डे ला ...

  तुम्ही तुमच्या खास प्रेमीजनांना
 "भेट" देण्याजोगा ....

माझ्या ६० चारोळ्यांचा "चारोळीसंग्रह".

.... आपल्या "सखी"भोवती रुंजी घालणारे-
 तुमच्या माझ्या चिरतरुण मनात, 
शब्दात उमटलेले विचार वाचा यातील चारोळ्यात ! 

( संपर्क ....09011667127 किंवा 
deshpande.vijaykumar@gmail.com )
.




"" चांदोबाचा दिवा ""



"" चांदोबाचा दिवा "" .........

  हे माझे रंगीत चित्रांचे, ४० कवितांचे, 

फक्त ४० रुपये किंमतीचे -

बाळगोपाळांना आवडेल असेच, 


मराठी "बालकवितां"चे पुस्तक ..


             तुमच्या घरातील लहान मुला/मुलींना,

 आणि त्यांच्या लहान मित्र/मैत्रिणींना

मुंज, वाढदिवस इ.विविध प्रसंगी "भेट" देण्यासाठी,

"रिटर्न गिफ्ट"साठी छान..


            शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थिनींना

 "पारितोषिक" स्वरूपात देण्यासाठी मस्त ..


(संपर्क - 09011667127 किंवा -

deshpande.vijaykumar@gmail.com)

.

याचसाठी केला होता अट्टाहास -

छ्या ! 
सगळाच केर मुसळात की हो .

कधी नव्हे तो,
आज देवळात दर्शनासाठी गेलो होतो..

हीssssssssss लांबलचक रांग .........
अखेरीस माझा नंबर आला -

देवाला मनोभावे नमस्कार करणार ..

इतक्यात -
लक्षात आले,

फोटोग्राफर बरोबर आणायचाच विसरला !

अगदी हिरेमोड झाला मनाचा ..

माझे देवदर्शन राहू द्या ..
पण -

माझ्या दर्शनाची पोझ........

तुम्हा सगळ्यांना दाखवायचीच होती -

इतकी चुटपुट लागून राहिलीय म्हणून सांगू !
.

कधी नव्हे ते

कधी नव्हे ते- 
माझ्या जीवनवृक्षावर 
चार पाच 
सुखाची फळे 
लटकलेली दिसली ..

कधी नव्हे ते- 
नको ती पाखरे 
जवळिकेने 
धडपडत चिकटली ..

कधी नव्हे ते- 
उरलीसुरली
सुखफळांची वाटणी 
करावीच लागली ..

कधी नव्हे ते- 
जीवनवृक्षाची डहाळी 
पुन्हा बहरण्याची 
वाट बघू लागली .. !
.

व्हॅलेंटाईन डे


आज प्रेम अगदी उतू जाण्याचा दिवस...... 
पण -
ह्या बायकांचं मानसशास्त्र काही कळतच नाही ब्वा !

मी माझ्याच घरात-
खोकला, सर्दी, पडसे, थंडीताप,डोकेदुखी इत्यादी इत्यादीनी अगदी बेजार झालो आहे. .

अशावेळी  बायकोने...
जवळ येऊन ...
माझ्या डोक्याला बाम चोळावा ,
नाकाला विक्स फासावे ,
घशात क्रोसिन कोंबावी , 
हाताशी रुमाल धरून उभे रहावे --
 बस्स .. एवढ्याच तर आज माझ्या अपेक्षा !
- आणि माझ्या अशा परिस्थितीत, 
मला एकट्याला घरात सोडून, 
बायको गेली आहे माहेरी ...

कशाला म्हणून काय विचारताय !

ती गेलीय,
तिच्या बहिणीच्या दिराच्या मामाच्या पोरीच्या नणंदेला "सर्दी झाली आहे" असे "कळल्याने",
"चौकशी" करायला -- सकाळी सकाळी !

सकाळचा.. 
पहिल्या प्रेमाचा हक्काचा ताजा गरम गरम चहाही....
आता स्वहस्तेच की हो !

तोपर्यंत ...सर्वाना "सुप्रभात !"
.

तीन चारोळ्या -

'संधीसाधू-'

कुशल पटू राजकारणी 
कुणी रुष्ट तर कुणी संतुष्ट -
सत्तेसाठी हपापलेले 
गळ्यात गळा तर कधी वितुष्ट ..
.

जळो जिणे लाजिरवाणे-

कुठली माया कसली ममता
मांजर कुत्रे कुशीत घेती -
हिडीसफिडीस घरच्या वृद्धांना
वाट आश्रमाची दाखवती . .
.

जित्याची खोड -

कुणाला मदत करायची तर
हात पुढे होत नाहीत चटकन,
कुणाच्या नावाने मोडायला मात्र
बोट कडकड वाजतात पटकन ..
.

कान्हा कान्हा, अरे अरे कान्हा -

कान्हा कान्हा, अरे अरे कान्हा
किती पळवशी पुन्हा पुन्हा ..

गोपाळांना करशी तू गोळा 
लोण्याच्या गोळ्यावरती डोळा 
तुझ्याच मागे पळता पळता 
किती दमवशी पुन्हा पुन्हा ..

सापडला तर मान हलवतो 
"मी नाही लोणी खाल्ले" म्हणतो 
इतरांचा ठावठिकाणा घेता 
किती चोरशी पुन्हा पुन्हा ..

बांधुनी ठेवून तुला पाहिले 
बंधन लीलया तूच तोडले 
कान्हा, लीला तुझ्या पाहता 
किती रमवशी पुन्हा पुन्हा ..

.