अग फेस्बुक फेस्बुक

"अग,
त्या मेल्या फेस्बुकाच्या नादात-
सकाळी गहू दळून आणायचेच विसरले बघ मी !

थोडीशी कणिक हवी होती मला ..
आता फक्त पोळ्याच करायच्या राहिल्यात !"

"अग बाई..

बर झालं बाई ..!
गेले तीन तास ह्या फेस्बुकाच्या नादात,
मी आज स्वैपाकच करायचा विसरून गेले होते .....

तुझ्यामुळे आठवण तरी झाली ग मला !
त्या नेटकॅफेतून आता येतीलच,

 हे घाईघाईत ओरडत-
"लवकर वाढ ग जरा, 

पोटात हत्ती ओरडायला लागलेत" -
म्हणून !"
.

पाच चारोळ्या -

आठवणींचे पाखरू तुझ्या 
बसते खेळत मनात माझ्या -
गुंगत अवखळपणात तुझ्या 
छान गुदगुल्या मनात माझ्या..
.

आठवणींची जुनी गोधडी
किती वर्षानी उसवत आहे -
धागा एकेक निघतानाही
मनात आनंद वाढवत आहे ..
.

आठवणींच्या गराड्यात 
तू दत्त म्हणून उभी राहतेस -
सगळे जग विसरून 
तुझाच जप करायला लावतेस ..
.

आठवणींच्या सरीवर सरी 
आल्या मनात झरझरत -
रोमांच कसे ह्या तनूवरी 
उठले अलवार थरथरत !
.

आठवणी का धावत सुटल्या 
सैरावैरा अशा अचानक -
तू तिकडे अन मी इकडे रे 
उचक्यांचा पण मारा दाहक ..
.

कुटुंब रंगलंय गोळीत

उकाडा मी म्हणत होता !
पेपराने वारा घेत होतो
.
फ्यान जरा वाढवत होतो
.
तोंडावर येता जाता पाण्याचे हबके मारत होतो
.
तरीही आठवडाभर झोप अशी ती आली नाहीच
.
शेवटी डॉक्टरला शरण जाऊन
,
एकदाची झोपेची गोळी आणून ठेवली !


पण-
बहुतेक उकाडा आणि झोप दोन्हीही घाबरले
.....
आणि
-
रात्री गोळी घेण्याआधीच
,
परवा पावसाचे हलकेसे शिडकावे पडून गेल्याने

इतकी मस्त झोप लागली होती की बस्स !


पण....... हाय रे कर्मा !
आमचं हे "कर्तव्यदक्ष, काळजीवाहू आणि कर्तव्यतत्पर" कुटुंब !


काय सांगू हो तुम्हाला ..

अगदी भर मध्यरात्री-
मी गाढ झोपेत असतानाच
,
मला गदागदागदा हलवून
,
झोपेतून जागे करून
-
बायको झोपेची गोळी माझ्यापुढे धरत म्हणाली -


"हं , ही घ्या मिष्टर,
मला 'विसराळू' म्हणता आणि
,
तुम्हीच विसरलात ना आज रात्री
..
झोपण्याआधी 'झोपेची गोळी' घ्यायला
? "
.

पती पत्नी और वो


होती घरात पत्नी एकटी 
पतीराजा बाहेरुन आला ..

पत्नीचा आवाज ऐकता 
थबकुन दारात तो थांबला ..

- " जर का इथे पुन्हा तू दिसला 
बडविन ह्या झाडूने तुजला "..

- पतिराजाने वाक्य ऐकले  
 घाबरून तो पुरता गेला ..

धाडस करुनी घरात शिरला 
उंदिर तो "मेलेला" दिसला ..

दृष्य बघोनी  हळूच हसला 
"हुश्श" म्हणोनी निवांत बसला ..

......परि पत्नीला नाही कळले 
पतिराजा का घाबरलेला .. !
.

श्यामची आई आणि श्यामची मम्मी



पूर्वीची श्यामची आई ..

शिक्षण, संस्कारासाठी,
श्यामला कवटाळणारी,
आदर्श-

श्यामची आई होती !


आजची श्यामची मम्मी ..

फेसबुक, टीव्हीमालिकेसाठी ,
श्यामला टाळणारी,
अदृष्य- 

श्यामची आई आहे ! 
.

तीन चारोळ्या

खोटारडी -
तू मला विसरून गेलीस 
तुझे बोलणे खरे वाटते - 
उचकी साधी लागत नाही 
शिक्कामोर्तब त्यावर असते ..
.

असुरी आनंद -
मिरवत आहे मी दु:खांची 
जोडुन ठिगळे आयुष्याला -
हसुनी नाती बघती सगळी 
पारावार न आनंदाला ..
.

शहाणपण -
का आभासी दुनियेमध्ये 
वाटे आपुलकीचे नाते -
अनुभव येता धक्के खाता 
परके अपुले उमजत जाते ..
.

शरणागत मी तुला समर्था ..


पाठीशी तू असताना मी भिऊ कशाला स्वामी समर्था 
दु:खांनाही सहज पेलतो आठवत तुजला नित्य समर्था ..

नामस्मरणी गुंगत असता कष्टांचे ना भय वाटे ते 
मूर्ती नयनासमोर नाचे मीहि मनातुन तुझ्या समर्था ..

जप करता मी इकडे तिकडे अवती भवती असशी तू 
घडली काही चूक तरीही तारुन नेशी मला समर्था ..

इतरांच्या संकटी धावतो मदतीसाठी मीच जरी    
मनात असते खात्री माझ्या पाठीशीही तूच समर्था ..

"श्री स्वामी समर्थ" एकच मंत्र पुरेसा बळ मिळण्या 
आयुष्याचे सार्थक होण्या शरणागत मी तुला समर्था ..
.

नशा फेसबुकाची

फेसबुकाच्या भिंतीवर 
"पोस्ट" अपडेट होते .

काही क्षण जातात - 
आणि ----
सुरुवात होते ----

लाईक मिळायला. 
कॉमेंट यायला ..
शेअर व्हायला ... 
कॉपी-पेस्ट बनायला .....

मस्त मजा यायला लागते !

गुदगुल्या, स्तुति, कोपरखळ्या, चिमटे, मत्सर, द्वेष, निंदा--- 
उस्फूर्तपणे एकत्र नांदताना पहायला धमाल येते ...

मित्र- शत्रू- सोबती- सवंगडी- आणि ... एकेक साथी ....
आपापली शब्दांची शस्त्रे /शास्त्रे /आयुधे परजत येतात ,

आपणही शब्दांची ढाल पुढे करत स्क्रोलिंग करत सरकत असतो -

मस्त मोसम असतो ना ,
मित्र मैत्रिणीनो ?

मी मनातून जोरजोरात गुणगुणत असतो ,
माझ्याबरोबर गात असतात ...

ते दोघे ...
चितळकरांचा रामचंद्र 
आणि मंगेशकरांची लता ......

गाणे असते .......

" कितना हंसी है मोसम , कितना हंसी सफर है 
साथी है खूबसूरत , ये मोसमको भी खबर है ....! " 
.

या कंगव्यावर.. या टकलावर...

मी आरशासमोर उभा !

हळूच इकडे पाहिले -
 तिकडे पाहिले..

कुण्णी कुण्णी नव्हते आता मला बघायला.

आरशासमोरचा कंगवा मी पट्कन उचलला.

डोळे मिटले....

आणि -

हळुवारपणे तो कंगवा 
अगदी अलगदसा , 

माझ्या "टकला"वरून फिरवला !

कित्ती छान वाटले म्हणून सांगू !

एकेकाळच्या घनदाट जंगलातल्या  
"बालोद्याना"तल्या......

त्या अविस्मरणीयशा 
 "बाल"स्मृती जाग्या व्हायला-
असा कितीसा उशीर हो !
.

आर्शिवाद

.
परवा बिहारच्या सफरीवर असतांना 


निरनिराळ्या ठिकाणी पाटीवर ,



"आर्शिवाद"


"संर्पक"


"अर्थव"


...... असे शब्द वाचायला मिळाले...



- आणि मनात विचार येऊन गेला,



अगदी "विद्येचे माहेरघर" असलेल्या 



आमच्या "पुण्यासारखे शुद्धलेखन"



इथेही जपले जाते तर !


.

चारोळी चौकट

१.
'शब्दा तुझा मी सोनार -'



मोहित करती मुळी न मजला 
हिरे माणके आणिक सोने - 
शब्दांना कवितेत गुंफुनी
मीच घडवतो खरे दागिने .. 
.



२.
'वेड्या जिवाची वेडी ही माया -'



दुरावलेल्या वासरासाठी 
गोठयात हंबरणारी गाय असते -
वाट चुकलेल्या लेकरासाठी 
घरात क्षमा करणारी माय असते ..
.



३.
'अनपेक्षित -'



वाट तुझ्या पत्राची पाहत असतांना 
एसेमेस कधी आला, तेही नाही कळले -
विचार तुला भेटण्याचा मनात यावा, 
त्याआधीच तू भेटावीस, असे जणू घडले ..
.



४.
'ज्याची त्याची चौकट -'



श्रीमंताने बसवले सोन्याच्या चौकटीत 
गुदमरणाऱ्या श्रीमंत साईला -
गरिबाने बसवले हृदयाच्या चौकटीत 
साध्यासुध्या फकीर साईला ..
.

आये आणि मम्मी

तर मी काय सांगत होतो बर .....?
हां , मातेच्या ममतेची महती !

जिच्या घरी लेकराचा पाळणा हलायला उशीर झालेला असतो-
ती माता,
आपल्या घरात दुडूदुडू धावत आलेल्या शेजारणीच्या लेकराला,
चटदिशी आपल्या कडेवर घेते.

त्याचे नाक भरून वाहत असले तरी,
आपल्या साडीच्या पदराच्या टोकाने-
ते नाक स्वच्छ पुसून,
त्याचे मटामटा मुके घेत सुटते !

पण......

 जिच्या घरी गोंडस बाळ जन्माला आलेले आहे-
तिच्याकडे-
बाहेरून घरात तुरुतुरु पळत येणारे बाळ तिला दिसले की,
ती प्रथम खेकसते -

"अरे हळू हळू ! "

त्या बाळाच्या भरलेल्या नाकापेक्षा-
तिला आक्वरड वाटते ते बाळाचे लाळेर !

"शी शी-" म्हणत -
ती लेकराला क्षणभर का होईना. . दूर सारून
आपला महागामोलाचा ड्रेस आधी सांभाळायला बघते ....

तीही माता ..हीही माताच !

एकाच भुईवर जन्मलेल्या !

का बरे फरक असावा असा -

लेकरू असण्याचा, अथवा नसण्याचा -

शिक्षणाचा/ संस्काराचा/ अनुभवाचा ....

का "आये" आणि "मम्मी" संस्कृतीचा !
.
.

गुड नाईट

बायको म्हणाली - गुड नाईट ?

मी उत्तरलो - गुड नाईट !

बायको ओरडली - गुड नाईट ?? 

मीही डाफरलो - गुड नाईट........!!

..........थोड्या वेळाने तणतणत -

बायको हातात 
"गुडनाईटची मॅट" 
घेऊन आली..

- आणि चिडूनच म्हणाली-

"हं .. लावा ही मॅट आधी पट्कन .. 
किती डास गुणगुण करायला लागलेत मेले हे !"
.

तीन चारोळ्या -

बट मोहकशी एका गाली 
खळी छानशी दुसऱ्या गाली-
जखमा करशी हृदयावरती 
जीव किती होई वरखाली ..
.

'बघ, ही माझी चमचमणारी चांदणी' 
परवा रात्री, चंद्र म्हणाला मला -
काल, मी सखीचा मुखडा दाखवला 
पण रात्रभर, चंद्र का नाही फिरकला ..
.


भेट आपली किती दिसांनी 
सांग विरह तू कसा साहिला -
गुलाब माझ्या हाती राहिला 
गाली फुलता तुझ्या पाहिला ..

.

अनागोंदी

वाराणशी ते पुणे (मार्गे) ठाणे :

नेपाळचा प्रवास संपला.
कशीविश्वेश्वराचे दर्शन झाले. 
स्वगृही परतण्यास निघालो. 
निरनिराळ्या देव-देवतांना नवस बोलत, साकडे घालत, गाऱ्हाणे मांडत ...
आमची निमआराम यष्टी ठाण्याहून निघाली सव्वा दोनला बरोब्बर .

लोणावळ्याच्या अलीकडे गचके खायला सुरुवात केली.
चालकाने तत्परतेने थांबवली. 
काही कुरकुरणाऱ्या प्रवाशांना त्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या यष्टीत बसवले.

त्याच्याकडूनच चौकशीअंती समजले, 
" ह्या यष्टीच इंजिन गरम झाले आणि 
रोजच साधारण एकदोन यष्ट्या अशाच कारणाने मधेमधे बंद पडतात ! 
आम्ही चालक तक्रार करतो, पण कुणी त्याची दखल घेत नाही. 
तर तुम्ही प्रवाशांनीच तक्रारी कराव्यात ! "

काही वेळाने तावातावात झालेल्या चर्चात्मक वादात,
एकदोन सहप्रवासी आणि तो चालक यांच्यात एकमत झाले की,
"सबंध देशात अशा अनागोंदी आणि नियमबाह्य
कारभाराने सुधारणा होणारच नाही !"

थोड्या वेळाने चालक, आम्ही प्रवासी आणि यष्टी -
सगळे मिळूनच गार झाल्यावर गाडी पुढे मार्गस्थ झाली.

लोणावळ्याला महामंडळाच्या कृपेने,
"स्वस्त जिन्नस महाग विकणाऱ्या" "अधिकृत"
हॉटेलसमोर आमची गाडी पाणी पिण्यासाठी थांबली. 
बिच्चारे पैसेवाले प्रवासी आणि फुकटे चालकवाहक... !
सगळीकडे ही बोंब माहित असूनही, 
सोयीस्कर दुर्लक्ष करूनच आपले महामंडळ झोपा काढत आहे. 

आमच्यासारख्या काही "गरजू अक्कलशून्य" प्रवाशांनी,
तिथे 'फ्रुटी'सारख्या पेयासाठी-
प्याकवर १४ रुपये एमआरपी लिहिलेले असूनही,
झकत २० रुपये खर्चले .

उशीरा का होईना ..
तहानभूक भागल्यावर, मी सुटकेचा निश्वास टाकला !
तीन चार ब्यागा आणि बायको..
एकाचवेळी सांभाळणे, म्हणजे काय चेष्टा आहे का राव ?
अक्षरश: तारेवरची कसरत !

एक प्रवासी केबिनमधे बसला
आणि (नियमानुसार ?) - पुन्हा चालकाशी 
चालत्या गाडीत सरकारी अमानुष धोरणाबाबत चर्चा करू लागला !
तो चालकही इकडे तिकडे समोर बघून यष्टी चालवत, 
त्या प्रवाशाशी (नियमानुसारच का ?) बोलत,
आपल्याही अडचणी सांगत होता. 
.

तोच कर्ता आणि करविता

मुक्काम पोस्ट वाराणशी :

काशी विश्वेश्वराचे दर्शन
 आणि गंगा नदीच्या काठावरचा सायंकाळी सातचा गंगारतीचा नयनरम्य सोहळा पहायला, 
आम्ही दूरच्या लॉजमधून रिक्षातून अंमळ लवकरच निघालो.

त्यावेळी आम्ही रिक्षातून जाताना,
परमेश्वर जगातली सगळी सूत्रे वरूनच हलवत असावा,
 याची प्रचीति आली !

गल्लीबोळातून, गर्दीतून इकडे तिकडे, 
अक्षरशः आपल्या आणि इतरांच्या जिवाची पर्वा न करता 
असंख्य सायकली, सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, बॅटरीरिक्षा, 
अगणित मोटारी, मोटरसायकली आठही दिशांनी बेफाम वेगाने, 
विना अपघात, एकमेकांना पुसटसा निसटता किँचितही धक्का न लागता धावताना... 
जेव्हा आम्ही स्वत:च्या डोळ्यांनी कौतुकाने पाहिल्या !

काशीविश्वेश्वरा,
साष्टांग दंडवत रे तुला !
.

मनी वसे ते पुढ्यात दिसे

मुक्काम पोस्ट राजगिर(बिहार) :

दुपारी तीन वाजता गौतम बुद्धांच्या "विश्वशांती स्तूप" म्हणून,
 सुप्रसिद्ध असलेल्या विविध मुद्रा असलेल्या सुंदर मूर्ती पहायला,
राजगिर येथील 'एरियल रोप वे' ऊर्फ 
"आकाशीय रज्जू मार्ग"ने उंचस्थानी गेलो.

चार किंवा सहा बैठकांची सोय असलेल्या रोप वेने,
 इतर ठिकाणी आजवर गेलो होतो,
पण रोप वेत एकजणच बसण्याची सोय,
 आज प्रथमच अनुभवली.

गौतम बुद्धाच्या प्रसन्न मूर्तींचे दर्शन घेऊन,
रोप वे खालच्या दिशेने येत असतांना मनात विचार येऊन गेला... 
मधेच हा रोप वे बंद पडला तर... !

मनी वसे ते पुढ्यात दिसे,
- असेच दोन मिनिटांनीच घडले की हो !

अचानक रोप वे चक्क बंद झाला. 
इतक्या उंचीवर आपण आता कायम अडकून पडणार, 
मनात आलेल्या ह्या कुविचाराने,
काळजात धस्स का काय म्हणतात, तसेच झाले की अगदी !!! 

. . . पण . . . 
अर्ध्या मिनिटातच,
रोप वे खालच्या दिशेने सरकू लागला...

आणि माझा इवलासा लाख मोलाचा जीव आनंदी झाला !

मनात अनन्य भावाने उदगारलो,
"बुद्धं शरणं गच्छामि..."
.

असाही एक धक्का

मुक्काम पोस्ट सौराह चितवन(नेपाळ) :

एरव्ही फक्त सर्कशीत पहायला मिळणारे 
भरपूर मोकळे हत्ती पाहण्याचा योग इथे आला. 
पण ते साखळदंडानी वेगवेगळ्या ठिकाणी बांधले होते. 
आजूबाजूला सभोवती तारांचे कुंपण !

बरोबरचा गाईड मख्खपणे आमच्याबरोबर आपल्या खांद्यावर दुर्बिण अडकवून हिँडत होता.

नेहमीच्या उत्साहात मी माझा मोबाईल कुशलतेने हाताळत,
 हत्तीँचे मूड बघत, फोटो काढत होतो.

एका ठिकाणी मी फोटो काढताना, 
एका तारेला वरखाली व्यवस्थित करण्यासाठी,
क्षणभरच हाताने धरले खरे...

... पण 'बाप रे' म्हणत, 
झटक्यात मी माझा हात त्या तारेपासून दूर नेला...

"कंपाऊंडच्या सगळ्या तारांतून...
 हत्ती पळून जाऊ नयेत, म्हणून सौम्यसा वीजप्रवाह खेळवला आहे .."
 - हा महत्वाचा मुद्दा सांगण्याचे कष्ट
आमच्या गाईडने घेतले नव्हते !
.

जन्मभूमी स्मशानभूमीश्च स्वर्गादपि ...

मुक्काम पोस्ट जनकपूर (नेपाळ) :

ग्रहणानिमित्त,
 'आज सायंकाळी बहुतेक मंदिरे बंद' - अशी माहिती लॉजवर मिळाली. 

तरीपण, "बाबा भूतनाथ महादेव मंदिर तरी बघून या " 
- अशी सूचना कुण्या एकाने केल्याने, आम्ही पायीपायी दौरा करत
 धनुषसागर, गायत्री मंदिर, गंगासागर इ. बघत -
बाबा भूतनाथ मंदिरात पोचलो .

 "स्वर्गद्वारा"त मस्तपैकी फोटो काढून झाले. 

एका गृहस्थाने "कुठून आलात" अशी आमची चौकशी केली. 
आम्ही सहाजण तत्परतेने 'पुणे महाराष्ट्र' उत्तरलो !

त्याने माहिती पुरवली.....
'हे इतके स्वच्छ मंदिर, हा सुंदर बागबगिचा, 
या सुरेख मूर्ती स्थापना... 
त्या समोर खुर्चीवर बसलेल्या महान व्यक्तीने,
 गेली 14 वर्षे अविरत धडपड करत नावारूपाला आणल्या आहेत.
 आणि हे मंदिरस्थान म्हणजे दुसरेतिसरे काही नसून-
 एके काळची "स्मशानभूमी" आहे ... ,
त्या पलीकडच्या शेडखाली प्रेत जाळली जातात !'

 पुढे काही न पाहता ऐकता, मुकाट्याने आम्ही तेथून परत फिरलो.

ग्रहणकाल संपत आल्याने,
गंगासागरतीरी गंगारतीसाठी उपस्थित राहिलो !
.

मी एक अस्तिक

मुक्काम पोस्ट पोखरा (नेपाळ): 

या शहरातील हॉटेलपासून थोड्या अंतरावर फेवा नावाचे एक तळे ऊर्फ जलाशय ऊर्फ सरोवर.
आम्ही सहाजण एक तासाची सहल करण्यासाठी एका नावेत बसून निघालो. 

एका किना-याला एक छोटेसे मंदिर असल्याने,
 देवदर्शनासाठी नावाड्याने तिथे दहा मिनिटे नाव टेकवली.

ह्याला विचारले -
"कोणता देव ?"
उत्तर आले नाही. 

 त्याला विचारले -
"कोणता देव ?"
उत्तर आलेच नाही !

कुणालाच देवाचे/देवीचे नाव माहित नाही !

त्या देवाच्या 
हा पाया पडला, 
तोही पाया पडला... 
म्हणून नाईलाजानेच मग मीही, 
काही दान तिथे न ठेवताच, त्या अनामिक देवाच्या पाया पडलो !

पण त्याच्या बाजूला,
आमचा नेहमीचा सगळीकडे असणारा "गणपतीबाप्पा" होताच. 
त्याचे मात्र मी दर्शन मनोभावे घेतले .

मंदिराबाहेर, प्रथा रीतीरिवाजानुसार ,
एकमेकांचे फोटो काढण्याचे कार्यक्रम न विसरता मनापासून पार पाडले 
आणि दहा मिनिटांनी घाईघाईत नावेत बसून परत निघालो.

चारपाच मिनिटांनी लक्षात आले की, 
मी एकटाच मंदिराबाहेर चपला विसरून आलो आहे !

इतर पाचजणापैकी मंदिराबाहेर एकाने/एकीनेही
 माझ्या चपला विसरल्याचे निदर्शनास आणले नाही.
 (दुष्ट, स्वार्थी, आपमतलबी कुठले !)

त्या भ्रमणावस्थेत,
आमच्या नावाड्याने मंदिराकडे जाणाऱ्या  दुसऱ्या एका नावाड्याला,
आपल्या भ्रमणध्वनीद्वारे माझ्या 'त्या' प्रसिद्ध पादुकांविषयी माहिती पुरवली.
अर्ध्या तासाने माझी पादत्राणे माझ्या पदकमलस्थानी विराजमान झाली !

एका देवाने तसे मारले,
तर दुसऱ्या देवाने असे तारले !

(नंतर सखोल चौकशीअंती समजले की,
ते वराही देवतेचे मंदिर आहे, जी यमदेवाची बहीण म्हणून पूजली जाते .)
.

दुधात साखर

पुणे ते नेपाळ-
व्हाया गोरखपूरः

पुणे ते गोरखपूर हा तब्बल 34 तासांचा झुकझुकगाडीतला एसीतून प्रवास -

गाडी दीड तास लेट. . .

तरी पण

सोबत. . . .

मोबाईल 
आणि
त्यात फेसबुकाची सोय-

म्हणजे,,,

दुधात साखरच साखर की हो !
.