घरात बसुनी खुशाल -- [गझल]

घरात बसुनी खुशाल नेता घोरत आहे 
अनुयायी का घरदाराला सोडत आहे .. 

करतो सभेत बडबड बाष्कळ कृतीविनाही 
उपदेशाचा डोस न चुकता पाजत आहे.. 

चुका दाखवी बोटाने जो तो दुसऱ्यांच्या 
उरली बोटे स्वत:कडे का विसरत आहे .. 

जगात एकी करण्यासाठी करी गर्जना 
भांडणतंटा भावकीत ना संपत आहे .. 

शंख ठोकतो जाळ पाहुनी "अरे बापरे" 
कुणी न बघतो बुडाखालचा पसरत आहे .. 
.

चार चारोळ्या

१.

स्तुतीसुमनांचा वर्षाव ऐकत 
मृतात्मा विस्मित जाहला होता -
एक शब्दही कुणी चांगला 
जिवंतपणी न बोलला होता..
.

२.

किलबिल करती अक्षरपक्षी 
खिडकीत मनाच्या बसून-
हायकू दोनोळ्या चारोळ्या 
भुर्रकन जाती उडून ..
.

३.

आठवणीचा मोर नाचतो 
थुई थुई ग मनात -
जंगलात जणु मोर नाहतो 
चिंब चिंब पावसात..
.

४.

प्रत्यक्ष न भेटलीस तरी 
रहात नाही काही अडून - 
तुझीच येते समोर प्रतिमा 
घेता डोळे बंद मी करून..
.

कविता.. माझी सखी

या कुशीवरून त्या कुशीवर 
लोळत पडतो मी रात्रभर ..

निद्रादेवी प्रसन्न होत नाही 
झोप काही लवकर येत नाही ..

काय करावे समजत नाही 
सखीशिवाय करमत नाही ..

आठवण सखीची येत असते 
उचक्यांनी बेजार करत राहते ..

दिवसभर का सखी भेटत नसते 
रात्री का अशी छळत ती असते ..

अखेर झोप होते अनावर 
सखीही येते बसून स्वप्नावर ..

सुखसंवाद सखीशी घडतो 
काहीबाही मीही बडबडतो ..

घडत राहते काही अघटित 
सखी अन मी असतो मिठीत ..

मस्त मजेत असा मी असतो 
बहुधा बायकोला न बघवतो ..

गदागदा ती मला हलवते 
सखी मिठीतून अलगद पळते ..

एक धागा सुखाचा क्षणात तुटतो 
दिवसभर शंभर दु:खांत अडकतो .. !
.

कुण्या एकाची जीवनगाथा

कुणी पसरली होती माझे स्वागत करण्या फुले 
त्यातही एखादा कोणी काटे पसरत मनी डुले -

अवघड होता रस्ता चालायाचा मजला पुढे 
निंदा मत्सर कौतुकसुमने स्तुतीत बोल खडे -

हिम्मत नव्हती हारायाची धाडस होते अंगी 
जगण्याचा हव्यास होता रंगुनी विविध रंगी -

ऊन कधी खडतर तर शीतल कधी लहर तनावर 
ओरखडा उमटू नव्हता द्यायचा टणक मनावर -

हसता हसता रडायचे अन हसायचे रडताना मजला 
अभिनय वेळप्रसंग पाहुनी करायचा होता मजला -

भीती होती आपल्यांची पण पाठी थाप परक्यांची 
मलाच पुढती सरकत जाऊन संधी गाठायाची -

सरशी कधी तर पराजयातुन असायचे आनंदी 
खडतर जीवन होते तरीही बनायचे स्वच्छंदी -

डावपेच अन गनिमी कावे आत्मसात मी केले  
आडवे आले जरी कुणी ते स्वत: नेस्तनाबुत झाले -

ललाटरेषा आखली होती आधीच त्या विधात्याने
पुसून नवीन आखणे होते मलाच स्वकर्तृत्वाने -

प्रयत्नांती परमेश्वर असतोच म्हणे तो पाठीशी 
मिळवत गेलो यश मी प्रयत्ने पूर्वपुण्य गाठीशी ..
.

संशयाचे भूत

ऑफिस सुटले बरेच लवकर 
नवरा पोचला दारी भरभर 

हसत होता स्वत:शी जरा 
धरला होता हातात गजरा 

दारापुढती उभा राहिला 
कानोसा तो घेऊ लागला 

पायांचा आवाज ऐकला धपधप 
दुसरा कसला ना कळला झपझप 

आत पावले होती वाजत     
बायको जोरात होती गर्जत 

"दिसलास जर का इथे पुन्हा तू 
असेच बडविन मरेपर्यंत तू .."

- बायकोचा आवाज ऐकताक्षणी 
घाबरला की नवरा मनी 

काय करावे त्यास कळेना 
दार बडवणे त्यास सुचेना 

बिचारा नवरा मागे सरकला 
बायकोचा आवाज कानी पडला 

" मर, मर.... मेल्या, असाच तडफडत 
येशिल का तू परत धडपडत ?"

- अखेर नवऱ्याने धाडस केले 
हाका मारत दार बडवले 

बायकोने हसतच दार उघडले
दिसले नवरोजी गोंधळलेले  

नवऱ्याने पाहिले इकडेतिकडे 
बायको हसली बघून त्याकडे 

ध्यानी आले काय घडले 
संशयाचे भूत पळून गेले  

हुश्श म्हणत नवरोजी हसले  
बायकोला 'शाब्बास' म्हटले 

-- बायकोने हातात झाडू धरलेला 
समोर तिच्या उंदीर मेलेला  !
.

छोटी छोटी माझी बाहुली

छोटी छोटी माझी बाहुली 
ऐटीत कशी उभी राहिली ..

फ्रॉक दिसतो छान छान 

डौलात डुलती दोन्ही कान ..

डोळे तिचे फिरती गोलगोल 

सांभाळताना आपला तोल ..

झोकात कशी हलवते मान 

विसरायला ती लावते भान ..

किती चकाचक बूट पहा 

सुंदर लेस बांधली अहा ..

तुरा केसांचा ऐटीत दिसे 

त्यावर सुंदरशी मोरपिसे ..

ती कमरेवर ठेवून हात 

गिरकी घेते बघा तोऱ्यात ..

छोट्या छोट्या बाहुलीला 

या या लवकर बघायला ..
.

स्वप्न मला का असेच पडते

स्वप्न मला का असेच पडते 
अवतीभवती ती घुटमळते ..

स्वप्नी म्हणते नक्की भेटू 
जागे होता का मग पळते ..

स्वप्नामधली रात्र सुखाची 
दिवसाची मग वाट लागते ..

समोर ना ती कधीच येते 

सखी वेड का मना लावते .. 

सहन न होते कुणास सांगू 
दु:ख मनीचे मनास छळते ..

पोरगी ती दूरदेशी शिकत आहे.. [गझल]

वृत्त- मंजुघोषा 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा 
मात्रा- २१
---------------------------------------------
पोरगी ती दूरदेशी शिकत आहे 
घास ओठी का हिच्या पण अडत आहे..

पीक नाही थंड आहे चूल जरि ती  
आत्महत्येचा विचारच शिजत आहे.. 

जीवनाला अर्थ ना पैशाविना या   
औषधावाचून तेही रडत आहे..

शब्दही आधार ठरतो निर्धनाला  
शब्द विकुनी पोट त्याचे भरत आहे..

खायला विष आज कोठे फुकट मिळते 
कोरडी भू आसवांनी भिजत आहे.. 

तीनदा हुलकावण्या देऊन झाल्या 
न्यायला आता किती यम दमत आहे..

खरा आनंद

त्याची नवीन नोकरी 
नवीन वर्षाची सुरुवात 
आणि पगाराचा दिवस !

हातातले खोके बायकोपुढे धरीत तो म्हणाला, 
"प्रिये,
हा बघ, 
तुझे कान, नाक, गळा चमचमवणारा - 
बेन्टेक्सचा दागिन्यांचा 
किती मस्त सेट आणलाय खास तुझ्यासाठी ! "

त्यावर कौतुकाने झडप घालत, 
जराशी हिरमुसलेली बायको विचारती झाली-
"पण, दुचाकी आणणार होता ना तुम्ही आपल्याला ? "

बायकोपेक्षा जमेल तेवढा जास्त 
केविलवाणा चेहरा करत तो उत्तरला, 
" हो ना! काय करणार?
सगळी बाजारपेठ पालथी घातली, 
पण, बेन्टेक्सची दुचाकी कुठेच दिसली नाही ग, 
म्हणून तर राणीसरकारांसाठी हा खास सेट- 
भेट ...! "

प्रसन्न मुद्रेने 
बायको आरशासमोर गेली !

पतीराजाचे मन जाणून- 
फूल नाही फुलाच्या पाकळीतही आनंद मानणाऱ्या,
अशा बायकोच्या सहवासात 
काही वेगळाच आनंद असतो, 
नाही का ?
.

चिमण्यांची शाळा - [बालकविता]

ऐकू आली ठण ठण घंटा 
भरली चिमण्यांची शाळा ..

भुर्रकन चिमण्या चिवचिवल्या 
वर्गात शिरल्या पंधरा सोळा ..

मास्तर नव्हते आले अजुनी 
चिमण्यांचा गोंधळ होऊन गोळा ..

काव काव आवाज बाहेर आला 
वळला तिकडे चिमण्यांचा डोळा ..

कावळे मास्तर वर्गात फिरले 
चिडीचूप झाला वर्ग सगळा ..

पाढे म्हणती कावळे मास्तर 
बे त्रिक सात चार नव्वे सोळा ..

चिमण्या होत्या गोंधळलेल्या 
पाढा म्हणताना दुखला गळा ..

कावळे मास्तर आपल्या नादात 
पुसता पुसता फळा काळा ..

डस्टर धपकन डोळ्यावर पडले 
सुजला मास्तरांचा एक डोळा ..

वाचता येईना लिहिता येईना 
चिमण्या म्हणती डोळा चोळा ..

चिडले ओरडले जोरात मास्तर 
सुटली शाळा जा पळा पळा ..

चिमण्या सगळ्या हसत उडाल्या 
लवकर सुटली त्यांची शाळा ! 
.