उंट जिराफ जिगरी दोस्त



उंट जिराफ जिगरी दोस्त
फोटो काढू म्हणाले मस्त -
फोटो काढला हसरा छान 
अडकून बसली मानेत मान !

           कांगारू म्हणाले पिल्लाला
           चल रे जाऊ फिरायला -
           पिल्लू बसले ऐटीत
           आईच्या पोटाच्या पिशवीत !

मोकळी हवा घेण्यासाठी
मासा पाण्याबाहेर आला -
बगळा स्वागत करण्यासाठी   
एका पायावर तयार झाला !

          ससोबा रॉकेटमध्ये बसून
          पृथ्वीभवती गरगर फिरले -
          ढगांचा गडगडाट ऐकून
          चांदोबाच्या कुशीत शिरले !

आरडा ओरडा करता करता 
मुंगीचा बसला हो घसा - 
आवाज तिचा आपल्याला
आता ऐकू येईल कसा ?



दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !


( चाल :  शूर आम्ही सरदार आम्हाला )

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ|

                मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत
                दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत
                लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१|

धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं 
सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं 
आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२|

( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )

लिहिण्यास कारण की -


तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत  दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे? जेवणाचे ताट पुढयात घेऊन, हातातला घास गालात-नाकात-तोंडात व्यवस्थित जातोय का ?- याची फिकीर न करता ' कसलाही ' कार्यक्रम हस्त-यंत्राद्वारे  चाचपणी करत, बदलत पहाणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! निदान येता जाता तरी 'दूरदर्शन संचावरील एकही कार्यक्रम " आज नजर टाकूनही पाहिला नाही, याची मनाला सतत टोचणी लागून राहिलेले 'आता ऑफिसात तोंड कसे दाखवावे ? ' या चिंतेने काळजीग्रस्त झालेले दिसतात !
      ज्यांना बातम्या ऐकायच्या नाहीत , ज्यांना मालिका पहायच्या नाहीत, ज्यांना दूरदर्शन वरील स्पर्धा पहायच्या नाहीत आणि  ज्यांना दूरदर्शनमधे काडीमात्रहि  स्वारस्य नाही - अशी माणसे ' सुखी 'असणार यात शंकाच नाही ! सुखी माणसांना मन गुंतवायला इतर असंख्य उद्योग आहेत. बातम्या नाही ऐकल्या/पाहिल्या तर आकाश कोसळणार नाही ! मालिकांच्या पात्रांत गुंतून पडलो तर त्यांच्या बापजाद्यांची इस्टेट आपली थोडीच होणार आहे ? नाही गुंतलो तरी आपण नरकात थोडेच जाणार आहोत ! ' एस एम एस ' वरच १०१ टक्के अवलंबून असणाऱ्या स्पर्धात भाग नाही घेतला , मरणोत्तर तर आपल्या पिंडाला कावळा शिवायचा थोडाच राहणार आहे - अशा निर्गुण ,निराकार, स्वस्थ , स्थितप्रज्ञ ,उदास ,भकास वृत्तीने जगणारी माणसे खरीच सुखी नाहीत काय ? दूरदर्शनवर दिसणारे जगातील  असंख्य घोटाळे , अगणित भानगडी-लफडी , अतुलनीय भ्रष्टाचार , अवर्णनीय "आदर्श ", अनंत लाचखोर -असल्या फालतू  गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपण बरे नि आपले काम (- न केलेले ) बरे !

 लिहिण्यास कारण की -

मी चुकून 'जाला'समोर न बसता , दूरदर्शन संचासमोर समोर बसलो (-आणि तिथेच फसलो !). कुठली तरी टुकार ( - पण घरातल्या तमाम महिला वर्गमतानुसार निदान  १०००० तरी भाग पूर्ण करणारी ?)मालिका चालू -- एका पात्राने  एक शब्द उच्चारण्याचा अवकाश की, पार्श्वसंगीत म्हणून ताट-वाट्या -पातेली -चमचे -डाव वगैरे एकसमयावच्छेदेकरून दणादण कानावर आदळल्याचा आवाज येई ! संगीतकार जाउ द्या (-त्याला काही कळत नसेल !) ; पण मालिकेतील पात्रे, दिग्दर्शक ,इतर सहकारी (-निदान स्पॉट बॉईज  तरी ?) यांच्या क्डून तरी पार्श्वसंगीत कानाला सुसह्य वाटते /जाणवते का  नाही, हे जाणून घेण्याची तसदीही कुणी घेतली नाही , याचे 'प्रचंड' आश्चर्य वाटते! हा एक भाग झाला ; तदनंतरचे 'महा'आश्चर्य म्हणजे एका पात्राने दुसऱ्या पात्राकडे नजर टाकली की , राहिलेल्या ८/९ पैकी  'प्रत्येक ' पात्राची प्रतिक्रिया /प्रतिसाद जाणून घेण्यासाठी - त्याच्या चेहऱ्यावर काहीकाळ क्यामेरा स्थिर !! मला सांगा , अशा रीतीने कासावापेक्षाही संथ गतीने मालिका चालू राहिली तर १०००० नव्हे तर १०००००० भाग नाही झाले तरच .... ?
धन्य धन्य हो - मालिका निर्मात्याची , दिग्दर्शकाची , संगीतकाराची , (आवडत नसली तरी, पोटासाठी -) काम करणारे कलाकार आणि त्या " मूर्ख-खोक्या " पुढे ठिय्या मांडणा-या सर्वांची !

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती


( चाल :  इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी  )

नव्या साडीसाठी  - दोघांची भ्रमंती
चालली  खरेदी.. थांबेना ती  |धृ |

सवलतींचा ताजा - लागतो ढीग
नाचती विक्रेते.. मागे पुढे  |१|   नव्या साडीसाठी -

माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब
भांडणात वाढ.. पत्नीसंगे  |२|  नव्या साडीसाठी -

मागची उधारी - राहिली अजून
जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही  |३|  नव्या साडीसाठी -

आला पहा कवी तो -

आला पहा कवी तो - दिसला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो ! जखमी कधी कुणाला ना वार करि कुणावर अध्यात ना कुणाच्या मध्यात तोच नसतो ! आली जरी त्सुनामी ; लाटांवरी तियेच्या हळुवार तो मनाने कविता करीत असतो ! ती एक ठेच साधी जखमी तुम्हांस करते डोळ्यात अश्रु कविच्या - कवितेतुनी टपकतो !! . [अर्थ - मराठी ई दिवाळी अंक २०१७]

चष्मा असुनी दिसले नाही -


(चाल :  शब्दावाचून कळले सारे  शब्दांच्या पलीकडले - )


चष्मा असुनी दिसले नाही -
 रस्त्याच्या पलीकडले ,
 प्रथम तुला पाहियले ; पाउल
खड्ड्यात कसे पडले ?

 शर्ट नवा मी खास घातला -
 पँट नवी अन् चष्माहि  नवा !
 त्या दिवशी का ; प्रथमच माझे
 बूट सांग अडखळले ?

आवडते कपडे त्या रात्री ;
 खड्ड्यातच फाटले किति तरी ...
 परीटघडीच्या त्या कपड्यांचे
रफू न मज परवडले !

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -


(चाल :  देहाची तिजोरी - भक्तीचाच  ठेवा )


फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?

                                नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
                               तरी चोरटयांना नाही  भीती मुळी त्यांची -
                               सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?

 उजेडात होते पहाणी , अंधारात साSSफ
 चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -
 दक्ष पोलिसांची कैसी नसे गस्त तेव्हां ?

                               फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
                              आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी
                              माल मनीं तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!

वाच वाचुनी अति मी दमले

(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -)

" वाच वाचुनी अति मी दमले - "

वाच वाचुनी अति मी दमले -
विटले रे कवितेला ...

कवितालेखन तुज न झेपते
आशय त्यात न कसला
विषय चांगला काही सुचेना
अती ताप तो झाला
रोख मानधन..नाही काही
मजवर राग का धरला ...

दारी कचरा घंटागाडी
सफाईवाला आला
निरुपयोगी कविता-कागद
रद्दी घातली त्याला
अजब तुझ्या त्या छंदापायी
सुसंवाद ना घडला..

अशुद्ध लेखन आणि व्याकरण
 गुंता वाढत गेला
 कवितेतील मज काव्य दिसेना
 कागद वाया गेला
 अंधारी ही डोळ्यांपुढती
 जीव वाचण्या भ्याला ...
.

एक त्रागा सुनेचा

(चाल : एक धागा सुखाचा -)

एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - 
घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे !

तू असशी जरी कर्तां  तगडा ,
सासू सुनेचा बघशी झगडा -
सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे !

उचलबांगडी बालपणाची ,
धुळीत स्वप्ने तारुण्याची -
जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे !

सासू सुनातें बघतो कोणी ,
एक सारखी बसती फुगोनी -
कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचा-याचे !

दाणे पडले टप टप टप

दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
                             चिव चिव करता टिपती दाणे
                             टिपता टिपता म्हणती गाणे
या रे पिलांनो जवळी या
आपण गाणे गाऊ  या
                             घरटे काडयांनी सजवू                         
                             दाणे पोटापुरते जमवू
हाव नको ती जास्तीची
सवय करू या कष्टांची
                             चोच दिली ज्या देवाने
                             घास ठेवले समोर त्याने
आभार त्याचे मानू या
चिव चिव गाणे गाऊ या