प्लॅस्टिकच्या युगात


        रोजच्याप्रमाणे परवा एक दिवस नव्या पेठेत फिरावयास गेलो होतो. नव्या पेठेतील फिरणे म्हणजे काय हे तुमच्यासारख्या चाणाक्ष अनुभवी तज्ञ जाणकार सूज्ञांना अस्मादिकांनी सविस्तर सांगणे म्हणजे एखाद्या पुढाऱ्याला आश्वासनाची व्याख्या सांगण्यासारखे होईल !

        फिरत असताना दोन वेण्या खांद्यावरून पुढे घेतलेली एक तरुणी माझ्याजवळून गेली. माझे लक्ष त्या वेण्यांवरील भरगच्च फुलांच्या गजऱ्याकडे गेले. मला प्रथम आश्चर्यच वाटले. कारण फुलांचा सुगंध लपवूनही जाणवतोच ! परंतु त्या तरुणीने माळलेले गजरे बिनवासाचे होते ! माझी डोक्यातली ट्यूब पेटली. माझ्या डोळ्यासमोर इंग्रजी टी आकाराची काठी घेऊन रस्त्यावरून हिंडणाऱ्या व्यक्ती आल्या. काठीवर रंगीबेरंगी, गुलाबी, अबोली, शुभ्रधवल असे गजरे व साधी फुले  अडकवलेली असतात. हे गजरे व फुले असतात ती अर्थात प्लॅस्टिकचीच !

        सध्याच्या युगाला प्लॅस्टिक-युग म्हटल तर त्यात काहीच चूक ठरणार नाही ! हल्ली फक्त माणसाचाच अवतार प्लॅस्टिकचा होणे शिल्लक राहिले आहे ! जिकडे पाहावे तिकडे प्लॅस्टिकच. लहान बाळाचे चोखणे प्लॅस्टिकचे. खिशातले कंगवे प्लॅस्टिकचे. तरुणींच्या गळ्यातले दागिने प्लॅस्टिकचे. म्हाताऱ्यांच्या हातातल्या काठ्याही प्लॅस्टिकच्याच !

        प्लॅस्टिक व म्याचिंग यांचे फार पूर्वीचे मित्रत्वाचे नाते असावेसे दिसते. जेथे तेथे म्याचिंगचा अट्टाहास केला जातो. तेथे प्लॅस्टिकची आवश्यकता दिसते. पिवळसर कांतीच्या महिलेला पायात पिवळ्या प्लॅस्टिकच्या चपला, पिवळी साडी, (यालाच लिंबू कलर म्हणतात असे आमचे कुटुंब ओठांचा चंबू करून सांगत होते ! असो !) त्या साडीला प्लॅस्टिकची पिवळी जर, पिवळा ब्लाउज, कानात प्लॅस्टिकची पिवळी कर्णफुले, नाकात प्लॅस्टिकची पिवळी मोरणी, केसातली  फुलेही पिवळ्या प्लॅस्टिकचीच ! हातात बांगड्या नावाची प्लॅस्टिकची पिवळी कडी, बोटात प्लॅस्टिकची पिवळी रिंग, खांद्यावर हेलकावे खात असणारी पिवळ्या नाण्यांनी भरलेली प्लॅस्टिकची पिवळी पर्स ! अबब ! काय हा म्याचिंगचा हव्यास आणि जोडीला प्लॅस्टिकची हौस !

        प्लॅस्टिकच्या युगात बाकी प्लॅस्टिकचे महत्व अवास्तव नाही बर का ! प्लॅस्टिकमुळे माणूस काटकसरी बनतो. प्लॅस्टिकमुळे मनुष्याच्या आधीच्या अनेक गैरसोयी दूर झालेल्या आहेत. घरातल्या सामानावर प्लॅस्टिकचा पगडा प्रामुख्याने जाणवतो. बदली, जागेची कमतरता, अपुरा पगार, अशावेळी हातभार त्यामुळेच लागतो. पितळ-लोखंडाच्या घागरी-बादल्या वापरणाऱ्यांना पाण्याची दूरवर ने-आण करताना नाकी आठ (नऊच का ?) किंवा दहा येत असतील. त्यांची सोय  प्लॅस्टिकच्या भांड्यांनी किती झालेली आहे. विहिरीतून पाणी उपसण्यास आता प्लॅस्टिकचे मजबूत पाईप वापरतात. त्यामुळे कमी वजन, कमी खरच व सोय भरपूर असा त्रिकोण साधता येतो !

        जॉन शंकर पटेल नावाचा माझा मित्र आहे. तो फार काटकसरी (-अर्थात चिक्कू !) आहे . कधी नव्हे ते त्याने मला आपल्या घरी फराळास बोलावले होते. घरात पाऊल टाकताच मला चहूकडे प्लॅस्टिक साम्राज्य दिसून आले. आम्ही दोघे खुर्ची टेबल घेऊन फराळाला बसलो. टेबलक्लॉथ प्लॅस्टिकचाच होता. टेबलावर तांब्या भांडे प्लॅस्टिकचे होते. नंतर डिशेस आल्या- त्याही प्लॅस्टिकच्याच. त्यातील चमचे प्लॅस्टिकचे. फराळाचे जिन्नस ज्यातून वाढले गेले, त्या थाळ्या प्लॅस्टिकच्या. मी पार वैतागून गेलो होतो. मी एक ग्लासभर पाणी पिऊन पाहिले- नशीब माझे ते पाणी खरेखुरे, पण प्लॅस्टिकच्या नळाचे होते ! तर सांगायचा मुद्दा हा की, हरघडीला प्लॅस्टिकचा उपयोग होताना दिसत आहे.

        बोलता बोलता एकदा सहज एकाने आमच्या घरी एकीच्या चाफेकळीसारख्या नाकाची स्तुती केली. परंतु दुसऱ्या स्त्रीची स्तुती ऐकणारी स्त्री अस्तित्वात यावयाची आहे. कारण उपरोक्त नाकस्तुती कानी पडताच आमचे 'कुटुंब' फिस्कारले- "इश्श्य ! कुणाच्याही नाकाची इतकी स्तुती नको काही करायला . आता प्लॅस्टिक सर्जरीने हव्वा तो अवयव, हव्वा तेव्हा चांगला करता-बसवता येतो म्हटलं !"

        बाजारात चक्कर मारल्यास दुकानात प्रथम आढळतात त्या प्लॅस्टिकच्या बादल्या. चारसहा रंगातील त्या टांगलेल्या बादल्याजवळ दिसतात ते प्लॅस्टिकचे ह्यांगर्स . नंतर डबे-बरण्या ओळीने मांडून ठेवलेले दिसतात. प्लॅस्टिक सोप केस , ब्रश, खोकी, कव्हर्स, बेल्ट .. आणखी काय काय वस्तू असतात, ते लक्षात ठेवणेही कठीण !

        प्लॅस्टिकच्या वस्तू बनवणारे कारागीर खरेच डोकेबाज असावेत. त्यांनी बनवलेली एकही वस्तू बाजारात खपली नाही, असे होत नाही. संक्रांतीच्यावेळी लुटण्याच्या वस्तू म्हणून बव्हंशी स्त्रिया असल्याच खरेदी करतात. आपला माल न खपणाऱ्या कंपन्या मालाबरोबर भेट म्हणून प्लॅस्टिकच्याच वस्तू देऊ करतात. पावसाळ्यातील न पडणाऱ्या पावसात भिजू नये म्हणून प्लॅस्टिकचे रेनकोट किती उपयुक्त असतात !

        लहान मुलांचे वाढदिवस प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी साजरे केले जातात. गृहिणी जिन्नस टिकवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. रेल्वे स्टेशनावर खाद्यपदार्थ प्लॅस्टिकच्या प्याकिंगमध्ये पुरवण्याची प्रथा पाडलेली प्रत्येकजण पाहतोच . कापड दुकानदार, पापड दुकानदार आपल्या मालाची जाहिरात प्लॅस्टिकच्या पिशव्यावरच छपाई करून दाखवतात.

        सर्वत्र प्लॅस्टिकचा प्रसार झालेला दिसतो. प्लॅस्टिक टिकाऊ असते. सुबकपणा त्यामुळे आणता येतो. त्यामुळे सजावटही खुलवता येते. हरतऱ्हेने उपयोगी पडणारे प्लॅस्टिक वापरण्यास सोयीचे असते. म्हणूनच त्याने बनलेल्या वस्तू दुकानात घरात बाजारात दिसतात. त्याची उपकरणे प्रयोगशाळेत आढळतात. शस्त्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो.

        सरकारने सध्या नाण्यांची टंचाई केली आहे. त्यावर तोडगा म्हणून कोण्या एकाने प्लॅस्टिकच्या मजबूत नाण्यांचा व नोटांचा उपयोग करण्यास सुचवले होते. आजच्या युगात बेकारी वाढली आहे. पावसाळ्यात दुष्काळ आणि उन्हाळ्यात गारपीट होत आहे. जगणे मुश्कील आहे. अशावेळेस प्लॅस्टिकचा उपयोग होण्यासारखा आहे. जीवनास कंटाळलेल्यानी प्लॅस्टिकची पिशवी डोक्यावरून गळ्यापर्यंत ओढून घेऊन श्वासोच्छवास करावा. बस्स ! एका मिनिटात काम फत्ते ! भूलोकातून स्वर्गलोकात विनातिकीट विनाविलंब प्रवेश 'आत्महत्या' या सदरात मोडणाऱ्या क्रियेने या प्लॅस्टिक-पिशव्यांच्या सहाय्याने मिळेल !

        प्लॅस्टिकच्या युगात सर्वकाही सुलभ सुबक सुंदर सोयीचे मिळू शकते. ते सर्व टिकाऊ मजबूत आकर्षक व मुख्यत: आवश्यक आहे .

        एक काळ यावयाचा राहिला आहे. जेव्हा अस्मादिकांचा कितवा तरी लेख प्लॅस्टिकाक्षरात छापून येईल ! त्यावेळी छपाईसाठी मशिनरी प्लॅस्टिकची असेल आणि वाचकही प्लॅस्टिकच्या डोळ्यांनी प्लॅस्टिकाक्षरातला तो माझा लेख तुम्ही प्लॅस्टिक-स्मित (-म्हणजेच टिकाऊ, मजबूत वगैरे !) करत वाचत असाल !
.              

उपदेश पहावा करून



        कुणाला भाषण करता येते, कुणाला विनोद करता येतो, तर कुणाला आणखी काही करता येते. खर सांगायचं तर मला आपल हे असल काही करायला येत नाही. मला करता येतो फक्त - "उपदेश !" त्यात मात्र आपला तोंडखंडा आहे बर का !

        उपदेश करणे हा धंदा करणारा महाभाग जगात काही मी एकटाच नाही. हजारो वर्षापुर्वी गुरूगृही अभ्यास संपल्यावर, तेथून बाहेर पडणारे समस्त शिष्यगण गुरूकडून उपदेशाचे डोस प्राशन करूनच इतर कार्यांकडे वळत . तसेच विवाहादि कार्य संपल्यावर वधूपिता आपल्या कन्येला जामाताच्या स्वाधीन करतानाही उपदेशच करत असतो. असा एखादा 'उपदेश-सीन' असल्याशिवाय सामाजिक-कौटुंबिक चित्रपट वास्तववादी ठरत नाही, असे म्हटले जाते ! आजतागायत होऊन गेलेल्या संतांच्या कामगिरीत मुख्यत्वेकरून लोकांना सोप्या भाषेत केला गेलेला 'उपदेश'च महत्वपूर्ण ठरला आहे !

        उपदेश करणे ही काही खर्चाची बाब नाही . उपदेश कुणीही करू शकतो. कुणालाही करता येतो. कधीही करता येतो व कुठेही करता येतो . एवढ्या सर्व सोयी असताना अशा कार्याचा लाभ घेणे कुणाला बरे नको वाटेल ? सर्वाना जरी हवेसे वाटेल तरी, याच्या वाटेला फारसे कुणी जावयास धजावत नाहीत, हेही तितकेच खरे ! कारण 'उपदेशकर्त्या' संताना नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. उपदेश करणे आणि केलेला उपदेश आचरणात आणणे - ह्या सारख्याच महत्वाच्या गोष्टी आहेत !

        जगातील  प्रत्येक सासू आपल्या सुनेला रामप्रहरापासून ते रात्रप्रहरापर्यंत 'उपदेश-काढा' पाजण्याचा प्रयत्न करत असते. परंतु गंमत अशी की, सुनेला "असे" वागावे म्हणून उपदेशणारी सासू स्वत: मात्र "तसे" क्वचितच वागत असल्याची आढळते !

        आजकालच्या दंगल जमान्यात शाळेमधे 'शांत बसा' म्हणून उपदेश करणारा पुढारी मात्र, दुसरीकडे दंगल पेटवण्यास उद्युक्त झालेला आढळतो ! 'आई वडिलांची आज्ञा पाळा' असे सांगणारी व्यक्ती स्वत:च्या आईवडिलांना घराबाहेर काढताना आढळते ! 'परोपदेशे पांडित्यम' म्हणतात ते ह्यालाच !

        उपदेश करणाऱ्याइतकाच उपदेश ऐकणाराही त्या तोलाचा असावा लागतो. कुरुक्षेत्रावर भगवान्  श्रीकृष्णाने केलेला 'उपदेश' ऐकावयास तेथे धनंजयच असावा लागतो, दुर्योधनाचे तेथे कामच नाही ! 'लाल त्रिकोणा'ची महती विवाह नोंदणी कार्यालयात येणाऱ्यानाच सांगितलेली बरी, ती वृद्धाश्रमात अथवा बालवर्गात सांगून काय उपयोग ?

        परवा एका 'कुटुंब-नियोजना'चा प्रचारक माझ्या मित्राजवळ फिरत फिरत आला. गप्पा मारता मारता प्रचारक मित्राला सांगू लागला. नव्हे, उपदेशच करू लागला- "आज आपल्या देशात सेकंदाला हजार बालके जन्मास येत आहेत, अशा रीतीने लोकसंख्या वाढत आहे. पण त्याचबरोबर या अनावश्यक वाढीमुळे अन्न वस्त्र निवारा यांचा अपुरेपणा वाढत आहे. यावर उपाय म्हणजे तुमच्यासारख्यानी शस्त्रक्रिया करून घेणे योग्य. तुम्हालाही त्यात देशकार्याला हातभार लावल्याचे समाधान मिळेल !"  मित्र बिचारा प्रचारकाच्या तोंडाकडेच पाहत राहिला. कारण विवाह होण्याआधीच 'शस्त्रक्रिया कर' म्हणून उपदेश करणारा त्याला प्रथमच भेटला होता ! मित्र अद्याप  'अविवाहित' आहे हे समजताच मुकाट्याने तो 'कु नि प्र ' तेथून चालता झाला !

        उपदेश करण्यात पुष्कळदा "गुरुची विद्या गुरूला" फळण्याची भीती असते. एका वकील-अशीलाच्या जोडीची कथा सर्वश्रुतच आहे. वकिलाने अशिलाला न्यायाधिशासमोर वेडेपणाचे सोंग वठवण्याचा उपदेश केला. त्यात वकिलाने ती केस जिंकली. केस जिंकल्याच्या आनंदात जेव्हा त्याने अशिलाकडे 'फी'ची मागणी केली, तेव्हा अशिलाने पुन्हा आपण वेडे असल्याची बतावणी सुरू केली. बिचारा हुशार वकील समजून चुकला की, आपला उपदेश आपल्यालाच भोवला बरं !

        उपदेशाच्या बाबतीत विरोधाभास सदैव प्रत्ययास येतो. 'खोटे कधी बोलू नये' असे मत प्रतिपादन करणारे पिताजी, आपल्या पुत्राला पुष्कळदा देणेकरी दारात दिसताच- 'बाबा घरात नाहीत !'असे सांगण्यास बजावतात. तेव्हाच तो पुत्र समजून चुकतो की, पिताजी जे 'खोटे' बोलू नये म्हणून सांगतात, ते खरोखरचे 'खोटे' नसून, ते 'खरे'बद्दल वापरलेले 'खोटे' आहे ! 'धूम्रपाना'मुळे क्यान्सर होईल असा उपदेश करणारे अनेक डॉक्टर प्रकृतीस्वास्थ्यास्तव झुरके मारत बसलेले दिसतात ! माझी छाती 'एकोणतीस एकतीस'च  दिसत असूनही, 'माणसाने नेहमी थोडे खावे !' असे सांगणारा एक 'किंगकॉंग' मला परवाच प्रवासात भेटला होता ! (त्याची 'चाळीस बेचाळीस' अशी छाती पाहून, त्याला प्रत्युपदेश करण्याची मात्र मला छाती झाली नाही एवढे खरे !)

         पुष्कळजण चांगल्या हेतूने उपदेश करतात. पण करायला जातो एक अन होते मात्र भलतेच ! आता हेच पहा ना- परवा आमची 'ही' घरात भांडण झाल्यामुळे, तलावात (बहुधा पाणी कमी आहे असे पाहून !) जीव देण्यास निघाली. वेळ संध्याकाळी सातची होती. बराच वेळ झाला तरी 'ही' खरोखरच परत आली नाही, म्हणून कंटाळून मी हिच्या शोधार्थ तलावाकडे निघालो. मस्त वारा सुटला होता. मी 'बहारो फूल बरसाओ ..' असे गुणगुणत तलावाजवळ पोहोचलो . तेवढ्यात तिथे एका बाकड्यावर, ओळखीची अशी वाटणारी  हिची साडी उर्फ पोतेरे दिसले. म्हणजे 'ही अजून जिवंतपणीच  येथे बसली आहे तर'- असा विचार करत मी बाकड्याजवळ दहा पावलांवर पोहोचलो. तेवढ्यातच वीज गेली. अंधार गुडूप झाला ! मी आपला सरळ बाकड्यावर 'हि'च्याजवळ जाऊन बसलो. आणि नेहमीचा धंदा (-अर्थात 'उपदेश करण्या'चाच हो !) सुरू केला !

        "प्रिये लाडके देवते.... वगैरे वगैरे.. आता तरी चल घरी.. अशा कातरवेळी एकटेच इथे बसणे योग्य नाही. मी तुझ्या सोबत आहे. मला एकट्याला तुझ्याशिवाय घरी कसे करमेल ? " - मी असे उपदेशत असताना, तिने काही उत्तर देण्याऐवजी- फाडकन माझ्या गालावर हात उमटल्याचा आवाज आला. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले . अन तेवढ्यात वीज आली ! बाकड्यावर जिच्याजवळ बसून मी उपदेश केला, ती बाकड्यावरची 'ती'-  माझी 'ही' नव्हतीच हो !   

 हिच्यासारखीच साडी असलेली ती, दुसऱ्याच कुणाचीतरी 'ही' होती !

        हल्ली मी सर्वांना उपदेश करत असतो-

 "बाबानो, दुसऱ्यांना उपदेश अवश्य करा, पण ते दुसरे 'भलतेच कुणीतरी तिसरे' असू देऊ नका !"
.  

                             

बसस्टॉप


    दिवसभर घरात बसून कंटाळा आला होता. बसस्टॉपकडे एखादी चक्कर मारावी, म्हणून चपलेत पाय घातले नि निघालो. दाराशीच नवे शेजारी भेटले . त्यांनी नको असताना हटकलेच . "बसस्टॉपकडे फिरावयास निघालोय !" - असे उत्तर देऊन मी माझा रस्ता सुधारला. माझ्या त्या उत्तरावर शेजाऱ्याने असा काही चेहरा केला की, जणू काही मी ठाण्याच्या इस्पितळाकडेच नाव नोंदवण्यास निघालो होतो ! अरसिकच आहे बेटा ! बसने प्रवास करण्यात पैसे खर्च होतात, पण बसस्टॉपवर काहीवेळ फुकट मजा पहावयास मिळते तर ती का सोडावी ?

        मी तर म्हणतो की, माणसाने काशीयात्रा वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्या यात्रेस जाऊन आयुष्यातला महत्वाचा काळ फुकट घालवण्याऐवजी, रोज बसस्टॉपवर पंधराच मिनिटे घालवली, तर त्या मनुष्यास 'प्रवासी व फॅशन-दर्शन ' यासारख्या विषयावर प्रबंध लिहिता येईल व (फुकटात-) डॉक्टरेट मिळू शकेल !

        कुंभमेळा व बसस्टॉपभोवतालची गर्दी यात फरक फक्त एकच आहे. कुंभमेळ्याचे यात्रेकरू ईश्वरनामात सदोदित दंग असतील, मात्र बसस्टॉपवरचे प्रवासी बस कंडक्टरच्या नावाचा जप करत असतात. बसबद्दलचे प्रेम जास्तच उतू आले, तर त्याच्या नावाने शंखध्वनी करण्यासही ते प्रवासी मागेपुढे पाहात नाहीत ! मानवी सुखासाठी बस हे साधन आहे. हे साधन वापरण्यासाठी आधार म्हणजे बसस्टॉपचाच !

        सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व तऱ्हांची माणसे एकत्र आणण्याचे सामर्थ्य ह्या बसच्या 'थांब्या'त आहे. रविवारी संध्याकाळची जत्रा पाहण्याचे नयनरम्य स्थान म्हणजे बसस्टॉप ! ज्यांचा वेळ बेकारीत जातो, त्यांनी तेथे जाऊन बसावे. त्यांचा वेळ तेथे फुकट जाणार नाही. बससाठी थांबणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे पोशाख, चेहरे, त्यांचे हावभाव वगैरे गोष्टी बेकार लोकांनी अभ्यासल्या, तर ते उत्तम 'मानसशास्त्रज्ञ' होऊ शकतील ! पण मी हे काय सांगत बसलोय- म्हणजे चाललोय- वेड्यासारखा ?

        तो पहा- बसस्टॉप आलाच ! सुदैवाने आज रविवारचा दिवस. संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत हं. ह्या कट्ट्यावर मी बसतो बर का ! इथून आपल्याला सार काही बसस्टॉपवरच दृश्य दिसतंय !

        ते पहा , नवविवाहिताचे नव्याकोऱ्या कपड्यातले एक जोडपे बससाठी 'थांब्या'कडे येऊ लागलय ! दोघेही कसे मस्त लाजतायत ! निदान सर्वांच्या समोर एकमेकांचा धक्का एकमेकाला लागू नये म्हणून किती जपताहेत ते ! (पण असे करण्याच्या प्रयत्नातच वधूचा धक्का वराला लागला बर का- माझे सूक्ष्म निरीक्षण !) वधूचा धक्का वराला लागताच ती ओशाळते . परंतु 'लाजतेस काय अशी ? आपल्याला जीवनात जोडीने यापुढे कितीतरी धक्के अजून खायचे आहेत !' - अशाप्रकारचा भाव तो वर चेहऱ्यावर दर्शवत आहे. बसथांब्याजवळील त्या पलीकडच्या कट्ट्यावर दोन तीन पेन्शनर्स गप्पा छाटत आहेत. आसपास इकडे तिकडे हिंडणाऱ्या तरुणींकडे (चोरटे ?) दृष्टीक्षेप टाकत, 'आजचा तरुणवर्ग का बिघडत चालला आहे?' याचीच बहुधा ते चर्चा करत असतील !

        संध्याकाळची वेळ ही शाळा कॉलेज ऑफिसेस सुटण्याची व सिनेमा सुरू होण्याची वेळ असते. पण आज रविवार ! त्यामुळे सिनेमाला जाणारे व फिरायला जाणारेच प्रवासी आपल्याला बसस्टॉपजवळ दिसणार ! त्या तीन जाडजूड स्त्रिया पाहिल्यात का ? त्या तिघी मिळून सिनेमाला असतील. कारण नुकताच पगार झालाय ना ! त्या श्वेतवस्त्रधारित शिक्षिकाच असणार ! कारण त्या पहा कशा अंग चोरत उभ्या आहेत ! कुण्या परपुरुषाचा स्पर्श होताच त्याचे, त्या आपल्या चष्म्यातूनच भस्म करतील अशी मला तरी खात्री वाटतेय !

        हा घोळका कॉलेजचा असावा. सर्व प्रवाशांच्या (माझी सुद्धा दृष्टी हं ! खोटे कशाला सांगू ?) नजरा त्या घोळक्याकडेच आहेत. त्या घोळक्यात एक तरुण (नवा भरती डेमोन्स्टरेटर !) आहे, त्याच्याभोवती चार पाच 'मिस कॉलेज ' असाव्यात ! तो तरुण मात्र ओशाळला आहे, कारण सध्या तो गोपीतला कृष्ण आहे, हे सर्वजण पाहत आहेत ना ! त्या गोपी- सॉरी पोरी- आपल्या माना वेळावून वेळावून, त्याला बहुधा 'रविवारच्या नव्या डिफिकल्टीज ' विचारत असाव्यात. सर्वजणासमोर  नवीन डेमोन्स्टरेटरचे डिसेक्शन जाहीररीत्या करण्याची संधी- नाही तरी त्या पोरीना दुसरीकडे कुठे व कधी मिळणार ?     

        त्या तिथे भडक कपड्यातील दोन सिंधी महिला आपापसात बडबडत आहेत. त्यांच्या पोरांचा रस्त्यावरच तमाशा चालू आहे. एक पोरटे ट्विस्ट करत आहे, दुसरे पोरटे "मैं गधोका लीडर्रर्रsss' म्हणून कोकलत आहे. त्यांच्या आयांचा नुसत्या हातवाऱ्यातच वेळ चालला आहे.

        वेळ ही अशी मस्त संध्याकाळची ! सूर्य अस्ताला जात आहे----वगैरे ! अशा रम्य वेळी तो पहा सात-आठ स्कर्ट व साड्यांचा ताफा, बससाठी इकडे येत आहे. कॉलेजमधील इकोनॉमिक्सचा हा ग्रुप दिसतोय ! शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या या अप्सरा असाव्यात ! कारण त्या ग्रुपमधील एका साडीवालीचा डोईवरील कच्छ-मुकुट सर्वात उंच तळपतोय ! केशमुकुटाची उंची हे सध्या डोक्यातील ज्ञानावरही थोडीफार अवलंबून आहे ! त्या ग्रुपमधून ज्युनिअरच्या पोरा-पोरीवर ताशेरे उडत असणार . त्या साडीवाल्या पोरी, मधूनच आपले खांद्यावरील पदर नीट आढळले तर थोडेसे ढळवण्याचा प्रयत्न करत आहेत ! (जाऊ दे ! अशा गोष्टी (आपलेच -) डोळे मिटून पहावयाच्या असतात !) किंवा एखाद्या नवीन आलेल्या स्मार्ट लेक्चररबद्दल- 'तो कुणाकडे व कितीवेळ पाहत असतो ?' याचे मूल्यमापन करत त्या भोवतालचे विश्व विसरू पाहतात.

        ह्या अप्सरांच्या आपोझिट साईडला पाहिलेत का ते कॉलेजकुमारांचे टोळके ? ते 'न्यारो-हिप्पी' आहेत हं ! अप्सरांकडे पाहून ह्या गंधर्वांच्या लीला बऱ्याच चालू असतात. गंधर्व व अप्सरा ह्यांच्याकडे आळीपाळीने नजर टाकत, एखादा टांगेवाला मिस्कीलपणे 'है क्या एक सवारी ?' असे ओरडत जातो. अर्धा मळकट लेंगा घालून गळ्यात हिरवा तांबडा रुमाल बांधलेले एक कार्टे बघा हातातली कपबशी मुद्दाम वाजवत चाललंय ! ते आता ओरडलेच - 'सवेरेवाले गाडीसे चले जायेंगे !' कधी का जाईनास बेट्या- त्या पोरी तुझ्याबरोबर थोड्याच येणार आहेत ? पोरीना तरी थोडीशी गम्मत वाटून त्या हसतात. ते ऐकून-पाहून त्या टोळक्यातल्या प्रत्येकाचा कलेजा पार खल्लास झाला असणार !

        पोरांच्या टोळक्याकडे गेलेली ती म्हातारी बघितली का ? पण ते टोळके तिला पोरींकडे पाठवते. ती काहीतरी पुटपुटत पोरींना विचारते. त्यातली एक पोरगी तिला नीट रस्ता समजावून सांगत, एक समाजकार्य पार पाडते. मधूनच एक आगाऊ तरुण, गॉगल घालून सायकलवर कसरत करत गेला. पण त्याची ती कसरत पहायला इथे वेळ कुणाला आहे ? सर्वाना येणाऱ्या बसचीच काळजी लागून राहिली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने एकही बस वेळेवर येणार नाही, एरव्ही चारचार बशी ओळीने एकमेकीना खेटून उभ्या असलेल्या दिसतात !

        दोन चार पोक्त जोडपीही सिनेमाला निघालेली आहेत ! हे जवळचे जोडपे पहा. बायकोच्या हातात बास्केट व नवऱ्याच्या हातात बेबी व मोठा बॉल आहे ! 'आजोबा, बश कधी येनाल ?' - बारकी बेबी आजोबांना विचारते. बायको व बास्केट यांच्याकडे आळीपाळीने पाहत असलेले आजोबा त्राग्याने म्हणतात- "येईल हं बेबी आता, तासाभरातच !" बायकोचे लक्ष कुठे आहे पतीराजाकडे ? तिचे लक्ष आहे आपल्या पर्फेक्ट 'म्याचिंग'कडे ! बास्केट चप्पल पर्स पातळ ब्लाउज या साऱ्यांच कसे झक्क व्हाईट म्याच झालंय ? (पक्का रंगही  कसा झक्क उठून दिसतोय नाही का !) - असा विचार ती स्वत:शी करत असते. नवऱ्याकडे मात्र मारक्या म्हशीसारखी नजर टाकत पाहते . कारण नवऱ्याने चप्पल घालून, ढगाळ्या प्यांटवर पट्टा कसाबसा चढवून, बुशशर्टचा इन केलेला आहे. न शोभणारा दुर्बिणीचा चष्मा त्याच्या नाकावर घसरत विराजमान झालाय !

        सारेचजण बसची वाट पाहत आहेत. पण बस कुणालाच लौकर याविशी वाटत नाही. कारण
बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येकजण आपली 'पोझिशन' आजमावतोय ! सिनेमा काय रोजचाच आहे ! पण सुटीचा दिवस आठवड्यात एकच असतो ना ! बसस्टॉपच्या आसपासचे वातावरण कसे अशावेळी धुंदफुंद बनलेले आहे. निरनिराळ्या केशरचना , निरनिराळ्या फ्याशन, निरनिराळ्या स्वभावांचे दर्शन याच बसस्टॉपवर होते. एखादी छोटीशी जत्राच भरल्यासारखी वाटते ! दुसऱ्यांना कृत्रिम नाटकी जीवन काही क्षण दाखवण्याचा अट्टाहास इथे प्रत्येकाचाच चाललेला आहे. यात सर्वांनाच एकप्रकारचा आनंद आहे. 'आपण सुखी आहोत' हे दाखवण्याची धडपड याच बसस्टॉपवर चाललेली आढळते. त्याच्याकडे पाहून वाटते की, खरेच जगण्यात मौज आहे. सर्व थरांना बसस्टॉप एकत्र आणतो. रडणाऱ्या लहान बालकापासून ते तावातावाने ओरडणाऱ्या वृद्धापर्यंत बसस्टॉपची वागणूक एकसारखीच असते. संध्याकाळच्या मर्क्युरी लाईटच्या सौम्य प्रकाशांत ह्या रंगीबेरंगी सजीव हालचाली पाहिल्याबरोबरच वाटू लागते की, निर्जीव असला तरी बसस्टॉप आपल्याला काहीतरी सांगू इच्छितोय, त्यासाठी तो बोलावतोय ! आणि म्हणूनच मी बसस्टॉपकडे आकर्षिला जातो व तासाभराने मन कसे तृप्त होऊन जाते.. एका अनामिक भावनेनेच !
.                     
       

         

कॉलबेल


        किर्रर्रर्रssss
        "हं ! आलोच हं !" असे म्हणत मी त्वरेने पुढील दाराकडे धाव घेतली. एक दार अर्धवट उघडूनच विचारले- "कोणय ?"
काहीच उत्तर आले नाही. पुन्हा दार उघडून समोर, आजूबाजूला पहिले, पण कोणीच आढळले नाही. 'म्हणजे भासच झाला तर --' असे पुटपुटत दार लोटले. दिवाणखान्यातील रेडिओचे बटन आणखीनच पिळले . तसा आवाज घुमू लागला.
"नैना बरसे----बरसे--" . पण असा भास होण्याची ही तिसरी खेप होती !
        त्याचं अस झालं- बरेच दिवस येणार, येणार म्हणून गाजत असलेली 'कॉलबेल' अखेर काल आमच्या घराच्या प्रवेशद्वारावर विराजमान झाली होती. आमचे घर एकंदरीत पाच खोल्यानी युक्त होते. खोल्याही मोठ्या असल्याकारणाने जेवणाच्या वेळेस आमची मोठी पंचाईत व्हायची . कारण सर्वजण मिळूनच एक पंगत आटपत होतो. पुढच्या बाजूची खोली व स्वैपाकघर यांच्यामधे दोन खोल्या होत्या.     

        आमची जेवणासाठी पंगत बसली की, पुढचे दार साहजिकच बंद असायचे. नेमके त्यावेळेसच यायची कुणाला ना कुणाला तरी बुद्धी होई. येणारी व्यक्ती मग धाड धाड दार वाजवी, नाही तर कडी खटखटावीत असे. मग अर्धे लक्ष जेवणात तर अर्धे बाहेर अशी त्रेधा उडे !

        ह्यासाठी एक 'कॉलबेल' (डोअरबेल) बसवण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाय नेहमी 'बंद'च्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणारी कोयनेची वीज नुकतीच आली होती. त्यामुळे कॉलबेलची सोय एकदाची झाली.

        कॉलबेल आमची व घरही आमचेच, त्यामुळे सर्वांनाच तिचे कौतुक ! बाहेरच्या लोकांनी बेल वाजवण्याऐवजी आमच्या घरातच आळीपाळीने ती वाजवण्यास सुरुवात झाली . शेवटी आमच्या पिताजींनी 'आणीबाणी' पुकारल्यावर 'बेल'चा मारा कमी झाला. तरी अधून मधून छुपे बार होत होतेच !

        खर म्हणजे मलाच 'कॉलबेल'च भारी कवतिक ! कोण्या एका नातेवाईकाचे परवा लग्न असल्यामुळे आमच्या घरची सर्व मंडळी काल सायंकाळीच तातडीने रवाना झाली होती. गृहखाते व इतर सर्व खाती माझ्यावर सोपवली गेली. मी सतत तीन मिनिटे बेल दाबूनच घरची अधिकारसूत्रे हाती घेतली. माझ्या लहान कानात सारखा एकच आवाज घुमू लागला होता - "किर्रर्रsssss....".

        रात्री झोपल्यावरही मला दोनतीनदा कोणीतरी बेल वाजविल्याचा भास झाला. मागाहून लक्षात आले की, तो रातकिड्यांचा आवाज होता !

        लहानपणाची अचानक आठवण आली म्हणून सांगतो. आमच्या शाळेतील हेडमास्तरांच्या टेबलावर एक घंटी होती. ती वाजवून शिपायाला सारखे बोलावण्यात येई . त्याला तसा त्रास देण्यात त्यांना मनस्वी आनंद होई. पण नंतर तो शिपाईही त्यांना सवाई भेटला. हेडमास्तरानी घंटी वाजवली तरी तो लक्ष देईनासा झाला. मग हेडमास्तर दोन-चारदा घंटी जोरात बडवायचे आणि ओरडायचे - "अरे शुंभा ---". मग तो शुंभ एका हाताने टोपी लगबगीने सारीत हेडमास्तरांच्या खोलीत जायचा.

        "काय रे शुंभा ? घंटी ऐकू आली नाही का तुला ?" - हेडमास्तर विचारत. तसा तो म्हणायचा- "साहेब, आपली ही कॉलबेल ऐकल्याबरोबरच आलो नाही का !" हेडमास्तर मग परत एकदा कॉलबेल बडवून त्याला जाण्याची सूचना देत. कारण त्यांचे स्वत:  घंटी बडवणे एवढेच काय ते काम असे !

            'कॉलबेल'ची प्रथा फार पुरातनकालापासून चालू आहे. कॉलबेलचे कार्य एकच, ते म्हणजे 'आवाज' देणे. फक्त तिच्या स्वरूपात वरचेवर बदल घडत गेले आहेत.

        'दवंडी पिटणे' हा कॉलबेलचाच एक मूळ प्रकार . न्यायप्रिय जहांगीर बादशहाच्या न्यायमंदिरावर  एक घंटा अडकवली होती. एका मरतुकड्या घोड्याने याच 'कॉलबेल'च्या जोरावर न्याय मिळवून घेतला नव्हता काय ? राजे लोक आपल्या दरबारात निघाले म्हणजे आधी टोल देण्याची व्यवस्था करत असत. देवाची पूजा चालू असताना आपण घंटी वाजवतो ती कशासाठी ? (माझ्या मते -) देवाला नैवेद्य खाण्यास बोलावण्यासाठी ! (- पर्यायानेच आपण नैवेद्य खाण्यास परवानगी मागण्यासाठी !) म्हणजेच देवादिकानीही 'कॉलबेल'चा उपयोग करून घेतला आहे.  शिमग्याच्यावेळी कॉलबेलच्याच एका प्रकाराचा (ठणाणा बेल ?) उपयोग करून सर्वाना एकत्र आणण्यात येते. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटा वाजवूनच आपण 'मी आलोय' अशी देवाला सूचना देत असतो. कित्येक सावकार इनामदारांच्या घरावर दोरी अडकवलेली असायची. ती ओढायची . म्हणजे त्यांच्या घरातली घंटा शंखध्वनी करत असे. हाही कॉलबेलचा एक नमुनाच !

        'कॉलबेल'चे एवढे 'जनरल क्नोलेज' सांगून- "किर्रर्र किर्रर्र ----" अशी दोनदाच बेल दाबली गेली व मी ओळखले की आपला (- म्हणजे माझा) दोस्त 'बाळ्या' आला . (नाही तरी बंडूचा दोस्त दुसरा कोण असणार ?) "थांब रे साल्या-" असे म्हणत मी दार उघडले तो- 'बाळ्या'ऐवजी एक छत्रीधारी 'बाळी ' समोर उभी ! मला काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात तिनेच मला विचारले- "काकू आहेत का घरात?" मी चाचरतच उत्तर दिले- " अं.. आहे- नाहीत, नाहीत त्या घरात. कालच गावाला गेल्या आहेत !" "बरं, मी येऊन गेले म्हणून सांगा त्यांना" असे म्हणून ती निघून गेली. मला तर ती अनोळखीच होती. ती निघून गेल्यावर मग लक्षात आले की, 'वह कौन थी ' म्हणून सांगायचे काकूंना ? कपाळावर हात बडवून घेतला झालं ! मी आणि बाळू - दोघात दोनदाच बेल दाबण्याचा करार ठरला होता, त्याचा हा परिणाम होता. परंतु ती 'बाळी' बहुधा बहिरी असावी , असा माझा अंदाज आहे. देव करो नि माझा अंदाज खरा ठरो !

        ती एक गंमत झाली . दुसरी अशी- मी दात घासत बाथरूममधे उभा होतो. तेवढ्यातच बेलचा आवाज आणि पाठोपाठ 'साहेब साहेब ' अशा आरोळ्या जोरात ऐकू आल्या. म्हणून दार उघडले. समोर एक पागोटे उभे ! मी त्याला सुनावले- "पाव्हनं, जोरात ओरडा तरी नाही तर ही बेल तरी जोरात दाबा !" तो निर्विकारपणे मला म्हणाला- 'यानरी अप्पा ? पाटील साहेबरु -" म्हणजे माझ्या खेकसण्याचा उपयोग काय झाला हो ! तो आमच्या शेजारच्या पाटलाकडे आला होता. "मसणात गेले तुझे पाटील साहेब !"- असे मी म्हणणार इतक्यात दस्तूरखुद्द पाटलांनीच त्याला तिकडे हाक मारून घेतले आणि मी वाचलो.

        पत्र द्यावयास आलेल्या पोस्टमामानेही कमालच केली होती बघा! आमचे एक पत्र आले होते. ते मी हातात घेऊन घरात वळलो, तोच- किर्रर्र आवाज आला म्हणून मी कोण आलय ते पाहण्यासाठी परत बाहेर वळलो . पाहतो तो पोष्टमन उभा ! मला म्हणतो कसा- "कशी वाजते ते फक्त सहज पाहिलं साहेब !" आमच्यातला 'साहेब' जागा झाला व "ठीक आहे, पुन्हा वाजवू नका "- असे त्याला म्हणालो.  मी दुसर काय करू शकणार होतो, नाहीतरी !

        शेजारची मुले तर येताजाता बेल गंमत म्हणून दाबून पळून जातात. त्यांच्यावर सारखे ओरडत बसण्यापेक्षा मला किर्रर्र आवाज ऐकणेच आवडते बुवा !

        वाचकहो ! माझ्या ह्या किर्रर्रची किरकीर ऐकून तुमचे डोके मात्र -----
किर्रर्र .... !

.     

         
   

चार ओळी मनातल्या -


१)     'कोडे -'

तुझे क्षितीज दूर पश्चिमेकडे
माझे असू दे इकडे पूर्वेकडे -
दोघांना जोडणारे मनाचे आकाश
सखे, आपल्यासाठी नसू दे कोडे . .

.

२)     'हर्षोन्माद -'

दोनोळी एक तुझ्यावर मी
 लिहून ठेवली, सखे -
गझल लिहिल्यासम तू
 नाचत काय सुटलीस, सखे . .

.

३)     'सत्यात कधी -'

पाऊल एकामागे एक
गुंफुन हात सखे हातात -
सप्तपदी ग कितिदा झाली
थकलो चालुन मी स्वप्नात ..


.

चिकाटी


        जगामधे चौसष्ट कला अस्तित्वात आहेत, असे समजले जाते. कुणी तरी आपले डोके लढवून पासष्टावीही कला असल्याचा दावा करतो ! कुणीतरी दुसरा कशाला पाहिजे, मी स्वत:च दावा करतो की "चिकाटी" ही मनुष्याची पासष्टावी कला आहे !

        उपरिर्निर्दिष्ट (काय, बरोबर लिहिला गेलाय ना शब्द !) चौसष्ट कला ह्या आत्मसात करून घ्याव्या लागतात. परंतु मी केलेल्या दाव्यातील 'चिकाटी' ही कला मनुष्याच्या जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत त्याला चिटकून (- का चिकटून !) असते.

        मनुष्य जेव्हा लहान मूल म्हणून जन्माला येतो, तेव्हाच त्याच्या कलेचा जन्म झाला म्हणून समजा. 'आईला सोडून न राहणे' ही जी चिकाटी तो धरतो, ती आपणहोऊन तो कधीच सोडत नाही- एकवेळ आई त्यालाच सोडून जाईल ! लहान वयात आई त्याला इतरांचा लळा लावण्याचा 'यत्न हाच परमेश्वर' करील, परंतु तो मात्र इतरांची लाळ घोटत राहणे शक्य नाही ! त्याची चिकाटी मोठी दांडगी हं ! काऊ-चिऊ-खाऊच्या नादात तो आईला विसरेल- पण क्षणभरच ! पुन्हा आपले 'आsssई ' करून भोकाड का काय म्हणतात, तेच पसरणार तो !

        आता  'चिकाटी' ही कला कशी काय असा प्रश्न आपल्यापुढे पडेल !
मनुष्य आपल्या अंगच्या गुणांना जे काही सोपस्कार घडवतो, त्यालाच आपण 'कला' असे म्हणतो . संगीत ही एक कला आहे. नृत्य ही दुसरी कला आहे. अशा ह्या ज्या काही चौसष्ट कला आहेत, त्या सर्वानी मिळूनच मनुष्य सर्वगुणसंपन्न होतो ना ! मग चिकाटी असण्याच्या कलेद्वारे मनुष्य आपल्या अंगचे गुणच उधळत नसतो काय ?

        'चिकाटी' या कलेलाच निरनिराळी अभिधाने काल-स्थलानुसार प्राप्त होतात. लहान मुलांच्या 'चिकाटी'ला आपण 'हट्ट' म्हणून संबोधतो . 'हट्ट' म्हटले की आपल्याला रामाने चंद्रासाठी धरलेला हट्ट आठवतो. याचाच अर्थ असा की, 'चिकाटी' ही कला रामायणकालापासून अस्तित्वात आहे. ती काही नवीन नाही. तरीपण तुम्हाला कुणाला माहित नसल्याने मला आज ती 'पासष्टावी कला' म्हणून सांगण्याचा खटाटोप करावा लागत आहे ! असो- काळाच्या उदरात अशा अनेक गोष्टी गडप झाल्या आहेत (-जाऊन पहा हवे तर !) . धनुर्विद्या शिकण्याची 'चिकाटी' बाळ एकलव्याने धरून शेवटी आपला अंगठा कसा गमावला, ते सर्वश्रुतच आहे. अशी ही असामान्य कला प्रत्येकाजवळ असतेच. परंतु त्या कलेचा आविष्कार घडवणे हे 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'    
 असल्याने तिचे स्वरूप 'डिफरंट डिफरंट' तऱ्हेने आपल्याला जाणवते !

        'अति तेथे माती' या कलेचे स्वरूप होऊ शकते. कारण चिकाटी बऱ्याच वेळेस अंगलट येते. एखादी सुंदर 'चपला' रस्त्याने चालताना दिसल्यास, चिकाटीने तिचा हव्यास धरला तर, तिने तिच्या सुरेख 'चपला' आपल्याला दाखवण्याचीच पाळी की हो !

        कलेला काही मर्यादा असतात. तद्वतच चिकाटी ऊर्फ हट्ट ऊर्फ हव्यास ऊर्फ जिद्द ही मर्यादितच बरी दिसते ! एवढे मात्र खरे की या कलियुगात ह्या कलेला खूपच 'स्कोप' आहे. कारण बेकारीची कुऱ्हाड कोसळली म्हणून रडणाऱ्यापेक्षा, वशिल्याची जबरदस्त चिकाटी धरून ओरडणाऱ्याचीच आजकाल धडगत आहे ! महत्वाकांक्षा बाळगणाऱ्याच्या अंगी चिकाटी ही अगदी जाम भिनलेली असते- जणू काही 'भ्रष्टाचार निपटून काढू !' म्हणत हटून बसलेले उमेदवारच !

        चिकाटी ही पैशासाठी, रूपासाठी, धान्यासाठी असते वा अन्य कुठल्याही कारणासाठी ती असू शकते ! 'चिक्कूपणा' हा पैशासाठी असलेला 'चिकाटी'चा एक पैलू ! 'स्वामीभक्ती' हा सेवानिष्ठ चाकराच्या चिकाटीचा एक पैलू ! 'उधळेपणा' ही नादान माणसाच्या चिकाटीची पराकोटीला पोहोचलेली अवस्था ! 'भगीरथ प्रयत्न' ही मनुष्याची प्रांजळ चिकाटी ! अशातऱ्हेने चिकाटी ही पैलूदार आहे. सोनार मुशीतून तापवलेल्या सोन्यास सांगितल्यावर हुकुमानुसार जसा आकार देतो, त्याप्रमाणे चिकाटी 'धरावी' तशी 'दाखवली' जाते !

        पाच पाच वेळा एसएससीला बसण्याची चिकाटी धरून, नापास होणाऱ्यांची वाहवा करावी तेवढी थोडीच ! 'पुढच्या खेपेला तरी लॉटरीचे बक्षीस नक्कीच मिळेल'-अशी चिकाटी धरणाऱ्या पामरांची दु:खावस्था काय वर्णावी ! पुढल्या दाराने मते नाही मिळवली तरी मागल्या दाराने मते मिळवण्याची चिकाटी दाखवावी टी उमेदवारानेच ! एक धोरण फसले तरी बोध न घेता, सगळीच धोरणे फसवण्याची चिकाटी दाखवावी ती आपल्या 'माय-बाप' सरकारनेच ! बेसुमार भाववाढ झाली तरी मूग गिळून राहण्याच्या सामान्य भारतीय जनतेच्या चिकाटीला तर जगात कोठेच तोड नसेल ! मार-बोलणी खात  पांडुरंगभक्तीत विलीन होण्याची चिकाटी धरावी ती संत तुकोबारायांनीच !

        सारांश असा की 'चिकाटी' ही जी पासष्टावी कला आहे ती इतर सर्व चौसष्ट कलांच्याहीपेक्षा सरसच आहे. आत्मा आहे तर शरीर आहे, आत्म्यावाचून शरीर शून्य आहे ! याप्रमाणे ही पासष्टावी कला चांगली अवगत असेल तर, उरलेल्या सर्व कला सहज अवगत होतील. परंतु 'चिकाटीविना सर्व व्यर्थ' आहे .

        मनुष्याचे निराशामय जीवन आशादायी बनवण्यास चिकाटी या कलेचा चांगला फायदा आहे ! आनंदी, उत्साही जीवनासाठी चिकाटी 'मस्ट' आहे ! ताटीवरून स्मशानात पोहोचलेला मनुष्यदेखील जगण्याच्या चिकाटीमुळे काहीवेळा  घरी परतला आहे ! 'धीर धरी रे धीरापोटी, असती मोठी फळे गोमटी' हे चिकाटीचेच सार आहे.

           चिकाटी धरली तर आपल्याला आज स्वस्त धान्य दुकानात माल मिळतो. चिकाटी धरली तरच, नको तिथले दारू-जुगाराचे अड्डे पोलिसांना सापडतात ! चिकाटीमुळे आपल्या सहनशीलतेचा अंतच कधी होणार नाही ! चिकाटी धराल तर तुमच्या पुढ्यातील रिकाम्या पेल्यात जगण्यासाठी अमृत मिळेल, चिकाटी सोडाल तर त्या पेल्यात भरण्यासाठी विषही मिळणार नाही !
     
                          भिंतीवर चढून जाळे विणण्याची 'एका कोळ्या'ची चिकाटी माहीत आहे ना ! तशी (- दुसऱ्याच्या हातातून पेपर घेऊन) माझा हा लेख वाचण्याची तुमची 'चिकाटी' खरोखरच दांडगी आहे हं !
.

अभिप्राय


          " हं ! काय म्हणतोय यंदाचा दिवाळी अंक ?"
          "हे काय विचारणे झाले ? अहो नुसता बेष्ट नाही, अगदी 'दी बेष्ट' आहे म्हटल !"
- आणि वाचकहो ! इथच फसलात तुम्ही ! याला कारण म्हणजे तुम्ही दिलेला 'दी बेष्ट' हा अभिप्राय ! खरोखरच जर तुमच्या हातातील अंक वाचनीय असेल तर तुम्ही मुद्दामच 'टाकाऊ' या शब्दात त्याचे वर्णन करा. म्हणजे तुमचा सहवाचक तुमच्या 'अंका'ला हातही लावणार नाही ! नाहीतर सहवाचकाची पुढीलप्रमाणे मागणी तुमच्याजवळ ठरलेली आहेच -
" अरे वा ! बेष्ट आहे म्हणता ? मग बघूच पाच मिनिटे जरा इकडे तो ! थोडा चाळून देतो !" आणि मग त्या "चाळण्या"ला पाच तास तरी कमीत कमी लागणारच !

        आजचा जमाना निव्वळ अभिप्रायावरच जगात आहे, असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ति होणार नाही ! 'उठता बसता कार्य करता' अभिप्रायाशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही . दैनिक घ्या अगर साप्ताहिक घ्या, पाक्षिक घ्या किंवा वार्षिक घेऊन पहा. त्यात कुणीतरी कशावरतरी अभिप्राय दिलेला न आढळेल तरच आश्चर्य !

        मनुष्य जन्माला येतो तो, अभिप्रायासहच ! पुढील जीवन उकडा तांदूळ , कडू साखर नि पाणीदार घासलेट यांच्याबरोबरच कंठावे लागणार आहे, हे जन्मत:च मानवाला ज्ञात झाल्याने की काय, तो भावी आयुष्याबद्दलचा आपला अभिप्राय जोरदार शंखध्वनी करून मातेजवळ सादर करतो.

        एखादा वक्ता भाषण करत असल्यास त्यावरील प्रतिक्रिया दोन प्रकारच्या अभिप्रायांनी व्यक्त झालेली दिसते. प्रकार दोन असले तरी साधन एकच ! टाळी ! भाषण खरेच चांगले असेल तर, भाषण पूर्ण होईपर्यंत श्रोते चूप असतात. भाषण संपल्यावर त्यांना उमजते की, 'आपण या भाषणाला अभिप्रायच दिले ला नाही !' - दुसऱ्याच क्षणी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने वक्त्याला पावती दिली जाते. तर दुसऱ्या प्रकारात वक्त्याचे भाषण जसजसे कंटाळवाणे होत जाते, तसतसा टाळ्यांचा गजर वारंवार होऊ लागतो ! हा वक्रोक्तिपूर्ण अभिप्राय !

        अभिप्राय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले मत, आपला कल ! गवैय्यासमोर आपली मान हलवली की, त्याला 'दाद' मिळते ! खेळांमध्ये खेळाडूना वरचेवर दिले जाणारे प्रोत्साहन म्हणजे त्यांच्या खेळाची पसंती        !

        कित्येकांना उठसूट कशावरही, कधीही व कुणाजवळही आपले मत प्रदर्शित करण्याची खोड लागून राहिलेली असते ! तुम्ही नाटकाला जा, ते सिनेमाबद्दलचे अभिप्राय तुम्हाला ऐकवतील- मग ते त्यांनी स्वत: पाहिलेले असो वा नसो ! तुमचा नवा शिवलेला शर्ट त्यांना दाखवा की, त्यांचा उद्गार ठरलेला -
" वा ! शर्ट मस्त जमलाय, पण शिलाईच जरा मार खातीय बघा ! " आपल्यालाच त्यामुळे अकारण ओशाळल्यासारखे होते !

          कधीही अभिप्राय देणारे महाभाग विलक्षणच ! गौरवसमारंभात ते एखाद्याबद्दलची स्तुती आवेशाने करतील ! तर एखाद्या प्रेतयात्रेबरोबर जात असतानाही, ते चंद्रावरून परतलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर जाण्याऐवजी, मंगळावर जाणेच का योग्य होते ? याबद्दल जोरजोराने आपला अभिप्राय पटवून देतील !

        एकाची निंदा दुसऱ्याजवळ, दुसऱ्याचे मत तिसऱ्याजवळ- अशा पळवापळवीत हे महाभाग सदैव पुढे असतात. अभिप्राय देण्यात आपले काही चुकते वा नाही याचे तारतम्य त्यांच्या गावीही नसते. त्यातल्यात्यात दोषयुक्त अभिप्राय बिनबुडाचे असतात, हे वेगळे सांगावयास हवेच का ? टीकेमधे सूर्याचे माध्यान्हीचे ऊन, तर अभिप्रायामधे पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल किरण आढळतात . टीका म्हणजे जहाल शब्दात दिला गेलेला अभिप्राय असे समजण्यास काहीच हरकत नाही.

        'नाटकातील अमुक एका व्यक्तीचा अभिनय चांगला होता'- हा झाला योग्य अभिप्राय . पण टीका करताना हेच असे सांगितले जाईल की, 'नाटकातील अमुक एका व्यक्तीच्या हालचालीत अभिनयाचा खराखुरा अकृत्रिम आविष्कार होत असल्याचा वारंवार आभास होत होता.' पतंग उंच उडत असला तरी पुन्हा त्याला उंच उडविण्यास शेपूट लावण्याची कामगिरी टीकाकार करतो !
   
    चेंडूफळीच्या खेळात टाकल्या जाणाऱ्या फसव्या चेंडूप्रमाणे अनेक फसवे अभिप्राय आजच्या भेसळ युगात आढळतात. चित्रपरीक्षण, नाट्यपरीक्षण वाचून, चित्रनाट्यशौकीनाना अनेकदा वाचलेल्या व प्रत्यक्ष अनुभवलेल्या अभिप्रायात तफावत पडलेली जाणवते.

        भरपूर जेवल्यानंतरची ढेकर, पूर्वी नभोवाणीवरील 'आपली आवड' ऐकताना न आवरणारी  जांभई किंवा झोपेतील घोरणे हे काही उत्कृष्ट अभिप्रायाचे नमुने ! सिनेमाच्या पडद्यावर ओळखीच्या  अभिनेत्याचे दर्शन घडताच, लहान पण सुजाण मुले टाळ्या पिटतात. या त्यांच्या अभिप्रायात अभिनेत्याबद्दलचे अपार प्रेम आढळते. तर सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत सुरू होते न होते तोच काही टवाळखोरांचे चुळबुळदर्शक व थेटराबाहेर पडण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांचे  अपार राष्ट्रप्रेम (?) दाखवणारे अभिप्रायच नाहीत काय !

        ग्रंथाची प्रस्तावना हा ग्रंथावरील अभिप्राय असतो. सभागृहात आढळणारे खुर्च्यांचे तुटके हात व मोडके पाय असलेली टेबले हे सभागृहात झालेल्या चर्चेवरील अभिप्रायांचे द्योतक होय ! तर साभार परत हा लेखकूला संपादकाचा अभिप्राय ! ठराव आला तर चर्चा आणि पडला तर मोर्चा - हे ठरावावरील ठराविक अभिप्राय आहेत !

        अभिप्रायाची सत्यासत्यता पटणे फार कठीण. एक प्रसंग सांगतो:
श्री. घारूअण्णा जेवावयास बसलेले आहेत. सौ.घारूअण्णा एकेक पक्वान्नाची चव कशी आहे ते विचारत आहेत. दुसरीकडे त्या एका हातात लाटणे घेऊन मांजराला दूर सारत आहेत. अशावेळेस एक विशिष्ट पक्वान्न श्री.घारूअण्णांना पसंत पडल्याने त्यांच्या तोंडून "वा वा !" हा उद्गार सहजच बाहेर पडतो. सौ.घारूअण्णांचे लक्ष तिकडे जाताच, चुकून (!) त्यांच्या हातातले लाटणे, नेमके घारूअण्णांच्या तुळतुळीत टकलावरच आदळून तेथे  एका टेंगळाचा जन्म झाला ! वाचकहो, एक गुपित म्हणजे नेमके ते पक्वान्न सौ.घारूअण्णांच्या एका शेजारणीकडून वानवळा म्हणून आलेले होते. आता सांगा की, 'खरा अभिप्राय' कुठे आढळतो !

        हे सांगणे जरा कठीणच आहे. कारण असे की, उस्फूर्तपणे तोंडून बाहेर पडलेला उद्गार हा पुष्कळदा सत्याभिप्राय शकतो, हे जितके खरे - तितकेच स्त्रीच्या हालचालीतून आढळणारा अभिप्रायही कितीकदा असत्य नसतो हे खरे ! म्हणून घारूअण्णांचा 'वा वा' हा उद्गार व त्यामुळेच (नकळत) घडून आलेली शेजारणीच्याच पक्वान्नाची स्तुती, यांचा परिणाम म्हणून त्यांच्या हातून 'लाटण्याचे निसटणे' हाही घारूअण्णावरील प्रतिक्रियात्मक नैसर्गिक अभिप्रायच म्हणावा लागेल !

        आपण रहस्यकथा वाचत असताना नायकाशी समरस होऊन ठोशास ठोसा देण्याचा पवित्रा धारण करतो. विनोदी कथा वाचताना गडबडा लोळण्याच्या बेतात येतो. एखादी रद्दी कथा वाचताना भिकार वाटली की, आपण ती दूर फेकण्याच्या बेतात येतो. हे आपल्या हालचालीतून व्यक्त होणारे 'अभिप्राय'च होत !

        'अरेरे' किंवा 'अहाहा' हे उद्गार आपण पाहिलेल्या दृश्यावरील अभिप्राय रोजच्याच जीवनात वापरावे लागणारे आहेत . आजच्या जमान्यात 'च्यायला !' हा विस्मयतादर्शक अभिप्राय आणि 'हात्तेरेकी !' हा तुच्छतादर्शक अभिप्राय खूपच रूढ झालेले आहेत.

        शरीराच्या प्रत्येक अवयवाबरोबर एकेक अभिप्राय निगडीत असतो ! त्यामुळेच मनुष्याला चैतन्य प्राप्त होते . त्याचा आळस दूर झाडण्यास मदत होते. रसिक वाचकांचा अभिप्राय न मिळता, तर तमाम लेखकांचा मुडदाच पडता !

        आता हेच पहा ना- हा सबंध लेख तुम्ही न कंटाळता वाचून काढलात . काढलात तो काढलात नि तुम्ही नाही फाडलात, आणि फाडला नाहीत- यातच अस्मादिकांना "अभिप्राय" गवसला !

.            

फुलून जाऊ विसरुन काटे . .


तुझ्या पापण्यांच्या आड
ते दडलेले सारे मोती
नको कुठेही बाहेर काढू
अमोल माझ्यासाठी किती-

ओघळेल मोत्यांची सर
माझ्या आसवात भर
तूही दु:खी मीही दु:खी
दु:खाचा ग नको पूर -


खाली मातीमोल होती
जाऊ देणार ना वाया
जपून ठेविन सारे मोती
ओंजळीत हातांच्या या -

होईल मनांचे ग मीलन
वाट जरी अवघड वाटे
दु:खानंतर येईल सुख
फुलून जाऊ विसरुन काटे . .


.

समेट

सांग साजणा, गुपित आपुले किती कसे आवरू
तू दिसता का मनात फडफडते रे फुलपाखरू -

लाली चढते गाली, ओठी गीत बघे थरथरू
कंप अनामिक देही माझ्या, सांग कसा आवरू -

आठव नुसता मनात होता, मन लागे मोहरू
प्रत्यक्षातच समोर जर तू, किती मला सावरू -

पुरे चोरट्या गाठीभेटी, उघड उभयता करू
चल, सर्वांच्या साक्षीने रे, फेरे सात धरू ..


.

सिनेमा

        मातेच्या कडेवर बसणाऱ्या बाळापासून ते काठीचा आधार घेणाऱ्या वयोवृद्धापर्यंत 'सिनेमा' हे सर्वांचे आकर्षण असते ! ज्याने 'सिनेमा' ही चीज काय असते, हे माहित करून घेतले नाही, तो प्राणीमात्र त्याच्याइतकाच दुर्दैवी !

        मनुष्य एकवेळ ऑक्सिजनविना राहू शकेल, पण सिनेमाचा विरह अगदी अशक्यप्राय ! सिनेमा ही चैनीची बाब आहे. गरीब लोकांचा 'पिच्चर' पाहण्याकडे विशेष लळा असतो. वेळप्रसंगी उपास करतील पण सिनेमासाठी थोडी पुंजी ठेवतील ! मध्यम वर्गाचे तर 'सिनेमा' हे एक मनोरंजनाचे साधन आहे. समस्त कुटुंबपरिवारासह महिन्यातून एखादा सामाजिक वा कौटुंबिक सिनेमा पाहण्याचा त्यांचा सोहळा काय वर्णावा ? श्रीमंतवर्ग तर खर्चाचा भलताच शौकिन ! जास्त पैसा खर्चण्याचे त्यांना सिनेमा हे प्रभावी(!) साधन आहे.
       
        जनतेच्या हौसेला मोल नाही ! महागाई वाढली म्हणून संप होतो, मोर्चे निघतात, दंगली माजतात, निदर्शने केली जातात ! पगार पुरत नाही म्हणून संसारात भांडणे होतात ! चिल्लर नाही म्हणून बाजारात उगाचच आरडाओरडा होतो. 'अफू खायलाही दमडा नाही' 'बेकारी शिगेला पोहोचली आहे' - असा कंठशोष होतो ! या महागाईने पोळलेली, अपुऱ्या पगारात गुजराण न करू शकणारी, पैसा जमल्यावर अफू खाऊ इच्छिणारी 'बेकार' जनता- चिल्लर जमवून सिमेमा मात्र कशी पाहू शकते, या विचाराने परमेश्वरही रात्रंदिवस  हैराण होत असावा !

        सिनेमामुळे आपल्यावर चांगला परिणाम होतो, असा एक समज आहे. 'हरे राम हरे कृष्ण'  हा देवाबद्दलचा एखादा छान सिनेमा असेल असे वाटून, शेजारच्या बंडूच्या आजोबा-आजीनी तो चक्क चोरून पहिला होता. पण नंतर त्यांच्यावर 'हाय राम'म्हणण्याची पाळी आली ! 'नावात काय आहे' असे विचारणाऱ्या, एका माजी नाटककाराला हा आजोबा-आजीचा दाखला समर्पक वाटला असता !

        सिनेमामुळे रावाचा रंक होतो व रंकाचा राव होऊ शकतो. सिनेमावर 'माया' केल्याने मायाजालातच फसून, आपली 'माया' संपुष्टात येते, हे पूर्णपणे समजण्यास काया जीर्ण होऊन, वाया जाऊ द्यावी लागते !

        बाकी सिनेमाचे वर्चस्व भलतेच आहे हं आपल्यावर ! पैज लागली की, हार जीत सिनेमानेच ठरली जाते. प्रियकर-प्रेयसीना 'सिनेमा'चा अंधारच 'प्यारा' वाटतो ! थोडा पैसा हाती खेळताच शुभारंभ 'पहिल्या दिवशी पहिला खेळ' पाहून करावा वाटतो.

        सिनेमातील 'हिरो-हिरोईन-व्हिलन' आदि मंडळीवर तमाम जनतेचे प्रेम असते. जनता प्रत्येकात स्वत:ला 'त्यापैकीच कोणीतरी' समजून सुखाचे चार क्षण कंठत असते ! सिनेमातील हीरोचे हिरोईनसह रोमान्स पाहून जनता खूष होते. ह्या जनतेत बरेचसे 'पबलीक'च असते. हिरोची व्हिलनसह दण्णादण्णी  बघून पब्लिक आपसातच दणादण दणके देऊन थेटरात दाणादाण उडवते. असल्या गमतीदार 'शिणेमा'ने पब्लिक हसून हसून पोट दुखेपर्यंत लोळते. बिचाऱ्या पब्लिकला त्यामुळे शिनेमा सुटल्यावर, राष्ट्रगीताला मान द्यायचे भान राखायचे सुचत नाही ! शिनेमा खास जनतेसाठी गाजत असतो, तर राष्ट्रगीत फक्त सरकारी नियमासाठी वाजत असते !

        हल्ली सिनेमा म्हटला की तो 'हाउस फुल' असतो. तो तसा असला की समजावे, तिकीट विक्री काळ्या बाजाराने चालू आहे ! जनतेने उगाच लांबलचक रांगेत तिष्ठत उभे राहून तिकीट विकत घेण्यापेक्षा, चारच पैसे जास्त देऊन 'अधिकृत' काळाबाजारवाल्याकडून ते घेऊन, आपला अनमोल वेळ, त्रास वाचवावा, असा शुद्ध व प्रामाणिक हेतू थेटरमालकाचा त्यावेळी असावा !

        शिवाय रांगेत उभे राहिल्याने चेंगराचेंगरी होऊन माणसे मरतात, उन्हाने चक्कर येते, खिसे कापले जातात, स्त्रियांना धक्काबुक्की होते- हे सर्व टाळण्यासाठी व काळाबाजार करणारे तिकीट विकूनच जगतात, म्हणून त्यांच्या चरितार्थाची सोय होण्यासाठी 'सिनेमा'वाले सिनेमा लगेच 'हाउस फुल' करत असावेत !

        सिनेमात काम करून पडद्यावर चमकण्याचे कित्येकांचे ध्येय असते. ध्येयाविना आयुष्य म्हणजे खुर्चीशिवाय मंत्रीच की हो ! सिनेमा पाहिल्यावर शरीराच्या सर्वांवयाना व्यायाम मिळतो. सिनेमा रद्दी असेल तर खुर्च्यांवर खुर्च्या आदळून हाताचे स्नायू पिळदार बनण्याचा संभव असतो. खुर्च्यांची बैठक लाथेने थडाथड उडवून आपल्या 'जातभाई'ची आठवण काढता येते. अस्प्रो-अनासीन-अवेदन-अमृतांजन आदि औषधे अधिकाधिक आवडू लागतात ! घरी 'कुटुंबां'मुळे झोप येत नसेल तर चार पैसे टाकून सिनेमा पाहण्याच्या निमित्ताने तीन तास निवांत घोरत येते ! स्वत: खुर्चीवर बसून नवऱ्याना थेटराबाहेर पोरे सांभाळावयास लावण्याची, बायकांना 'सिनेमा' ही तर अपूर्व संधीच असते !

        सिनेमा चांगला असेल तर खूप लोक सिनेमा बघतात. मग सरकारलाही त्यामुळे खूपच 'करमणूक कर' मिळतो. अशा रीतीने सिनेमा काढणारे खूष, पाहणारे खूष, सरकारही खूष ! मग काय- त्या खुशीत चार काळा बाजारवालेही खूष केले गेले तर कुठे बिघडते ! त्यानी खुषीने 'खुषी' दिली की, बंदोबस्तवालेही खूष !

        सिनेमा हे जाहीरातीचेही प्रभावी साधन आहे ! पूर्वी लाल त्रिकोणाची, कुटुंबनियोजनाची जाहिरात किती कौशल्याने दिग्दर्शक करत होते ! (अंदरकी बात तुमच्या-आमच्यातच राहू द्या !). सिनेमाद्वारे लोकांना बोध मिळतो- 'डबड्या 'त जाऊन तमाशा पहावा, पण 'हाऊस फुल्ल'च्या सिनेमाला कधी जाऊ नये म्हणून ! सिनेमामुळे मनोरंजन होते- डोअरकीपर, सायकलस्टँडवाले व मध्यंतरात लुडबुड करणारे यांचे ! सिनेमा सुटल्यावर भसाड्या व खराब आवाजातल्या ध्वनीमुद्रिका ऐकवून व ते राष्ट्रगीत समजून पडद्यावर एखादा उलटा झेंडा दाखवणाऱ्या थेटरम्यानेजराचे कौतुक करावेसे वाटते !
.