ह्या पुणेकरांचे...



ह्या पुणेकरांचे 
काही खरे नाही ...

सदोदित दुसऱ्यालाच 
शिस्तीचे धडे 
कायम दुसऱ्यांचे वाभाडे 

आपल्याखाली जळतय काय 
कुणाला पहायला वेळच नाही 

एवढया एवढ्याशा पोरापोरीपासून 
ते थेट मसणात गवऱ्या पोचणाऱ्या म्हातारीपर्यंत..... 

..... सारे टपलेले सिग्नल तोडायला 

पण ,
दुसऱ्यांनी तोडलेला दिसला रे दिसला 
की ह्यांची गावभर बोंब सुरूच !

............... जाऊ द्या 

आपल्याला काय करायचे आहे म्हणा 
आपण पुण्यात चार दिसाचा पाहुणा 

पोलिसाचे लक्ष नाही
 माझ्याकडे 
तोवर मनातले तुम्हाला सांगून 
मोकळा झालो बघा -

अजूनही त्याचे लक्ष आणि लक्ष्य 
इकडे नाही तोवर दाम्टावी आपली गाडी ,

लाल सिग्नल तोडून
त्या नो एन्ट्रीच्या बोळात !

काहीही म्हणा राव,
वाण नाही 
पण पुणेरी गुण
कसा 
पट्कन आत्मसात होतोच बघा ! 
.

ग बाई गेला टँकर कुणीकडे ...



पाणीच पाणी चहूकडे ... ग बाई गेला टँकर कुणीकडे ...


कार्यकर्ता घाईघाईत नेत्याजवळ येऊन म्हणाला -


" आपली दुष्काळ दौऱ्यावर निघायची वेळ झाली आहे , 


निघायचं ना आता ?

तुम्ही डुलकी घेत आहात म्हणून विचारतोय, साहेब ! "



नेता त्याच्याकडे पहात उत्तरला -


" अरे ज्याला तू डुलकी समजतोस,


 ती माझ्या मनांत चाललेली काळजी आहे !

त्या भागात न्यायच्या पाण्याच्या आपल्या टँकरचा-


कुठ्ला दर फायदेशीर आहे, 


त्याचा विचार करत होतो मी ! "


.

अरे बिल्डर बिल्डर ....





अरे बिल्डर बिल्डर 

किती फोडशी डोंगर -

वनराई जाई वाया

निसर्गाचा रे जागर !




अरे बिल्डर बिल्डर 

किती तुझा अविचार ,

पैशापायी हकनाक 

बळी घेशी रे हजार !




अरे बिल्डर बिल्डर 

किती झालास नीडर  ;

जीव गेले हकनाक 

तुझा तोरा तरीही झ्याक !




अरे बिल्डर बिल्डर 

एखादा करी विचार ....

सर्व सोयी पाहुनिया 

खूष ग्राहक होणार !


.

सुट्टी



           शिशुशाळेत जाणाऱ्या अजाण बालकापासून ते दुकानदारी करणाऱ्या सुजाण मालकापर्यंत- सर्वांना हवीशी वाटणारी "सुट्टी",  ही मनाला विरंगुळा देणारी अफलातून बाब आहे !

          'मला हे नको, मला ते नको'- असे चिकित्सक वृत्तीने प्रत्येक बाबतीत गरजणारी स्त्री 'स्वयंपाकाला सुट्टी हवी कां ?' असे पतिराजाने विचारताच चट्कन 'होकार'  देऊन मोकळी का होत असेल बरे !

        केशकर्तनालयाचा धंदा, सराफाचा धंदा, किराणा दुकानाचा धंदा, कपडे विक्रेत्याचा धंदा बघा-  प्रत्येक ठिकाणी सुट्टी आहेच ! कुठल्याही धंद्याला सुरुवात करण्याआधीच, आपल्याला सोयीनुसार आणि कायद्याने देखील आठवड्यातून एक दिवस 'सुट्टीचा दिवस' म्हणून ठरवावा लागतो. सुट्टीचा दिवस उपभोगू न शकणारा दुर्दैवी मनुष्य प्राणी या भूतलावर क्वचितच आढळेल ! सुट्टीला काळाचे बंधन नाही. ती क्षणैक असू शकते वा अनंत काळाची चिरकाल असू शकते !

          परवा दूरच्या एका नातेवाईकास मी एका दवाखान्यात भेटायला गेलो होतो. बिचारा दुखण्याने अगदी जर्जर झाला होता . 
मी त्याला विचारले - 
"काय महाराज, दुखण्याला सुट्टी वगैरे काही द्यायचा विचार आहे की नाही मनांत  ? "
त्यावर विनोदाने (माझाच नातेवाईक ना !) तो उत्तरला -
"त्या परमेश्वराला तरी सुट्टी हवी ना , माझ्या दुखण्याच्या सुट्टीचा विचार करत बसायला !"

          या भूतलाच्या छत्रावर एकटा परमेश्वरच दुर्दैवाने जिवंत असेल, जो सुट्टीचे महत्व जाणत नसेल ! आपण 'दिवाळीची सुट्टी'  उपभोगतो. 'दिवाळीची सुट्टी'-  या दोन शब्दांचा विचार केल्यास, सुट्टीमुळे दिवाळीला महत्व आहे कां, दिवाळीमुळे सुट्टीला ? आपल्याला असे दिसून येईल की, सुट्टीमुळेच निश्चित दिवाळीला महत्व प्राप्त झालेले आहे ! 

          "सुट्टी" नसती तर ऐन दिवाळीतच आपल्याला शिमग्याचा सण साजरा करावा लागला असता. कारण पावसाळ्यानंतर हीच सुट्टी सर्वात  जास्त काळाची असते. बहीणभावांची भेट याच काळात होते. फराळाच्या निमित्ताने मित्रमंडळी याच काळात एकत्र जमतात. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. दिवाळसणानिमित्त जावईबापूना भेटवस्तूचा लाभ होतो. या सुट्टीचा फायदा घेऊन, एखादी तरुणी आपल्यामागे हात धुवून लागणाऱ्या तरुणास 'भाऊराया' असे भाऊबिजेनिमित्त संबोधून, त्याचा 'मामा' बनवू शकते. आणि सुट्टीतील रम्य मधुचंद्राच्या कल्पना-सरोवरात डुंबणाऱ्या बिचाऱ्या त्या तरुणाच्या मनोराज्याला अर्धचंद्र मिळतो !

          त्यानंतर महत्व आहे ते म्हणजे 'उन्हाळी सुट्टी'ला ! ही खरी बाळगोपाळांची सुट्टी ! 'पळती झाडे पहात' बेटे मस्त मजेत 'मामाच्या गावाला' निघतात. मुलांच्या पाठोपाठ या सुट्टीचा आस्वाद घेणारी ती  मास्तरमंडळी ! हां हां म्हणता म्हणता, वार्षिक परीक्षेच्या पेपर तपासणीच्या गठ्ठ्यानी, ती आपली सुट्टीची विकेट पार सीमापार उडवून लावतात !

          माणसाला मरेस्तोवर कष्ट करावे लागतात. हे कष्टाचे जाळे सुखदु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. हे जाळे व्यवस्थितपणे विणण्याचे साधन म्हणजे 'सुट्टी' ! सुट्टीच्या सहाय्याने माणूस टप्प्याटप्प्याने प्रगतीपथावर घोडदौड करू शकतो. सुट्टी आहे म्हणून जीवनात राम आहे, जीव आहे. जीवनातील सुट्टीच्या अतुलनीय स्थानाचे महत्व मी तुम्हाला लिहून सांगू शकणार नाही आणि वाचूनही तुम्हाला ते कळणार नाही. अहो, सुट्टीशिवाय जीवन म्हणजे बघा...म्हणजे...अं अं.... फराळाशिवायच दिवाळी समजा  की हो !     

          कोणतेही काम 'पूर्ण' करायचे असल्यास, ते काम अधूनमधून 'अपूर्ण' ठेवावे लागते. मधे सुट्टी घेतली की, ते काम व्यवस्थित पार पडत जाते. त्या कामाला चालना मिळालेली असते. 'काम चालू, रस्ता बंद'ची पाटी वाचली की, आपण समजू शकतो-
 'काय चालू आणि काय बंद' आहे ते ! 

          ही 'सुट्टी'ची प्रथा पार पुरातनकालापासून चालत आलेली असावी ! आजोळी गेलेला भरत रामाला भेटायला, उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी गाठून येत असावा. दुष्यंत राजा देखील रविवारची सुट्टी गाठून शिकारीला गेलेला असताना, रविवारच्या सुट्टीची मौज आपल्या सख्यांसह मनमुराद लुटणाऱ्या शकुंतलेची शिकार बनला असेल ना !

      सुट्टीची प्रथा अंमलात आणणाऱ्या महाभागाचे कौतुक, करावे तेवढे थोडेच आहे ! आपल्या मायबाप सरकारने सुट्टीचे महत्व चांगले जाणले आहे. महिन्यातील दुसऱ्या आणि चवथ्या/पाचव्या शनिवारी सुट्टी सुरू करून, सरकारी कामकाज व्यवस्थेत किती आमूलाग्र बदल घडवला आहे ते आपण पाहतोच ना ! मी तर असे सुचवीन की, आठवड्यातले सातही दिवस सुट्टी जाहीर करावी ! काय हरकत आहे हो ? सर्व कर्मचारी बंधू नेहमी ताजेतवाने रहातील. आपल्या 'छोटया कुटुंबा'समवेत ते वेळ मजेत घालवतील. अशारीतीने ते सदासतेज रहातील. सदा उत्साही राहिल्याने 'आराम हराम है'- हे वचन त्यांना तरी पचनी पडेल. (सरकारला कुठलीच गोष्ट रुचत नाही पचत नाही !) जास्त सुट्टी मिळाल्याने, विश्रांती घेण्याच्या कामाचा वेग निश्चितच वाढेल !

          माणसाला जीवनात बदल हा हवाच असतो. एका गोष्टीला 'बगल' देऊन तो दुसऱ्या गोष्टीत 'बदल' घडवत असतो. घरातल्या कामात एखादी मोलकरीण त्रास देत असेल, तर तिला 'कायमची सुट्टी' देऊन दुसरी मोलकरीण कामासाठी आपल्या घरात आणली जाते. एखादी फ्याशन जुनी झाली की, तिला आपोआप सुट्टी मिळून, नवीन फ्याशन अस्तित्वात येते. 

          सुट्टीची सवय लहानपणापासूनच लागते. सवय म्हणण्यापेक्षा चटक किंवा लळा हे शब्द जास्त योग्य ठरतील ! लघवीची सुट्टी, मधली सुट्टी, खेळाची सुट्टी- हे विद्यार्थी जीवनातील महत्वाच्या घडामोडीचे प्रसंग ! शनिवारची अर्धी सुट्टी, महिनाअखेरची अर्धी सुट्टी- हे विद्यार्थी दशेतले आवडते प्रकार !  एखादी व्यक्ती निधन पावल्यास, दुखवट्यापेक्षा नंतर मिळणारी सुट्टी जास्त आनंददायक वाटते ! मृत व्यक्तीला 'कायमची सुट्टी' मिळालेली असते- तर आपल्याला तिच्यामुळे थोडी तरी सुट्टी मिळावी, अशीच दुखवट्यामागची भावना असते !  

          सुट्टीचा आनंद हाच खरा जीवनातला आनंद. थकल्याभागलेल्या आपल्या जिवाला विश्रांतीमुळे बदल मिळतो. बंधमुक्त जीवन आपण सुट्टीच्या काळात उपभोगू शकतो, जगू शकतो. खरे तर सरकारला मुदतवाढ, नगरपालिकेला करवाढ, व्यापाऱ्याला भाववाढ, सिनेमा-नाटकवाल्यांना दरवाढ जशी आवश्यक वाटते, तशी आमजनतेला सुट्टीवाढ का आवश्यक वाटू नये हो !        

              " आजपर्यंत जगात ज्या काही थोर महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यापैकी xxx  म्हणजे "- अशाप्रकारचे व्याख्यान केवळ  "सुट्टी"मुळे देता येते. फुल्यातल्या व्यक्तीची आपण आदरपूर्वक जयंती/पुण्यतिथी साजरी करतो. सुट्टीच नसती तर जयंती/पुण्यतिथी कशी काय साजरी करणार  आपण ?  वेळ कधी मिळणार आपल्याला ! सुट्टी मिळते, म्हणून व्याख्यान द्यायला वेळ मिळतो- तर सुट्टी मिळते, म्हणून ते ऐकायला वेळ मिळतो. 

          त्या एका रविवारच्या सुट्टीमुळेतर आपल्याला इतर वारांची नावे लक्षात ठेवायला वेळ मिळतो. एक दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीमुळे आपले जीवन एक दिवस सुखी होत असते. 

          पुढाऱ्यांची जयंती/पुण्यतिथी, लहानमोठे सणवार, महत्वाच्या घडामोडींचे दिवस, अमुकदिन तमुकदिन वगैरे- केवळ सुट्टीमुळे लक्षात ठेवता येतात ! 

          दिवस उगवतो आणि उगवल्यामुळे मावळतो. पण सुट्टीचा दिवस तो सुट्टीचाच दिवस ! तो एखादाच असतो. म्हणून म्हणावेसे वाटते -              " सुट्टीत खरोखर जग जगते ! " 

          तरी बरे.... आजचा सुट्टीचा दिवस मी- 'सुट्टी' हा शब्द, 'सुटी' असा लिहावा, का 'सुट् टी ' असा लिहावा, का 'सुट्टी' असाच लिहावा; ह्या मतभेदाना चव्हाट्यावर आणण्याच्या विचारास पूर्ण सुट्टी दिलेली आहे ! 
.

अनुभव


" नको असलेले पाहुणे, शेवटी त्यांच्या गावी रवाना झाले आणि आमच्या जिवात जीव आला ! "

       - ही काय भानगड आहे, ते समजण्यास 'अनुभव' घ्यायलाच हवा ! 'पाहुणे ' ही गोष्ट वास्तविक सर्वाना हवी वाटणारी आहे. कारण ते थोडेच दिवस रहातात, बहुधा बरोबर साखर- तांदूळ आणतात आणि जाताना मुलांच्या हातावर खाऊही ठेवतात !

               पण अनेक दिवस मुक्काम थकणारा, 'माझे नाही तर माझ्या काकाचे घर' मानणारा, मोकळ्या हाताने व रिकाम्या खिशानेच दुसऱ्यांच्या घरात वावरणारा असा-  ' पाहुणा' नामक प्राणी दिसला की,  आमचे धाबे दणाणते बुवा ! असल्या पाहुण्यांचा अनुभव फारच भयानक असतो . ' कधी एकदाचा तो कटतोय' अशी वाट पहातच,  त्याची उत्तम बडदास्त राखण्याचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडणारा, हाच खरा 'नटसम्राट' कसा, ते अनुभावानेच तुम्हाला समजेल !

               तर सांगायचा मुद्दा हा की, आजकाल अनुभवाचा जमाना आहे. टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय आणि बऱ्यावाईट  अनुभवांची शिदोरी जवळ बाळगल्याशिवाय मानवाला आपल्या आयुष्याचा रथ हाकताच येणार नाही ! अनुभवी असणे,  हाच आजच्या युगाचा आदर्श आहे. परदेशी जाऊन स्वदेशी परत आलेल्या मानवास पहिला प्रश्न पत्रकार विचारतात, तो हाच की, " आपल्याला ह्या दौऱ्यात काय काय अनुभव आले ? " ज्याचे अनुभव अधिक, त्याला भाव अधिक मिळतो. तुम्हाला म्हणणं पटतंय कां पहा ! जरा सविस्तरच सांगतो हं -

               एका वर्तमानपत्रातली ही जाहिरात पहा- " उमेदवार पाहिजे ! शिक्षणाची अट वगैरे पुढीलप्रमाणे - उमेदवार कमीतकमी पी एच डी असावा, किंवा काहीच न शिकलेला असल्यास किमान ३० वर्षाचा त्याला कामाचा अनुभव असावा ! " आहे की नाही कम्माल ?  'एक सुप्रशिक्षित उमेदवार आणि एक अशिक्षित पण अनुभवी  उमेदवार' यात अडाण्याचाच गाडा पुढे रेटला जातोय की नाही ?  कशामुळे हो ?

                आजीबाईजवळ अनुभवांच्या गोष्टींचा बटवा असल्यामुळे,  लहान मुले  तिच्याचभोवती गोळा होतात ना ! अनेक भलेबुरे अनुभव घेऊनच पुष्कळ संशोधक चांगल्या नावारूपास येतात. शिक्षणाला  अनुभवाची जोड असणे,  म्हणजे सुगंधी सोने सापडण्याचा अनुभव घेण्यासारखेच  !

               अनेक मुलाखती देऊन पदवीधर उमेदवार अनुभवाने पुढे येऊ शकतो.  खूप वधुपरीक्षेतून तावून  सुलाखून म्हणजेच अनुभव घेऊन एखादी तरुणी उत्तम गृहिणी बनू शकते !  मुलींसाठी आपली पादत्राणे झिजवणारा वधुपिता आपल्या अनुभवामुळेच दुसऱ्यांना "लाल त्रिकोण" दाखवण्यास क्वालिफ़ाईड ठरतो .

               आयुष्याचे सार अनुभवांमधे एकवटलेले आढळते. अनुभवांच्या ठेचा बसून मनुष्याला शहाणपणा येतो.  "एकवार अनुभव हीच यशाची खात्री" देणारे, शेवटी यशाला कात्रीही लावतात, ही गोष्ट अनुभवानेच कळते !  दारावरचे अनेक फिरते विक्रेते असे यशाला कात्री लावणारे दिसतात. विद्यार्थ्याना पुच्छगतीने प्रगतीपथावर नेणारे काही "अनुभवी" मार्गदर्शक  आपल्याला गाईडसवर विराजमान झालेले दिसतात. अर्थात स्वत:ला आलेल्या काही खास अनुभवाने विद्यार्थीही "अनुभवी" होऊन वरील अनुभवांपासून चार हात दूर रहातात.  ही पण एक झलक- अनुभवाचीच !

               लग्नसमारम्भाप्रसंगी याद्या-बैठका-कोठी यासाठी अनुभवी माणसे अनुभव असणाऱ्यानाच का नियुक्त करतात, ते अनुभव आल्याशिवाय नाहीच उमजणार ! अनुभवी तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवाशांना कसे अगदी अचूक "सावज" म्हणून हेरतात, हे पाहण्यासाठी एकदा अनुभवच घ्यायला हवा ! अनुभवांच्या अनेक पेडानी जीवनाचा दोरखंड मजबूत होत जातो ! वाईट अनुभवांती माणूस चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतो, तर चांगल्या गोष्टी अनुभवणारा माणूस वाममार्गाचा अनुभवही घेऊ इच्छितो. अनुभव हे असे दुहेरी हत्यार आहे !

              भरबाजारात सर्वांच्या समोर घसरून पडण्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का कधी ? मद्द्याची चव अनुभवानेच कळते, असे म्हणतात. पण एखाद्या मद्द्यप्याला नको तिथे, नको तसे लोळताना पाहिल्यावर कुणाला बरे तसल्या अनुभवाचे अप्रूप वाटेल ?  दुसऱ्याला आलेल्या अनुभवापासून आपल्याला कोणता अनुभव येईल, हे अनुभवानेच ज्ञात झाले पाहिजे !

               अनुभवाबरोबर भाव जास्त खाता येतो, याचा मलाही अनुभव आलेला आहे. माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी "बॉस"ने एक आकडेतक्ता मला टंकलिखित करायला सांगितला होता. त्यात काहीतरी गफलत असल्याची शंका आल्याने मी बॉसला तसे म्हटले.  तर थंडीने कुडकुडणार्‍या दातांप्रमाणे तो उसळला - " हे पहा मिष्टर टायपिष्ट ! तुमच्यापेक्षा चार पावसाळे (- का पैसे ! ) मी जास्तच खाल्लेत, तेव्हां माझ्या चुका काढत बसू नका ! " बॉसने चार पावसाळ्याचा अनुभव पाठीशी जास्त घेतल्याने आणि मी नोकरीत पूर्ण अननुभवी असल्याने, मी निमूटपणे परत फिरलो. बॉसचा हा पहिलाच अनुभव माझ्या भावी कारकीर्दीला फार अनुभवी ठरला !

               गिऱ्हाईकापासून येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांती दुकानदार शहाणा होऊ शकतो. माणसाच्या प्रत्येक पावलागणिक अनुभव त्याला पुढे पुढे ढकलत असतो. "अनुभवी हो" असे नुसते म्हटल्याने, अनुभवी होता येत नाही,  तो प्रत्यक्ष घ्यावाच लागतो !  कंडक्टर -प्रवासी, वकील-अशील, डॉक्टर-पेशंट , विक्रेता-ग्राहक ह्या सगळ्या जोड्या  एकमेकांच्या सहवासातच एकापेक्षा एक अनुभवाने वरचढ होतात !

               माझ्यामते सर्वात अनुभवी कोण असेल तर तो म्हणजे साडी विक्रेता ! आशा निराशेच्या हिंदोळ्यावर, त्याला चोखंदळ स्त्री-ग्राहकांचे अनुभव घेत झुलावे लागते. त्यांच्या चंचल स्वभावाचे प्रत्यंतर, तो हरघडीला अनुभवत असतो. शंभर  साड्यातून महिलावर्गाची रंगाबाबत चिकित्सा, त्यांचे  काठपदरांविषयी पसंती-नापसंतीचे चीत्कार, त्या डीझाईन्सबद्दल हजारो हुंकार आणि सरतेशेवटी शंभरातील एकाही साडीची पसंती नसण्याचा उद्गार ऐकणे-  म्हणजे त्या विक्रेत्याच्या सहनशीलतेचा अंतच की हो ! पण अनुभवाने तोही सोशिक बनतो ना !  " ही नको ती - ती नको तिच्या पलीकडची -" ह्या असल्या कोलाहलात, त्याला अनुभवाने रममाण व्हावेच लागते.  शिवाय साड्यांचा तो भलामोठा उत्तुंग डोंगर रचून, त्यातून तळाशी असलेलीच साडी नेमकी एखाद्या विशालकाय पुरंध्रीने  निवडताच ...., पुन्हा दर भाव ह्यांची घासाघीस- त्या विक्रेत्याला स्वस्थ चित्ताने ऐकून घ्यावी लागते !  स्त्रियांच्या स्वभावाला मनोभावे शरण जाऊन, अनुभवाने स्थितप्रज्ञ राहू शकणाऱ्या अशा त्या अनुभवी विक्रेत्याची धन्य होय !                      

                 थेटरापाशी चालू असलेल्या काळ्याबाजारातले तिकीट निर्भीडपणे घेण्यास, अनुभव लागतो. रेशनच्या रांगेत आपला नंबर येताच- साखर व धान्य संपण्याचा दु:खद निराशेचा क्षण अनुभवण्यातले थ्रिल काही वेगळेच ! नेहमी नापास होणाऱ्याला, एखादेवेळी पास होण्याचा आनंद अनुभवल्याखेरीज पुढे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली   गवसणार नाही.

              रुळलेल्या चाकोरीतून वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न म्हणजे " अनुभव ! "    धाडसाने अनुभव येतात आणि अनुभव आले की माणूस धाडसी बनू शकतो !
.

हाल कैसा है जनाबका ----- !


सकाळचा चहा म्हणजे,

बायकोबरोबर काल शिळ्या वाटलेल्या


यथेच्छ गप्पाटप्पा - 


आज ताज्यातवान्या करायची संधी !




विषय एका जुन्या मित्राच्या नव्या लग्नाचा निघाला ...




बोलता बोलता मी म्हणालो -



" किती हालात दिवस काढले होते बिचाऱ्याने !


आठवले की अजून अंगावर काटा येतो.


बरे झाले आता दोनाचे चार झाले.

सुखाचे दिवस पहायला मिळतील त्याला आता ! "




बायको शांतपणे उद्गारली -


" लग्न आत्तातर झालेय ना ?


खरे हाल आता सुरू होतील बघा ! "




मी रिकाम्या कपबशा आत नेत असताना....



बायको फेसबुकावर लॉगिन करत होती !!!


.


तो - ती - आणि चिमटा


आमचे लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस .

ती माझ्यासाठी,
 रोज एक नवीन पदार्थ करण्यात गुंग असायची !
आत्तादेखील "हजार पाकक्रिया"चे पुस्तक समोर ठेवूनच तिचा स्वैपाक शांत चित्ताने चाललेला ! 


  मी तेव्हा नवोदित, उगवता, होतकरू कवी-लेखक .
लिखाणात, वाचनात अतिशय मग्न असायचो.
काळवेळेचेही भान नसायचे मला .
आपण बरे - आपले वाचन बरे - आणि आपले लेखन बरे -
हेच माझे विश्व !

..... स्वैपाक करता करता मधेच 
ती मला म्हणाली -
" अहो, चिमटा घेता का जरा ! "

  मी आपली मान वर न करता,
एक प्रकारच्या धुंदीत वाचता वाचताच विचारले -

" कुठे ? "

ती फिस्कारली -
" कुठे म्हणून काय विचारताय ! 
तुमचं आपलं काहीतरीच !
काळवेळ तरी काही...
 कळते का नाही ?
माझ्या एका हातात तिम्बलेली ही कणिक आहे आणि-
 दुसऱ्या हातात पोळी लाटलेला हा पोळपाट आहे.
कणकीत थोडे तेल सोडायचे होते...
दूध उतू जात आहे, ते पातेले खाली उतरायचे आहे.
म्हणून तो ग्यासजवळ असलेला...
चिमटा घ्या म्हटले मी ! "

.

चडफड अति अंतरात...




माझ्या संगतीत राहून,

बायको इतकी बिलंदर झाली असेल, 

असे वाटले नव्हते हो मुळीच !



कालचीच गोष्ट सांगतो  .....



दुपारी  बायकोने मला  तीनचार वेळा पुकारले तरी,

लिखाण अर्धवट कशाला सोडावे, अशा उद्देशाने मी जाणून बुजूनच थोडेसे 

दुर्लक्ष केले होते.


संध्याकाळी ती मला म्हणाली -

"अहो, त्या शेजारच्या वहिनीनी तुम्हाला बोलावले आहे . काही तरी काम

 आहे म्हणे तुमच्याकडे . "


 ब्यांकेच काहीतरी एखादं महत्वाचं कामबीम असेल,

म्हणून मी पट्कन शेजारी जाऊन आलो...........!


घरात पाऊल टाकल्यावर बायको उद्गारली -

" ह्यापी एप्रिल फूल, मिष्टर ! 

मी बोलावले तर,

तुम्हाला एक सेकंद वेळ मिळत नाही ना ?

पण इतरासाठी कसा काय वेळ मिळतो हो तुम्हाला ! "



चडफडत बसण्याखेरीज आता मी दुसर काय करणार होतो !

.


काट्यात रमणाऱ्या फुला तू -





काट्यात रमणाऱ्या फुला तू -


असाच ऐटीत फुलत रहा तू ! 


काट्यासवेही मिरवलास तू 


कठोर असा कोमल कसा तू -


ना खंत ना चिंता करशी तू 


दु:खास निमूट कवटाळशी तू !


आनंदलो मी, दिसताच मज तू


माझी उद्याची पहाट बघ तू -


क्षणैक जीवन जगलास जरि तू


सुगंध ठेवुन मिटलास परि तू - 


हसत फुलावे शिकवलेस तू 


फुलुन मरावे ठसवलेस तू - 


मनास माझ्या फुलवताच तू 


आदर्श माझा ठरलास रे तू ! 


.

एप्रिल फूल





त्याने बायकोला बजावले -

" लवकर तयार हो. 
आज आपण मस्तपैकी हॉटेलात जेवायला जाऊ...
 आणि तिथून परस्पर एखादा छानपैकी चित्रपट पाहू .....!

नवऱ्याने बजावून देखील -
 ती स्वैपाकघरात,
 निवांतपणे...
 स्वैपाकाच्या तयारीला लागलेली आहे !

कारण .......

तिला ठाऊक आहे, 
तो रोज आपल्याला बनवतोच.... 

आज तर त्याचा हक्काचा 'एप्रिल फूल'चा दिवस ! 
.